Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६

७१.

आला आला रुखवत, रुखवतावर गाजर, आत उघडून बघा तर विठ्‌ठल रुक्मिणीचा बाजार.

७२.

आला आला रुखवत, रुखवतावर पान आत उघडून बघा तर राम लक्ष्मणाच धनुष्य बाण.

७३.

आला आला रुखवत, रुखवतावर कात आत उघडून बघा तर, मुंगी पैठणचा एकनाथ.

७४.

आला आला रुखवत, रुखवतावर तुरी, आत उघडून बघा तर, सीता जानकी मंदोदरी. आला आला रुखवत, रुखवतावर मोत्यांची जाळी, आत उघडून बघा तर सावता माळी. मांडवाच्य दारी बांधली गाई, आत उघडून बघा तर रामाची आई. काळ्या रानी पेरला हरभरा, तिणी वावरला खाली उरला काडीमोडा त्याचा बांधला, भारा, तो नेला नंदूरच्या बाजारात, त्याला आला रुपया. रुपया मोडला सोयरा जोडला तिथ, एक आणा खर्च केला. आणे राहीले पंधरा, ईवायाचा बैल गेला बंदरा, तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले तेरा, बहिणीला घेतला डेरा. आणे उरले बारा खाण्यास घेतला कांद्याचा भारा. आणे उरले अकरा. इवायाच्या शेतात होता डावरा. तिथ घेतला बकरा तर तिथ एक आणा खर्च केला, आणे राहिले दहा, आला विहीणीचा बा, त्यांना केला शेला पागुटा, तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले नऊ. आला विहीणीचा भाऊ त्याला आणली पान सुपारी, तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले आठ बहीणीला घेतला रहाट, तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले सात, विहीणीच्या राहटाचे मोडले चाक. तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले सहा, विहीण रुसली, कोणात बसली तिला केली चोळी कांकन, तिथ एक आणा खर्च केला आणे उरले पाच, आणला कळवातणीचा नाच. तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले चार, आल्या विहीणीच्या बहिणी चार. त्या रुसल्या, त्यांना केले जेवण. तिथ एक आणा खर्च केला. आणे उरले दोन, आली विहीणीची कुणाची कोण, तर ती रुसली, घेतल पातळ, तिथ एक आणा खर्च केला, आता आणा उरला एक तर सांगते ऐका उखाणा घालणारी आहे वाखरीकराची लेक.

७५.

मांडवाच्या दारी ठेवली पेढयाची परात, नामदेवाचे लग्न झाले बेदरीन् पंढरपूरी निघाली वरात. विठ्‌ठलाच्या रावळी सोन्याची गाई, त्यांचा दर्शनाला आली रामाची आई. सोन्याच्या गाईचे पिवळे पाय, जरीचा पीतांबर नेसली रामाची माय.

७६.

मांडवाच्या दारी टाकली सेन्नी, नवर्‍याची कुरवली शुक्राची चांदणी. विहीण होती कुंदी, नेसली चिंदी, धुतली केव्हा राजवाडीच तळ बांधल तेव्हा. राजवाडीच तळ बांधल परवा, विहीण नेसली पितांबर हिरवा, पितांबराला लागला वासा, लागला कसा तो वाजंत्र्याला पुसा.

७७.

आला आला रुखवत मांडवाच्या दारी, रुखवतावर कुंकवाचा पुडा, ईन मागती चिंतामणी घोडा. चिंतामनी घोडयाची चाल हालकी, ईन मानती पालखी. पालखीला चांदीचा खिळा ईन मागती सागवानी चौफळा. चौफाळ्याला लावले मोती, ईन मागती अंबारीचा हत्ती.

७८.

अंबारीच्या हत्तीला रेशमाचा कोरडा, ईन मागती चैत्राच्या महिन्यात हिरवा चुडा. मांडवाच्या दारी शिद्याची पाटी, ईनीच्या कपाळाला पडली आठी. आता ही आठी कशान काढू, बारा भुयाची पालखी धाडू, ईन म्हणती मला कशाला पालखी, मी तुळशीच्या फुलवानी हालकी. ईनीन सहज पालखीला दिली मांडी, तर मोडली पालखीची दांडी, म्हणून ती न्हीऊन तोलली तर भरली सव्वा चांगली खंडी.

७९.

नऊ महिन्याच नरुशी, काना बोलच तिनशी रुपये दिले बाराशे, बनवल्या मोहरा केढीच मोल करा, पटला तर रुखवत भरा, न्हाईतर मागारी फिरा.

८०.

शिवरात्रीच पारण करती जीवाच्या कारण, नऊ नारळ, बत्तीस केळ, द्राक्ष सीताफळ, अंजीर, काशी भोपळ, विहीणीन फराळ केला बळ, खाल्ली पाटीभर केळ, विहीणीन फराळ केला नागर, खाल्ली पोतभर भगर, विहिणीन फराळ केला बारका, खाल्ल्या पोतभर खारका. विहिणीन फराळ केला, विहीण माळ्याला गेली, एक रसाची (पाद) पेली, एक गुळाची ढेप पार केली, चार पायल्या भाजले शेंगदाणे, मक्याच्या भाजल्या लाह्या ईवायी दादा जाता खजुराची वाड आणाया, का बसू धपाट खाया.