Get it on Google Play
Download on the App Store

प्रसंग ५

"खालि येई नारायणा" या आईच्या करुणोद्गाराने नारायण क्षणभर बावरला. त्याला काय करावे हे न सुचल्याने मनाची थोडी चलबिचल झाली. पण दुसर्‍याच क्षणी त्याने निर्णय घेतला आणि मायापाश तोडून तत्काळ दुसर्‍या वृक्षावर उडी मारली. दुसर्‍यावरून तिसर्‍यावर, तिथून चौथ्यावर असे करीत नारायण क्षणभरत दिसेनासा झाला. प्रभू रामचंद्रांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले होते त्या पंचवटी क्षेत्राकडे नारायण गेला. नाशिकशेजारी टाकळी गावात निवान्त ठिकाणी राहावे आणि गोदावरी नंदिनी संगमात उभे राहून तेरा कोटी रामनाम जप व गायत्री पुरःश्चरण करावे असा नारायणाने निश्चय केला. सूर्योदयापासून मध्यान्हकाळापर्यंत कमरेइतक्या पाण्यात उभे राहून अनुष्ठानास सुरवात केली. नंतर मधुकरी मागण्यासाठी नारायण पंचवटीत येत असे. मधुकरीचा श्रीरामाला नैवेद्य दाखवून प्रसाद भक्षण करावा असा क्रम अखंड बारा वर्षे चालू होता. 'बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा" या वचनाप्रमाणे नारायणाने खडतर तपश्चर्या केली. प्रभू रामचंद्रानी नारायणाला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि कृष्णातीरी जावयास सांगितले. नारायणाबद्दल ज्याला त्याला उत्कंठा आणि ओढ उत्पन्न झाली. आणि प्रत्येकाच्या मनात एकसारखा एकच विचार येऊ लागला, "कोण हा तेजस्वी ब्राह्मण."

कोण हा तेजस्वी ब्राह्मण

करितसे तपाचरण दारुण ॥ध्रु०॥

रोज प्रभाती मजला दिसतो

गोदावरिच्या जली उभा तो

सूर्य उगवता अर्घ्यचि देतो

माध्यान्हीला घरी जाउनी

भिक्षेचे जेवण ॥१॥

दोन प्रहरि ग्रंथांचे वाचन

स्वये करितसे संतत लेखन

प्रभुरायाचे निशिदिन चिंतन

रात्री जाउनि राउळामधे

करित श्रवण कीर्तन ॥२॥

अंगावरती वस्त्रे भगवी

शोभून दिसे तरुण तपस्वी

विनम्र वृत्ती सदा लाघवी

ब्रह्मचर्य अन्‌ गौरकाय ते

कांतिमान यौवन ॥३॥

जटाभार मस्तकी शोभला

जाणतेपणा मुखी विलसला

अवनीवर जणु मुनि अवतरला

वर्षामागुनि वर्षे गेली

तरि न कळे हा कोण ॥४॥

निवास याचा सदा पंचवटी

तपाचरण हा करि गोदातटि

प्रभु रामासम आकृति गोमटि

एकांतामधि नित्य राहतो

करित प्रभू चिंतन ॥५॥