Get it on Google Play
Download on the App Store

इंट्रोगेशन सेशन-२ पूर्वतयारी

अनंत आणि रणधीर इतका वेळ खोलीत एकत्र होते. अनंतला पूर्वीप्रमाणेच बांधून ठेवले होते. त्याच्या प्रकृतीत कोणताही बदल झाला नव्हता. रणधीर एका टेबलाजवळ हतबुद्ध होऊन बसले होते. शेवटी अनंतने मौन सोडले आणि कोरड्या स्वरात तो म्हणाला.

"मला एक ग्लास पाणी मिळू शकेल?" त्याच्या घशाला कोरड पडल्यासारखे रणधीरला वाटले.

"याच्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये." रणधीर यांनी बसल्याबसल्या  एका गार्डला आदेश दिले.

"... तुम्ही इथे किती दिवस काम करत आहात?" अनंतने संवाद सुरु करण्याचा प्रयत्न केला.

"काहीच दिवस झालेत." रणधीरने उत्तर दिले.

ओमने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो हसायला लागला.

"तू का हसतो आहेस?" रणधीरने जरा चिडूनच विचारलं.

"लवकरच पाऊस पडणार आहे . मला मातीचा वास आणि पावसाचा आवाज आवडतो." अनंत महाकालची नजर व्हेंटिलेटरमधून दिसणाऱ्या आकाशाकडे वळली होती. त्याने गार्डने आणलेले पाणी घटाघटा ढोसले.

"पाऊस? आत्ता? उन्हाळ्यात! तू वेडा झाला आहेस का?" रणधीर म्हणाले.

रणधीर यांना बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज ऐकू आला. ते खोलीतून बाहेर गेले आणि बाकीचे सर्वजण आत आले.

काही क्षणात सर्वजण आपापल्या जागी बसले. KGB उत्साहात होती कारण तिला फायनली काहीतरी काम दिले होते. अभिषेक गोंधळलेल्या नजरेने अनंत महाकालकडे एकटक पाहत होता. अनंत महाकालही अभिषेककडे टक लावून पाहत होता. डॉ.मेहता इंट्रोगेशनच्या दुसऱ्या सत्रासाठी सज्ज झाले होते. अचानक त्यांना आठवलं की ते काहीतरी विसरले आहेत. ते KGB जवळ गेले आणि कुजबुजले,

“अनंतने एका लॉकरबद्दल देखील सांगितले होते, जेथे तो त्याची माहिती सुरक्षित ठेवतो. त्याबद्दलही चौकशी कर."

“येस सर!” KGB. म्हणाली.

इतक्यात डॉ. चंदावरकर परत आत आले आणि सर्व सहकाऱ्यांची पाहणी केली असता डॉ. सोनाली पर्रीकर तिथे उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

" अभिषेक !" डॉ.चंदावरकरांनी त्याला बोलावले." डॉ. सोनाली पर्रीकरना शोधा आणि त्यांना इथे घेऊन या."

नाखुषीने होकारार्थी मान हलवत अभिषेक बाहेर पडला.

‘च्यायला... मीच का?’ असा विचार तो करत सरळ दाराकडे निघाला. 'त्या बाईला कुठे शोधायचे ते मला माहीत आहे! वाटलच होतं हि अजूनही इथेच बसली आहे ’

त्या त्यांच्या नोट्सचा बारकाईने अभ्यास करत होत्या.

"हे काय, आपण अजून इथेच?" तो अनिच्छेने आणि पण बिनधास्तपणे म्हणाला.

“मी नुकत्याच तयार केलेल्या नोट्स वाचत होते. बघू काही लिंक लागते का...तुला काय वाटतं अभिषेक...? "

"डॉ. पर्रीकर तुम्हाला चंदावरकर बोलावत आहेत.” त्या अभिषेकला काही विचारण्या आधीच तो त्यांना अडवत म्हणाला.

“हम्म....” सोनाली पर्रीकर यांनी होकारार्थी मान डोलावली.

डॉ.सोनाली पर्रीकर आणि अभिषेक एकत्र चालू लागले. प्रयोगशाळेत प्रवेश करण्यापूर्वी डॉ.सोनाली पर्रीकर मृदू परंतु अधिकारवाणीने म्हणाल्या,

“अभिषेक, तुला अघोरींबद्दल बरेच काही माहित आहे, तरीही मला आणखी एक गोष्ट तुझ्या माहितीत आणायची आहे की अघोरींचे एक तत्व आहे की त्यांना कोणत्याही प्राण्याबद्दल किंवा वस्तूबद्दल द्वेष नसतो. त्यांचा असा विश्वास असतो की जो द्वेष करतो तो साधना करू शकत नाही आणि त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. आपण नेहमी इतरांचा द्वेष करण्याचे कारण शोधत असतो, मग ते धार्मिक विचार, त्वचेचा रंग, भाषा, लिंग विविधता, राजकीय विचार, लिंग किंवा वंश यावर आधारित असो.आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे, नाही का? माझ्या म्हणण्याचा सारांश असा आहे की मी लोकांशी प्रुवग्रहदूषित मतांच्या आधारावर नव्हे तर व्यक्ती म्हणून ते कोण आहेत त्यांचे अंगभूत गुण काय आहेत या आधारावर व्यवहार करते आणि दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्याशी तसंच वागावं अशी माझी अपेक्षा आहे. तुला मुद्दा समजला ना?"

डॉ. सोनाली पर्रीकर त्याच्याकडे टक लावून म्हणाल्या. त्यांच्या नजरेत चांगलीच जरब होती. अभिषेकला काय ते नीट समजले आणि त्याने होकारार्थी मान हलवली. दोघांनी लॅबमध्ये प्रवेश केला. डॉ. मेहता डॉ.चंदावरकरांशी बोलत होते,

“सर, पुन्हा औषधांनी प्रतिसाद दिला नाही तर काय करणार?” डॉ.मेहता चिंतेत होते.

"आपण बघू." डॉ.मेहता यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत डॉ.चंदावरकर यांनी उत्तर दिले.

क्रमश: