शिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.
शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं! राष्ट्रीय चारित्र्य। नॅशनल करेक्टर। हे असेल तर यशकीतीर्चे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारख्या कर्दनकाळ वैऱ्यालाही दाखवून दिलं की , हा शिवाजीराजा मरण पावला तरीही इथं हजारो शिवाजीराजेच उभे असतील ते न वाकता , लाचारीने न झुकता , भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस- पंचवीस वर्ष झुंजत राहतील. ते सारे शिवाजी वाकणारही नाहीत , अन् मोडणारही नाहीत. त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तख्त दुभंगेल.
हेच शिवराष्ट्रीय अन् महाराष्ट्रधमीर्य आमचं कर्तृत्त्व आणि आमची आकांक्षा , पुढच्या इतिहासात साक्षात , प्रत्ययास आली नाही का ? आलीच! हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नये. हे लेणं आम्ही कधीही हरवून बसता कामा नये. माझ्या कुमार नातवंडांनो , मी हे महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘ आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ‘ हे सदर मांडतोय , ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच. छत्रपती शिवाजीमहाराजांचे असंख्य , उदात्त , उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच या चरित्राचा उपयोग. नुसतेच पुतळे अन् नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत. निजीर्व आहेत.
अफझलखानच्यास्वारीमुळे महाराजांचे शतपैलू नेतृत्त्व आणि त्यांच्या शिलेदारांचे शतपैलू कर्तृत्त्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्ययास येतेय. या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगडसारखा गड निवडला. प्रतापगड म्हणजे जणू विधात्यानेच रचून ठेवलेला सह्यादीतील अत्यंत बिकट चक्रव्यूहच. महाराजांचा सह्यादीच्या नैसगिर्क रचनेचा , म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येते. अर्थात केवळ जावळी प्रतापगडच काय , पण अवघ्या कोकण , सह्यादी , समुद , मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता. येथील नद्या , निबिड अरण्ये , दऱ्याखोरी , पश्चिम समुद , पठारे आणि अशा अवघ्या मराठी मुलुखातील माणसंही त्यांनी अचूक हेरली होती. त्यांच्या सैन्यात कोकणातील जवान होते अन् त्या दूरवरच्या चंदपुरी गोंडवनातील गोडंही होते. सारेच होते उघड्या शरीराचे , निधड्या छातीचे , अन् कडव्या इमानाचे।
अफझलखान प्रयत्न करीत होता अशा या निबिड चक्रव्यूहातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकून आणण्याचा. त्याचे याबाबतीतील सर्व डाव वाया गेले.
महाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आरखडा आखला जात होता. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकीत होते. विजापुराहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेचदार डाव टाकले. भावनेला डिवचले. चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळात कुठेही प्रतिहल्ले केले नाहीत. ठाणी जाईपर्यंत ती राखण्याची शिकस्त केली. पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितले , ‘ ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात प्रयत्न करू नका.
‘ या काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाही. खानाला या काळात महाराजांनी कधीही पत्र वा राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला नाही. अगदी गप्प राहिले. झडप घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो , डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान बुचकळ्यातच पडला होता. या शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा त्याला थांगपत्ताही लागत नव्हता. पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या प्रतापगडावर पाठविले. महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर पत्रही दिले होते. खानाची अशी दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड बोलणी होती की , ‘ प्रतापगडाहून आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल व्हा ,’ म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या घशात येऊन पडा.
हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन् कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने. शरणागतीच्या भाषेत.
या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी आणि तत्परतेने केली. याचवेळी राजापूरच्या बंदरात , कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती. जर युद्ध भडकले आणि कोकणात पसरले तर अफझलखानाला या गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर खानाची छावणी , पुणे , सातारा , कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत होता. ही किमया महाराजांच्या वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची.
या साऱ्याचा परिणाम ? पराभव कुणाचा ?
-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे