प्रकरण २
....आणि मग वज्रसेन आणि राजपुरोहित राजकुमारच्या कक्षातून बाहेर आले. राजपुरोहित महाराज सेतूपती याला भेटायला गेले आणि वज्रसेन तेथे द्वारपाल बनून पहारा देऊ लागला. तीन प्रहार झाल्यानंतर मोरयाशास्त्री यांनी वज्रसेनाला हाक मारली. वज्रसेन आत आला. त्याच्या चेहऱ्यावर आशेचा किरण प्रफुल्लीत झाला होता.
“वज्रसेन, राजकुमार लुप्त झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण राजवाड्यात त्यांचा शोध घेतला होतात का?” मोरयाशास्त्री
“होय ब्राम्हणदेव! मी स्वत: आणि माझ्या सहकारी रक्षकांनी संपूर्ण राजप्रासाद पालथा घालून शोध घेतला आहे.” वज्रसेन
“ आणि कारागृह?”
“होय तेथील अन्वेषण देखील आम्ही केले आहे.”
“ आणि स्त्रियांचे कारागृह?”
“ मी समजलो नाही ब्राम्हणदेव?”
“का? या राज प्रसादामध्ये स्त्रियांचे कारागृह नाहीये का?”
“ आहे ब्राम्हणदेव... “
“ मग तुम्ही तिकडे शोध घेतलात का?”
“ नाही ब्राम्हणदेव..”
“ ठीक आहे. मग जा आणि एकदा स्त्रियांच्या कारागृहाचे एकदा काळजीपूर्वक अन्वेषण करा.”
“ परंतु महाराज स्त्रियांच्या कारागृहात पुरुष रक्षकांना जाण्याची अनुमती नाही त्यासाठी महाराज सेतूपती यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तेथे केवळ स्त्री रक्षक आणि किन्नर यांनाच प्रवेश आहे.”
“ ठीक आहे वज्रसेन. मग महाराजांना वस्तुस्थिती काय आहे हे अवगत करून द्या. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा राजकुमार नंदीतेज यांचा आज संध्याकाळ पर्यंत सुगावा लागणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर मात्र आपण त्यांची काहीही मदत करू शकणार नाही.”
मोरयाशास्त्री यांचे हे शब्द ऐकून वज्रसेन यांचे हातपाय थरथर कापू लागले. राजकुमार पुन्हा कधीच भेटणार नाही हा विचार त्याच्या मनात सुद्धा येऊ नये म्हणून तो प्रार्थना करत होता. परंतु मोरया शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार ती शक्यता देखील नाकारता येत नव्हती. कसाबसा भानावर येऊन वज्रसेन महाराजांकडे जायला निघाला.
“ जशी आज्ञा, ब्राम्हणदेव..”
काही वेळातच महाराजांना भेटून वज्रसेन याने सगळी हकीकत महाराजांच्या कानावर घातली. वज्रसेन याला स्त्री कारागृहात अन्वेषण करण्याचे अनुमतीपत्र देऊन सेतूपतीने त्याला रवाना केले.
नंतर सेतूपती स्वत: राजपुरोहित षण्मुखानंद यांच्या सोबत राजपुत्राच्या कक्षात गेला. त्याने मोरयाशास्त्री यांना साष्टांग नमस्कार केला
“हे गुरुशिरोमणी, या भयंकर आपत्तीच्या काळात आपणा आमच्या समोर दत्त बनून उभे राहिला आहात. रात्रीच्या वेळी या कक्षात नक्की काय घडले याचे मला ज्ञान नाही परंतु हे सर्व निश्चित आमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फलित आहे असे समजून आम्ही राजकुमार परत येण्याची आशाच मनातून सोडून दिली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यातील सर्व नागरिकांना राजप्रासादात जे घडले ते सांगून आपले राज्य प्रमुख मंत्रीगणांच्या हाती सोपवून वानप्रस्थ स्वीकारण्याचा आम्ही निर्णय घेणार होतो कारण आम्हाला तोच मार्ग योग्य वाटत होता. जो राजा स्वत:च्या अपत्याचे नीट संरक्षण करू नाही शकला तो आपल्या प्रजेचे काय रक्षण करणार?" महाराज सेतूपती
महाराज सेतूपती याचे बोलणे मोरयाशास्त्री यांनी गंभीरपणे ऐकून घेतले. ते त्यांचे सांत्वन करत म्हणाले.
“महाराज, जे घडून गेलं त्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. आपण सर्वच आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ स्वत: भोगत असतो. हे सत्य आहे कि आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फलित म्हणून आपला आणि राजपुत्र यांचा वियोग निश्चित होता परंतु हे देखील तितकेच सत्य आहे कि भगवान शिवशंकरांची आपल्यावर कृपा आहे. राजकुमार जीवित आहेत. आपण केवळ संगमेश्वरावर श्रद्धा ठेवा. त्याच्या कृपेने सर्व काही ठीक होईल."
सेतूपतीने दोन्ही हात जोडले आणि संगमेश्वर महादेवाचे स्मरण केले.
क्रमश:
लेखक : अक्षय मिलिंद दांडेकर