तुकाराम गाथा - अभंग संग्रह ४२०१ ते ४३००
४२०१
संसार करिती मोठ्या महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥१॥
पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥
आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥२॥
विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । म्हणोनि लागले जन्ममृत्यु ॥३॥
तुका म्हणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥४॥
४२०२
गव्हाराचें ज्ञान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥१॥
त्यासी ज्ञानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥२॥
तुका म्हणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥३॥
४२०३
भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥१॥
कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें ज्ञान ॥ध्रु.॥
अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥२॥
कथाकीर्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥३॥
तुका म्हणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥४॥
४२०४
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥
तुका म्हणे आम्ही काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥
४२०५
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥१॥
आवडी आवडी कळिवराकळिवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥२॥
तुका म्हणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥३॥
४२०६
हे चि माझे चित्ती । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती । जागृति स्वप्नासी ॥१॥
आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपत्ति धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें ॥ध्रु॥
तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देई । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्तीचा ॥२॥
जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद । हरि गोविंद वाचेसी ॥३॥
काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥४॥
तुका म्हणे या चि भावें । आम्हीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥५॥
४२०७
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देई माझ्या ॥१॥
तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥२॥
कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥३॥
तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा । बोल सर्वोत्तमा मजसवें ॥४॥
४२०८
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥१॥
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥
आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥३॥
४२०९
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥१॥
मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥
वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥२॥
तुका म्हणे माते भक्तां तूं कृपाळ । गिळियेले जाळ वनांतरीं ॥३॥
४२१०
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रक्षिले वनांतरीं ॥१॥
मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥
गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥२॥
तुका म्हणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥३॥
४२११
धडकला अग्नि आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥१॥
अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥
अरे कृष्णा तुझें नाम बळिवंत । होय कृपावंत राख आतां ॥२॥
तुका म्हणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥३॥
४२१२
अरे कृष्णा आम्ही तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥१॥
अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥
वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥२॥
तुका म्हणे तुझे पवाडे गोपाळ । वर्णिती सकळ नारायणा ॥३॥
४२१३
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥१॥
अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुद्धि कळली अंतरींची ॥ध्रु.॥
गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥२॥
तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका म्हणे त्यांची आली कृपा ॥३॥
४२१४
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जवळि आले ॥१॥
सकुमार मूर्ति श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥
लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥२॥
चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥३॥
तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥४॥
४२१५
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥१॥
विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥
जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ २॥
तुका म्हणे अवघा वोणवा गीळिला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥३॥
४२१६
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥१॥
नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आम्हां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥
होई बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥२॥
वोणव्याच्या रागें गिळिशील आम्हां । तुका मेघशामा पायां लागे ॥३॥
४२१७
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥१॥
शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥
गोपाळ म्हणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥२॥
कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गिळियेलें ॥३॥
तुका म्हणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल म्हणोनियां ॥४॥
४२१८
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥१॥
बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होईंल पोळिली नारायणा ॥ध्रु.॥
बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥२॥
घोंगडिया घालीं घालूनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥३॥
तुका म्हणे भावें आकळिला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥४॥
४२१९
एक म्हणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥१॥
वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥
म्हणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥२॥
तुका म्हणे अवघे विठोबाभोंवते । मळिाले नेणते लहानथोर ॥३॥
४२२०
एक म्हणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आम्हां ॥१॥
गिळो लागलासी अग्नीचे कल्लोळ । आम्ही चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥
ज्वाळांबरोबरि गळिशील आम्हां । ऐसें मेघशामा भय वाटे ॥२॥
तुका म्हणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥३॥
४२२१
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥१॥
ज्वाळाबरोबरि तुम्हां कां ग्रासीन । अवतार घेणें तुम्हांसाटीं ॥ध्रु.॥
निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥२॥
चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका म्हणे पार नेणे ब्रम्हा ॥३॥
४२२२
ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥१॥
दुर्जनां चांडाळां करीं निर्दाळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥
भक्त माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥२॥
पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥३॥
माझे भक्त मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥४॥
कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका म्हणे डोळे झांकियेले ॥५॥
४२२३
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥१॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥
जोडितसां तुम्ही खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥२॥
तुमची व्याली माझे डाई हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥३॥
दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥४॥
भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥५॥
माझ्या अंगसंगें तुम्हांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥६॥
ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि । परि तुम्ही अजूनि न धरा लाज ॥७॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥८॥
तुका म्हणे जाला कामाचा अंकित । सांगे मनोगत तैसा वर्ते ॥९॥
४२२४
कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥
त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥३॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥४॥
ताईंत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥६॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुलें ॥७॥
तुका म्हणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥८॥
४२२५
उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हिर्या अंगीं ॥१॥
एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥
परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥२॥
तुका म्हणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥३॥
४२२६
बारावर्षे बाळपण । तें ही वेचलें अज्ञानें ॥१॥
ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥
बाकी उरलीं आठ्याशीं । तीस वेचलीं कामासी ॥२॥
बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥३॥
बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥४॥
तुका म्हणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥५॥
४२२७
सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥१॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥
तुका म्हणे दास । जाला तया नाहीं नास ॥३॥
४२२८
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥१॥
यासी घेऊं प्रायश्चित्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥२॥
अनुतापीं न्हाऊं । तुका म्हणे रवी पाहूं ॥३॥
४२२९
ठाव तुम्हांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥१॥
न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
चोरट्यासी थारा । येथें कैंचा जी दातारा ॥२॥
तुका म्हणे मनें । आम्हां जालें समाधान ॥३॥
४२३०
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥
बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥२॥
तुका म्हणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण ॥३॥
४२३१
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो ॥१॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥२॥
बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥३॥
दधिमंगळभोजन सारा । म्हणती करा मुरडींव ॥४॥
मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥५॥
तुका म्हणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥६॥
४२३२
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥१॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होईंल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥२॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥३॥
भल्या बुर्या मारी । होतां कोणी न निवारी ॥४॥
अविचार्या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥५॥
तुका म्हणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥६॥
४२३३
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥१॥
निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥२॥
तुका म्हणे जडबुद्धि । कर्मशुद्धी सांडवीं ॥३॥
४२३४
गोपीचंदन मुद्रा धरणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥
मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥२॥
तुका म्हणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥३॥
४२३५
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥
न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥२॥
तुका म्हणे अभिमाना । नारायणा न सोसे ॥३॥
४२३६
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
उभयकुल समवेत । नर्का प्रवेश अद्भुत ॥२॥
तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥
४२३७
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा ॥१॥
कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥
रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥२॥
तुका म्हणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥३॥
४२३८
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥
चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥
नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥२॥
तुका म्हणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥
४२३९
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी ॥१॥
अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥
विश्वासिया करी घात । न धरी चित्ति कांटाळा ॥२॥
तुका म्हणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥३॥
४२४०
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥१॥
तो ही येथें कामा नये । नर्का जाय म्हणोनि ॥ध्रु.॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥२॥
तुका म्हणे दांभिक तो । नर्का जातो स्वइच्छा ॥३॥
४२४१
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥
सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही जालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥३॥
४२४२
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥१॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥३॥
तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥४॥
४२४३
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥१॥
खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥
वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥२॥
मृगजळा पोही घालुनि सज्ञाना । तापलिया जना निववावें ॥३॥
तुका म्हणे मिथ्या देहेंद्रियकर्म । ब्रम्हार्पण ब्रम्ह होय बापा ॥४॥
४२४४
तुझा म्हणविलों दास । केली उच्छिष्टासी आस ॥१॥
मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥२॥
सीण भाग माझा पुसें । तुका म्हणे न करीं हांसें ॥३॥
४२४५
काय मागें आम्ही गुंतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥१॥
कीर्ति चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आम्हां ॥ध्रु.॥
घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आम्हांपासीं नाहीं तैसा ॥२॥
तातडी तयांनीं केली विटंबणा । आम्हां नारायणा काय उणें ॥३॥
नाहीं मुक्तिचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥४॥
तुका म्हणे काय मानेल तें आतां । तूं घेई अनंता सर्व माझें ॥५॥
४२४६
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥
केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥
हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥२॥
तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली लुटी ॥३॥
४२४७
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्का द्वारीं ॥१॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥
बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥
तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥३॥
४२४८
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥१॥
ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे ऊंस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥
बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आम्हांसि नाहीं ॥३॥
आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥४॥
तुका म्हणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥५॥
४२४९
आमुचें दंडवत पायांवरि डोईं । व्हावें उतराईं ठेवूनियां ॥१॥
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चत्ति द्यावें बोला बोबडिया ॥२॥
तुका म्हणे आम्ही लडिवाळें अनाथें । म्हणोनि दिनानाथें सांभाळावें ॥३॥
४२५०
भाग्यवंत आम्ही विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥१॥
नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥
प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥२॥
आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥३॥
वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥४॥
तुका म्हणे क्तजनाची माउली । करील साउली विठ्ठल आम्हां ॥५॥
४२५१
तीर्थे फळती काळें जन्में आगळिया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥१॥
सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥
काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥२॥
उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडाळितां ॥३॥
तुका म्हणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥४॥
४२५२
संतजना माझी यावया करुणा । म्हणउनी दीन हीन जालों ॥१॥
नेणें योग युक्ती नाहीं ज्ञान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥
भाव भक्ती नेणें तप अनुष्ठान । करितों कर्तिन विठ्ठलाचें ॥२॥
ब्रम्हज्ञान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥३॥
तुका म्हणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥४॥
४२५३
ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥१॥
काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥
करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे ज्ञान खरें भक्तिरस ॥२॥
गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥३॥
तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥४॥
तुका म्हणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक म्हणोनियां ॥५॥
४२५४
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥
तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥२॥
तुका म्हणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्ती निसुगातें ॥३॥
४२५५
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥
एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥२॥
तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥३॥
तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तो ही नव्हे ॥४॥
४२५६
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥१॥
बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥२॥
तुका म्हणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥३॥
४२५७
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥१॥
मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥
मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥२॥
तुका म्हणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥३॥
४२५८
अधमाचें चत्ति अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥१॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
अधमाचें चत्ति दुश्चित्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥२॥
गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥३॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥४॥
तुका म्हणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ति सीण होय ॥५॥
४२५९
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥२॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥३॥
४२६०
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
४२६१
मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥१॥
परि मूर्खाचें चत्ति बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥
सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥२॥
अतिप्रयत्नें गाळितां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥३॥
अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥४॥
पहा ब्रम्हानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुक्त केला ॥५॥
४२६२
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भक्तिभावें ॥१॥
म्हणउनि चिंता नाहीं आम्हां दासां । न भ्यो गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥२॥
तुका म्हणे आम्हां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥३॥
४२६३
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाईंच्या पति पांडुरंगा ॥१॥
चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥२॥
तुका म्हणे तुझा म्हणताती मज । आतां आहे लाज हे चि तुम्हां ॥३॥
४२६४
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥१॥
तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥
काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥२॥
तुका म्हणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥३॥
४२६५
जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥१॥
काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुम्ही डोळे झांकियेले ॥ध्रु.॥
राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥२॥
तुका म्हणे मागें आपंगिलें भक्तां । माझिया संचिता कृपा नये ॥३॥
४२६६
पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥१॥
स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥
भक्ताचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥२॥
ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥३॥
तुका म्हणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥४॥
४२६७
प्रगट व्हावें हे अज्ञानवासना । माझी नारायणा हीनबुद्धि ॥१॥
खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसद्धि हा ॥ध्रु.॥
ज्ञानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्ती धरोनियां ॥२॥
परि तूं कृपाळ होसी देवराणा । ब्रिदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥३॥
उतावीळ बहु भक्तांचिया काजा । होसी केशीराजा तुका म्हणे ॥४॥
४२६८
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दुर्हावला ॥१॥
ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥
मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥२॥
हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥४॥
४२६९
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥१॥
तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥
कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥२॥
तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥३॥
तुका म्हणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥४॥
४२७०
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥
जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
दुजा भाव आड येऊं नेदीं चत्तिा । करावा अनंता नास त्याचा ॥२॥
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥३॥
तुका म्हणे आम्ही जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥४॥
४२७१
तुज केलिया नव्हे ऐसें काईं । डोंगराची राईं क्षणमात्रें ॥१॥
मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥
सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥२॥
दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥३॥
तुका म्हणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥४॥
४२७२
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥१॥
अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥
सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥२॥
स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥३॥
तुका म्हणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥४॥
४२७३
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी ॥१॥
जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥
लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥
मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥३॥
तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥४॥
४२७४.
पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥१॥
सोइर्याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥
बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥२॥
श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राम्हण । गोवार मागून सावडीतो ॥३॥
नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राम्हणासी खांड नेदी एक ॥४॥
हातें मोर्या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥५॥
सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥६॥
हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥७॥
पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥८॥
देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥९॥
गाईंला देखोनी बदबदां मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥१०॥
ब्राम्हणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥११॥
तुका म्हणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥१२॥
४२७५
आम्ही रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥१॥
मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥
वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥२॥
तुका म्हणे पेणें । आम्हां वैकुंठासी जाणें ॥३॥
४२७६
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥१॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥३॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥३॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥४॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥५॥
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥६॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥७॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥८॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥९॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥१०॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥११॥
४२७७.
नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥१॥
सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥
आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥२॥
तुका म्हणे देवा । ब्रिदें सोडोनियां ठेवा ॥३॥
४२७८
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥१॥
विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अग्नि कोठें ॥ध्रु.॥
देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥२॥
ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥३॥
तुका म्हणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥४॥
४२७९
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥१॥
वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥
ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥२॥
ऐशालागीं मन वोळगे अहर्निशीं । तेणें वंद्य होशी ब्रम्हांदिकां ॥३॥
तुका म्हणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥४॥
४२८०
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥
काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृष्टि जाली ॥ध्रु.॥
आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे भाग्य या नांवें म्हणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥३॥
४२८१
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥
चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भावाचा पैं हात धरावा नश्चियें । तेणें भवभय देशधडी ॥२॥
नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥३॥
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु जाला ॥४॥
४२८२
षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥१॥
त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी निश्चिती फावलें तें ॥ध्रु.॥
तैसें दुष्टकर्म जालें हरिभक्ता । त्यागिली ममता विषयासक्ति ॥२॥
इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥३॥
तुका म्हणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥४॥
४२८३
बीज भाजुनि केली लाही । आम्हां जन्ममरण नाहीं ॥१॥
आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे उस । आम्हां कैंचा गर्भवास ॥२॥
तुका म्हणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥३॥
४२८४
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥
धारष्टि धैर्याचा वरिष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥
पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगें ॥२॥
अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥
धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥
४२८५
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥१॥
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
चंद्रामृतें तृप्तिपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥२॥
अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥३॥
तुका म्हणे काय अंधळिया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥४॥
४२८६
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीर्ति महाद्वारीं वानूं तुझी ॥१॥
पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥
साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥२॥
तुका म्हणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥३॥
४२८७
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥२॥
तुका म्हणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥३॥
४२८८
कोणी निंदा कोणी वंदा । आम्हां स्वहिताचा धंदा ॥१॥
काय तुम्हांसी गरज । आम्ही भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥
तुम्हांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥२॥
तुका म्हणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥३॥
४२८९
तुझे नामें दिनानाथा । आम्ही उघडा घातला माथा ॥१॥
आतां न धरावें दुरी । बोल येईंल ब्रीदावरी ॥ध्रु.॥
पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥२॥
तुका म्हणे तुझे पायीं । आम्ही मिरास केली पाहीं ॥३॥
४२९०
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥
तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥
देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न जाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळलें ॥३॥
तत्वमसि विद्या ब्रम्हानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥
४२९१
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥१॥
त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥
ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी ॥२॥
आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे ॥३॥
केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥४॥
करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥५॥
तुका म्हणे कांहीं नित्यनेम । चित्ती न धरी तो अधम ॥६॥
४२९२
मानूं कांहीं आम्ही आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥१॥
आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥२॥
तुका म्हणे खेळों आम्ही सहजलीळे । म्हणोनी निराळे सुख दुःख ॥३॥
४२९३
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥१॥
अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥
त्याचा होईंन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥२॥
तुका म्हणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥३॥
४२९४
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥१॥
वावडी उडाली अंबरीं । हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें ॥ध्रु.॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥२॥
व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥३॥
तुका म्हणे असों भलतिये व्यापारीं । लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥४॥
४२९५
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥१॥
तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक म्हणती चंद्रभागा ॥ध्रु.॥
तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥२॥
विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥३॥
तुका म्हणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥४॥
४२९६
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥१॥
तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥२॥
तुका म्हणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥३॥
४२९७
भक्तिॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे ॥१॥
प्रेम व्याज देई हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥
माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्तन ॥२॥
तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाईंत ॥३॥
तुका म्हणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥४॥
४२९८
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
मिराबाईंसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥२॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥३॥
आतां तुम्ही दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥४॥
४२९९
हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुम्हांविण जाऊं शरण कोणा ॥१॥
नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥
रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सत्व माझें ॥२॥
तुका म्हणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्ती येऊं द्यावी ॥३॥
४३००
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥१॥
कावळ्याचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥
क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥२॥
तुका म्हणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥३॥