Get it on Google Play
Download on the App Store

०८ राँग नंबर २-४

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

"मुळीच नाही मी नेहमी खरे बोलतो.खरे बोलण्याला डर कुणाची? तुमच्या मधुरा देशपांडे या नावाप्रमाणेच तुमचे बोलणे मधुर आहे.तुमचा आवाज मधुर आहे.  तुमच्या आईवडिलांनी तुमचे इतके बरोबर नाव कसे काय ठेवले असेल?त्यांना तुमचे भविष्य कळले असणार "

~ते ठीक आहे .परंतु आपण परस्परांची स्तुती करण्यात जास्त वेळ घालवत आहोत असे तुम्हाला वाटत नाही काय?~

"मुळीच नाही सर्व काही पूर्वनियोजित असते असा माझा गाढ विश्वास आहे .तसा माझा अनुभव आहे.सर्व कांही तो ठरवीत असतो.आपल्याला फक्त ते माहीत नसते एवढेच.योग्य वेळ येताच सर्व उलगडा होतो."

~हे मात्र खरे.मलासुद्धा कित्येकवेळा योगायोगांची गंमत वाटते.~

"हो ना. आत्ताच पाहाना.तुम्ही फोन मालिनीबाई काटदरेना केला.तो मला लागला.माझ्या नशिबात एवढा मधुर मंजुळ आवाज ऐकण्याचे होते म्हणूनच तसे झाले ना?"

~तुम्ही तरी ना!एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर फारच चढविता?~

"अहो हे तर मगाशीच बोलून झाले.कांही नवीन ऐकवाना.".

~आपण मधुर गाणे पुन्हा पुन्हा ऐकतोच कि नाही?~

"हे मात्र खरे.मला तुमच्याशी पुन्हापुन्हा बोलत राहावे असे वाटत आहे."

~परंतु आता नाईलाजाने आपल्याला फोन बंद करायला हवा ~

"नाइलाजाने म्हणजे मला जसे वाटत आहे तसेच तुम्हाला वाटत आहे.मला हे ऐकून खूप आनंद झाला."

~मग करू फोन बंद आपण किती तरी वेळ बोलत आहोत.तुमचा अमूल्य वेळ मी घेत आहे.~

"अजिबात नाही.माझा एवढा वेळ सत्कारणी कधीच लागला नव्हता."

~तुमचा आवाज फार गोड नसेल.परंतु तुमचे बोलणे गोड आहे. दुसऱ्याला बोलते कसे ठेवावे.दुसऱ्याला कंटाळा कसा येऊ देऊ नये.यात तुम्ही माहीर आहात.~

"स्वत:ची स्तुती कुणाला आवडत नाही?मी त्याला अपवाद कसा असणार?तुमचा आवाज जसा मधुर आहे.तसेच तुमचे बोलणेही मधुर आहे.तुम्ही सतत बोलत राहावे.आणि मी ऐकत राहावे असे मला वाटते."

~हो पण कधीतरी आपल्याला फोन बंद तर करावाच लागणार?~

"हो ना, त्याशिवाय आपण प्रत्यक्ष कसे भेटणार"?

~म्हणजे प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे तर. ~

"हो ना माझ्या तशा बर्‍याच इच्छा आहेत."

~काय म्हणालात?~

"कांही विशेष नाही आपण भेटणार हे विधिलिखितच आहे असे म्हणत होतो."

~अरे वा तुम्हाला भविष्य केव्हापासून कळू लागले?~

"तुम्ही भेटल्यापासून!"

~बर आता मी फोन बंद करते.~ 

"एक मिनिट,त्यापूर्वी तुमचे गाणे ऐकवले तर मी उपकृत होईन.गाण्याची एखादी लकेर तरी ऐकवा"                       

~इश्यsss~

आणि पलीकडे फोन बंद केल्याचा आवाज आला.

या गप्पात किती वेळ गेला ते कळलेच नव्हते.आणखी बोलत राहावे असे वाटत होते.मी तिच्या आवाजाच्या आणि पर्यायाने तिच्या प्रेमात पडलो होतो.ती विवाहित आहे की अविवाहीत आहे?ती तरुण आहे कि प्रौढ आहे?ती काळी गोरी, सडपातळ स्थूल,ठेंगू उंच,कशी आहे कांहीच कल्पना नव्हती.तिचा स्वभाव कसा असेल हेही माहीत नव्हते.ती तरुण असेल, अविवाहित असेल, मला अनुरूप असेल,तिचा स्वभावही चांगला असेल,तिच्या आवाजाप्रमाणेच तिला बघितल्यावर मी तिच्या प्रेमात पडेन,माझ्याप्रमाणेच तिच्याही प्रतिक्रिया असतील,असे मी गृहीत धरून चाललो होतो.तसे मी बरेच गृहीत धरून चाललो होतो. त्याशिवाय आयुष्याला गंमत नाही.  ती कुठल्या संगीत विद्यालयात शिकते ते तिने सांगितले होते.परंतु वेळ सांगितली नव्हती.बाकी कांहीच माहिती तिने दिली नव्हती.हे सहज झाले होते की तिने मुद्दाम केले होते ते तिचे तिलाच माहीत. परंतु तिला शोधून काढण्याचा एक संकेत(क्ल्यू) माझ्याजवळ निश्चित होता.   

मला प्रथम मधुर संगीत विद्यालयाचा पत्ता शोधून काढावा लागणार होता.कोणकोणत्या वेळी त्यांच्या बॅचेस असतात ते पाहावे लागणार होते.त्यातील तिची संभाव्य बॅच हुडकून काढावी लागणार होती.नंतर सहज भेट झाली किंवा मुद्दाम भेट घडवून आणली असे कांहीतरी सुचेल तसे करावे लागणार होते.मीच तो राँग नंबरवाला (परंतु प्रत्यक्षात करेक्ट नंबरवाला) हे तिला पटवून द्यावे लागणार होते.तिची प्रतिक्रिया काय असेल तेही मला माहीत नव्हते.तिलाही मी करेक्ट नंबर  वाटेन.अशी आशा होती. एवढय़ा मुलींच्या गर्दीत तिला ओळखायची कशी हाही प्रश्न होता.              

उद्या मी तिला बघणार होतो .कदाचित भेटणारही होतो.आमच्या दैवात काय लिहिले होते ते त्या अदृश्य  चित्रगुप्तालाच माहीत.  

मी प्रथम मधुर संगीत विद्यालयाचा पत्ता शोधून काढण्याचे ठरविले.त्यांची वेबसाइट नव्हती.गुगलवर त्यांचा पत्ता,माहिती,फोन नंबर,सर्वकांही सापडले.महात्मा गांधी रोड व  जवाहरलाल नेहरू रोड जिथे मिळतो तिथे हे संगीत विद्यालय होते.त्यांच्या बॅचेस केव्हां असतात त्यामध्ये प्रवेश कसा दिला जातो वगैरे गोष्टींसाठी फोन करा असे लिहिले होते.मी त्या मधुर संगीत विद्यालयाला फोन लावला.फोनवर कुणीतरी मंजुळ किंचित किनेर्‍या आवाजातील बाई बोलत होत्या. मी त्यांना माझ्या बहिणीला गाण्याच्या क्लासला यायचे आहे असे सांगून फी वेळ वगैरे गोष्टी विचारल्या.पुढील माहिती कळली.सकाळी सात ते आठ व आठ ते नऊ आणि संध्याकाळी सहा ते सात व सात ते आठ,अशा वेळी गाण्याचे वर्ग चालतात.सकाळी पहिल्या बॅचला नवीन उमेदवार असतात. दुसऱ्या बॅचला ज्यांच्या एक किंवा दोन गाण्याच्या परीक्षा झाल्या आहेत असे उमेदवार असतात.संध्याकाळी तिसर्‍या बॅचला तीन परीक्षा झालेले व चौथ्या बॅचला चार परीक्षा झालेल उमेदवार असतात.आठ वाजता एक स्पेशल बॅच असते.बाईना जे उमेदवार होनहार लक्षणीय   (प्रॉमिसिंग) वाटतात ते आठ वाजल्यानंतर येतात. यावेळी एखादा दुसराच स्त्री पुरुष असतो.मी सहज चौकशी केल्यासारखे दाखवून विचारले रात्री आठच्या बॅचला   हल्ली किती जण असतात.हल्ली एकच मुलगी येते असे त्यानी सांगितले.  

