०३ लेडीज रुमाल २-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
~प्रतीक~
संगीता(त्या मुलीचे नाव)हसतमुख होती .तिचे हास्य मोहक होते.
तिचे व्यक्तिमत्त्व मनावर गारुड करणारे होते. तिने माझ्या मनावर गारुड केले.
कदाचित तो तिच्या कामाचा भाग असेल.
ती मुलगी माझ्या मनात भरली एवढे मात्र खरे.
तिला पाहण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी, त्या दुकानात वारंवार जावे असे मला आंतून वाटले.
त्या दुकानात जाण्यासाठी मला आणखी एक ठोस कारण सापडले.
त्या मुलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर,एक स्वतंत्र मृदु कप्पा माझ्या मनात निर्माण झाला.
हॉटेलवर जेवून मी ब्लॉकवर परत आलो.पूर्वीं ज्या हॉटेलवर मी महिनाभर राहात होतो तिथेच जेवण्यासाठी महिना पध्दतीने (मंथली बेसिसवर)जात होतो.तिथले जेवण जरी महाग असले तरी मला ते आवडले होते.संगीताने दिलेली पिशवी माझ्या हातात होती.त्यात मी खरेदी केलेले पुस्तक होते.लॉकची शेजारी दिलेली किल्ली घेण्यासाठी मी बापूसाहेबांच्या दरवाजावरील बेल वाजवली.
कुमुद बहुधा माझीच वाट पाहत असावी.घंटी वाजवल्याबरोबर लगेचच तिने दरवाजा उघडला.मी भाड्याने जागा घेण्यासाठी बापूसाहेबांकडे गेलो तेव्हापासून कुमुदचे लक्षण मला कांही ठीक दिसत नव्हते. तिचे विभ्रम तिच्या डोळ्यांतील ती विशिष्ट चमक मी तिला आवडलो आहे असे स्पष्ट दर्शवीत होती.तिला एकदा सर्व कांही स्पष्ट सांगितले पाहिजे.या बाबतीत मी कांहीच करू शकत नव्हतो. तिला वस्तुस्थिती सांगितल्यावर ती तिच्या सर्व भावनांना आवर घालील याची मला खात्री होती. तिने मला पिशवीत काय आहे असे विचारले.लघुकथा संग्रह असे त्रोटक उत्तर देऊन मी माझ्या ब्लॉकवर आलो.सोफ्यावर आरामशीर बसून मी पुस्तक वाचावे म्हणून बाहेर काढले.
पुस्तकासोबत एक छोटा लेडीज रूमाल होता.बहुधा पिशवीत पुस्तक टाकताना संगीताच्या हातातून तो पिशवीत पडला असावा.नेहमी मी सर्व शक्यता, सर्व पर्याय, विचारात घेतो.माझ्या विचारांची ती पद्धतच आहे.चुकून हातातून पडला असावा याबरोबरच मुद्दाम तिने ठेवला असावा अशीही एक शक्यता माझ्या मनात आली.ही शक्यता मला सुखावून गेली.यांतून तिला काय सुचवायचे असावे तेही माझ्या तत्काळ लक्षात आले. दुसऱ्या दिवशी रुमाल परत करण्यासाठी मी यावे, माझी भेट व्हावी, म्हणून संगीताने मुद्दाम तो रुमाल पुस्तकाबरोबर माझ्या पिशवीत टाकला की चुकून पडला याची खात्री करून घ्यावी म्हणून मी एक प्रयोग करण्याचे ठरविले.
मनातून तिकडे जावे, संगीताला पाहावे, तिच्याशी बोलावे, असे कितीही वाटत असले तरी चार दिवस बुक डेपोकडे फिरकूही नये असे मी ठरविले.नंतर पुस्तक खरेदीसाठी जावे.एखादे पुस्तक खरेदी करावे. आणखी एक लेडीज रुमाल पिशवीबरोबर येतो का ते पाहावे.आला तर तो मुद्दाम टाकला आहे अशी खात्री पटेल.आठ दिवस मी मुद्दाम जाऊ दिले.जरी अगोदर जावे, तिला पाहावे, तिच्याशी बोलावे, असे वाटत असले तरी मी निग्रहपूर्वक उशीरा चांगला आठ दिवसांनी बुक डेपोमध्ये गेलो.मला पाहताच ती विशिष्ट चमक संगीताच्या डोळ्यात दिसली.मनुष्य तोंडाने काहीही बोलत असला,हाताने कांहीही करीत असला,तरी त्याचे डोळे त्याचे अंतरंग बरोबर प्रगट करीत असतात,असा माझा अनुभव आहे . मी एक पुस्तक खरेदी केले.ते संगीताने पिशवीत टाकून दिले.घरी गेल्यावर पिशवीतून पुस्तक काढले.पिशवीत लेडीज रुमाल होता.मी सुखावलो.माझा कयास बरोबर ठरला होता.
~संगीता~
प्रतीकला बघितल्या बघितल्याच मला तो आपलाच आहे अशी भावना निर्माण झाली होती. अशी भावना आतापर्यंत कुणाबद्दलही वाटली नव्हती. मी त्याच्याकडे निरखून पाहिले होते.त्याचे डोळे मलाही निरखीत होते.मला जे वाटले तेच त्याला वाटते की नाही याची मला परीक्षा घ्यायची होती. बिल व पुस्तक देताना आहे ते पिशवीत टाकून देण्याची आमची पध्दत आहे.त्यासोबत मी माझा रुमाल टाकला.जर मी खरी असेन.माझा अंदाज बरोबर असेल,तर दुसऱ्या दिवशी तो रुमाल परत करायला आला असता.त्या निमित्ताने त्याला माझ्याकडे येता आले असते. बोलणे पाहणे झाले असते.आवडत्या माणसाची नुसती भेटही सुखावून जाते.त्याच्या बोलण्यातून कांहीतरी सूचना मिळाली असती. ता म्हणताच ताक भात आणि तो आपल्याला खायचा आहे एवढे कळण्याइतकी मी चतुर नक्कीच आहे. संवाद सुरू झाला असता.पठ्ठ्या आठ दिवस फिरकलाच नाही.त्याच्या डोळ्यात दिसलेली चमक मी पाहिली होती.मी माझी हार मानायला तयार नव्हते.तो आल्यानंतर रुमालाबद्दल कांहीच बोलला नाही .पुस्तक घेऊन तो निघून गेला.मी शेवटचा चान्स शेवटची संधी घ्यायचे ठरविले.पिशवीत आणखी एक रुमाल टाकला. त्यावर कोपऱ्यात मी हृदयचिन्ह गुलाबी रंगात काढले होते.दुसऱ्या दिवशी तो रुमाल परत द्यायला आला.त्याने परत केलेल्या रुमालाच्या कोपऱ्यात एक हृदयाचा आकार बॉलपेनने काढलेला होता.परंतु मी दिलेला रुमाल हा नव्हता.याचा आकार पोत चित्र रंग निराळा होता. मी दिलेला रुमाल त्याने माझी आठवण म्हणून स्वत:जवळ ठेवून दिला होता.
हृदय चिन्ह असलेला एक रुमाल पिशवीतून त्याच्याबरोबर गेला होता.दुसराच रुमाल हृदय चिन्ह घेऊन परत आला होता.हृदयांची प्रतीकात्मक अदलाबदल झाली होती. तो गेल्यावर मला आणखी एक रुमाल सापडला.हा रुमाल प्रतीकने काचेखाली ठेवला होता.
~प्रतीक~
संगीता माझ्यावर प्रेम करते. तिला मी आवडतो. हा माझा अंदाज बरोबर होता.आठ दिवसांनी गेल्यामुळे तिला थोडा राग आलेला दिसला.दुसऱ्याच दिवशी रुमाल परत करायला मी येईन अशी तिची अपेक्षा असावी.मी आणखी एक पुस्तक खरेदी करून घरी आलो.अपेक्षेप्रमाणे त्यात एक लेडीज रुमाल होता.त्याच्या कोपऱ्यात हृदय चिन्ह रेखाटलेले होते. तिच्या त्या रुमालावर मी हृदयचिन्हामध्ये एक बाण काढला.दुसऱ्याच दिवशी मी तो रुमाल परत करायला गेलो.काल बहुधा चुकून हा तुमचा रुमाल पुस्तकाबरोबर पिशवीत पडला.नंतर कुणालाही ऐकायला येणार नाही अशा स्वरात कुजबुजत म्हणालो किंवा मुद्दाम टाकला.त्यावर ती छानपैकी लाजली.त्यानंतर तिने काल मी टेबलाखाली सरकवलेला रुमाल ज्यावर हृदयाचे चिन्ह मी काढले होते तो मला परत दिला.हा तुमचा रुमाल काल तुम्ही विसरलात असे आणखी वर म्हणाली.हसत हसत मी तो माझ्या खिशात ठेवला.घरी आल्यावर तो उलगडून पाहता त्यावर मी रेखाटलेल्या हृदयाचिन्हामध्ये एक बाण काढलेला होता.आता परस्परावरील प्रेमाची शंभर टक्के खात्री पटली होती.
त्यानंतर मी नेमाने पुस्तक खरेदीसाठी तेथे जाऊ लागलो.त्यानिमित्ताने आमची भेट होत असे.आमचे बोलणे होत असे. आम्ही परस्परांचे फोन नंबरही घेतले होते.फोनवर आम्ही गप्पा मारीत असू.तिच्या बुक डेपोला सोमवारी सुट्टी असे.त्या दिवशी आम्ही सिनेमा, पार्क कुठेतरी भेटत असू.तिच्या बोलवण्यावरून मी त्यांच्या घरीही गेलो.त्यांच्या कुटुंबाची ओळख झाली.तिचे बाबा आजारातून बरे झाले .ते नियमितपणे कामावर जाऊ लागले.त्यांच्यावर आलेले आर्थिक संकट दूर झाले. विवाहाला कोणतीच अडचण राहिली नाही.
