शिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा
काल आपण हिरा गौळणीची ‘ कथा ‘ ऐकलीत. उपलब्ध असलेल्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दप्तरखान्यात जपलेल्या रुमालांत ‘ हिरकणीचा कडा ‘, ‘ हिरकणी बुरुज ‘, ‘ हिरकणीचा पहारा ,’ इत्यादी शब्द असलेली अक्षरश: शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही हिरा गवळणीची हकीगत वास्तव असावी , असे दिसून येते.
महाराजांनी , हिरा गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली , त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार , खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला.
गिर्यारोहण करणाऱ्या युवायुवतींना ही हिरा गवळण कायमची पेरणादायी ठरली आहे. ऐतिहासिक आख्यायिकाही किती प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात , त्याचा हा अनुभव आहे.
रायगडाच्या एकूण बांधकामावरती विजापूरच्या आदिलशाही बांधकामाचा (वास्तु-स्थापत्य कामाचा) खूपच परिणाम दिसून येतो. मेडोज टेलर यांनी इ.स. १८८५ मध्ये लिहिलेला ‘ विजापूर आर्ट अॅण्ड आकिर्टेक्चर ‘ हा ग्रंथ जरूर पाहावा आणि रायगडचाही अभ्यास अभ्यासकांनी करावा.
रायगडाचं ऐतिहासिक , भौगोलिक , सांस्कृतिक आणि गनिमी काव्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्व किती मोठे आहे. हे आमच्या लोकांना कधीच समजले नाही. छत्रपती शकर्कत्या शिवाजीमहाराजांच्या राजधानीचा म्हणजे ‘ तख्ताचा जागा ‘ रायगड पेशवाईत इ.स. १७ 3 ४ पासून १८१८ पर्यंत केवळ अडगळीत पडला होता. त्याचे महत्त्व पेशव्यांना काहीच वाटले नाही. या कालखंडात सातारा , कोल्हापूर , तंजावर येथील प्रत्यक्ष राजघराण्यातील एकही व्यक्ती रायगडावर आली नाही. तसेच एकही पेशवासुद्धा आला नाही. रायगड म्हणजे राजकीय कैदी ठेवण्याचा केवळ तुरुंग ठरला. अखेरच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या विधवा पत्नीला या रायगडावर कैदेत ठेवले होते. तिचे नाव श्रीमंत यशोदाबाईसाहेब. त्या रायगडावर अकरा डिसेंबर १८११ या दिवशी मृत्यू पावल्या. भडाग्नी देऊन त्यांचे गडावर दहन करण्यात आले. बस्स! एवढाच पेशवे घराण्याचा अन् रायगडाचा सुतकसंबंध. साडेतीन शहण्यातला प्रख्यात मुत्सद्दी शहाणा सखाराम बापू बोकील हाही बारभाईंच्या कारकीदीर्त रायगडावर तुरुंगात होता. त्याचाही मृत्यू येथेच झाला. एकूण रायगड तो स्वर्गास बहुत जवळ ठरला ?
रायगड इ.स. १७ 3 ४ पासून इ.स. १८१८ , ९ मेपर्यंत मराठी सत्तेखाली होता. आश्चर्य म्हणजे रायगडावर याच काळात राजसभेच्या भव्य महालांत सिंहासनाच्या डाव्या उजव्या बाजूस विटांचे हौद बांधण्यात आले. (ते आजही शिल्लक आहेत.) त्या हौदात धान्य भरून ठेवीत. म्हणजेच प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला , त्या राजसभा मंदिराचे धान्याचे कोठार बनवले गेले. वास्तविक या राजसभेचे एक स्वातंत्र्यदेवतेचे मंदिर म्हणून वैभवसंपन्न असे प्रेरणादायी स्मारक म्हणून मराठी सत्ताधीशांनी जपणूक करावयास हवी होती. पण त्यांनी गडाचा बनवला तुरुंग आणि राजसिंहासन सभेचे बनवले गोदाम. संपूर्ण शिवचरित्राकडेच पेशवाईत दुर्लक्ष झाले ; तिथे एका रायगडाची काय कथा ? राज्यकारभार , युद्धपद्धती , अष्टप्रधान पद्धती , आरमार , परराष्ट्रनीती , स्वराज्यानिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्रधर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही. मग अभ्यास कुठला ? त्याचे आचरण कुठले ?
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका असामान्य मानवाचे चरित्र नाही. ती एक राष्ट्रधर्माची , राष्ट्रीय चरित्र्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे. ती आम्ही गुंडाळून ठेवली. आजही आम्ही काही वेगळे वागतो आहोत का ? मिरवणुकी , गुलाल , वर्गण्या , जयजयकार , अन् पुतळेच पुतळे , याशिवाय काही करतो आहोत का ?
रायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद इ.स. १७९८ च्या काळात नाना फडणवीसांनी केला. त्यांनी महाराजांच्या राजसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली. नंदादीप , पूजा , कीर्तन , त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले.
पेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात ते ही बंद पडले. नगाऱ्यावर अखेरची टिपरी पडली. आमचे राष्ट्रीय चलनवलनच संपले. आम्ही ‘ कोमा ‘ त गेलो. जिवंत असूनही मेलो.
रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.
रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.
पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.
शिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनांत पुन्हा शिलगावली गेली. नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही. कुठे सापडत नाही. पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सौंगड्यांनिशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता , ‘ ज्ञान मिळवा. अभ्यास करा. ज्ञानाविण मति गेली , गती गेली , सर्वस्व गेलं. दारिद्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो , लेकीसुनांनो तुम्हीही शिका , फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो , कष्टासाठी अन् पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. ‘
या महात्म्याने शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीतीर् आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा जणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले. ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले , ती तारीख सापडत नाही. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीणोर्द्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले.
- बाबासाहेब पुरंदरे