प्रकरण ३
संपूर्ण २ घटिका प्रतीक्षा केल्यानंतर सेतूपातीचा धीर संपलाच होता इतक्यात वज्रसेन घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या समोर आला.
“वज्रसेन, नंदीतेजाचा सुगावा लागला का?”
“होय महाराज”
हे ऐकून सेतूपतीच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपल्या प्रिय पुत्राला आपल्या हृदयाशी कवटाळण्यासाठी भावविव्हल झालेला सेतूपती म्हणाला
“कुठे आहे राजकुमार? तू त्याला सोबत घेऊन का आला नाहीस?”
“क्षमा करा महाराज! परंतु राजकुमारांची अवस्था पाहून मला लक्षात आले नाही कि मी त्यांना आत आणावे कि नाही?”
सेतूपती आपल्या हृदयातील भयभीत पित्याचे दु:ख लपवू शकला नाही.
“ अवस्था? म्हणजे काय? तो जखमी आहे का? कि तो मूर्छित होऊन पडला आहे? माझ्या मनावर दडपण आले आहे वज्रसेन. काय झालं आहे? सांग.” सेतूपती
“ महाराज.....ते...” वज्रसेन बोलताना पुन्हा अडखळला. त्याला घडलेली गोष्ट कशी सांगावी हेच समजत नव्हते. त्याने मोरयाशास्त्री यांच्याकडे पहिले मग राजपुरोहीतांकडे पहिले आणि मग मान खाली घातली.
“ अरे तू गप्प का? व्यर्थ वेळ दवडू नकोस? तुला समजत नाही का महाराज किती अस्वस्थ झाले आहेत.” राजपुरोहित म्हणाले.
वास्तविक राजपुरोहित देखील सेतूपती इतकेच भयभीत आणि अस्वस्थ झाले होते. जर राजपुत्र केवळ जखमी झालेले असते तर राज वैद्यांनी त्यांना नक्कीच बरे केले असते. परंतु वज्रसेन नक्की काय घडले ते सांगत नव्हते, त्यामुळे त्यांना अधिकच दडपण आले होते.
“ क्षमा करा राजपुरोहित, परंतु जे दृश्य मी पहिले ते कोणत्या शब्दात कथन करू तेच मला समजत नाहीये.” वज्रसेन
“ जे काही असेल ते सांगून टाक, वज्रसेन! आम्ही इतक्या कमकुवत मनाचे नक्कीच नाही कि आम्ही सत्याचा सामना करू शकत नाही. आता आणखी वेळ दवडू नकोस.” महाराज सेतूपती
“महाराज, राजकुमारांच्या शरीरात काही परिवर्तन झाले आहे. त्यांच्या छातीवर स्तन उगवले आहेत. आणि त्यांच्या योनीतून रक्तस्त्राव होत आहे. त्यांचा आवाज आणि वागणं बोलणं स्त्रियांसारखे झाले आहे.”
“वज्रसेन..! “ हे तू काय बरळत आहेस? कोणत्या स्त्रीला तू राजकुमार समजून बसला आहेस? केवळ सहा दिवस झाले आहेत राजकुमार बेपत्ता होऊन. इतक्यातच माझ्या सिंहासारख्या शक्तिशाली राजपुत्राची प्रतिमा तुझ्या मनातून पुसली गेली? ” महाराज कडाडले.
“नाही नाही महाराज! मी तर राजपुत्रांना अगदी बालपणापासून पाहतो आहे. त्यांना ओळखण्यात माझी चूक होऊ शकत नाही. आपली आज्ञा असेल तर मी त्यांना आत घेऊन येऊ का? आपण त्यांचे पिता आहात. जर आपण केवळ एक वेळा म्हणालात कि ते तुमचे पत्र नाहीत तर मी माझे मस्तक धडावेगळे करून आपल्या पायाशी प्रस्तुत करेन.”
वज्रसेन खूपच भावूक होऊन बोलत होता. राजकुमाराला या अवस्थेत पाहून त्याला स्वत:ला विश्वास बसत नव्हता. परंतु तो राजकुमाराला खूपच चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे त्याने राजपुत्राला पाहताक्षणीच ओळखले. राजकुमाराला त्या अंधारकोठडीत वेदनाविव्हल अवस्थेत पाहून वज्रसेनचे हृद्य हेलावून गेले होते. त्याची अशी अवस्था कोणाला समजू नये म्हणून त्याने राजपुत्राला एका मिठाईच्या पेटाऱ्यात बसवून लपतछपत इथवर आणले होते. परंतु महाराज सेतूपती यांच्यासमोर राजकुमाराला घेऊन येण्याचे धाडस वज्रसेनाला होत नव्हते. त्याला वाटले कि महाराज राजपुत्राला या अवस्थेत पाहू शकणार नाहीत. त्यामुळे त्याने त्या दोघांची थेट भेट घडवून आणण्याऐवजी महाराजांना राजकुमाराची अवस्था वर्णन करावी या हेतूने शब्दांची विफल जुळवाजुळव मनातल्या मनात सुरु केली होती पण प्रत्यक्ष समोर आल्यावर त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच मोरयाशास्त्री म्हणाले,
“ महाराज, एक राजा सत्याची पडताळणी झाल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे माझे असे मत आहे कि आपण वज्रसेनाला त्या स्त्रीला आत घेऊन येण्याचा आदेश द्यावा.”
सेतूपती काही क्षण नि:शब्द झाला आणि त्यानंतर त्याने वज्रसेनाला राजकुमाराला म्हणजे त्या स्त्रीला आत घेऊन येण्याचा आदेश केला. वज्रसेनाने आदेशाचे पालन केले. त्या स्त्रीला पाहताच सेतूपती मटकन खाली बसला. त्याचे हातपाय अगदी गळून गेल्यासारखे झाले. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. राजपुरोहित मोरया शास्त्री यांना घडलेला प्रकार ईतका अबोध वाटत होता कि त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.
क्रमश:
लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर