शिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…
आग्र्याच्या दरबारात एकामागोमाग होत गेलेले अपमान आणि त्यातल्यात्यात आपल्या सामनेसामने एका पराभूत जसवंतसिंहाचा केलेला सन्मान पाहून महाराजांना आपला अपमान अतिशय असह्य वाटला. ते रागाने लाल झाले. रामसिंगला त्यांनी तिथल्यातिथेच दरडावून विचारले , ‘ हा सारा कसला प्रकार चालविला आहे ? अपमान! याच्यापेक्षा मृत्यू परवडला. मी मराठा आहे.
हे मी सहन करणार नाही ‘ आणि महाराजांनी एकदम दरबाराकडे पाठ फिरविली. शंभूराजांसह ते झपझपझप आपल्या जागेवरून वळले आणि शाही सरदारांच्या मागच्या बाजूस गेले. संतापामुळे त्यांना जरा चक्कर आली. ते जमिनीवरच बसले. दरबारात एकच खळबळ उडाली. खळबळ म्हणजे कुजबुज. अत्यंत अदबीने बादशाहाची आदब सांभाळीत आणि महाराजांच्या बेगुमान , उद्धट , रानटी वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करीत ही कुजबुज उर्फ खळबळ चालू होती. ज्या दरबारात शिंक आली तर ती सुद्धा अत्यंत अदबीने शिंकायची , तिथे शिवाजीराजे वाघासारखे चवताळून मोठमोठ्याने या अपमानांचा निषेध करीत असलेले पाहून हे सगळे शाही सरदार अत्यंत बेचैन झाले होते.
बादशाह मात्र शांतपणे समोरचा आरडाओरडा ऐकत होता आणि असे जणू काही भासवीत होता की , आपण उत्तर ध्रुवावर असून , ही मराठी खळबळ दक्षिण ध्रुवावर कुठेतरी चालू आहे. त्याने अकिलखानास संथपणे फर्मावले , ‘ अकील , वह देखो , सीवाकी त्यौंरीयाँ क्यू चढ गयी है ?’ अकीलखान पुढच्या रांगेतून निघून महाराजांपाशी थोड्या अंतरावर पोहोचला. तेव्हा त्याला महाराजांचे शब्द कानी पडले , ‘ मला दरबारात उभं करता ? मी काय तुमचा नोकर आहे ? मी तुमचा पाहुणा. मला साधी खिलतही दिली जात नाही ?’
रामसिंग तरी काय बोलणार ? तोही अखेर शाही गुलामच. तो एवढंच म्हणाला. ‘ महाराज , बादशाहांची प्रतिष्ठा बिघडते आहे. आपण रागावू नका , आपल्या जागेवर परत चला. ‘
महाराजांनी हे साफ नाकारले. रामसिंग म्हणाला , ‘ महाराज याचे दुष्परिणाम होतील. बादशाह नाराज होतील. ‘
हे सर्व बोलणे हिंदीतून चालले होते. अकीलने परत जाऊन बादशाहास म्हटले की , ‘ खिलत न दिल्यामुळे शिवाजीराजे नाराज झाले आहेत. ‘ तेव्हा बादशाहाने अकीलबरोबरच नवीन खिलतीचे ताट महाराजांकडे पाठविले. अकीलने ताट पुढे करताच महाराज कडाडले , ‘ मी तुमच्या बादशाहाची खिलत झिडकारतो. ‘
खरं म्हणजे महाराजांचे सगळे बोलणे बादशाहाला नक्कीच ऐकू जात होते. तो काय समजायचे ते समजून गेला होता. मराठी रक्त लाव्हारसासारखे उसळलेले सारा दरबारच पहात होता. मराठी रक्ताला मान खाली घालून अपमान सहन करण्याची सवयच नाही. ( नव्हती)
रानटी जनावराप्रमाणे राजे संतापले आहेत , असे अकीलने बादशाहास सांगितले. तेव्हा त्याने रामसिंगला समोर बोलावले आणि आज्ञा दिली , ‘ रामसिंग , शिवाजीराजांवर गुलाबपाणी शिंपडा आणि त्यांना मुक्कामावर घेऊन जा. ‘
गुलाबपाणी शिंपडून महाराष्ट्राचा संताप आणि अपमान शांत होणार होता काय ? रामसिंगने महाराजांना संभाजीराजांसह दरबारातून नेले. महाराजांनीही बादशाहाकडे वळूनसुद्धा पाहिले नाही. भेटून जाणे तर दूरच.
कालपासून घडत असलेल्या या सर्व अपमानकारक घटनांचा परिणाम अगदी स्पष्ट आत्ताच दिसत होता. तो म्हणजे ज्या हेतूने मिर्झाराजांनी हे शिव- औरंगजेब भेटीचे महाकठीण राजकारण जुळवून आणले त्याला औरंगजेबाने सुरुंगच लावला. दरबारातून मुक्कामावर पोहोचेपर्यंत महाराज वा रामसिंग काहीच बोलले नाहीत. पोहोचल्यावर रामसिंग एवढेच म्हणाला की , ‘ महाराज , आपण एवढं रागवावयास नको होतं ‘ तेव्हा महाराज एकदम म्हणाले , ‘ तुमच्या बादशाहास काही रीतरिवाज समजतात का , पाहुण्याशी कसं वागायचं ते ?’
मग रामसिंग आपल्या वाड्यात निघून गेला. त्याच्या वाड्याच्या विशाल प्रांगणातच अनेक तंबू ठोकून महाराजांसह सर्वांची राहण्याची व्यवस्था या छावणीत करण्यात आली होती. महाराजांचा खास शामियाना स्वतंत्र होता. म्हणजेच त्यांची राहण्याची व्यवस्था इमारतीत नव्हती , तर ती या छावणीत होती.
आपण फार अडचणीत येऊन पडलो आहोत , आता याचा परिणाम काय होणार हे त्यांना नेमके जाणवत नव्हते. झालेला प्रकार वाईट होता. पण तो सर्वस्वी औरंगजेबानेच मुद्दाम घडवून आणला होता. खरेतर औरंगजेबाचेच यांत नुकसान होणार होते. अशा विक्षिप्त राजकारणाला आणि गजकर्णाला औषध नसते. फक्त असते खाज आणि आग.
हा पहिला दिवस. १२ मे १६६६ . तो दिवस व रात्र नंतर शांतच गेली. पण सर्वांचीच मने अशांत होती. दुसऱ्या दिवशी महाराज आपल्या सर्व सैन्यानिशी म्हणजे सुमारे तीनशे मावळ्यांनिशी आग्रा शहरात फेरफटका मारावयास निघाले. एका हत्तीवर ते आरुढ झाले होते. पुढच्या एका हत्तीवर भगवा झेंडा फडकत होता. शंभूराजे बरोबर होते. ऐन शहरातून महाराज फेरफटका मारून आले. बहुदा ते देवदर्शनासही यावेळी गेले असावेत. पण तशी नोंद नाही. ताजमहाल बघायला गेल्याचीही नोंद नाही. महाराजांच्या तोंडी ताजमहालचा कुठे उल्लेख आल्याचीही नोंद नाही.
महाराज आग्ऱ्यात प्रथम प्रवेशले तेव्हा ते आणि युवराज शंभूराजे कसे तेजस्वी आणि अस्सल राजपुतांसारखे दिसत होते याचे वर्णन परकालदास नावाच्या रामसिंगच्या एका सेवकाने एका पत्रात लिहिले आहे. हे पत्र अप्रतिम आहे. त्यात महाराजांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट उमटले आहे. १ 3 मे रोजी मधूनमधून रामसिंग आपल्या प्रांगणातल्या शामियान्यात महाराजांना भेटून गेला. औरंगजेबाचे काही काही सरदार असेच भेटून गेले. हे सर्व औपचारिक पण सुसंस्कृतपणे घडत होते. महाराजही त्यांच्याशी शांतपणे बोलत होते. पण एक गोष्ट महाराजांना स्पष्ट लक्षात आली होती की , आपल्यावर बादशाहाची सक्त नजर आहे. येथून एकदम निसटून पसार होणे आत्ता शक्य नाही. पण प्रत्यक्ष आघात करून महाराजांना बेड्या घालणे किंवा ठार मारणे असे धाडस औरंगजेबाला करणे अवघडच होते.
समजा तसे काही त्याने केले असते , तर ? तर रामसिंग आणि काही थोडे राजपूत चिडले असते का ? तशी भीती तरी बादशाहाला नक्कीच वाटत होती. कारण रामसिंग हा आपल्या बापाइतकाच तुळशीबेलाच्या शपथेला बांधील होता. राजपुताचा शब्द म्हणजे ‘ प्राण जाय पर वचन न जाय ‘ असा लौकीक सर्वत्र होता. त्याची धास्ती त्याला होती. म्हणून तो भडकलेला पण वर्तनात शांत असा राहिला होता. शाही कुटुंबातील त्याची बहीण जहाँआरा , मामी , मावशी , इतर नातलग आणि अनेक सरदार ‘ तो ‘ दरबार संपल्यापासून औरंगजेबाला आग्रह करकरून म्हणत होते की ‘ सीवाने भयंकर वर्तन करून आपला अपमान केला आहे. आपण त्याला ठारच मारा. ‘ पण बादशाह कोणताही अभिप्राय व्यक्त न करता त्याला ठार कसे मारता येईल याचा विचार करीत होता. बादशाहाला आणखी एका प्रकारची भीती वाटत होती , असे वाटते.
ती म्हणजे शुजाची. बादशाहाने आपल्या भावांचा काटा काढला होता. दारा व मुराद यांना ठार केले होते , पण शुजा हा भाऊ भूमिगत झाला होता. तो सापडत नव्हता. वेळोवेळी चोरट्या बातम्या उठत की , शुजा गुप्तरितीने बंडाची तयारी करीत आहे. तो एक दिवस दिल्लीवर चालून येणार. या जरी ऐकीव अफवा होत्या तरी औरंगजेबाला त्याची धास्ती होतीच. शिवाजीराजाचे निमित्त घडून जर राजपूत सरदार या शुजाला सामील झाले तर ते फारच महागात पडेल असे स्पष्ट दिसत होते. बादशाह या संबंधात बोलत नव्हता पण तशी भीती त्याला नक्कीच वाटत होती. म्हणून शिवाजीराजाला वेगळ्या पद्धतीने खलास करण्याची कारस्थाने त्याच्या डोक्यात घुमत होती. चारच दिवसानंतर म्हणजे दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला! आता ?
- बाबासाहेब पुरंदरे