संग्रह ३
३१.
मांडवाच्या दारी विहीण चालली झुरझुरा, वाट नाही डोंगर फोडा, तोंड धुवायला मोठा हांडा, हांडा पुरेना रांजण मांडा, दांत घासायला दिला वासा, वासा पुरेना तुळई तासा, तोंड धुवुन बसली जेवायला, बारा पायलीच्या केल्या शेवया, पोट नाही भरल जावया, बारा पायलीच्या केल्या तेलच्या विहीण म्हणते कालच्या, बारा पायलीच्या असतील त्या घ्या न्हाईतर वाटा धरा बघु सोईच्या.
३२.
मांडवाच्या दारी पिवळ झाल माझ बोट, रुखवत उघडताना नवर्या बाळाला लावा हळदीच बोट.
३३.
मांडवाच्या दारी पिवळ झाली माझी चोळी, रुखवत उघडायला बोलवा माझ्या नवर्या बाळाची करवली.
३४.
पुर्या विहीण म्हणते झाल्या झुरझुर्या, वारा पायलीच्या केल्या रोठ्या, विहीण म्हणते लहान मोठया, बारा पायलीच्या केल्या वडया विहीण म्हणते तिखट झाल्या धोडया, बारा मणांचा केला भात, विहीणीन आखडला हात, बारा शेर खाल्लं तूप, विहीण म्हणते मला आलं नाही रुप, बारा खणांची शिवली चोळी, चौदा तोळ्याची घातली ठुशी, मग विहीणी आणि व्याही झाले खुशी.
३५.
आला आला रुखवत त्यावर ठेवली विळती
नवर्याची करवली कोंबडीसंग खेळती.
३६.
आला आला रुखवत त्यावर होत खोबर्याच भकाल
रुखवत नेता नेता उसळल गुरवाच टकाल.
३७.
बागणीपासून कुंडलवाडीपर्यंत पेरले जवस
कुंडलवाडीच्या लोकांनी बागणीचा मिळावा नवरा म्हणून केला नवस.
३८.
आला आला रुखवत त्यावर होतं दावं
अमक्या आम्ही नवरा केलेला तुम्हाला वो काय ठाव?
३९.
आला आला रुखवत त्यावर होती भेंडी,
नवरीची करवली चोंबडी मेंढी.
४०.
आला आला रुखवत त्यावर होती कढी,
विहीणबाई आत उघडून बघती तर होती तपकीरीची पूडी.
४१.
आला आला रुखवत त्यावर होता आंबा,
रुखवत उघडती रंभा.
४२.
आला आला रुखवत त्यावर होती केळीची फणी,
रुखवताचा आणा घालणारी लयी दिसतीया शहाणी.
४३.
आला आला रुखवत आळी बोळांनी
विहीणबाईंचा कान खाल्ला टोळांनी.
४४.
आला आला रुखवत दणाणल जोत,
आत उघडून बघते तर होत साखरेच पोत.
४५.
आला आला रुखवत त्यावर होती कांद्याची पात,
रुखवत चांगला आणा नाहीतर नवर्या मुलाच भांडायला हाय लई खात.
४६.
आला आला रुखवत जाई जुईचा,
आयाबायांनो काही बोलू नका रुखवत माझ्या आईचा.
४७.
आला आला रुखवत त्यावर ठेवली झारी,
विहीणबाईला खोट बोलण्याची सवय भारी.
४८.
आला आला रुखवत रामाच्या सीतेचा,
विहीणबाईला नाद आहे पोथी ऐकायचा.
४९.
आला आला रुखवत त्यावर होता मोर,
नवरा नवरी चंद्राची कोर.
५०.
आला आला रुखवत, त्यात आळ राखेच,
विहीणबाई हळूच बसा पातळ आहे लोकाच.