भार्गवराम कि परशुराम?
या संपूर्ण प्रकारामुळे सोनाली पर्रीकर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता परन्तु ही गोष्ट लपवून त्यांनी त्याला विचारले.
"हे कसं शक्य आहे? रामायण काळात जन्माला आलेली व्यक्ती? तू आजही जिवंत कसा आहेस?”
“मी तेव्हापासून आजपर्यंत कधीच म्हातारा झालेलो नाही. मला बऱ्याचदा थकवा जाणवतो, पण उपाशी पोटी किंवा विश्रांती न घेता मी आपोआपच पुन्हा उर्जेने भरून जातो. कधीकधी मला दुखापत होते, मी आजारीही पडतो; पण मृत्यू येण्याआधीच मी बरा होऊ लागतो. आणि मी मरत कधीच नाही.” अनंतने खुलासा केला.
खोलीत नीरव शांतता पसरली आणि वातावरण काहीसे उदास झाले.
सोनाली पर्रीकर यांना विश्वास बसत नव्हता, पण तरीही त्यांनी पुढे विचारले, “तू त्या वेळी कसा दिसायचास?”
इतक्यात अचानक डॉ. मेहता त्यांच्या खुर्चीवरून ताडकन उभे राहिले आणि ओरडले,
“ बस्स.. हा सर्व मूर्खपणा आहे! नाही, मला हे अजिबात मान्य नाही.”
रागाने पावले टाकत ते दाराकडे चालू लागले.
अनंतने डोळे उघडले आणि स्क्रीनवर अंधार झाला. एका गार्डने दिवे चालू केले. डॉ. चंदावरकर आणि सोनाली पर्रीकर यांनी डॉ. मेहता यांच्याकडे धाव घेऊन त्यांना थांबवले.
डॉ. मेहता यांचा आवाज घुमला,
“सर, आपण इथे एका मानसिक रुग्णाला हाताळतोय. यापुढे हे मी सहन करू शकत नाही. तो काल्पनिक गोष्टी सांगतोय...”
"मग लाय डिटेक्टर ते सूचित का करत नाही?" डॉ चंदावरकरांनी शंका विचारली.
“कारण त्याची नाडी सामान्य आहे, जेव्हा कोणी खोटे बोलतो तेव्हा त्याच्या रक्तदाबात चढ-उतार होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. आपले मशीन त्यानुसार आपल्याला अशा बदलांबद्दल माहिती देत असते.”
डॉ.मेहता यांनी कारणे सांगितली.
"आणि आपण स्क्रीनवर जे चित्र पाहत आहोत त्याचं काय?" चंदावरकरांनी विचारले.
“आपण जे चित्र पाहतो ते त्याच्या आठवणी नसून त्याची कल्पना आहे, जी त्याला सत्य आहे असे त्याला वाटते. कोणताही मनोरुग्ण त्याच्या कथा आणि कल्पनांबद्दल उत्कट असतो आणि या उत्कटतेमुळे तो जे काही बोलतोय ते प्रत्यक्षात त्याच्या पूर्वायुष्याचाच एक भाग आहे यावर विश्वास ठेवतो. तो त्याच्या कल्पना जणू जगतो!” मेहता यांनी स्पष्ट केले.
“कल्पना अस्पष्ट असतात, मेहता! आपण आता पाहतो तितक्या त्या कधीच स्पष्ट दिसू शकत नाहीत. केवळ वास्तविक घटना आणि लोक आपल्या विचारांमध्ये स्पष्टपणे दिसू शकतात." चंदावरकर
"अगदी बरोबर! आणि हा माणूस खूप ठामपणे विचार करतो की हे सर्व सत्यच आहे. आणि म्हणूनच तो कधीही कल्पनाशक्ती म्हणून विचार करत नाही. त्याचा विश्वास आहे की तो तिथे होता आणि हे सर्व तो जगला आहे.” डॉ.मेहता आपल्या विचारांवर ठाम होते.
“सर, हे जे काही हा मनुष्य सांगतोय ते सर्व रामायण आणि बाकीच्या सारख्या भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे वर्णन केले आहे आणि त्याने त्या ग्रंथांचा इतका अभ्यास केला आहे की तो खरोखर त्या महाकाव्यांचा एक भाग आहे असे त्याला वाटू लागले आहे. तो खोटे बोलतोय हे त्याला जाणवत देखील नाही. तो मनोरुग्ण आहे, सर. ही एक असामान्य केस आहे पण जगात अशी प्रकरणे होऊन गेली आहेत.” डॉ.मेहता यांनी अधिक विश्वासाने सांगितले.
" हे सेशन इथेच संपवावे लागेल." चंदावरकर यांनी घड्याळाकडे पाहत सांगितले.
“आपण उद्या कंटीन्यू करू. रात्री जेवायला सगळे एकत्र भेटू.” असे सांगून ते तिथून निघून गेले.
काही वेळातच चौकशीची खोली रिकामी झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अनंतला एका गुप्त ठिकाणी नेले आणि त्याला हातकडी लावण्यात आली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले होते.
रात्री जेवणाच्या टेबलवर सर्वांनी त्या दिवसाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांचे जेवण संपताच डॉ.मेहता यांनी विचारले,
"अभिषेक आणि रोहिदास, या विषयावर तुमचे मत काय आहे? आम्हाला सांगा."
"इथे कोणी अश्वत्थामा आणि परशुराम यांच्याबद्दल ऐकले आहे का?" अभिषेकने प्रश्न केला.
"हो." रोहिदास
"हो, फक्त जुजबी ऐकले आहे." डॉ मेहता यांनी सांगितले.
"नावे तेवढी ऐकली आहेत. पण काही विशेष ऐकलं नाहीये " सोनाली पर्रीकर हळूच म्हणाली.
टेकी असलेल्या केजीबीने लगेच दोन्ही नावे गुगल केली.
"बरं! नावातील ‘परशु’ हा शब्द कुऱ्हाड सूचित करतो. परशुराम या नावांचा शब्दश: अर्थ 'कुऱ्हाडीसह राम' असा आहे. तो भगवान विष्णूचा सहावा अवतार होता. रेणुका आणि जमदग्नी ऋषी यांचा पाचवा पुत्र होता. हिंदू धर्मात तो सात चिरंजीवांपैकी एक परशुराम आहे. शक्तिशाली राजा कार्तवीर्यने याच्या वडिलांची हत्या केल्यानंतर एकवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करण्यासाठी परशुराम हे नाव ओळखले जाते. भार्गवराम म्हणजे परशुरामाचा ऐतिहासिक वारसा आधुनिक मध्य प्रदेशातील इंदूर शहराजवळ महेश्वर येथे स्थित हैहया राज्यापासून सुरू होतो. कठोर तपश्चर्येने त्याने भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले आणि परशु मिळवला. शिवानेच नंतर त्याला युद्धाची कला शिकवली होती.
परशुरामाची परमभक्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निरंतर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने श्रीभार्गवराम याला दैवी शस्त्रे बहाल केली. त्यात कधीच नष्ट न होणारे अविनाशी आणि अजय असे परशु होते. आणि त्याला 'परशुराम' हे नाव दिले. तेव्हा भगवान शिवाने परशुरामाला दुष्ट, राक्षस आणि अहंकारी लोकांपासून आदीशक्तीची मुक्तता करण्याची आज्ञा केली.
पुढे त्यानंतर विष्णूचे श्रीराम आणि श्रीकृष्ण असे अवतार पाहण्यासाठी परशुराम दीर्घकाळ जगला. देवांचा राजा इंद्राने दिलेले भगवान शिवाचे विजय धनुष्यही परशुरामाकडे होते. रामायणा'मध्ये परशुरामाने ते धनुष्य राजकुमारी सीतेचे वडील जनक यांना त्यांच्या स्वयंवरासाठी दिले होते. उपस्थित वरांच्या ताकदीची चाचपणी करण्यासाठी त्यांना ते गूढ धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा चढवायची होती. श्रीरामाव्यतिरिक्त इतर कोणालाही यश मिळाले नाही. पण श्रीराम जेव्हा धनुष्याला प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा धनुष्य तुटले, त्यामुळे एक भयंकर गर्जना झाली, जी महेंद्र पर्वताच्या शिखरावर ध्यानात तल्लीन झालेल्या परशुरामांच्या कानापर्यंत पोहोचली. संतप्त परशुराम श्रीरामाचा वध करायला स्वत: आला पण नंतर त्याला समजले की श्रीराम हे भगवान विष्णूचेच अवतार आहेत.”
“ते सगळं ठीक आहे, अभिषेक पण तुला नक्की काय म्हणायचं आहे? थोडक्यात सांग.” डॉ. सोनाली पर्रीकर म्हणाल्या.
“परशुरामाने रामायण आणि महाभारतात भीष्म, कर्ण आणि द्रोण यांचे गुरू म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. द्रोण हे मुख्यतः द्रोणाचार्य म्हणून ओळखले जातात. आचार्य म्हणजे ‘गुरू’. ते शंभर कौरवांचे आणि पाच पांडवांचे गुरु होते. हिंदू धर्माशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये स्पष्ट करण्यात अभिषेक पारंगत होता.
"थोडक्यात" दोन्ही हाताच्या बोटांनी दुहेरी अवतरण चिन्हाची खुण करत अभिषेक पुढे म्हणाला "कथेचा सारांश असा की परशुराम प्रत्येक युगात प्रकट झाला आहे आणि अमर आहे."
क्रमश: