नेताजी कि अश्वथामा?
"आपण दोघांनी जरा बोलायला हवं." मेहता यांनी डॉ.सोनाली पर्रीकर यांना सांगितले.
"आपण? एक्चुली आपल्या सर्वांना बोलण्याची गरज आहे." डॉ.सोनाली पर्रीकर वैतागून म्हणाल्या.
अनंत महाकाल पुन्हा शुद्धीवर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक दुःखी भाव दिसत होता, कारण त्याला समजले होते की त्याने आपली आणखी काही रहस्ये या मंडळींसमोर उघड केली होती. डॉ चंदावरकरांनी एक छोटासा ब्रेक जाहीर केला आणि ते खोलीतून बाहेर पडले.
डॉ. मेहता यांनी डॉ. सोनाली पर्रीकर यांना दाराजवळ बोलावले आणि म्हणाले, “मला लॉबीच्या त्या टोकाला खिडकीपाशी भेटा.”
"मला वाटतं आपण सगळ्यांना भेटायला हवं." सोनाली पर्रीकर यांनी ठाम प्रतिक्रिया दिली.
इतक्यात K.G.B. आली आणि म्हणाली, "सर, मला काहीतरी मिळाले आहे."
"इथे नको, चल आमच्याबरोबर." असे म्हणत डॉ.मेहता यांनी तिला सोबत घेतले.
"मी सगळ्यांनाच बोलावून घेते." सोनाली पर्रीकर यांनी सांगितले.
सर्वजण खोलीतून बाहेर पडले आणि अनंत महाकालवर नजर ठेवण्यासाठी रणधीर रक्षकांसह आत आला.
लॉबीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून रोहिदासने प्रथम बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, "तो वेगवेगळ्या शतकांचा उल्लेख करत नाहीये. तो वेगवेगळ्या युगांबद्दल बोलतोय.. हे कसं शक्य आहे?"
डॉ.सोनाली पर्रीकर म्हणाल्या,"हा माणूस नक्की काय रसायन आहे हेच मला समजत नाहीये. तो म्हणतो त्याचे नाव अनंत महाकाल! पण त्याच वेळी तो रामायणातला सुषेण आणि महाभारतातला विदुर असल्याचा दावाही करतो, याचा अर्थ त्याचे वय वाढतच नाही...आणि हे आपण मान्य करावे अशी त्याची इच्छा आहे! शिवाय, सुभाषचंद्र बोस यांना अश्वत्थामा मानून तो त्यांचा शोध घेत आहे. नक्की तो कोण आहे?"
"मलाही हाच प्रश्न पडला आहे, तो नक्की आहे तरी कोण?" डॉ मेहता काहीसे चिडूनच म्हणाले."KGB, तुझ्याकडे काय आहे?" त्यांनी पुढे विचारले.
KGB उत्साहाने सांगू लागली “सर, अनेक धक्कादायक तथ्ये सापडली आहेत. अनंत महाकालच्या बँक खात्यांबाबत मला माहिती मिळाली आहे. या सर्वांमध्ये खूप पैसा आहे आणि ती खाती देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत.”
“हम्म…आणि?” डॉ मेहता
“सर्वच खात्यांमध्ये त्याचाच फोटो आहे. त्याने उल्लेख केलेल्या सर्व नावांची माहिती मिळवण्यासाठी मी त्याचा फोटो वापरला आणि इमेज सर्चच्या सहाय्याने मला कळलं कि प्रोतिम मोहपात्राकडे वैध ऑल इंडिया ड्रायव्हिंग लायसन्स आहे. चंपकलाल चतुर्वेदी यांच्या नावे मतदार ओळखपत्र आहे. पंचमदादा मोंडल यांच्या नावाने पासपोर्ट!
मधुकर सुब्बुराव यांच्याकडे CSU चे सुमारे 70 वर्षे जुने अनेक बॉण्ड्स आणि शेअर्स आहेत. हाच दिवस आहे जेव्हा CSU ला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली होती आणि त्यांच्या शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर जाहीर करण्यात आली होती. ते शेअर मधुकर सुब्बुराव यांचे वडील सिद्धरामय्या सुब्बुराव यांनी विकत घेतले होते. सिद्धरामय्या सुब्बुराव यांच्या सध्याच्या खात्यांवर अनंत महाकाल याचा फोटो आहे. अनंत महाकाल ४० वर्षांचा आहे आणि सरकारी नोंदीनुसार मधुकर सुब्बुराव याच्या वडिलांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे. त्याने नमूद केलेल्या सर्व नावांसाठी मी वडिलांची माहिती पाहिली आहे.
नावे वेगवेगळी पण चेहरा एकच! याचा अर्थ ४० ते ५० वर्षांच्या अंतराने तो पिता आणि मुलगा दोघेही होता. तो जी काही नाव घेतो त्याची हीच परीस्थिती आहे.
लॉकर्सबद्दल बोलायचे तर पंजाबमध्ये सतपालसिंह अरोडा याच्या नावावर पंजाब नॅशनल बँकेचा लॉकर आहे. एस.पी. रामारेड्डी याच्याकडे हैदराबादमध्ये आंध्र बँकेचे लॉकर आहे. गुरु शरण सिंगचे वडील वगळता कोणाचेही पोलिस रेकॉर्ड नाही आणि त्याचा चेहराही अनंत महाकालच्या चेहऱ्याशी जुळतो. भारत-पाकिस्तान सीमेवर त्याला पकडण्यात आले. तो अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना एकेकाळी पाकिस्तानच्या तुरुंगात कैद करण्यात आले होते.
आणि बाय द वे ही सर्व नावे नामांकित संस्था आणि विद्यापीठांतून शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची आहेत. सेथूरमण हे डॉक्टर आहेत. बी.सी. चक्रधारी पॅरिसला जाऊन आलेले आहेत.
पण मला विष्णु गुप्ता या नावाविषयी काहीही सापडले नाही किंवा चंद्र गुप्ता या सांगितलेल्या नावाशी त्याचा संबंध सापडला नाही. तीच अवस्था विदुर आणि संजयची आहे.”
KGB अभिमानाने सांगत होती. ती आणखी काही बोलायच्या आधीच डॉ. मेहता यांनी विचारपूर्वक विचारले,
"त्याच्या आईबद्दल काही माहिती उपलब्ध आहे का?"
“त्यांच्या सर्वांच्या आई ते अगदी लहान असतानाच वारल्या होत्या. कोणतेही चित्र सापडले नाही. ही सगळी अपत्ये त्यांच्या त्यांच्या वडिलांनीच लहानाची मोठी केली आहेत.”
"हा केवळ एक योगायोग असू शकत नाही. त्याने सांगितले होते की त्याच्या सर्व ओळखी खऱ्या आहेत...” डॉ. सोनाली पर्रिकर विचारात पडल्या.
“तुला सुभाषचंद्र बोस आणि या सर्व लोकांमध्ये काही संबंध सापडला आहे का?” असा सवाल डॉ.मेहता यांनी केला.
"थोडाफार.... काही विचित्र तथ्य सापडली जी माहित असल्याचा सगळे दावा करतात कि त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती आहे." KGB ने खुलासा केला.
“सुभाषबाबूंचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही? हे सगळ्यांनाच माहीत आहे.” रोहिदासने विचारले. त्याच्या डोळ्यांत चिंता स्पष्ट दिसत होती.
“हो ते आहेच, पण या व्यतिरिक्त मला काहीतरी विचित्र सापडले आहे. सुभाषचंद्र बोस यांचे पाच वेळा, पाच वेगवेगळ्या नावांनी, भारतातील पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये निधन झाले आहे.”
KGB एखाद्या मोठ्या रहस्याचा उलगडा करत असल्यासारखी बोलली.
"म्हणजे?" सगळे अक्षरशः उडाले होते.
"हम्म... साहजिक आहे. हे असूच शकेल. या आत बसलेल्या माणसाचा बाहेरच्या जगात अस्तित्वात असेल्या प्रत्येक गोष्टीशी काही न काही संबंध आहेच.”
डॉ. मेहता वैतागून जाऊन आरोप करत म्हणाले पण त्यावेळेस ते उपहासाने हसत होते. KGB डॉ. मेहता यांच्या उपरोधिक मतावर हसत पुढे म्हणाली,
"सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी झाला होता. ते एक भारतीय राष्ट्रवादी होते ज्यांच्या असहकार चळवळीतील देशभक्तीने त्यांना भारताचा नायक बनवले. पण दुसऱ्या महायुद्धात भारताला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी नाझी जर्मनी आणि इम्पीरियल जपानकडून मदत मागितली होती. ज्यामुळे त्यांची प्रतिमा प्रस्थापितांकडून मलीन केली जाते.
आदरणीय नेताजी १९२० आणि १९३० च्या दशकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते आणि १९३८ आणि १९३९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनले; मात्र महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे त्यांची काँग्रेस नेतृत्वातून हकालपट्टी करण्यात आली होती. १९४० मध्ये भारत सोडण्यापूर्वी त्यांना ब्रिटीशांनी नजरकैदेत ठेवले होते.
सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ऑगस्ट १९४५ मध्ये ताईहोकू फॉर्मोसा म्हणजे सध्याचे तैपेई, तैवान येथे एका विमान अपघातात झाला असे मानले जाते. अनेक विचारवंतांच्या मते, सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू थर्ड डिग्री बर्न्समुळे झाला. परंतु त्यांच्या अनेक समर्थकांनी, विशेषतः बंगालमध्ये, त्यांच्या मृत्यूची वस्तुस्थिती किंवा परिस्थिती स्वीकारण्यास नकार दिला आणि आजही ते नकारतात.
त्यांच्या मृत्यूच्या नंतर काही तासांतच कटकारस्थानाच्या रचल्या गेलेल्या कथा समोर आल्या, त्यापैकी काही आजही टिकून आहेत, ज्यात बोस यांच्याबद्दलच्या काही भयानक काल्पनिक कथा आहेत.
बोस यांच्या हयातीच्या कथा १९४५ च्या सुमारास लोकप्रिय झाल्या होत्या, जेव्हा ते दिल्लीत दिसले होते आणि लाल किल्ल्यावर त्यांची हत्या केली गेली असे मानले जाते. पण १५ वर्षांनंतर १९६० मध्ये पॅरिसमध्ये काढलेल्या एका छायाचित्रातही ते दिसले होते.
अनंतचे नाव असलेले पंचमदादा मोंडल हे सुभाषचंद्र बोस यांचा शोध घेण्यासाठी १९६४ मध्ये पॅरिसला गेले होते. २७ मे १९६४ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी सुभाषचंद्र बोस यांनाही पाहिले गेले होते.
१९७७ मध्ये पुन्हा एकदा असा दावा करण्यात आला की ते मध्य प्रदेश येथे एका संताचे जीवन व्यतीत करत होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.
या सर्व रहस्यमय कथांनंतर 'गुमनामी बाबा' या कथेचा जन्म झाला. ते पडद्याआडूनच त्यांच्या समर्थकांशी बोलत असत. उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील गुमनामी बाबाच्या विश्वासपात्रांनी १९४४ मध्ये ते जर्मनीला गेल्याचे गुपित उघड केले होते; त्याच वर्षी ज्या वर्षी सुभाषचंद्र बोस जर्मनीमध्ये हिटलरला भेटले होते. पॅरिसच्या सौंदर्याची स्तुती करताना तर ते कधीच थकले नाहीत, असे त्याच्या विश्वासपात्रांनीही सांगितले होते. पण गुमनामी बाबाच्या पॅरिस भेटीची पुष्टी करू शकेल अशी कोणतीही नोंद नाही; मात्र सुभाषचंद्र बोस नक्कीच तिकडे गेले होते. गुमनामी बाबांच्या वैयक्तिक मित्रांनी असेही सांगितले होते की जेव्हा जेव्हा त्यांना सुभाषचंद्र बोस जिवंत असल्याची बातमी ऐकत तेव्हा ते ताबडतोब त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलायचे. असं म्हणतात कि १६ सप्टेंबर १९८५ रोजी त्यांनी आपला देह त्याग केला. पण खरी गम्मत या तारखेत नाही तर त्यांच्या जन्मतारखेत आहे, जी योगायोगाने २३ जानेवारी १८९७ आहे. ज्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला होता तोच दिवस.
अनंत महाकालच्या मते सुभाषचंद्र बोस अजूनही जिवंत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही; इतकच काय तर तो त्यांना शोधत देखील आहे." KGB ने जी काही माहिती गोळा केली होती ती पटापट सांगून टाकली.
काही क्षण सर्वजण शांत होते. सगळे मुद्दे एकत्र करून ते समजून घेण्याचा प्रयत्न ते करत होते, पण काहीच समजत नव्हते. काही वेळानंतर डॉ.मेहता म्हणाले,
"रोहिदास, त्या श्लोकाचा अर्थ काय होता?"
रोहिदास उत्तरला- “म्हातारपण माणसाला वाघासारखे घाबरवते, रोग शरीरावर शत्रूंप्रमाणे आक्रमण करतात, आयुष्य फुटक्या मडक्यातून पाणी झिरपते तसे असतेतरीही लोक इतरांना हानी पोहोचविण्याचा विचार करतात; त्यांना कळत नाही की ते स्वत: क्षणभंगुर आहेत, ही खरच आश्चर्याची बाब आहे. हा असा त्या श्लोकाचा नेमका अर्थ आहे.”
काही क्षण सर्वजण गप्प होते मग डॉ.मेहता यांनी सर्वांना विचारले.
“आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही की आपण या चौकशीद्वारे नक्की कुठे जात आहोत? पण एक व्यक्ती आहे, जिच्याकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. आणि आपण इथे कशासाठी आलो आहोत हे जाणून घेण्याची वेळ आली आहे? मी डॉ चंदावरकर यांच्याकडे जातोय. एकतर मी उत्तर घेऊन परत येईन किंवा आत्ताच्या आत्ता हे ठिकाण सोडून निघून जाईन. मला कोण कोण साथ देणार आहे?”
क्रमश: