Get it on Google Play
Download on the App Store

सुषेण

सर्वजण पुन्हा एकदा त्या खोलीत जमा झाले आणि आपापल्या जागी बसले. अनंतच्या शेजारच्या खुर्चीवर सोनाली पर्रीकर बसल्या. प्रत्येकाचे रक्षण करण्यासाठी यावेळी गार्डस आहेत कि नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी मान वळवली. लगेचच सर्वाना परिस्थितीचे गांभीर्य आणि संवेदनशीलता समजली. त्यांना काहीतरी धोका आहे हे जाणवत होते आणि थोडी भीतीही वाटत होती.

डॉ.चंदावरकर अनंतच्या जवळ आले आणि त्याच्यापुढे होऊन जरासे कमरेत वाकले आणि म्हणाले,

“अनंत.... महाकाल!!! आम्ही तुला काय म्हणून बोलवावं? अनंत...? की... बंकिम? कदाचित.. मधुकर? की..... विदुर या संबोधनाला आपण प्राधान्य देणार? आश्चर्य वाटतंय? कसं आहे न काही वेळापूर्वी आपण स्वत: अनेक गुपितं आमच्यासमोर उघड केली आहेत. आता बाकीच्या गोष्टी आम्हाला माहीत आहेतच तरीसुद्धा तुम्हीच तुमच्या तोंडून सांगून टाका म्हणजे बरं! जबरदस्ती की स्वेच्छेने सांगायचं... ती तुमची मर्जी आहे. कोणत्याही प्रकारे सांगा आम्हाला जे हवे आहे ते मिळेल हे नक्की. काय म्हणता?"

चंदावरकर तुच्छतेने हसत म्हणाले.

अनंत काहीही बोलला नाही. त्याने पराभव स्वीकारल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तो अशा  एखाद्या चोरासारखा अस्वस्थ दिसत होता ज्याने लपवून ठेवलेला किमती खजिना सापडला आहे.

डॉ.चंदावरकर त्याच्या खुर्चीपासून दूर गेले आणि डॉ.सोनाली पर्रीकर यांना अनंतला नवीन कार्यपद्धती समजावून सांगण्याची आज्ञा केली. सोनाली पर्रीकर पुढे सरसावल्या आणि म्हणाल्या

“अनंत, आम्ही तुम्हाला एका लाय डिटेक्टरशी जोडणार आहोत, जो तुमच्या विचार लहरींना व्हिज्युअलमध्ये रूपांतरित करेल आणि स्क्रीनवर दाखवेल.”

सोनाली पर्रीकर यांनी आई इंजेक्शन देण्याआधी आपल्या मुलाला समजावून सांगते तसे समजावून सांगितले.

“म्हणजे...” अनंतने हळूच विचारले.

“याचा अर्थ तुम्ही खोटे बोलू शकत नाही, कारण तुमचे विचार जसे तुम्ही जगलात तसेच्या तसे स्पष्टपणे आम्हाला दिसून येतील. मला खात्री आहे की या प्रक्रियेला आपला आक्षेप नसेल, आहे का?" असा सवाल डॉ.मेहता यांनी केला.

"माझ्याकडे इतर काही पर्याय आहेत का?" अनंत म्हणाला.

"नाही! डॉ मेहता, सुरुवात करा.” चंदावरकर यांनी आदेश दिला

अनंतने सोनाली पर्रीकर यांच्याकडे पाहिले, त्या आधीच त्याच्याकडे सहानुभूतीने पाहत होत्या. चंदावरकर प्रयोगशाळेतून बाहेर पडले आणि त्यांच्या कार्यालयात जाताना त्यांनी रणधीरला फोन केला.

"रणधीर, प्लीज रिपोर्ट!" त्यांनी आदेश दिला.

पलीकडून रणधीरने उत्तर दिले,

“सर, आमच्या लोकांनी ते लॉकर्स ताब्यात घेतले आहेत. ते काही वेळात तिथे पोहोचतील.”

“त्या लॉकरमध्ये जे काही असेल...लवकरात लवकर इकडे आणा.” असे आदेश डॉ.चंदावरकरांनी दिले.

लॉकरचं ठिकाण आणि पत्ता चेक करत रणधीर म्हणाला, "सर, ते लॉकर तुमच्या पर्यंत पोहोचलेच म्हणून समजा."

डॉ चंदावरकरांनी विचारले, “ किती वेळ लागेल?”

प्रवासाच्या वेळेचा अंदाज रणधीरने सांगितले की,

“उद्या... सकाळीच..” 

रणधीरने फोन ठेवला. लगेच रणधीरने काही फोन केले आणि दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याची व्यवस्था केली.

रणधीर (फोनवर)

"माझ्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल?"

पलीकडचे उत्तर ऐकून रणधीर पुढे म्हणाला,

“कोणताही पुरावा मागे ठेवू नका. माझी माणसे तुला एक सीलबंद लिफाफा देतील. तो मिळाल्यानंतर, लिफाफ्यात दिलेल्या पत्त्यावर ते डिलिव्हर करा आणि तो तुम्हाला पासवर्ड सांगेल – ‘6 TANGO FOXTROT ALPHA 42 CHARLIE ZEBRA YANKEE’ जो मोदींनी केलेल्या नोटाबंदी मध्ये रद्द झालेल्या १००० रुपयाच्या नोटेचा सिरीयल नंबर आहे  आहे त्याला द्या."

रणधीरने फोन ठेऊन दुसरा नंबर डायल केला.  

“आज रात्री त्याच पत्त्यावर तुम्हाला पार्सल मिळेल. ते सुरक्षित ठेवा. तुमचा कोड आहे – ‘6 TANGO FOXTROT ALPHA 42 CHARLIE ZEBRA YANKEE’. सकाळी हेलिकॉप्टर पायलटला पार्सल सुरक्षितपणे पोहोचवा. तुमचे पेमेंट तुमच्या खात्यात पोहोचले आहे आणि १००० रुपयांची नोट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल.”

प्रयोगशाळेत केजीबी आणि डॉ. मेहता सर्व वायर्स योग्य ठिकाणी लावून एकमेकांशी बोलत होते.यावेळी अभिषेक सोनाली पर्रीकर यांना प्रश्नांची यादी तयार करण्यात मदत करत होता.

“तुम्ही ‘सुषेण’ पासून सुरुवात केली पाहिजे. त्याने सांगितलेल्या  नावांपैकी सुषेण हे एक त्याचे स्वतःचे नाव आहे.” अभिषेकने सुचवलं.

“सुषेणच का? दुसरे नाव का नाही?" सोनाली पर्रीकर उत्सुकतेने म्हणाल्या.

“कारण माझ्या मते ते सर्वात जुने नाव आहे आणि या गुंतागुंतीच्या धाग्याचे एक टोक आहे आणि त्या धाग्याचे दुसरे टोक अनंत महाकाल आहे; किंवा मग तुम्ही त्याला सत्ययुगाबद्दल माहिती विचारून देखील सुरुवात करू शकता."

"मी जरा गोंधळले आहे. सॉरी. पण सुषेण कोण होता?” सोनाली पर्रीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत पण अधिकृत स्वरात विचारले.

"बरं मी सांगतो! सत्ययुगानंतर....त्रेतायुगात म्हणजे रामायणात... राम आणि रावण यांच्या युद्धात रावणाचा मुलगा मेघनाद याने लक्ष्मणाला एक प्राणघातक बाण मारला होता. लक्ष्मणाचा जीव वाचवण्याची क्षमता केवळ 'संजीवनी वटी' नामक हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावर सापडणाऱ्या एकाच औषधी वनस्पतीमध्ये होती, असे म्हटले जाते. हि संजीवनी बुटी सुचवणारा वैद्य म्हणजे सुषेण. डाव्या हातात द्रोणागिरी  पर्वत घेऊन उडत उडत जाणारा हनुमान तुम्ही पहिला असेलच. याचा अर्थ असा की, रामायणातील कथांनुसार ज्याने लक्ष्मणाचे प्राण वाचवले त्याच सुषेणने संजीवनी वनौषधी मागवून घेतली होती ज्यासाठी हनुमानाने संपूर्ण पर्वत उचलला होता.”

अभिषेकने खुलासा केला.

“म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की सर्व नावांमधील संबंध जाणून घेण्यासाठी सुषेणपासून म्हणजेच त्रेतायुगापासून सुरुवात करावी लागेल?” मनातील संशय दूर करत सोनाली पर्रीकर म्हणाल्या.

"तुम्ही मला जे सांगितले ते मी केलं आणि मला काहीतरी सापडलंय." केजीबी म्हणाली.

"काय?" अभिषेकने उत्सुकतेने विचारले.

"विदुर हा धृतराष्ट्राचा भाऊ मानला जातो, जो त्याच्या काळातील सर्वात विद्वान आणि ज्ञानी पुरुष होता."

"आणि संजय?"

“संजय हा धृतराष्ट्राचा सल्लागार होता, ज्याने त्यांच्या दिव्यदृष्टीचा वापर करून धृतराष्ट्रासाठी काम केले. त्याचे वडील गावलगण होते.”

"याचा अर्थ मी बरोबर होतो." अभिषेक नेहमीप्रमाणे फुशारकी मारत म्हणाला.

आणि केजीबीने देखील हे मान्य केले,

“हम्म! असं वाटतंय तरी सध्या.."

"नक्कीच १०० टक्के , आता तुम्ही बघा, कदाचित वेडेपणा वाटेल पण मी सिरीयस आहे. या माणसाचा आणि त्रेतायुगातल्या माणसाचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. आणि हे खूप विचित्र आहे की आपली सर्व उत्तरे एकाच व्यक्तीकडे आहेत ती म्हणजे अनंत महाकाल. त्यामुळे सुरुवात तिथूनच  केली पाहिजे.”

अनंतला लाय डिटेक्टर मशिनशी जोडल्यानंतर डॉ.मेहता उत्साहाने  त्यांच्या कॉम्प्युटरवर काम करू लागले. हे पाहून सोनाली पर्रीकरही अभिषेककडे दुर्लक्ष करून डॉ.मेहता यांच्यात सामील झाल्या. डॉ.चंदावरकर प्रयोगशाळेत दाखल होताच डॉ.मेहता यांनी त्यांना हाक मारली आणि म्हणाले,

“सर, आम्ही तयार आहोत.”

डॉ. चंदावरकरांनी कोरड्या नजरेने उत्तर दिले. "मग सुरुवात करा."

“अनंत, कृपया सहकार्य करा. मी तुम्हाला खात्री देते की तुम्हाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.” सोनाली पर्रीकर विनंतीच्या स्वरात म्हणाल्या.

अनंतने त्याच्या मनाविरुद्ध होकार दिला. डॉ. मेहता आणि केजीबी यांनी अनंतच्या शरीराला जाड तारा आणि केबल्स जोडल्या.

काही क्षणातच अनंतला आपण अडकवल्याची जाणीव झाली. त्याच्या डोक्यावरून, छातीतून, हातातून आणि पायावरून दोन विरुद्ध दिशेने तारा जात होत्या. त्याच्या डोक्याला जोडलेल्या तारा पुढे कॉम्प्युटर आणि मशीनला जोडल्या गेल्या होत्या, त्या तारा दुसऱ्या बाजूला प्रोजेक्टरच्या स्क्रीनला जोडलेल्या होत्या आणि बाकीच्या थेट लाय डिटेक्टरला जात होत्या. डॉ.मेहता आणि केजीबी यांनी पूर्ण तयारी केली होती आणि अनंतने डोळे मिटले.

सोनाली पर्रीकर यांनी अभिषेकच्या मदतीने आपले प्रश्न तयार केले होते. सर्व तयारी सुरू झाली; सर्व दिवे बंद केले होते. काळोख होता. सध्या जो प्रकाश होता तो संगणकाच्या स्क्रीनवरून येत होता. केजीबीने तिच्या  माझ्या सिस्टमवर काही बटणे दाबली आणि एंटर दाबले. हे करत असताना, काही पिनच्या सहाय्याने कागदावर स्क्रॅच करून आलेखाचा आकार तयार केला. काही क्षण स्क्रीनवर काही प्रतिमा दिसू लागल्या आणि लगेच निघूनही गेल्या कारण अनंतने डोळे उघडले होते.

जर अनंतचे डोळे उघडले तर पडद्यावर काहीच दिसत नव्हते. त्याने डोळे मिचकावताच स्क्रीनचा  प्रकाश कमी जास्त होत होता. दिवसाची वेळ, ठिकाण, लोकांचे कपडे, हवामान, संस्कृती पडद्यावर दिसत होती. सर्व काही अतिशय वेगाने चालले होते कि या सगळ्याचा काही अर्थ लागत नव्हता.

कोणतीही अवांछित स्थिती उद्भवू नये म्हणून खोलीतील रक्षक सावध झाले होते आणि त्यांनी त्यांच्या बंदुका लोड केलेल्या होत्या. खोलीतील लोकांच्या चेहऱ्यावरही संभ्रम दिसत होता, कारण अनंतचे विचार खूप वेगाने बदलत होते. सोनाली पर्रीकर यांना अनंतच्या विचारांवर नियंत्रण आणणे आवश्यक होते, यासाठी अनंतला शांतता आणि सुरक्षिततेची जाणीव करून द्यावी लागणार होती.

हे करण्यासाठी सोनाली पर्रीकर यांनी अनंतच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाल्या,

“अनंत, सर्व काही ठीक आहे. कृपया शांत हो. तू एकटा नाहीस. डोळे उघड आणि माझ्याकडे बघ. दीर्घ श्वास घे, रेलैक्स हो, तणावमुक्त हो.”

आता स्क्रीनवरची चित्रं हळूहळू बदलू लागली आणि दृश्य स्पष्ट दिसू लागली. एकामागून एक चित्र भराभर बदलण्याऐवजी थोडा थोडा वेळ थांबत बदलू लागली होती.

डॉ.चंदावरकर यांनी रक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यांचा  आवाज अनंतच्या कानापर्यंत पोहोचला आणि पडद्यावर डॉ.चंदावरकरांनी स्वतःला पाहिले. यानंतर एका गावाचे दृश्य समोर आले. ठिकठिकाणी खळखळ वाहणारे पाणी आणि हिरवळ असे विहंगम दृश्य समोर दिसत होते. डॉ.चंदावरकर यांनी आर्त नजरेने ते दृश्य पहिले आणि ते गंभीर झाले.

त्यानंतर एक सरकारी शाळा, लाकडी बाकांवर बसलेली काही मुलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचा गणवेश घातलेली काही इंग्रज मंडळी. हे चित्र भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचे वाटत होते. ते चित्र पाहून डॉ. चंदावरकरांना असा धक्का बसला की ते हादरून गेले.

सोनाली पर्रीकर वगळता सर्वांनाच त्यांचा मूड आणि अस्वस्थ अभिव्यक्तीतील हा बदल जाणवला.

सोनाली पर्रीकर म्हणाल्या,

"अनंत, तू तयार आहेस का?"  आणि हे विचारताच स्क्रीन ब्लैंक झाली.

"हं!" अनंतकडून होकार आला.

लाय डिटेक्टरमधून 'बीsssप' असां आवाज आला, याचा अर्थ अनंत खरोखर तयार नव्हता. सर्वांच्या नजरा 'बीsssप' कडे वळल्या, अगदी अनंतचीही.

