Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ६


“सांगा, तुम्हा सर्वांची काय समस्या आहे?” मंदार वृक्षाखालील पारावर पद्मासनात बसलेल्या राजकुमाराने विचारले.

एक वृद्ध समोर आला आणि म्हणाला,

“ महाराज माझे नाव दिनकर आहे. मी एक व्यापारी आहे. येथील शेतकरी लोकांकडून मी धान्य, फळे, नारळ, सुपारी इत्यादी विकत घेतो आणि चीत्पुलूण येथे नेऊन विकतो. गेल्या काही दिवसांपासून एक युवती प्रतिदिवस माझ्याकडे येऊन काही न काही उधार मागून नेत होती आणि माझे पती येऊन पूर्ण मूल्य फेडतील असे सांगत होती. या गावातील लोकांनी माझी कधीच फसवणूक केली नाही. त्यामुळे मी त्या स्त्रीला कोणतेही प्रश्न न विचारता अन्नधान्य देऊ केले. एक महिना उलटून गेला आणि त्यानंतर मात्र मी त्या स्त्रीला अन्नधान्य देणे बंद केले. मी तिला सांगितले कि तुझ्या पतीला घेऊन ये आणि संपूर्ण उधार फेडून टाक. परंतु ती काही आपल्या पतीला घेऊन आली नाही. अतिरेक तर तेव्हा झाला जेव्हा काल ती माझ्या घरातून धान्य चोरून पळून गेली.”
दिनकर व्यापारी बोलायचा थांबला तेव्हा आणखी एक मनुष्य पुढे आला आणि म्हणाला,

“केवळ दिनकर शेठ नाही तर त्या स्त्रीने इतर लोकांचीही फसवणूक केली आहे. ती म्हणते कि ती विवाहित आहे परंतु आम्ही कोणी तिच्या पतीला पाहिलेले नाही. अनेक लोकांकडून कधी धान्य, कधी नारळ, कधी सुपारी. कधी फळे तर कधी कपडे असं साहित्य ती घेऊन गेली आहे पण यांचे मूल्य तिने कधी दिलेले नाही. दर वेळेस ती हेच पालुपद लावते कि तिचा नवरा येईल आणि संपूर्ण मूल्य फेडून टाकेल. आणि विचारले असता आता ती स्त्री म्हणते कि तिच्या पतीने सर्व कर्ज फेडून टाकले आहे. या  गावात एकही अशी व्यक्ती नाही जो तिचा घेणेकरी नाही.”

“तुमचे नाव काय?” राजकुमार

“महाराज, माझे नाव सत्यवान आहे. मी या गावातील विश्वकर्मा कुळातील कर्ता पुरुष आहे.” सत्यवान

“त्या स्त्रीने तुमच्याकडून काही कर्ज घेतले आहे का?” राजकुमार

“ होय त्या स्त्रीने आमच्याकडून जांभ्या दगडाचे चीरे घेतले आहेत आणि घेताना सांगितले कि त्याचे मूल्य तिचा नवरा देईल.” सत्यवान

“ ठीक आहे, आता आणखी कोणाची काही तक्रार आहे का? त्या स्त्रीला तातडीने समोर हजर करा.” राजकुमार

“ महाराज, मला काही सांगायचे आहे.” एक वृद्ध स्त्री समोर आली. ती कदाचित त्या गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असावी.

“ आजी, आपले नव काय आहे? आणि त्या स्त्रीने आपले काही साहित्य घेतले आहे का ज्याचे मूल्य अद्याप चुकवलेले नाही.?” राजकुमार

“महाराज, माझे नाव कमला काकी. आम्ही या गावाचे गुरव. माझे पती आणि माझा पुत्र दोघे या मंदिरासाठी आणि गावासाठी झटले आहेत. त्या स्त्रीने माझ्याकडून काहीच घेतले नाही, महाराज! कारण मी त्या स्त्रीला पहिल्या भेटीतच ओळखले होते आणि त्यामुळेच मी तिला काही द्यायला अगोदरच नकार दिला होता. माझ्या डोकीचे केस असेच पिकले नाही महाराज! मी गावातील सर्वांना समजावत होते कि या स्त्रीपासून सावध रहा. ती कोणी मायावी स्त्री आमच्या गावाला तिच्या जाळ्यात अडकवेल याची मला आधीच कल्पना होती. पण माझे कोणीच ऐकले नाही.”

“परंतु आजी, आपणास असे का वाटते कि ती स्त्री मायावी आहे?” राजकुमाराने विचारले.

“ महाराज, माझ्या पाहण्यात आले आहे कि या गावातील कोण्या व्यक्तीने तिला काही वावगे बोलले किंवा उधार देण्यास मनाई केली तेव्हा तेव्हा त्यांच्या कुटुंबावर काही न काही संकट आले आहे.” कमला काकी

“ इथे उपस्थित आणखी कोण कोण आहेत जे कमला काकींशी सहमत आहेत.?” राजकुमाराने विचारले.
एक स्त्री आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन समोर आली आणि म्हणाली,

“ मी महाराज! मी कमला काकींशी सहमत आहे. माझे नाव मालती आहे आणि माझे पती शेतकरी आहेत. माझ्या पतीने एकदा त्या स्त्रीला आमच्या आमराईमध्ये आंबे चोरताना पकडले होते आणि पुन्हा आमराईच्या जवळपासही न दिसण्याची तंबी दिली होती. त्या रात्रीपासून त्यांचीन तब्ब्येत खालावू लागली आणि आता तर ते इतके दुर्बल झाले आहेत कि अंथरुणातून उठूही शकत नाहीत.” असे म्हणून मालती रडू लागली.

त्यानंतर अनेकांनी या दोघींशी सहमती दर्शवली कि ती स्त्री कदाचित मायावी असावी.

“ठीक आहे. त्या स्त्रीला समोर हजर करा.” राजपुत्राने आदेश दिला.थोड्याच वेळात दोघांनी त्या स्त्रीला पकडून समोर आणले.

राजकुमाराची दृष्टी जेव्हा त्या स्त्रीवर पडली तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला. भरदार उरोज आणि नितंब असलेल्या त्या स्त्रीचे सौंदर्य अवर्णनीय होते. इतकी वर्षे राजप्रासादात राजपुत्राने सुंदर सुंदर गणिका पहिल्या होत्या परंतु त्या सर्व स्त्रियांचे सौंदर्य या स्त्रीच्या रूपासमोर नगण्य होते.राजकुमार मनात विचार करत होता कि एखादी स्त्री अशा फाटक्या साडीत इतकी सुंदर दिसते तर हिला राजप्रासादातील उंची वस्त्रे आणि आभूषणे किती शोभून दिसतील. हिच्या सौंदर्यापुढे अप्सराही लज्जित होतील. काही वेळ राजपुत्राचे मन भरकटले परतू पुढच्या क्षणीच त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला आणि तो म्हणाला

“देवी, आपण कोण आहात? कृपया आपला परिचय द्यावा.” त्या स्त्रीने आपल्या आजूबाजूला उभ्या लोकांकडे पहिले आणि थोडी घाबरतच ती म्हणाली.

“ मी पुष्टी! ” आणि ती गप्प झाली.

तिचे शरीर जितके सुंदर होते तितकीच मधुर तिची वाणी होती. तिचे सौंदर्य आणि मधुर वाणी सर्व नागरिकांच्या लक्षात कसे आले नाही? कि फक्त राजकुमारालाच ती तशी दिसत होती.राजकुमाराचे मन अत्यंत विचलित झाले होते. त्या स्त्रीच्या सौंदर्याचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला होता कि काही क्षण तो विसरूनच गेला कि तो त्या पारावर न्यायाधीशाच्या रूपातच बसला आहे. त्याला ती हवी होती.

"राजकुमार नंदीतेज....!"

वज्रसेन याने हाक मारताच राजकुमार भानावर आला कि तो तिकडे न्यायदानासाठी बसला आहे. आणि त्याने हे देखील पहिले कि त्या स्त्रीने राजकुमाराकडे ढुंकूनही पाहिले नाही.तिची दृष्टी देवालायावर होती आणि ती चिंतीत दिसत होती. केवळ एकदा तिने राजकुमाराकडे मान वर करून पहिले असते तर तिला आपल्या पतीचा विसर पडला असता आणि राजकुमारवर ती मोहित झाली असती.

त्या स्त्रीने राजकुमाराकडे न पाहणे त्याला अपमानास्पद वाटत होते.

क्रमश:

लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर