०९ राँग नंबर ३-४
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
ती छोट्या किंवा मोठय़ा पडद्यावर गेली तर नाव मिळवील असा विचार माझ्या मनात येऊन गेला.
तिच्या पाठोपाठ जाऊन ती मधुर संगीत विद्यालयातच जाते याची मी खात्री करून घेतली.
बाहेर मोटारीत शांतपणे बसून राहिलो.सव्वा नऊच्या सुमारास ती बिल्डिंगबाहेर आली.
तिच्यापाठोपाठ मी ती कुठे राहते ते बघण्यासाठी गेलो.ती कोणत्या सोसायटीत जाते एवढे पाहून नंतर घरी निघून आलो.
बहुधा माझे मिशन राँग नंबर यशस्वी झाले असावे.
मी घरी आलो तो खुशीतच शीळ घालीत आलो.माझ्या सुदैवाने 'राँग नंबर मंजुळा' माझ्या कल्पने प्रमाणेच तरुण अविवाहित होती.तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते.अर्थात हे कांही लग्न झाल्याचे व्यवच्छेदक लक्षण समजता येत नाही.काही स्त्रिया लग्न झालेले असूनही मंगळसूत्र घालत नाहीत.तर कांही स्त्रिया केवळ फॅशन म्हणून केव्हां केव्हां मंगळसूत्र घालतात.कांही स्त्रिया पुरूषांपासून संरक्षण,विवाहित म्हणून मुले मागे लागत नाहीत. त्रास देत नाहीत.या हेतूनेही मंगळसूत्र घालतात.
असे असले तरी ती ज्या प्रकारे माझ्याशी फोनवर बोलत होती त्यावरून ती अविवाहित असावी असा अंदाज मी केला होता. प्रत्यक्षात तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते.ती लहान मुलगी नव्हती. ती प्रौढाही नव्हती.एकूण सिग्नल हिरवा होता.ती फारशी सुंदर नव्हती.कित्येक जणांनी तिला आल्सो रॅनमध्ये काढली असती.तिचे थोडक्यात वर्णन पुढीलप्रमाणे करता आले असते.निदान ती मला तशी भासली.बेताची उंची, किंचित कृश शरीरयष्टी,अपरे नाक,शुभ्र दंतपंक्ती,बेताची कपाळपट्टी,दाट केस,उजळपणाकडे झुकणारा सावळा वर्ण,प्रभावी हास्य.अर्थात तिचे खळखळून हास्य मी पाहिले नव्हते.लिफ्टमध्ये तिने तिच्या ओळखीच्या गृहस्थांकडे बघून ओळखीचे स्मित केले होते.त्यावरून मी अंदाज केला होता.मन मोकळे हसणारे लोक,मोकळ्या मनाचे असतात,असा माझा आपला एक अंदाज होता.अर्थात नियमाला अपवाद हे असतातच.तिच्याशी ओळख झाल्यावर तिचे खळखळून तोंडभरून हास्य पाहायला मिळणारच अशी माझी खात्री होती.
रात्री मी तिला फोन केला.ती फोन घेईलच याची मनोमन खात्री होती.मागच्या वेळेला जे प्रदीर्घ संभाषण झाले होते त्यावरून ती फोन नक्की उचलील असा माझा अंदाज होता.तिने फोन उचलला.मी एकदा राँग नंबर बोलत आहे ना असे विचारणार होतो.परंतु दुसऱ्या कोणी फोन उचलला असल्यास गोंधळ उडू नये म्हणून मी बोलत आहे.असे सांगितले.मधुराने माझा नंबर सेव्ह केला होता.तिने मी कोण ते बरोबर ओळखले.तिने मी राँग नंबर बोलत आहे असे उत्तर दिले.त्यावर आम्ही खळखळून हसलो. आमच्या संभाषणाला सुरुवात झाली .
"मी तुम्हाला ओळखले आहे.तुम्ही संगीत विद्यालयात रात्री आठला जाता.बाई तुमची स्पेशल शिकवणी घेतात.तुम्ही त्यांचे नाव काढाल अशी त्यांना खात्री आहे."