मला हवी असलेली माहिती मिळाली होती.माझी 'मंजुळा' 'राँग नंबर'बहुधा आठच्या बॅचला जात असणार.कारण बाईंनी तिला मालिनी काटदरे यांची भेट घ्यायला सांगितले होते.तिचा आवाज,तिची गायनातील तयारी   त्यांना ध्वनिमुद्रण योग्य वाटली होती. त्यांच्यामार्फत तिचे काम होईल असे त्यांना वाटले होते.मालिनीताईंचे ध्वनिमुद्रण विश्वाशी कांही संबंध होते ते त्यांना माहीत असावे.रात्री पावणेआठ वाजता जर आपण मधुर संगीत विद्यालयासमोर थांबलो तर तिची भेट होईल दर्शन होईल. ती कशी आहे( काळी गोरी, उंच बुटकी, तरुण प्रौढ, इ.) ते कळेल.

रात्री साडेसात वाजताच मी माझी मोटार मधुर संगीत विद्यालयाच्या समोर उभी केली.सात पंचेचाळीसच्या सुमारास पाच दहा मिनिटांत चार पाच मुली बिल्डिंगमध्ये शिरताना दिसल्या.आठदहा मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर हा मधुर संगीत क्लास होता.स्वाभाविक अनेक जणांची, जणींची, बिल्डिंगमध्ये सतत ये जा होती.त्यातून 'मंजुळे'ला शोधून काढणे कठीण होते.मधुरा देशपांडेला पाहण्याचा माझा बेत फुकट गेला.मी मोटार घेऊन मुकाट्याने घरी परत आलो.मिशन मधुरा फुकट गेले होते.

या मधुराचा कुठेतरी फोटो मिळाला पाहिजे.माझ्याजवळ तिचा फोन नंबर होता.तिने ज्यावेळी चुकून माझा नंबर लावला होता त्यावेळी तो फोनवर आला होता.मी तो  राँग नंबर म्हणून सेव्ह केला होता.ही मधुरा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम,कुठेतरी असली पाहिजे.कुठेतरी तिचा फोटो मिळेल.मी प्रत्येक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला.मला ती सर्वत्र सापडली.मात्र प्रत्येक ठिकाणी अनेक फोटो होते. फेसबुक इन्स्टाग्राम इथे कितीतरी मधुरा देशपांडे होत्या.व्हॉट्सअॅपवर एकच मधुरा होती.तिथे असलेला फोटो तिचाच असेल याची खात्री नव्हती.एकूणच गोंधळाचे वातावरण होते.शेवटी मी फेसबुकवर दिलेली माहिती वाचून एक मधुरा निश्चित केली.जिला गायनाची आवड आहे, जिचा गळा गोड आहे,जी फेसबुकवर क्लासिकल किंवा जुन्या मराठी व हिंदी सिनेमातील गाणी अपलोड करते अशी ती होती.तिचा एक स्क्रिनशॉर्ट काढून तो माझ्याजवळ ठेवला.

दुसर्‍या  दिवशी नव्या दमाने मधुर संगीत विद्यालयाच्या बाहेर साडेसात वाजता मोटारीत तिची वाट बघत बसलो.

थोड्याच वेळात राँग नंबर स्कूटरवरून आली.मी तिच्या पाठोपाठ लिफ्टमध्ये शिरलो.

ती मला ओळखण्याचा बहुधा कांहीही संभव नव्हता.अर्थात माझ्याप्रमाणेच तिने संशोधन केले असेल तर ती मला ओळखण्याचा संभव होता.

तिने माझ्याकडे पाहिले.तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसले नाहीत.

तिने  मला ओळखले नसावे.किंवा ती एक नंबरची अभिनय कुशल  असावी.

मनातील भाव चेहऱ्यावर दिसू न देण्यात ती पटाईत असावी. कदाचित तिच्या ओळखीचे कुणी लिफ्टमध्ये असावे.त्यामुळे तिने ओळख दाखविली नसावी.

*ती छोट्या किंवा मोठय़ा पडद्यावर गेली तर नाव मिळवील असा विचार माझ्या मनात येऊन गेला.*

*तिच्या पाठोपाठ जाऊन ती मधुर संगीत विद्यालयातच जाते ना याची मी खात्री करून घेतली.*

*बाहेर मोटारीत शांतपणे बसून राहिलो.सव्वा नऊच्या सुमारास ती बिल्डिंगबाहेर आली.*

*तिच्यापाठोपाठ मी ती कुठे राहते ते बघण्यासाठी गेलो.ती कोणत्या सोसायटीत जाते एवढे पाहून नंतर घरी निघून आलो.*

*बहुधा माझे मिशन राँग नंबर यशस्वी झाले असावे.*

(क्रमशः)

१४/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन