तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४४०१ ते ४५००
४४०१
कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ।
कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥१॥
कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान ।
नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध ॥ध्रु.॥
नेणे यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ।
मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥२॥
न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ।
न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥३॥
आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी ।
तुझीं ब्रिदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका म्हणे ॥४॥
४४०२
भीमातीरवासी । तेथें नश्चियेंसी काशी ॥१॥
मुख्यमुक्तीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥
घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥२॥
भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी म्हणे तुका ॥३॥
४४०३
जाली गाढवी दुधाळ । महिमा गाईंची पावेल ॥१॥
श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥
जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥२॥
तुका म्हणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥३॥
४४०४
काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥१॥
काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रम्हरूप ॥ध्रु.॥
अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥२॥
तुका म्हणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥३॥
४४०५
हें चि मागणें विठाबाईं । पायीं ठेवूनियां डोईं ॥१॥
शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥
मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृत्ति जडो ॥२॥
तुका म्हणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥३॥
४४०६
करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥१॥
तुजलागीं दानें तुजलागीं तीर्थे । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥
सकळ चित्तवृत्ति दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥२॥
तुका म्हणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥३॥
४४०७
पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥१॥
कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥
वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥२॥
नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥३॥
तुका म्हणे भेटी देई नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥४॥
४४०८
पूर्वा बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥१॥
अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥
तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥२॥
नारद प्रर्हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥३॥
अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥४॥
धर्माचें उच्छष्टि अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥५॥
जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥६॥
तुका म्हणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥७॥
४४०९
कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्ती ॥१॥
तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥
आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥२॥
आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया ॥३॥
तुका म्हणे देई चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥४॥
४४१०
पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥१॥
अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥
चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥२॥
तुका म्हणे आम्ही पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥३॥
४४११
रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥१॥
नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुम्हांस फुकाचें हें ॥ध्रु.॥
संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥२॥
तुका म्हणे आम्हीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥३॥
४४१२
बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥१॥
बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥
बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥२॥
ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥३॥
४४१३
कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥१॥
सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया ॥ध्रु.॥
करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा ॥२॥
जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥३॥
तुका म्हणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥४॥
४४१४
माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥१॥
शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥
इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥२॥
तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥३॥
तुका म्हणे देई दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रम्हादिकां ॥४॥
४४१५
पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥१॥
काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
करिशील तरी नव्हे कांइ एक । निर्मिलें त्रैलोक्य हेळामात्रें ॥२॥
समर्थासि काय आम्हीं शिकवावें । तुका म्हणे यावें पांडुरंगा ॥३॥
४४१६
ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आम्हां अनाथांच्या माहेरा ये ॥१॥
भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥
आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥२॥
वाटे चित्ती काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥३॥
तुका म्हणे माझे पुरवीं मनोरथ । येईं गा न संवरीत पांडुरंगा ॥४॥
४४१७
काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥१॥
नामाचा प्रताप ब्रिदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥
कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥२॥
माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥३॥
तुका म्हणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥४॥
४४१८
रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥१॥
धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥
रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ॥ २ ॥
तुका म्हणे रामनामीं । कृतकृत्य जालों आम्हीं ॥३॥
४४१९
येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥१॥
होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥२॥
तुका म्हणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥३॥
४४२०
भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥१॥
वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥
अकरालक्ष योनि किड्यामाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पर्यांमध्ये ॥२॥
तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥३॥
एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥४॥
तुका म्हणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥५॥
४४२१
तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून ॥१॥
कोण करील माझें साहे । चित्ती विचारूनि पाहें ॥ध्रु.॥
तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥२॥
तुका म्हणे निका । भवसिंधु तारक नौका ॥३॥
४४२२
हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज ॥१॥
आहें अमंगळ दुर्बळ । होई दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥
बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥२॥
तुका म्हणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥३॥
४४२३
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥
गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥
काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥२॥
तुका म्हणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥३॥
४४२४
अगा पंढरीच्या राया । वेगीं येई तूं सावया ॥१॥
दीनबंधु तुझें नाम । देई आपुलें आम्हां प्रेम ॥ध्रु.॥
जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥२॥
तुका म्हणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥३॥
४४२५
विटेवरी समचरण । तो हा रुक्मिणीरमण ॥१॥
वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥
नामापाशीं चारी मुक्ति । पहा हृदयीं प्रतीति ॥२॥
तुका म्हणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥३॥
४४२६
सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥१॥
आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥
काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥२॥
लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥३॥
तुका म्हणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥४॥
४४२७
सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥१॥
काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥
न लभे व्रततीर्थदानीं । तें या विठ्ठलदर्शनीं ॥२॥
साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥३॥
तुका म्हणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥४॥
४४२८
गव्हांच्या घुगर्या । नाचण्यांच्या पुर्या । बर्या त्या चि बर्या । पाधाणी त्या पाधाणी ॥१॥
काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥
रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥२॥
तुका म्हणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥३॥
४४२९
आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥१ ॥
म्हणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥
लोभिक तें लोभा लावी । बांधल्या गोवी वांचूनि ॥२॥
तुका म्हणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥३॥
४४३०
बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥१॥
नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥२॥
तुका म्हणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥३॥
४४३१
मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥१॥
सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥
आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥२॥
पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥३॥
करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥४॥
स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका म्हणे ॥५॥
४४३२
अवघ्या कोल्ह्यांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥१॥
भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥
कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥२॥
दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥३॥
४४३३
तुझे म्हणों आम्हां । मग उणें पुरुषोत्तमा ॥१॥
ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥
कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥२॥
तुका म्हणे परीस । सांपडल्या उपवास ॥३॥
४४३४
कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रम्हज्ञानाविण चाड ॥१॥
दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥
न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥२॥
तुका म्हणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥३॥
४४३५
गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥१॥
तेथें आम्हीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥
ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥३॥
४४३६
डोळियांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥१॥
काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥
आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥२॥
तुका म्हणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥३॥
४४३७
भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रम्हचारी ॥१॥
ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥
वळीवळी थोरथोर । मोडोनियां केले चूर ॥२॥
वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥३॥
मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥४॥
जिवें मारियेला मामा । धांवें भक्ताचिया कामा ॥५॥
तुका म्हणे पूर्ण । दावी भक्तीचीं विंदानें ॥६॥
४३३८
वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥१॥
आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥
दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥२॥
हात पाय राहिलें कान । नेत्रा पाझर हाले मान ॥३॥
अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥४॥
आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥५॥
लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥६॥
तुका म्हणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥७॥
४४३९
वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥१॥
नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥
दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥२॥
शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥३॥
तुका म्हणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥४॥
४४४०
अतित्याईं देतां जीव । नये कींव देवासि ॥१॥
थोड्यासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥
त्यासि परलोकीं नाहीं मुक्ति । अधोगति चुकेना ॥२॥
तुका म्हणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥३॥
४४४१
तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥
हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥
जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥२॥
जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥३॥
तुका म्हणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥४॥
४४४२
तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥
जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
साच करीं हरी आपुली ब्रिदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥२॥
साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥३॥
सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥४॥
कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भक्ति घडेल देवा ॥५॥
ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥६॥
तुका म्हणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥७॥
४४४३
नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुक्तीचें ही ॥१॥
रामकृष्ण म्हणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥
नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥२॥
तुका म्हणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥३॥
४४४४
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥
दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥
छाटी भगवी मानसीं । व्यर्थ म्हणवी संन्यासी ॥२॥
तुका म्हणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥३॥
४४४५
जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ १ ॥
डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥
न वर्जितां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥२॥
तुका म्हणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥३॥
४४४६
आपटा संवदड रानचारा । दसर्याचा होय तुरा ॥१॥
तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥
मृत्तिकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥२॥
तुका म्हणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥३॥
४४४७
काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल ॥१॥
नाम वाचे श्रवण कीर्ति । पाउलें चित्ती समान ॥ध्रु.॥
कीर्तनाचा समारंभ । निर्दंभ सर्वदा ॥२॥
तुका म्हणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनामीं ॥३॥
४४४८
आम्ही जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥
आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥२॥
येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥
रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥४॥
४४४९
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥
ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥
बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥२॥
तुका म्हणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥३॥
४४५०
तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥१॥
तुझ्या नामबळें तरले पतित । म्हणोनि माझें चत्ति तुझे पायीं ॥२॥
तुका म्हणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥३॥
४४५१
उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥१॥
युक्तीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥
लोखंडा परीस ज्ञानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥२॥
तुका म्हणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥३॥
४४५२
दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥१॥
तूं अखंड दुश्चित्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥२॥
तुका म्हणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥३॥
४४५३
तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥१॥
हें चिं देई विठाबाईं । पांडुरंगे माझे आईं ॥ध्रु.॥
नाहीं मोक्ष मुक्ति चाड । तुझी सेवा लागे गोड ॥२॥
सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥३॥
नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण ॥४॥
पुंडलीक पाहोन दृष्टी । हर्षो नाचों वाळवंटीं ॥५॥
तुका म्हणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥६॥
४४५४
बाईंल चालिली माहेरा । संगें दिधला म्हातारा ॥१॥
सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥
जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥२॥
न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥३॥
फजित केलें जनलोकीं । मेला म्हणे पडे नरकीं ॥४॥
गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुम्ही मज ॥५॥
तुका म्हणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥६॥
४४५५
तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥१॥
तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अक्त ते ॥ध्रु.॥
केवड्यामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भक्तिहीन ॥२॥
तुका म्हणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥३॥
४४५६
शिव शक्ति आणि सूर्य गणपति । एक चि म्हणती विष्णूस ही ॥१॥
हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥
अन्य देवतांसि देव म्हणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥२॥
वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥३॥
आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥४॥
धन्य ते वैष्णव भजती केशव । साित्वक हे जीव मोक्षा योग्य ॥५॥
तुका म्हणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥६॥
४४५७
तुम्ही साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुम्हां घरीं ॥१॥
तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥
कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुम्हांपुढें काय बोलों ॥२॥
तुम्ही अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥३॥
वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥४॥
पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥५॥
समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥६॥
मेरूचा पाठार अवघी ते क्षिति । मषकाचे हातीं मुष्टि फावे ॥७॥
सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥८॥
कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥९॥
तैशी तुम्ही निरे ज्ञानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥१०॥
कृपानिधि तुम्हीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥११॥
अज्ञान मी वेडें म्हणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुम्हां ॥१२॥
बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥१३॥
तुका म्हणे तुम्ही संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥१४॥
४४५८
देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निर्दैव ॥१॥
देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥
नाभी मृगाचे कस्तुरी । व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥२॥
साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे ॥३॥
दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥४॥
तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥५॥
४४५९
जयजय म्हणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥१॥
आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥
आपण म्हणे आणिकां हातीं । यज्ञादिकीं नये ते गति ॥२॥
आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि म्हणतां राम ॥३॥
मंत्र जपा हा चि सार । वर्णा याती जयजयकार ॥४॥
म्हणतां राम म्हणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥५॥
४४६०
शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येईंल काळा फोडों डोईं ॥१॥
तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥
येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होईंल तें दुरि शृंगारिलें ॥२॥
तुका म्हणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥३॥
४४६१
होई आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥१॥
आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तई सकळ चिंता ॥ध्रु.॥
अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥२॥
तुका म्हणे जालें एक चि वचन । केलिया कीर्तन आराणुक ॥३॥
४४६२
लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण ।
उद्यांचें आजि च मरण । आणोनि म्हणे हरि भोक्ता ॥१॥
नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं ।
लाभ विचारोनि पोटीं । होई सेवटीं जागृत ॥ध्रु.॥
आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा ।
पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास ॥२॥
म्हणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा ।
होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥३॥
क्षण या देहाच्या अंतीं । जड होउनि राहेल माती ।
परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥४॥
जंव या नाहीं पातल्या विपत्ति । आयुष्य भविष्य आहे हातीं ।
लाभ विचारोनि गुंती । तुका म्हणे अंतीं सर्व पिसुनें ॥५॥
४४६३
आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥१॥
काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥
काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥२॥
तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥३॥
४४६४
पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥१॥
दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥
जातीचें मी हीन न कळे भजन । म्हणोनि संतचरण इच्छीतसें ॥२॥
तुका म्हणे मज म्हणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥३॥
४४६५
नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥१॥
शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥
शिवास नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥२॥
मरण जालें काशीपुरी । तेथें नाम चि उद्धरी ॥३॥
तुका म्हणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥४॥
४४६६
अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥
अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥
सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥२॥
संतांची जो निंदा करी मुखीं जप । खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥
४४६७
नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥१॥
म्हणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥
करिती विठोबाची भक्ति । दयाधर्म नाहीं चित्ती ॥२॥
तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥३॥
अंगीं नाहीं क्षमा दया । म्हणती भेट पंढरीराया ॥४॥
नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदक्षिणा ॥५॥
ऐसें नव्हे भक्तिवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥६॥
नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥७॥
जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥८॥
४४६८
नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साह्य होय ॥१॥
उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साह्य करी ॥ध्रु.॥
शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साह्य करी ॥२॥
असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥३॥
तुका म्हणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥४॥
४४६९
दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥१॥
बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥
क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥२॥
सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥३॥
तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥४॥
लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥५॥
ब्रम्हांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥६॥
प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥७॥
सांडूनि वैकुंठ धांव घाली तई । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥८॥
तुका म्हणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥९॥
४४७०
अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥१॥
माझिया गा चित्ति करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥
जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाईंच्या पति कृपावंता ॥२॥
हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा ॥३॥
तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शक्ति नाहीं ॥४॥
न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥५॥
तुका म्हणे हरि करावें या काय । भजनासि साहए होई बापा ॥६॥
४४७१
हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥१॥
माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥
माझें दुःख जरी ऐकशील सईं । म्हातारा तो बाईं खोकतसे ॥२॥
खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥३॥
पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥४॥
जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥५॥
पूर्व सुकृताचा हा चि बाईं ठेवा । तुका म्हणे देवा काय बोल ॥६॥
४४७२
स्वामीच्या सामर्थ्या । चाले बोलिला पुरुषार्थ ॥१॥
पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥
देव ज्यासी साह्य । तेणें केलें सर्व होय ॥२॥
तुका म्हणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥३॥
४४७३
नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । म्हणा हरीहरी सर्वभावें ॥१॥
नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥
नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥२॥
गजेंद्राची स्थिति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥३॥
तुका म्हणे घेतां मुक्ति आहे । नामें सर्व पाहें आकळिलें॥४॥
४४७४
यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आम्हां दिनानाथें रक्षियेलें ॥१॥
यम नेतां तुम्हां रक्षील हें कोण । तुम्हां धन्यधन्य कोण म्हणती ॥ध्रु.॥
संतसज्जनमेळा पवित्र संतकीर्ति । त्यांनीं उत्तम स्थिति सांगितली ॥२॥
तें चि धरोनि चित्ती तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥३॥
४४७५
देवासी पैं भांडों एकचत्ति करूनि । आम्हांसि सज्जनीं सांगितलें ॥१॥
आम्हां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥
तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आम्हां देशवटी देवो सुखें ॥२॥
देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥३॥
चित्ती धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥४॥
तुका म्हणे सर्व देवाची नष्टाईं । आम्ही सुखें डुलतसों ॥५॥
४४७६
भरणी आली मुH पेठा । करा लाटा व्यापार ॥१॥
उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥
येथें पंक्तिभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥२॥
तुका म्हणे लाभ घ्यावा । मुद्दल भावा जतन ॥३॥
४४७७
ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥१॥
धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥
भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥२॥
तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥३॥
गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥४॥
तुका म्हणे हातीं । न धरितां गमाविती ॥५॥
४४७८
कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥१॥
तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥
दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥२॥
कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥३॥
तुका म्हणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥४॥
४४७९
ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥
हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥२॥
गोब्राम्हणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका म्हणे ॥३॥
४४८०
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥१॥
उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय म्हुण ॥ध्रु.॥
खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥२॥
हातींचा हिरोनि घातला पोटासी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥३॥
ओंव्या प्रारंभ २३१ अभंग ३
४४८१
पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया ॥१॥
याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्गुदास तुका ॥२॥
काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥३॥
या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥४॥
सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया ॥५॥
या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निर्विकार ॥६॥
नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥७॥
तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥८॥
मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥९॥
दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥१०॥
हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥११॥
जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥१२॥
यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥१३॥
नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥१४॥
चत्ति ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥१५॥
जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥१६॥
माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥१७॥
कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥१८॥
नाहीं भय भक्ता तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥१९॥
लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥२०॥
डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥२१॥
जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा ॥२२॥
माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥२३॥
हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥२४॥
चेतवला अग्नि तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥२५॥
मना धीर करीं दृढ चिता धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥२६॥
बाप हा कृपाळु भक्ता भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥२७॥
त्याचा भार माथां चालवी आपुला । जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥२८॥
भावेंविण त्याची प्राप्ति । पुराणें बोलती ऐसी मात ॥२९॥
मात त्याची जया आवडे जीवासी । तया गर्भवासीं नाहीं येणें ॥३०॥
यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥३१॥
होती आवडत जीवाचे ताइत । त्यां घडी अच्युत न विसंभे ॥३२॥
भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥३३॥
वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥३४॥
संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भक्ती देवलाभ ॥३५॥
लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भक्ती केला ॥३६॥
लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥३७॥
विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौर्यासी ॥३८॥
शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥३९॥
गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥४०॥
तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥४१॥
या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥४२॥
जेणें अग्निमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता ॥४३॥
तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं ॥४४॥
नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥४५॥
याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें ज्ञान नाहीं कोठें ॥४६॥
कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण ॥४७॥
विनवितां दिवस बहुत लागती । म्हणउनि चित्ती देव धरा ॥४८॥
धरा पाय तुम्ही संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥४९॥
नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया ॥५०॥
त्याची च उच्छष्टि बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥५१॥
व्यासें सांगितलें भक्ति हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥५२॥
तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी क्त माता पिता ॥५३॥
तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्ति उत्तरें रुसिया ॥५४॥
यासी वर्म ठावें भक्तां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥५५॥
तान्हेलें भुकेलें म्हणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥५६॥
जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥५७॥
धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भक्तालागीं तैसा नारायण ॥५८॥
नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥५९॥
पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥६०॥
रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥६१॥
उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥६२॥
मरणाचे अंतीं राम म्हणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥६३॥
तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्ती सर्वकाळ ॥६४॥
सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥६५॥
कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥६६॥
सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥६७॥
नाहीं भलें भक्ती केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥६८॥
नागवलों म्हणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥६९॥
तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं । जनार्दन ठायीं चहूं खाणी ॥७०॥
खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥७१॥
ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥७२॥
वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥७३॥
ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥७४॥
दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । म्हणउनि तुटी देवासवें ॥७५॥
सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥७६॥
पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥७७॥
वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकर्मा ॥७८॥
षडकर्मा हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥७९॥
देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥८०॥
मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युक्ति थोडी ॥८१॥
युक्त थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥८२॥
बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युक्ति पुढें त्यांच्या ॥८३॥
पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रम्हादिकां ॥८४॥
काय भक्तीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय ॥८५॥
होय हा सगुण निर्गुण आवडी । भक्तिप्रिय गोडी फेडावया ॥८६॥
या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें ॥८७॥
तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सत्वकाळीं ॥८८॥
सत्वकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक ॥८९॥
सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥९०॥
कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सत्वगुणीं ॥९१॥
सत्वरजतमा आपण नासती । करितां हे भक्ति विठोबाची ॥९२॥
चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥९३॥
सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥९४॥
एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आम्हां ॥९५॥
आम्हांसी विश्वास याचिया नामाचा । म्हणउनि वाचा घोष करूं ॥९६॥
करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥९७॥
नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी ॥९८॥
सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥९९॥
राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका म्हणे कांहीं न लगे आंता ॥१००॥
४४८२
गाईंन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगलें हें चत्ति माझें तया पायीं । म्हणउनि घेई हा चि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥
नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तपतीर्था ॥४॥
तीर्था रज माथां वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥५॥
गुणवाद ज्याचे गातां पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥६॥
त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥७॥
विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥८॥
कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवें करी धंदा ॥९॥
करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातुसे ॥१०॥
सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥११॥
लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग-तया कोण भोगविशी ॥१२॥
विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभा ॥१३॥
लोभें गिळी फांसा आविसाच्या आशा । पडोनि मासा तळमळी ॥१४॥
तळमळ याची तरी शम होईंल । जरी हा विठ्ठल आठविती ॥१५॥
आठव हा तरी संतांच्या सांगातें । किंवा हें संचित जन्मांतरें ॥१६॥
जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥१७॥
पुढें जाणोनियां करावें संचित । पुजावे अतीत देव द्विज ॥१८॥
जन्म तुटे ऐसें नव्हे तुम्हां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥१९॥
करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥२०॥
लावियेलीं कर्में शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥२१॥
पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥२२॥
वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलेंसें कोणी न म्हणावें ॥२३॥
न म्हणावें जाला पंडित वाचक । करूं मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥
चाळविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥२५॥
सुख तरी च घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥२६॥
राम हा उच्चार तरी च बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥२७॥
पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयज्ञ ॥२८॥
यागयज्ञ तप संसार दायकें । न तुटती एके नामेंविण ॥२९॥
नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥३०॥
जाणती हे क्तराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥३१॥
अमृताचें सार निजतत्व बीज । गुह्याचें तें गुज रामनाम ॥३२॥
नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसद्धि हे ॥३३॥
हें चि सुख आम्ही घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥३४॥
कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुद्धि दुष्ट नासे ॥३५॥
नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥३६॥
विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्ती न लगे कांहीं ॥३७॥
कांहीं कोणी नका सांगों हे उपाव । माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥३८॥
जाणोनियां आम्ही दिला जीवभाव । दृढ याचे पाये धरियेले ॥३९॥
धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला ये च विशीं निरधार ॥४०॥
निरधार आतां राहिलों ये नेटीं । संवसारतुटी करूनियां ॥४१॥
येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥४२॥
आपुली पाखर घालुनियां वरि । आम्हांसी तो करी यत्न देव ॥४३॥
देव राखे तया आणिकांचें काय । करितां उपाय चाले तेथें ॥४४॥
तेथें नाहीं रिघ कळिकाळासी जातां । दास म्हणवितां विठोबाचे ॥४५॥
विठोबाचे आम्ही लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥४६॥
धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुम्ही ॥४७॥
तुम्ही निदसुर नका राहूं कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥४८॥
गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥४९॥
तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥५०॥
जाच करिती हे म्हणसी कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥५१॥
बुडी दिली कुंभपाकीं दुर्योधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥५२॥
धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरि नये ॥५३॥
न ये वरि कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥५४॥
त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥५५॥
नारायण विसरलीं संवसारीं । तया अघोरीं वास सत्य ॥५६॥
सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुम्ही ॥५७॥
तुम्ही नका मानूं कोणी विसवास । पुत्र पत्नी आस धन वित्त ॥५८॥
धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूतीं ॥५९॥
दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥६०॥
नेदी शुद्धबुद्धि आतळों चित्तीसी । नाना कर्म त्यासी दुरावती ॥६१॥
दुराविलीं एकें जाणतीं च फार । निंदा अहंकार वादभेद ॥६२॥
वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥६३॥
रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥६४॥
सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥६५॥
वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥६६॥
धरूनियां देव राहतील चित्ती । आधींचिया गती आठवाया ॥६७॥
आठवावा देव मरणाचे काळीं । म्हणउनि बळी जीव दिले ॥६८॥
दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥६९॥
मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटीं नेला अधोगती ॥७०॥
गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥७१॥
विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा ॥७२॥
तरती दुबळीं विठोबाच्या नांवें। संचित ज्या सवें नाहीं शुद्ध ॥७३॥
शुद्ध तरी याचे काय तें नवल । म्हणतां विठ्ठल वेळोवेळां ॥७४॥
वेळा कांहीं नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची ॥७५॥
भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥७६॥
करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥७७॥
मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥७८॥
पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया ॥७९॥
ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया ॥८०॥
भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥८१॥
ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥८२॥
संवसारें जन गिळिले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥८३॥
वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥८४॥
सायास केलियावांचुनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥८५॥
नये बळें धड घालूं कांट्यावरि । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥८६॥
हातीं आहे हित करील तयासी । म्हणउनि ॠषीं सांगितलें ॥८७॥
सांगती या लोकां फजित करूनि । आपण जे कोणी तरले ते ॥८८॥
तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥८९॥
गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥९०॥
चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥९१॥
लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥९२॥
संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥९३॥
मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठीं ॥९४॥
राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥९५॥
नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥९६॥
तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुश्चिंत हे घेतां नाम होती ॥९७॥
होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥९८॥
चेवले जे कोणी देहअभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥९९॥
कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आम्ही त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥
लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका म्हणे संगें संतांचिया ॥१०१॥
४४८३
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥
भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥
कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥
अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥
हरिरूपीं दृष्टि कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमष्टि भावना देहाचिया ॥११॥
विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥
अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा ॥१३॥
कृष्णा म्हणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥
ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥
न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥१६॥
रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥
मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥
आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥
अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥
जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥
होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥
निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥
साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥
हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥
व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥
सकळा चोरोनि हरि जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥
उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥
न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥
तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥
बाळक्रीडा प्रारंभ अभंग - १००
४४८४
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥
माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥
कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥
आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥
सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥
तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥
सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥
संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥
क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥
करीं ब्रिदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥
नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥
चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥१२॥
४४८५
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥
रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥
सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥
दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥
पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥
गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥
आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥७॥
कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥८॥
न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥
नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥१०॥
सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥
४४८६
चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥१॥
देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥२॥
आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥३॥
करावया क्तजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥४॥
गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥५॥
घरोघरीं जाला लक्ष्मीचा वास । दैन्यदाळिद्रास त्रास आला ॥६॥
आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥७॥
लोकां गोकुळींच्या जालें ब्रम्हज्ञान । केलियावांचून जपतपें ॥८॥
जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥९॥
केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥१०॥
सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥११॥
नाहीं भक्ता दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥१२॥
याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका म्हणे आस त्यजूनियां ॥१३॥
४४८७
यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥१॥
खेळविला जिंहीं अंतर्बाह्यसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥२॥
दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥३॥
जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥४॥
ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥५॥
विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥६॥
एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥७॥
वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥८॥
भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका म्हणे जैसी स्पटिकशिळा ॥९॥
४४८८
शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कंसादिक ॥४॥
दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठें राहे हरी आठवितां । भक्ती द्वेषें चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या रुणी देव ॥८॥
देव भोळा धांवे भक्ता पाठोवाठी । उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धांवे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥
४४८९
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥१॥
गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥२॥
तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥३॥
माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥४॥
जैसा तैसा आहे अंतर्बाह्यात्कारीं । म्हणउनि चोरी नसंपडे ॥५॥
नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥६॥
वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥७॥
निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळि ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥८॥
न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥९॥
भाविका तयांसी येतो काकुलती । शाहाण्या मरती नसंपडे ॥१०॥
नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका म्हणें भावें चाड एका ॥११॥
४४९०
चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं म्हणवोनि ॥२॥
नसंपडे इंद्रचंद्रब्रम्हादिकां । अभिमानें एका तळिमात्रें ॥३॥
तळिमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अक्त जे निष्ठ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥७॥
जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हां कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्ती सांगितलें ॥११॥
सांगितलें संतीं तुम्हां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥१२॥
दंडूं आम्हीं रागें म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्यां ॥१५॥
४४९१
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तिवत्ति समर्पिलें ॥२॥
समर्था तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥
गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥७॥
धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥८॥
परी याचि तुम्ही आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥
तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥
४४९२
दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥३॥
वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥
यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छष्टि तें खावें धणीवरी ॥७॥
वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥
छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥
४४९३
भक्तजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी म्हणे वैकुंठींचा पति । तुम्हीं माझ्या चित्ती सर्वभावें ॥५॥
भाव जैसा माझ्याठायीं तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हांलागीं ॥६॥
तुम्हां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हां ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हां आम्हां असे नारायण । आपली च आण वाहातसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवें रसा आणूनियां ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥१०॥
एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥११॥
तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्ती ॥१५॥
चित्ते ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥१६॥
आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥२०॥
नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मनें ॥२१॥
४४९४
मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥३॥
एक भाव नाहीं सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसें रूप ॥४॥
रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥५॥
लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥६॥
कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
४४९५
जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥१॥
मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥३॥
पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे बाळ देवा ॥५॥
बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥
दुणी जालें त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनियां ॥११॥
आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥१२॥
मुळें याच देव न कळे तयांसी । चत्ति आशापाशीं गोवियेलें ॥१३॥
लेंकरूं आमचें म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तो चि भाव ॥१४॥
भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसळितां रवी डेरियांत ॥१५॥
डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥१६॥
हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥१८॥
यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥२०॥
नेदी राहों भाव लोभिकांचे चित्ती । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥२१॥
अंधळीं तीं तुका म्हणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥२२॥
४४९६
ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥
वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग ॥३॥
व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौळियांची ॥४॥
यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥५॥
होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौळियांचें ॥६॥
गौळियांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रम्हादिकां तुका म्हणे ॥७॥
४४९७
नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥
तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥७॥
करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥८॥
कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवें भाव ॥९॥
जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चत्ति त्यापें ॥१२॥
त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥१४॥
कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥
कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
४४९८
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसें तुम्हां गमे । वळि हा करमे वांयांविण ॥२॥
वांयांविण तुम्हीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥
याचें सुख तुम्हां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥५॥
लटिकें हें तुम्हां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥६॥
अवघ्यांचा तुम्हीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥
आणिका ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसों ॥१०॥
बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका म्हणे ॥१३॥
४४९९
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥
ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥५॥
कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्हीं कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥८॥
खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चत्ति त्यांचें ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका म्हणे पायीं गोविंदाचे ॥१४॥
४५००
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥१॥
एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥
जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥
विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥
लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥६॥
व्याही भाईं हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥
एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥
लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणीं मृत्तिकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥१३॥
यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥
खेळतों ते आम्हीं नव्हों नारीनर । म्हणोनि विकार नाहीं तयां ॥१५॥
तया ठावें आहे आम्ही अवघीं एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आम्ही कोणकोणें काय खेळों ॥१७॥
काय खातों आम्ही कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी ॥१८॥
मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥
धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥
नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्ती मनीं बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरि जयांचिये चित्ती । तयां नावडती मायबापें ॥२२॥
मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥२३॥
वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥
गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥
न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥२६॥
एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥२७॥
तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका म्हणे हरि बाळलीला ॥२८॥