~अरे वा दोन दिवसांत तुम्ही बरीच प्रगती केली.तुम्ही पोलिसांत आहात काय?~
"त्यासाठी पाेलिसांत कशाला असायला पाहिजे.प्रत्येकात एक गुप्तहेर दडलेला असतो."
~तुम्ही ज्या मार्गाचा अवलंब केला त्याच मार्गाचा मी अवलंब केला.~
"कोणता मार्ग"
~व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यामधून जाणारा मार्ग
तुम्ही शोध घेणार याची मला तुमच्या बोलण्यावरून खात्री पटली होती.मी माझे खरे फोटो तिन्ही ठिकाणी टाकले होते.~
"होका तरीच मी तुमच्या प्रत्यक्ष दर्शनापर्यंत पोहोचू शकलो."
~तुम्ही लिफ्टमध्ये शिरल्याबरोबर मी तुम्हाला ओळखले.मीही तुमचा फोटो तुमच्याच मार्गाने शोधून काढला होता.~
"तुम्ही माझा शोध घेण्याचा प्रयत्न करणार याची मला खात्री होती.म्हणून मी तिन्ही ठिकाणी माझे खरे फोटो टाकले होते"
यावर आम्ही दोघे खळखळून हसलो.
"मग तुम्ही तुमचे गाणे मला कधी ऐकवणार?"
~माझे गाणे ध्वनिमुद्रित व्हावे म्हणून प्रयत्न चालला आहे.एक ना एक दिवस त्यामध्ये यश निश्चित येईल.त्यावेळी तुम्हाला माझे गाणे रेडिओवर,टीव्ही चॅनेलवर किंवा दैव अनुकूल असेल तर एखाद्या चित्रपटातही पार्श्र्वसंगीत म्हणून एखाद्या अभिनेत्रीच्या गळ्यातून ऐकायला मिळेल.~
"त्याबद्दल मला निश्चित खात्री आहे.तुम्ही लवकरच चमकत्या तारका होणार आहात"
~तुम्ही पुन्हा मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला सुरुवात केलीत.तुमच्याकडे हरभऱ्याच्या झाडांची लागवड केलेली आहे वाटते?~
"खरे बोलायला डर कुणाची?तुम्हाला लवकरच तुमचे इप्सित साध्य होवो अशी शुभेच्छा मी प्रगट करतो."
~ तुमच्या सदिच्छांबद्दल मनःपूर्वक आभार .ते सर्व ठीक परंतु जर तुम्ही मला ओळखले होते तर माझ्याशी बोलला कां नाहीत?~
"खरे सांगू!"
~मग आतापर्यंत काय खोटे बोलत होता?~
"तसे नव्हे मला तुमची थोडी भीती वाटत होती."
~तुम्हाला जर भीती वाटत असते तर तुम्ही हा शोध घेतला असता का?~
"तुमच्या चेहऱ्यावर ओळखल्याची जरा जरी खूण दिसती तरी मी तुमच्याकडे बघून निदान हास्य तरी केले असते.परंतु तुमचा चेहरा ढिम्म होता."
~मला तुमच्याकडे बघून हास्य करायचे होते.ओळख दाखवायची होती.तुमची प्रतिक्रिया बघायची हाेती~
"मग तसे कां केले नाही?"
~मी ओळख दाखवणार होते परंतु त्याच बिल्डिंगमध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ राहतात.ते लिफ्टमध्ये होते.त्यांनी माझ्याकडे बघून काय कशी काय बरी आहेस ना असे विचारलेले तुम्हाला कदाचित आठवत असेल.म्हणून मी ढिम्म राहिले.~
"तुम्ही नुसत्या चांगल्या गायिकाच आहात असे नव्हे तर चांगल्या अभिनेत्रीही आहात."
~असे तुम्ही कशावरून म्हणता?पुन्हा तुम्ही हरभऱ्याचे झाड आणले.~
"लिफ्टमध्ये शिरल्यावर मी तुमच्या चेहर्याकडे बारकाईने पाहत होतो.तुम्हीही माझ्याकडे पाहात होता. तुमच्या चेहऱ्यावरील एक बारीकशी रेषही हलली नाही."
~मगाशीच मी तुम्हाला सांगितले लिफ्टमध्ये आमच्या ओळखीचे गृहस्थ होते.~
"परंतु तुम्ही चेहरा अगदी अनोळखी ठेवला होता.तुम्ही मला ओळखलेच नाही असे मला वाटले"
~तुम्ही तुमच्या मोटारीत बसून माझ्यावर लक्ष ठेवीत होता.मी आल्याबरोबर तुम्ही माझ्या मागोमाग लिफ्टमध्ये आलात.~
"अरे बापरे!तुम्हाला तर सर्वच माहीत आहे.तुमच्याशी जरा जपूनच वागले पाहिजे"
~एखाद्या मुलीला निरनिराळय़ा सोशल मीडियावरून शोधून काढणे.तिची वाट पहाणे.तिचा पाठलाग करणे.असे वेळी अवेळी फोन करणे हे जपून वागणे का?~
"बरे ते जाऊ दे .तुम्हाला मालिनीबाई काटदरे भेटल्या का?तुमचे गाणे ध्वनिमुद्रित केव्हां होणार?तुमचे नांव पार्श्वगायिका म्हणून कधी झळकणार?तुम्हाला छोट्या किंवा मोठय़ा पडद्यावर बघण्याचा आम्हाला लाभ केव्हा मिळणार?
~हो हो हो एकाच वेळी किती प्रश्न?हल्ली स्पर्धा खूप असते.त्यातून आपल्या गुणांवर पुढे येणे मोठे कठीण असते.कुणीतरी गॉडफादर असला तर सर्व कांही सोपे होते.किंवा कांही तडजोडी कराव्या लागतात.मला गॉडफादर नाही.मला कोणतीही तडजोड करायची नाही.~
"मी तुम्हाला आश्वासनपूर्वक सांगतो की तुमच्या गुणावर तुम्हाला यश मिळेल."
~तुमच्या सदिच्छांबद्दल खूप खूप आभार.त्या तर तुम्ही मगाशीच दिल्या आहेत. ~
"पुन्हा दिल्या तर काय बिघडले.अधिकस्य अधिकं फलम्"
यावर ती काही बोलणार होती परंतु तेवढ्यात तिच्या बहुधा मावशीचा आवाज ऐकू आला.मधू किती वेळ फोनवर बोलत बसली आहेस?कोण आहे तरी कोण?खूप रात्र झाली.झोपायचे नाही का?
त्यामुळे तिने मला
~गुड नाइट शुभ रात्री केले.~
फोन कट होण्याच्या अगोदर मी घाईघाईने
"शुभरात्री,स्वीट ड्रीम्स "
असे म्हटले आणि त्या रात्रीचे आमचे संभाषण संपले.एकूण दोन तीन दिवसांत आमची चांगलीच प्रगती झाली होती.आता व्हॉट्सअॅपवर संदेश वहन करायला हरकत नव्हती.तिच्या बाजूने हिरवा सिग्नल मिळालेला दिसत होता.माझ्या बाजूने तर हिरवा होताच!
तिला हे माहिती नव्हते की मालिनीबाई काटदरे या माझ्या आत्या होत्या.
त्यांचा मुलगा प्रसिध्द ध्वनिमुद्रक होता.त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ होता.
मी कृष्णकांतला माझ्या आतेभावाला फोन लावला. त्याच्याजवळ मोकळेपणाने सविस्तर बोललो.
कृष्णकांतच्या त्याच्या व्यवसायामुळे सिनेक्षेत्र, नाट्यक्षेत्र,मोठमोठय़ा ध्वनी मुद्रण करणाऱ्या कंपन्या,टीव्ही चॅनेल्स, इत्यादी क्षेत्रात ओळखी होत्या.
* संधी मिळताच त्याने मधुराला वाव दिला असता.*
*कुणाच्याही पाठिंब्याशिवाय मी नाव कमवीन अशी राँगनंबरची जिद्द होती.माझी शिफारस तिने मान्य केली असती असे नाही.*
*तिला संधी देण्यासाठी मला कदाचित डावपेच आखावे लागणार होते*
*मी एवढा प्रयत्न करीत होतो.परंतु मधुरा माझ्यावर प्रेम करते की नाही याचा मला पत्ताच नव्हता.*
* दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच वेळी मधुराला फोन केला.*
(क्रमशः)
१४/७/२०२१©प्रभाकर पटवर्धन