Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ५


“ तुम्हा सर्वाना हे तर ज्ञात आहेच कि माघ मासात गणेश जयंतीच्या दिवशी महाराजांनी हि घोषणा केली होती कि गुढी पाडव्याच्या दिवशी आपण युवराज्याभिषेक करणार आहोत. आपल्या कुळात जन्माला आलेल्या राजाचा राज्याभिषेक करण्याअगोदर उच्छिष्ट गणपतीचे अनुष्ठान करणे हा कुळाचार आहे. या कारणास्तव मी राजपुरोहित षण्मुखानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उच्छिष्ट गणपतीची साधना सुरु केली.

राजपुरोहित यांनी आम्हाला अगोदरच सूचित केले होते कि साधना पूर्ण होताच मला गुह्यनगरीतील सागरतटावर स्थित गणपतीच्या दर्शनाने संपन्न करायची आहे. या कारणास्तव त्या दिवशी प्रत: समयी काही अंगरक्षकांना सोबत घेऊन उच्छिष्ट गणपतीच्या दर्शनासाठी निघालो.

जेव्हा आम्ही गुह्यनगरीमध्ये पोहचलो तेव्हा तेथील लोकांनी देवालयात जाण्याचा मार्ग अडवून धरला होता. चौकशी केली असता समजले कि आम्ही तिकडे गेलो होतो म्हणुनच गावकरी लोकांनी जाण्याची वाट अडवली होती. त्यांची मागणी होती कि आम्ही त्यांना अगोदर न्याय द्यावा आणि त्यानंतरच ते आम्हाला दर्शनासाठी जाऊ देतील.

आम्ही त्यांना  समजावण्याचा बराच प्रयत्न केला कि  ते गाव स्वच्छंद आहे आणि कोणत्याही राज्याच्या सीमेत येत नाही. त्यामुळे कोणत्याही राजाला त्यांच्या न्यायप्रणालीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. आपला तो अधिकारच नाही. परंतु लोकांनी आमचे ऐकलेच नाही.

आपणास ज्ञात आहेच कि गुह्यनगर ते जयगड ह्या सागरीपट्ट्याला आपण उच्छिष्ट गणपतीचे अधिकारक्षेत्र मानतो. या कारणास्तव त्या नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आणि उद्दामपणा करणे योग्य ठरणार नाही.

आम्ही द्विधा मन:स्थिती मध्ये अडकलो होतो.तेव्हा अचानक  माझ्या लक्षात आले कि राजपुरोहित षण्मुखानंद यांनी आम्हाला सांगितले होते कि साधनेच्या अखेरच्या दिवशी उच्छिष्ट गणेश कोणत्याही रुपात येऊन आमची सत्वपरीक्षा पाहू शकतात. त्यामुळे आम्हाला वाटले कि कदाचित गणरायाला हे पडताळून पहायचे असावे कि आम्ही न्याय या शब्दाचा योग्य अर्थ जाणून आहोत कि नाही. असा विचार करून आम्ही नगरवासी जनांची मागणी मान्य केली.

आम्ही आमच्या घोड्यावरून उतरून देवालयाच्या आवारातील एका जुन्या उंच मंदार वृक्षाच्या पारावर बसून त्या नगरवासियांना त्यांची समस्या काय आहे याची पृच्छा केली."

सात दिवसापूर्वी घडलेली ती घटना आता राजपुत्राला व्यवस्थित स्मरण होऊ लागली होती. त्याची साधना संपन्न झाल्या कारणाने तो अत्यंत प्रसन्न भासत होता. आणि या आनंदाच्या भरात तो इतका मग्न झाला होता कि आपल्या समोर प्रस्तुत करण्यात आलेल्या परीक्षेचे तात्पर्य तो समजू शकलाच नाही.

क्रमश:

लेखक: अक्षय मिलिंद दांडेकर