प्रकरण ७
राजकुमाराला तिचे रूप पाहून मनात उत्पन्न होत असलेल्या भावना अत्यंत विचित्र भासत होत्या. तो पुष्टीवर इतका मोहित झाला होता कि त्याला स्वत:चा विसर पडत चालला होता. ती खरोखर मायावी स्त्री होती का? इतकी सुंदर स्त्री अशा दयनीय अवस्थेत कशी राहू शकते? राजकुमाराला शंका आली आणि त्याने विचारले,
“आपला इतकाच परिचय आहे का? येथील नगरवासियांनी सांगितले कि आपण विवाहित आहात. आपल्या पतीचे नाव काय आहे आणि ते कुठे आहेत? त्यांना इथे पाचारण करावे.”
“ क्षमा करा राजकुमार परंतु या क्षणी मी माझ्या पतीचे नाव उच्चारू शकत नाही.” पुष्टी
“ का बरे?” राजकुमार
“ कारण ते या वेळी विश्राम करीत आहेत. अशा वेळेस जर मी त्यांचे नाव माझ्या मुखातून उच्चारले तर त्यांच्या विश्रामात बाधा उत्पन्न होऊ शकते.”
तिच्या या बोलण्यावर उपस्थित मंडळीमध्ये एकच हशा पिकला. राजकुमारलाही तिचे बोलणे विचित्र वाटले तो म्हणाला.
“ तुमचे पतीपरमेश्वर येथेच जवळपास आहेत का? मला तर येथे कोणीही विश्राम करत असलेले दिसत नाही. आणि जरी तुमचे पती विश्राम करीत असतील तरी या क्षणी त्यांचे इथे उपस्थित असणे अनिवार्य आहे. या गावातील लोकांनी आपल्यावर चोरी, फसवणूक असे गंभीर आरोप केले आहेत. अशा वेळेस आपली इच्छा नाही का कि आपले पती आपल्या सोबत असावेत?”
“नाही. माझ्या लेखी त्यांनी विश्राम करणे अधिक महत्वाचे आहे. आरोप माझ्यावर केले आहेत आणि मी आता या क्षणी इथे उपस्थित आहे.” पुष्टी
"ठीक आहे.." राजकुमाराने दिनकरकडे इशारा केला आणि म्हणाला
“ या गृहस्थांनी तुमच्यावर आरोप केला आहे कि आपण यांच्याकडून एकसारखे उधारीवर जिन्नस आणि रोकड घेतली आहे. त्याच बरोबर त्यांनी तुम्हाला काल रात्री त्यांच्या घरी चोरी करत असताना पकडले. असे त्यांचे आरोप आहेत. हे सत्य आहे का?”
“असत्य आहे. माझ्या पतीने यांची संपूर्ण उधारी चुकती केली आहे. आणि ज्यावेळेस यांनी मला जिन्नस देण्यास नकार दिलं त्या दिवसापासून मी यांच्या घरी पाऊल देखील ठेवलेले नाही.” पुष्टी
“ वा गं वा! कधी फेडले संपूर्ण मूल्य? मी तर तुझ्या पतीला कधी पहिला सुद्धा नाही.” दिनकर व्यापारी डाफरला.
“माझ्या पतीने तुमच्या पुत्राला जीवनदान देऊन आपले कर्ज फेडले आहे.” पुष्टी
“जीवनदान? देवी कृपया विस्तारपूर्वक सांगावे.” राजकुमार
“ राजकुमार, कोणत्याही ज्योतीषचार्याचा परामर्श घ्या. ते आपणास हेच सांगतील कि यांच्या पुत्राचे आयुष्य संपले आहे. परंतु माझे पती इतके दयाळू आहेत कि त्यांनी थोड्याशा खाद्य जिन्नसाच्या बदल्यात यांच्या पुत्राला दीर्घायुष्य प्रदान केले आहे.” पुष्टी
“ तोंडाला फुटेल ते काय वाट्टेल ते बरळत आहे हि स्त्री ..” दिनकर व्यापारी आता भडकला होता.
“ मी तर आधीच म्हणाले होते कि हि स्त्री मायावी आहे.” कमला काकी म्हणाली.
“ देवी, आपले पती नक्की कोण आहेत? कृपया त्यांचा परिचय द्यावा. त्याशिवाय आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसले आहे.” राजकुमार सर्वांना शांत करत म्हणाले आणि पुष्टी मात्र गप्पच राहिली.
“सत्यवान याचे म्हणणे आहे कि आपण यांच्याकडून बांधकामासाठी जांभ्या दगडाचे चीरे घेतले. हे खरे आहे का?” राजकुमाराने पुढील प्रश्न केला.
“ खरे आहे.”
“ त्याचे मूल्यदेखील आपल्या पतीने दिले आहे का?” राजकुमार
“ होय दिले आहे. माझ्या पतीच्या कृपेमुळेच नंदीतेज राज्यातील संगमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य यांच्याकडे आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या कडून मी ऋण घेतले आणि ते सर्व माझ्या पतीने फेडले आहे. त्यामुळे माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे कृपया मला जाण्याची आज्ञा असावी.” पुष्टी
“देवी, आपण जे काही कथन केले त्यावर विश्वास तरी कसा ठेवावा? आपण हे सुद्धा धड सांगत नाही कि आपले पती कोण आहेत. अशात मी तुम्हाला निर्दोष कसे घोषित करू?”
हे शब्द ऐकताच त्या स्त्रीच्या मुखावर वेगळेच भाव उमटले. आतापर्यंत जिचे लक्ष फक्त देवालायावर केंद्रित होते ती आता थेट राजकुमाराच्या डोळ्यात पाहत होती. तिच्या तीव्र दृष्टीक्षेपामुळे राजकुमाराचे मन पुन्हा विचलित होऊ लागले. राजकुमार आपल्या मनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतच होता इतक्यात त्या स्त्रीने राजकुमाराला अत्यंत विचित्र प्रकारे पहिले जणू तिला राजकुमारच्या मनात काय सुरु आहे हे अगोदरच ज्ञात होते. आता ती रागावली होती. ती म्हणाली
“ राजकुमार, तुम्ही मला निर्दोष घोषित करा अथवा नका करू मला तुम्ही इथे थांबवून ठेवू शकत नाही. हे गाव आपल्या आपल्या अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळे कृपया मला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. माझे पती जागे झाले आणि मी तिकडे अनुपस्थित आहे हे त्यांना कळले तर ते प्रचंड क्रोधीत होतील. आणि असे झाले तर सर्वनाश होईल...”
तिचे हे बोलणे ऐकून राजकुमार प्रचंड संतापला होता परंतु आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवत तो तिला म्हणाला,
“ देवी, या नगरवासियांनीच माझ्याकडे न्याय मागितला आहे. हे नगर जरी आमच्या अधिपत्याखाली येत नसेल पण मी एक क्षत्रिय आहे. त्यामुळे जर कोणी आमच्याकडे न्याय मागत असेल तर आमचा धर्म हेच सांगतो कि आम्ही न्याय देणे अनिवार्य आहे. आणि आपल्यावर या नगरवासियांनी केलेल्या आरोपांचे खंडन करणारे एकही विश्वासार्ह उत्तर आपण देऊ शकला नाही आहात आणि आपण आपल्या पतीला येथे पाचारण करण्यास तयार नाही. त्यामुळे तुमचे म्हणणे आजीबात खरे वाटत नाही. मी तुम्हाला स्वत:ला सत्य सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी देतो. आपण कृपया त्यांना बोलवावे कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचण्याआधी मी त्यांचीही बाजू ऐकू इच्छितो.” राजकुमार
“ आपण दिलेल्या संधीबद्दल आभार, राजकुमार! परंतु सत्य हेच आहे कि आपण आणि येथील नगरवासी इथे बसून या नगराच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करीत आहात. मी पुन्हा एकदा सांगते हे क्षेत्र तुमच्या अधिपत्याखाली येत नाही. तुम्ही जे करू पाहताय तो न्याय नाही. मी तुम्हाला प्रश्न करते या लोकांचा न्यायाधीश बनण्या अगोदर या क्षेत्राच्या राजाची आपण अनुमती घेतली होती का? हे नगरवासी एक राजा असताना दुसऱ्या राज्याच्या राज्कुमाराकडे न्याय मागत आहेत. यांची मागणी पूर्ण करण्याआधी आपण या क्षेत्रातील राजाचे आवाहन केले होते का? जर नसेल केले तर आपण सर्वप्रथम त्या राजाचे दोषी आहात.”
पुष्टी बोलायची थांबली. तिने राजकुमार आणि उपस्थित मंडळी यांच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलू लागली.
“राजकुमार, माझे पती जागृत होण्याअगोदर आणि तुमचे हे दु:साहस त्याच्या कानावर जाण्याअगोदर आता मी तुम्हाला एक संधी देते. माझ्या पतीचे नगरावर खूप प्रेम आहे आणि स्वभावाने ते फारच दयाळू आहेत. मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करते कि ते सर्वांना क्षमा करतील.”
पुष्टीचे हे उत्तर राजकुमाराला फारच अपमानास्पद वाटले. ते काही म्हणायच्या आताच जमावातील एक जण म्हणाला,
“ अरे, काय निर्लज्ज बाई आहे. राजकुमाराचा अपमान करते..”
“हि तर असा आव आणून आहे जणू काही हि या गावची महाराणीच आहे.” पुष्टीला राधिकेने धक्का देत म्हटले.
“ए बाई, ऐक या गावाचा कोणीही राजा नाहीये आणि आम्ही सर्वांनी मिळूनच राजकुमाराकडे आग्रह केला आहे कि त्यांनी तुला शासन करावे. तुला शिक्षेची भीती आहे म्हणूनच तू इतकी वायफळ बडबड करत्येस ना? आणि कोण आहे तुझा नवरा? जो समोर येत नाही आणि आमच्यावर दया दाखवतोय. आला मोठा...”
दिनकर व्यापारी पुढे आला आणि हात जोडून म्हणाला,
“महाराज, आम्ही अगोदरच तुम्हाला सांगितले आहे हिचा कोणीही नवरा नाही. असता तर एव्हाना समोर आला असता. हि केवळ आपल्याला फसवण्यासाठी काहीतरी कारण काढत्ये. तरीही जर आपणास विश्वास बसत नसेल तर मी एक सुचवतो. आपण आपल्या सैनिकांना हिच्या घरी पाठवून अन्वेषण करावे. जर हिचा नवरा झोपला असेल तर समोरच दिसेल आणि नसला तरी काही न काही पुरावा तर मिळेलच ना?”
“ राजकुमार, आपण आपला वेळ वाया घालवत आहात. याउलट आपण ज्या कार्यासाठी इकडे आला आहात ते पूर्ण का करत नाही? माझ्या पतीचा साक्षात्कार इतका सुलभ होऊ शकत नाही.”
पुष्टी अविचलपणे म्हणाली.आता तर राजकुमारालाच त्या स्त्रीचे म्हणणे असत्य वाटू लागले होते. तो म्हणाला,
“वज्रसेन, या नगरातील एखाद्या नागरिकाला सोबत यांच्या घरी जा आणि कसून अन्वेषण करा. ह्यांचे पती तिकडे भेटले तर ठीक अन्यथा त्यांची एखादी वस्तू तिकडे असेल ती घेऊन या ज्यावरून सिद्ध होईल कि यांचा कोणी पती खरोखर आहे.”
“ थांबा राजकुमार, मी इतके समजावले तरी आपण चुकीचा निर्णय घेतला आहे. जर आपल्याला माझ्या पतीला भेटण्याची मनापासून इच्छा आहे तर मला जाऊ द्या आणि सायंकाळ पर्यंत प्रतीक्षा करा. मी आपणास वचन देते मी स्वत: त्यांना आपल्या समोर घेऊन येईन तेव्हा हे सिद्ध होईल कि मी सत्य कथन करत आहे.” पुष्टी
“ महाराज, हिला आजीबात जाऊ देऊ नका. आता हिला ठाऊक झाले आहे कि हिचे पितळ उघडे पडणार आहे. संधी मिळताच हि पळून जाईल.” कमला काकी म्हणाली.
आता राजकुमार वैतागला होता तो म्हणाला.
“ हे पहा देवी, आम्ही येथे उच्छिष्ट गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहोत. सायंकाळ पर्यंत आम्हाला नंदीतेज राज्यात परतायचे आहे. आम्ही आमचा आणखी वेळ वाया घालवू शकत नाही. म्हणून आपण आपल्या पतीला आता समोर बोलवावे अन्यथा सैनिक पाठवून आम्हाला आपल्या घराचे अन्वेषण करावे लागेल.”
“राजकुमार, देवालयात यावेळेस प्रवेश निषिद्ध आहे. ते आता संध्याकाळीच उघडेल आणि त्याच वेळेस आपणास माझ्या पतीचे दर्शनही होईल. तेव्हा आपण स्वत: माझा न्यायनिवाडा करण्याची आज्ञा देखील घेऊ शकता. आणि जर माझ्या पतीला वाटले कि आपण न्यायनिवाडा करण्यासाठी पात्र आहात तर ते स्वत: आपल्या सर्व प्रश्नांची सहर्ष उत्तरे देतील. तेव्हा माझे ऐका आपण काही वेळ येथे प्रतीक्षा करा आणि तूर्तास मला जाऊ द्या.” पुष्टी
पुष्टीचे हे शब्द राजकुमाराला विषारी बाणाप्रमाणे टोचले. तो उठून उभा राहिला आणि म्हणाला.
“ देवी, कदाचित परिस्थितीचा आपणास बोध नाही. याच कारणास्तव आपल्यावर या नागरिकांनी इतके आरोप केले आहेत. त्यांचे उचित उत्तरे देऊन खंडन करण्याऐवजी आपण माझा अपमान करून आपली मर्यादा ओलांडत आहात. आपण एक स्त्री आहात म्हणून आता पर्यंत आम्ही हे सर्व सहन केले. परंतु मला भासते आहे कि आपण आमच्या सहनशीलतेची चेष्टा करत आहात. हे गाव कोणत्याही राज्याच्या सीमेत मोडत नाही हे खरे असले तरी स्वच्छंदता आणि दु:साहस यातलं अंतर आपणास लक्षात आलेले नाही. या गोष्टीचा विचार करून आम्ही आपणास शेवटची संधी देत आहोत. वज्रसेन आणि इतर सैनिक यांना सोबत घेऊन जाऊन आपल्या पतीदेवांना तत्काळ येथे पाचारण करावे. आणि आपण जर आमच्या या आज्ञेचे उल्लंघन केले तर आम्ही असे गृहीत धरू कि आपण दोषी आहात आणि असत्यवचनी आहात.”
राजकुमाराच्या या बोलण्याचा पुष्टीवर काडीमात्र परिणाम झाला नाही आणि ती हसत हसत म्हणाली,
“ राजकुमार, मी आपणास अगोदरच सांगितले आहे कि माझ्या सत्य आणि असत्य यांचा निर्णय करण्याचा आपणास अधिकार नाही. गुह्यनगर नंदिमोक्ष राज्याच्या सीमेत येत नाही. आणि सीमेत येत जरी असते तरी आपण केवळ एक राजकुमार आहात. या प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिक केवळ राजाने नियुक्त केलेल्या अधिकारी व्यक्तीच्या हातात असतात. माझे ऐका आपली चूक मान्य करा आणि ज्या कार्यासाठी इथवर आला आहात ते पूर्ण करण्याकडे अगोदर लक्ष द्या. मला इथे पाचारण करून माझ्याशी मोठ्या आवाजात बोलल्याबद्दल मी आपणास क्षमा करेन आणि माझ्या पतीच्या कोपाचे भाजन होण्यापासून वाचवेन. सोबत मी हि प्रार्थना देखील करेन कि आपली साधना त्यांनी सफल करावी.”
राजकुमाराला हे अपमानास्पद शब्द सहन झाले नाहीत. तो आक्रोशाने म्हणाला
“ दुष्ट स्त्रीये, तू खोटारडी तर आहेसच त्या सोबत तू अनेकांना कपटीपणे फसवले देखील आहेस. आम्ही तुला अनेकदा संधी देऊन देखील तुझा उन्माद तुझ्या दर्पोक्तीतून दिसून येतोच आहे. आम्ही तुला या क्षणी गुह्यनगर सोडून जाण्याचा आदेश देत आहोत.”
"सावधान राजकुमार !" पुष्टी कडाडली
पुष्टिच्या या शब्दांत कोण जाणे काय शक्ती होती. सर्व नगरवासी भयभीत होऊन दोन दोन पावले मागे सरकले.
क्रमश:
लेखक :अक्षय मिलिंद दांडेकर