संग्रह ९
१०१.
महा पुण्याची पुण्यनगरी, पुणे नगरीला नऊ नऊ पेठा, नऊ नऊ पेठांना नऊ नऊ वेशी, नऊ नऊ वेशींना नऊ नऊ बुरुज, नऊ नऊ बुरुजांना नऊ नऊ करंड, नऊ नऊ करंडयावर नऊ नऊ मोर, नऊ नऊ मोरांना नऊ नऊ तुरे, एवढया तुर्यांची गणती करा, पुणे नगरीचा नवस खरा, पाचशे रुपयाचा मानपान जावयाला करा नाहीतर माग फिरा.
१०२.
लगीन ठरल धोगावला, सोयरा जोडला कुंडलतला, गुळभात केलाय बुरजाला, जाती टाकल्याती कुंभारगावला, गव्हाच सामान पळसाला, मांडव घातला कोल्हापूरला, छत दिलाय बोरगावला, कमानी काढल्यात ताकारीला, गाडयाचा तांडा तडसारला, यीनीच भांडण चिंचणीला, वाजरती वाजीवत्यानी पंढरपूरला, चक्यार आलय थोरल्या मदुदाला, आरतीवर घागर कटपाळ्याला, वर बाप चुकून गेला कुरंदवाडला, नवरा निगाला शिवरभाला, वळ जांबूळणीच्या रानाला, घोडा ईसारला कापूसखेडला, कुरवली चुकून आली निमसोडाला, आरतीच भांडण ईकळ्याला, चितळी मायाणी पैल्या पंगतीला, वाडाय चालल्या नागवाडीला, पंगती पडल्यात्या भाळवणीला, ईस्तार्या टाकत्याती हिंगणगावाला, पुरण देत्याती रायगावाला, भात वाडत्याती पुसावळीला, कुंडली म्हणत्याती कंळबीला, बेंडबाज्या वाजतूया औंधाला, पाणी काय तापतय ल्हासूर्ण्याला, कळस घातल्याती येतगावाला, पाट टाकल्याती खेराडयाला, नवरा नवरी पाणी न्हात्याती आळ्याला, औषद उडतया कडीपूरला, हंडे पेटवल्याती तुपारीला, परकास पडलाय शिरटयाला, लग्न लागत्याती तारनांदगावला, शास भरत्याती कोरेगावला वया बांधल्याती साकळ्याला, गोपा खेळतूया लोणंदला, वराड चालत्या वाई देशाला न् रुखवत उघडाय लावताय तुमी हित आमाला.
१०३.
पाऊस आला झीरीमीरी, चिखल झाला सरासरी मूठ धरली चाडयावरी, कोळपन केली खुरप्यावरी, काडणी काडली इळ्यावरी, पेंढया बांधल्या मेंढीवरी, गोळा केल द्ड्डावरी, आसेगाव नगरी, भवतन डगरी, डगरीवर बुराज, बुरजावर बळी, बळीच्या नाकात नथ, नथीचे मोती किती, मोत्याची गणती करा, रुखवत उघडताना x x x रावांच नाव घेते अबदागिरी धरा.
१०४.
आला रुखवत, रुखवतात होता चहाचा कप, जावई म्हणतो मला पाहू द्या तिच रुप, सासू म्हणते अगोदर द्या तिला तूप मग पहा तिचे रुप.
१०५.
आला आला रुखवत, रुखवतात होता पेढा, व्याही म्हणतो मला हवा दहा हजाराचा जोडा, विहीन म्हणते नवरा नवरीचा जमला जोडा, कुरवली म्हणते तुमचे राहूद्या सर्व बाजूला मला आधी जेवायला वाढा.
१०६.
आला आला रुखवत, रुखवतावर होता खडा आन् भावजी आमचा पखालीचा जोडा.
१०७.
आला आला रुखवत रुखवतावर होती करपी पोळी, विहीन म्हणते मला शिवा जुन्या खणाची चोळी, व्याही म्हणतो शिवीन येत्या दिवाळी तर रुसावयाची आली मेव्हणीवर पाळी.
१०८.
आला आला रुखवत मांडवाचे दारी, लाडू कमी म्हणून व्याही करी मारामारी, विहीन म्हणते नका करू मारामारी, उद्या होईल त्यांची बरोबरी मग खाऊ सर्वजण शिरापुरी.
१०९.
आला आला रुखवत, रुखवतावर टाकल गोळ, म्हवळाच वर्हाड उकिरडयावर लोळ. आला आला रुखवत, रुखवतावर टाकली गाजर, आता उघडून बघते तर दिसला विठ्ठ्लरखुमाईचा बाजार.
११०.
खळ्याच्या काठी मदनाची पाटी यीनीबाई रुसल्या सागुतीसाठी.
१११.
आला आला रुखवत, रुखवतावर टाकले पेढे, आता रुसले आमचे वेडे.
११२.
आला आला रुखवत, रुखवतावर टाकली नोट, विहीणबाई मागतात जाकीट आणि कोट.
११३.
आला आला रुखवत, रुखवतावर होती केळी, आत उघडून बघतात तो दशरथाची बाळी.
११४.
आला आला रुखवत, रुखवतावर होता पेढा, आमची लेक शहाणी नवरदेव आहे वेडा.
११५.
आला आला रुखवत, रुखवतावर होती आरती, आत उघडून बघते तर शंकरपार्वती.