आई वडील व मी यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध आहेत.संगीताबद्दल मी आईजवळ सर्व कांही बोललो.केवळ संगीताला पाहण्यासाठी व कुमुदला भेटण्यासाठी आई माझ्याकडे चार दिवस आली होती.
*कुमुद*
प्रतीक शेजारी राहायला आला यामध्ये मला परमेश्वरी योजना दिसत होती.परंतु मला वाटलेली, मला हवी असलेली,माझ्या कल्पनेतील,ती योजना नव्हती.माझ्या विभ्रमाना माझ्या सूचक बोलण्याला तो कांहीच प्रतिसाद देत नव्हता.
माझी आई चांगली सुगरण आहे.तिला निरनिराळे पदार्थ करून आम्हाला खायला घालायला आवडते.तिला निरनिराळे प्रयोग करायलाही आवडतात.तिने एखादा पदार्थ केला आणि प्रतीक त्यावेळी घरी असला तर ती मला आवर्जून तो पदार्थ त्याला नेऊन द्यायला सांगत असे.मीही हौशीने तो नेत असे.असा प्रसंग साधारणपणे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी येत असे.त्या दिवशी प्रतीक हमखास घरी पुस्तक वाचीत पडलेला असे.तो माझ्या आईच्या पदार्थांचे नेहमीच कौतुक करीत असे.
अशीच एक दिवस आईने केलेली डिश घेऊन मी त्याच्याकडे गेलेली असताना टेबलावर एक फोटो पाहिला .लांबून मला तो फोटो माझाच वाटला .माझा फोटो याच्याकडे कसा? असलाच तर तो मला दिसेल असा टेबलावर कां ठेवलेला ?असा प्रश्न मला पडला. नीट निरखून पाहता तो फोटो माझा नव्हता.माझ्यासारख्या दिसणाऱ्या एका दुसऱ्याच कुणा मुलीचा होता.मला पाहताच प्रतीक म्हणाला,हा फोटो इथे मी तुला दिसेल असा मुद्दाम ठेवला आहे.तुला पाहताच मी चमकलो त्याचे हे कारण आहे.ही माझी धाकटी बहीण.आम्हा सर्वांची ती अत्यंत लाडकी आवडती होती.दोन वर्षांपूर्वी रस्त्यावरील अपघातात तिचा मृत्यू झाला.तुला पाहिल्यावर मला माझी बहीणच पुन्हा मिळाली असे वाटले.
हे सर्व बोलत असताना प्रतीकच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.तो त्याच्या बहिणीवर किती प्रेम करीत होता त्याची सहज कल्पना आली.रक्षाबंधन जवळच आले होते.त्या दिवशी मी त्याला राखी बांधली. माझ्या मनाला आवर घातला होता.मी पूर्णपणे सावरले होते. .मला भाऊ नव्हता.आम्ही दोघी बहिणीच.आम्हाला सुदैवाने भाऊ मिळाला.
त्याची आई चार दिवस मुलाचा ब्लॉक बघण्यासाठी आली होती .तीही मला पाहताच अशीच चमकली.
~प्रतीकची आई~
मला फोनवर वारंवार एकदा माझा ब्लॉक बघायला ये असे कां म्हणत होता ते त्याच्याकडे गेल्यावर लक्षात आले.
फोनवर संगीताविषयी सर्वकांही त्याने मला सांगितलेच होते.कुमुदबद्दल मात्र तो कांहीच बोलला नव्हता.इथे आल्यावर मी संगीताला भेटले.तिच्या घरीही गेले.तिचे आई वडील बहीण भाऊ सर्व कुटूंब संस्कारी वाटले.श्रीमंती गरिबीचा मला किंवा यांना कधी प्रश्नच नव्हता.हेही गरिबीतून वर आले आहेत.आमचे आजचे वैभव उभे करताना मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून धडपड केली आहे.
*या शहरात प्रतीक आल्यामुळे मला सून व मुलगी दोन्ही मिळतील असे वाटले नव्हते.*
*सून हीच मुलगी अशा अर्थाने मी बोलत नाही .*
*आमच्या रत्नाचा रस्त्यावरील अपघातात दोन वर्षांपूर्वीं मृत्यू झाला.*
*येथे आल्यावर मला कुमुद दिसली.माझी मुलगी मला पुन्हा मिळाली.ती नुसती दिसायलाच नव्हे तर स्वभावानेही रत्नासारखीच अल्लड ,प्रेमळ,कुणालाही आपलेसे करणारी आहे .*
* जगात दिसायला एकासारखी एक सात माणसे असतात असे ऐकून होते.ते कांही मला माहीत नाही.पण एकासारखी एक दोन माणसे असतात हे नक्की.*
(समाप्त)
२०/५/२०२१©प्रभाकर पटवर्धन