त्यानंतर त्याला सोनाली पर्रीकर समोर दिसल्या, त्यांच्या चेहऱ्यावर हलके स्मितहास्य होते. त्या परिपक्वतेने म्हणाल्या,

"सर्व काही ठीक आहे, डोंट वरी. मला समजत्ये तुझी अवस्था, परंतु आपल्याला आता सुरुवात करावीच लागेल. अनंत,  तुझे डोळे तू उघडलेस तर आम्ही दृश्य स्क्रीनवर पाहू शकत नाही. त्यामुळे बोलत असताना तुझे डोळे मिटलेलेच ठेव.” त्यांनी अनंताला समजावले.

अनंतने शांतपणे डोळे बंद केले. सोनाली पर्रीकर यांनी प्रथम डॉ. चंदावरकर यांच्याकडे आणि नंतर डॉ. मेहता यांच्याकडे पाहिले. दोघांनीही मान हलवून होकार दिला. सोनाली पर्रीकर यांनी दीर्घ श्वास घेतला आणि प्रक्रिया सुरू केली.

" सुषेण कोण आहे?" सोनाली पर्रीकर यांनी पहिला प्रश्न विचारला.

अनंत काही वेळ शांत झाला; पण त्याला माहित होते की त्याच्या आठवणी सर्व काही सांगतील, म्हणून तो म्हणाला,

“तो मीच होतो.”

तो असे म्हणताच पडद्यावर एका गावाचे आणि त्या बेटावरील जंगलाचे चित्र उमटले. अनवाणी पायांनी चालत धनुष्यबाण वाहून नेणारे आदिवासी... किमान पण स्वच्छ अशा कपड्यांमध्ये दिसत होते. वनस्पती आणि फुलांच्या अद्भुत प्रजाती दिसत होत्या. उंच पर्वत आणि सुंदर धबधबे असलेली ही जमीन  सुपीक आहे असे वाटत होते.

"हे कोणते ठिकाण आहे?" असा सवाल सोनाली पर्रीकर यांनी विचारला.

"दक्षिण भारतातील एक गाव." अनंतने उत्तर दिले.

"तू तिथे काय करत होतास?"

"मी तिथं एक वैद्य  होतो. लोक विविध उपचारांसाठी माझ्याकडे येत असत. मला डोंगरात उगवलेल्या प्रत्येक मुळे, साल, पान आणि फुलांची माहिती होती. मला प्रत्येक आजाराची आणि त्याच्या उपचारांची माहिती होती.

"हे गाव नेमकं कुठे आहे?”  सोनाली पर्रीकर यांनी प्रोत्साहन देत विचारले.

“गावाचे नाव सुचिंद्रम आहे. ते आता तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात मोडते.”

“तू कोणाचा जीव वाचवलास?”

“मी अनेकांचे प्राण वाचवले होते, त्यापैकी एक लक्ष्मण होता. मी युद्धादरम्यान अनेक माणसांची आणि वानरांची सेवा केली होती."

"तुला म्हणायचे आहे, रामायणातील लक्ष्मण?" सोनाली पर्रीकर यांनी खात्री करून घेण्याच्या हेतूने विचारले.

"हो."

अनंत डोळे बंद करून विचार करू लागला आणि तसे करताच पडद्यावर एका माणसाची प्रतिमा साकार झाली. लांब दाढी, भगव्या रंगाचा अंगरखा  आणि लुंगी, लाकडी खडावा आणि डोक्यावर पगडी. त्यांच्या आजूबाजूला वनस्पती, औषधी तेलं आणि मलमं दिसत होती. काही निराळीच असामान्य भांडी त्यात औषधी मुळी आणि काढे होते.

तोच चेहरा,  तोच माणूस....अगदी हुबेहूब अनंत महाकाल. तो माणूस एका बेशुद्ध शरीराजवळ बसला होता. त्याच्या शेजारी आणखी एक माणूस त्या बेशुद्ध माणसाचा हात धरून रडत होता. तेथे अनेक माकडाचे तोंड असलेले माणसे होती, ते सर्व चिंताग्रस्त दिसत होते. पडद्यावर दिसणारी पात्रे दुसरी कोणी नसून सुषेण, भगवान राम, लक्ष्मण आणि हनुमान होती हे स्पष्ट झाले.

क्रमश: