Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

६१.

मांडवाच्या दारी ईन आली वरच्या येशी, युवाय आला खाल्या येशी, ईनीबाय ईनीबाय, मोकळ्या का केशी? आमच्या एकादशी, फरावळीला काय करशी? नऊ नारळ-पन्नास केळी घेती, मनाच्या लाह्या सहज जाती, चंद्रभागेला काकडयाच याल, खावावती बार्शीला, काय बारा मनाचा चाराचुरा, तांब्यावरल्या बारा तेरा मनाच भज चौघांच वज्ज, पुढार्‍याची उपटा दाढी, पुढारी म्हणे-माझ काय वाकड, भटाच्या पाठीत घाला लाकड, भट म्हणे मी केल सोईच, आता तुमी नशीब बघा दोघांच.

६२.

आला आला रुखवत, मांडवाच्या दारी, उघडून पहाते आत काय काय परी, शेवाया साजूक तेलच्या नाजूक, उडदाचे वडे, साखरेचे खडे, तुपाची केली दातवनाची कळी, सायासाची फणी, आरकार परकार पन्नास फळ, आंबा, जांभळ, करवंद, काळ, शेंडी सकट पाच नारळ, देठासकठ पिकली केळ, जेवायाला काय वाढल? जांब पेला, ताट वाटी, येवढी करणी कशासाठी? तर सांगते ऐका की, नवर्‍या मुलाच्या ऐपती साठीच, मांडवाच्या दारी करंजाचा पाला, नवरी बघून नवरा आला, इंद्रसभेला गेला इंद्रसभेचा आणला हात्ती, चंद्रसूर्याला पुसून, वर गांधारी कुंती बसून, विहीण न्हाली रात्री, चंद्रावळीच घातल इसान, त्याच वर्तमान पुसून घेती तर विहीण मांडवात येण्यास का बर भेती ?

६३.

मांडवाच्या दारी टाकले, आंबे मोहर तांदूळ, विजापुरी धुतले, कोल्हापूरी शिजविले, गोपाळपूरी पाठविल्या चिठ्‌ठया, गाव गुरसाळे बरोबरी, परत्यात न्याहरी करी, करकबमधी धुतले हात न्‌ भोशात झाली, रुखवत उघडायाला लई झाली रात.

मुक्ताबाई बहीण धाकटी, बालवयाची, आई हळद कुठ आहे? रुक्मिणीच्या हाती सोन्याचा करा, लिंबू नारळ उतारा, मारण्या निघाला दुपारा, गेला मारुतीच्या पायरीवर, शिरहरी बोले झडझडा, आणा नवरदेवाच्या शिरठोणा, मग बोले सत्यभामा, नवरीचा कोठे गेला मामा? मग बोले सुभा, नवरदेव मांडवात उभा, मांडवाच्या दारी टाकला चौरंग पाट, नवरी-नवर्‍याचे लग्न लावण्यास देव आले तीनशे साठ.

काळ्या रानी पाऊस पडला दनादनी, गंगाजमुनास आल पाणी, राही रुक्मिणीचा रुखवत, सीताबाई हळदीकुंकू देती, याच वर्तमान सांगून घेती, आणि मांडवात येण्यासच का विहीन बाई अनुमान करती.

६४.

आला आला रुखवत, रुखवतावर सरी, मारुतीन आणला दूर्णागिरी.

आला आला रुखवत, मांडवाच्या दारी, चिरेबंद हेळ, आत उघडून बघतीय तर, राम लक्ष्मणाचा खेळ.

६५.

आला आला रुखवत, रुखवतावर चांगली दिली असती मोटार, पण तुमच्या घरची वाटच नाही चांगली, त्येन घोर पडलाय फार.

आला आला रुखवत, रुखवतावर पेरु, मोटार यायचीच होती तर आम्ही म्हटल असत कसबी करु.

आला आला रुखवत, रुखवतावर हुता लसून, मोटार कुठली आणावी जावा, कैकाडयाचा गाढवावर बसून जावा. 

६६.

आला आला रुखवत, रुखवतावर तुरी, नवरी दिसली बरी पण नांदल तवा खरी.

आला आला रुखवत, रुखवतावर बेगडाच पान, नवरी दिली छान पण नवरदेव दिसतो लहान.

६७.

आला आला रुखवत, मांडवाच्या दारी, काय काय वरी, वेगडाच्या कमानी झळकल्या नारळांच्या तोरणान नानापरी, दरवाज्यावरी चौकट चार पार करी, पाहीन म्हणल खन खन करी, तुमार लहुबंदी वाज भिंगरी, हा दनका म्हनावा कशाची तरी! जावयाला बुंदीची न्याहारी, करिती साखरचा पाक, साखरचा पक्का झाला पाक, थोडा करिते खव्याचा पेढा, पेढा झाला झाक, खव्याच्या पेढयाला तूप आटत भारी, अनारस करते तरी, कसकस लावूनी वरी, पांडवाच्या कोनी समया लावा दोनी, समई जळाल्या दोनी, ह्या आन्याला उत्तर द्या बर्‍या बोलान काय ? मगच ईनीबाय मांडवात पाय टाका पाय !

६८.

मांडवाच्या दारी खिरीच गाडग कानपडत, यीन मागती तानवडत, तानवडयाला न्हाय बळ, यीन मागती उसाचा थळ उसाच्या थळाला न्हाय गुंडी, ईन मागती हरभर्‍याच्या डाळीची वडी, डाळीच्या वडीचा लागला ठसका, ईनीच्या झिंझीला बसला हिस्का, झिंझीच्या हिस्क्याला ईवाय राजस भ्याला, गाईच दाव म्हशीची म्होरकी आणि वासराच पेंडक, तिनीचा विनला शेला, यीवाय राजस गेला, यीनीला भेला न्‌ मग लहान थोरांना राम राम केला.

६९.

मांडवाच्या दारी काव ईनबाय तुमच्या बोलण्याची तस्ती, शेरा खाली वस्ती, ईनबाय आद्यात मद्यात नसती, वाकरी घोळात दिसती. बोसळ्याची नदी खळखळ वाजती, सांगुल्याचा मेला कुष्टी, बांधीन म्हणल ईनीच्या पाष्टी, तर तीच पडना दिष्टी.

७०.

आला आला रुखवत, रुखवतावर दागीन्याचा डबा, आत उघडून बघा तर राम लक्ष्मणाची सभा.