शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निदान पहिल्या दोन पिढ्यांना उपभोगी , सुखवस्तू जीवन जगण्यास अवधीच मिळणार नाही. याच दृष्टीने शिवकालीन हिंदवी स्वराज्याची पहिली पन्नास वर्षे कशी गेली , याची बेरीज वजाबाकी योग्य तुलनेने आपण केली पाहिजे. आजच्या आपल्या स्वराज्याची गेल्या पन्नास वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती निश्चित झाली आहे. पण गती मात्र कमी पडली , अन् पडत आहे हेही उघड आहे. याकरता इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला पाहिजे. अशा अभ्यासासाठी शिवकाळात साधने फारच कमी होती. दळणवळण तर फारच अवघड होते. महाराजांची मानसिकता सूक्ष्मपणे लक्षात घेतली , तर असे वाटते की , युरोपीय प्रगत वैज्ञानिक देशांचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी आपली माणसे नक्की पाठविली असती. हा तर्क मी साधार करीत आहे. पाहा पटतो का! मराठी आरमार युरोपियनांच्या आरमारापेक्षाही सुसज्ज आणि बलाढ्य असावे असा त्यांचा सतत जागता प्रयत्न दिसून येतो. माझ्या तर्कातील हा एक महत्त्वाचा टप्पा.
राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली. हो , तयारी सुमारे वर्षभर आधी सुरू झाली. याच काळात पण प्रारंभी एक प्रकरण घडले. एक अध्यात्ममार्गी सत्पुरुष रायगडावरती आले. ते स्वत: होऊन आलेले दिसतात. त्यांना महाराजांनी मुद्दाम बोलावून घेतलेले दिसत नाही. यांचे नाव निश्चलपुरी गोसावी. त्यांच्याबरोबर थोडाफार शिष्यसमुदायही होता. त्यात गोविंदभट्ट बवेर् या नावाचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले शिष्यही होते. त्यांनी राज्याभिषेकपूर्व रायगडावरील निश्चलपुरी गोसावी यांचे वास्तव्य आणि त्यात घडलेल्या घटना एक गंथ संस्कृतमध्ये लिहून नमूद केल्या आहेत. या ग्रंथाचे नाव , ‘ राज्याभिषेक कल्पतरू. ‘
रायगडावर आल्यावर निश्चलपुरींना दिसून आले की , गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. हे निश्चलपुरी स्वत: पारमाथिर्क साधक होते. ते तांत्रिक होते. म्हणजे मंत्र , तंत्र , उतारे , पशु बलिदान इत्यादी मार्गांनी त्यांची तांत्रिक योगसाधना असे. त्यांच्या मनांत एक कल्पना अशी आली की , शिवाजी महाराजांनी आपला संकल्पित राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने करून घेऊ नये , तर तो तांत्रिक पद्धतीने करून घ्यावा.
महाराज , राज्योपाध्ये बाळंभट्ट आवीर्कर आणि वेदमूतीर् गागाभट्ट यांच्या मनात सहज स्वाभाविक विचार होता की , प्राचीन काळापासून परंपरेने रघुराजा , प्रभू रामचंद , युधिष्ठिर इत्यादी महान राजपुरुषांना , महान ऋषीमुनींनी ज्या वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केले , त्याच परंपरेप्रमाणे राजगडावरील हा राज्याभिषेक सोहाळा व्हावा. पण निश्चलपुरींना हे मान्य नव्हते. त्यांनी महाराजांना सतत आग्रहाने म्हटले की , ‘ मी सांगतो त्याच पद्धतीने म्हणजेच तांत्रिक पद्धतीने तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. ‘
महाराजांना हे उगीचच धर्मसंकट पुढे आले. पण वाद न घालता महाराजांनी यात अगदी शांत , विचारी भूमिका ठेवली. प्राचीन पुण्यश्लोकराजपुरुषांचा आणि तपस्वी ऋषींचा मार्ग अवलंबायाचा की , हा तांत्रिक मार्ग स्वीकारावयाचा हा प्रश्ान् त्यांच्यापुढे होता.
महाराजांनी गागाभट्टांच्या प्राचीन वैदिक परंपरेप्रमाणेच हा राज्याभिषेकाचा राज्यसंस्कार स्वीकारावयाचे ठरविले. पण या सुमारे सात आठ महिन्यांच्या कालखंडात त्यांनी निश्चलपुरींचा थोडासुद्धा अवमान केला नाही. अतिशय आदरानेच ते त्यांच्याशी वागले. याच कालखंडात प्रतापराव गुजर सरसेनापती यांचा नेसरीच्या खिंडीत युद्धात मृत्यू घडला.( दि. २४ फेब्रु. १६७४ ) महाराज अतिशय दु:खी झाले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले , ‘ महाराज , ही घटना म्हणजे नियतीने तुम्हाला दिलेला इशारा आहे. सरसेनापतीचा मृत्यु म्हणजे अपशकुनच आहे , तरी तुम्ही माझ्याच पद्धतीने हा राज्याभिषेक करा. ‘
महाराजांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण तयारी मात्र चालू होती. तशीच चालू ठेवली.
पुढच्याच महिन्यात दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब , काशीबाईसाहेब या अचानक मृत्यू पावल्या. याहीवेळी निश्चलपुरींनी महाराजांना ‘ हा अपशकुन आहे , अजूनही विचार करा ‘ असा इशारा दिला , तरीही महाराज शांतच राहिले. पुढे तर किरकोळ अपशकुनांची मालिका त्यांचेकडून महाराजांपुढे येत गेली. एके दिवशी गडावरील राजप्रासादाला मधमाश्यांचे आग्यामोहोळ लागले. हाही त्यांना अपशकुन वाटला. दुसऱ्या एका दिवशी आभाळात पक्ष्यांचा थवा उडत चाललेला पाहून त्यांनी महाराजांना म्हटले की , या मार्गाने हे पक्षी उडत जाणे हे अपशकुनी आहे. अर्थात महाराज मात्र शांतच आणि असेच अपशकुन ते मांडीत राहिले. त्यांनी सांगितलेला शेवटचा अपशकुन असा. एका होमहवनाचे प्रसंगी महाराज होमापुढे बसले होते. मंत्र चालू होते. महाराजांचे राजोपाध्याय बाळंभट्ट हे तेथेच बसले होते. एवढ्यात अचानक वरच्या पटईला ( सिलिंगला) असलेल्या नक्षीतील एक लहानसे लाकडी कमळ निसटले आणि ते राजोपाध्यायांच्या तोंडावरच पडले. त्यांना जरा भोवळ आली. थोडेसे लागले. पण धामिर्क कार्यक्रम चालूच राहिले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले की , ‘ हा अपशकुन आहे. अजूनही विचार करा आणि हे वैदिक सोहळे थांबवून माझ्या सूचनेप्रमाणे सर्व करा. ‘
पण तरीही महाराज शांतच राहिले. सर्व विधी , संस्कार आणि राज्याभिषेक सोहळा पूर्ण पार पडला. महाराज छत्रपती झाले.
निश्चलपुरी आपल्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे फारच नाराज झाले आणि नंतर महाराजांना म्हणाले , ‘ तुम्ही माझे ऐकले नाहीत. हा तुमचा राज्याभिषेक अशास्त्रीय झाला आहे. तुम्हाला लौकरच त्याचे प्रत्यंतर येईल. ‘ असे म्हणून निश्चलपुरी रायगडावरून निघून गेले. हे प्रकरण आपणापुढे थोडक्यात पण नेमके विषयबद्ध सांगितले आहे. पण आपणही याचा अभ्यास करावा. या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. समकालीन ‘ राज्याभिषेक कल्पतरू ‘ हा गोविंदभट्ट बवेर् यांचा गंथही उपलब्ध आहे. शिवाय अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. या सर्वांचा आपण अभ्यास करून आपले मत ठरवावे.
महाराजांच्या या प्रकरणातील भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटते ? मला मात्र असे वाटते की , महाराजांच्या मनात निश्चलपुरींनाही नाराज करावयाचे नसावे. प्राचीन परंपरेप्रमाणे राज्याभिषेक करावा आणि नंतर वेगळ्या मुहूर्तावर निश्चलपुरी यांच्या म्हणण्याप्रमाणे तांत्रिक राज्यभिषेकसुद्धा करून टाकावा , असे वाटते. कारण तसा तांत्रिक राज्याभिषेक नंतर दि. २४ सप्टेंबर १६७४ , अश्विन शुुद्ध पंचमी या दिवशी महाराजांनी याच निश्चलपुरींकडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रायगडावर करवून घेतला. हा तांत्रिक विधी तसा फार थोड्या वेळातच पूर्ण झाला. निश्चलपुरींनाही बरे वाटले. पण दुसऱ्याच दिवशी (दि. २५ सप्टेंबर) प्रतापगडावर आकाशातून वीज कोसळली आणि एक हत्ती आणि काही घोडे या घाताने मरण पावले. यावर निश्चलपुरी काय म्हणाले ते इतिहासाला माहीत नाही. आपणास काय वाटते ?
-बाबासाहेब पुरंदरे