०१ अखेरचा मुक्काम
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
तू माझी साथ अशी मध्येच कां सोडलीस?जन्मभर तुझ्या हातात हात घालून तुला सोबत करीन असे लग्नाच्या वेळेला दिलेले वचन तू कां मोडलेस ? मला सोडून कां निघून गेलीस?तुझा माझा कांही प्रेमविवाह नव्हता.चारचौघांसारखे दाखवून लग्न ठरले होते.लग्नाच्या वेळी शिक्षण,वय, मुलीची व मुलाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक स्तर जात, धर्म ,रंग, रूप ,इत्यादी सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या होत्या .संपूर्ण मनासारखे स्थळ क्वचितच एखाद्याला मिळते.जीवनात तडजोड करावीच लागते.त्याप्रमाणे तुम्हीही तडजोड केली असेल. आम्हीही केली असेल.तू मला आवडली होतीस यात शंका नाही.मीही बहुधा तुला आवडलेला असावा.आपला संसार सुरू झाला.सुरुवातीला शारीरिक आकर्षणाचा प्रभाव जास्त असतो.त्यालाच चुकीने प्रेम असे म्हटले जाते.दोन वेगळ्या संस्कृतीतून, संस्कारातून, घराण्यातून ,आलेले स्त्री पुरुष एकत्र राहू लागतात.त्यावेळी तडजोड ही अपरिहार्य असते. जेव्हा जेव्हा कुणीही दोन माणसे एकत्र राहू लागतात त्यावेळी तडजोड अपरिहार्य असते.कांही सोडावे लागते. कांही नवीन घ्यावे लागते.प्रत्येकाला थोडे थोडे बदलावे लागते.ही प्रक्रिया अपरिहार्य आहे.तूही थोडी बदललीस. मीही थोडा बदललो.
भांड्याला भांडे लागते. आवाज येतो.संसाररूपी खेळाचा तो एक भागच असतो.आपण भांडलो नाही असे नाही .एकमेकांशी अबोला धरला नाही असेही नाही.दुसऱ्याला आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न केला नाही असेही नाही.परंतु शेवटी आपण एक झालो हे महत्त्वाचे .
हळूहळू आपण एकमेकांवर प्रेम करू लागलो.शारीरिक दृष्ट्या एक झालोच होतो आता मानसिकदृष्टय़ाही एक झालो.शारिरीक प्रेम होतेच आता आंतरिक प्रेमाचाही उदय झाला. हळूहळू परस्परांची एकमेकाना इतकी सवय झाली की घरात दुसरा नसेल तर पहिल्याला करमत नाहीसे झाले.बघता बघता तीस वर्षें कधी निघून गेली ते कळलेच नाही.मुले मोठी झाली त्याना पंख फुटले.आपण उतारवयाकडे झुकू लागलो.केस रूपेरी होऊ लागले.
वयानुसार आपले प्रेम जास्त दृढ होत गेले.हळूहळू अशी स्थिती निर्माण झाली की बोलल्याशिवाय एकमेकांना दुसर्याच्या मनातले कळू लागले. दोघांमध्ये इतकी एकरूपता आली कि एकाच्या पायात काटा टोचला तर दुसर्याच्या पायातून रक्त यावे.एकाला ठेच लागली तर दुसर्याच्या तोंडातून ओय् यावे.एकाच्या डोळ्यात कसू शिरले तर दुसर्याच्या डोळ्यांतून पाणी यावे.
आणि मग एके दिवशी भरल्या संसारातून तू निघून गेलीस.असा मी काय गुन्हा केला होता की मला सोडून जावे असे तुला वाटले.तू गेल्यानंतर मी सैरभैर झालो.माझा मी राहिलो नाही. मुलगी आपल्या संसारात रमली होती.मुलगा ऑस्ट्रेलियात नोकरीला लागला होता.तो व त्याची फॅमिली तिथे राहात होती.
मुलीने मला बाबा तुम्ही दिल्लीला येवून राहा असे सांगितले.मला दिल्लीची हवा मानवत नाही.तेथे जावून राहावे असे मला वाटले नाही.मुलगा ऑस्ट्रेलियात बोलवीत होता.माझी मुळे इथे खोल रुतली होती.माझे मित्र माझे नातेवाईक इथे होते.मला तिकडे जावून करमण्यासारखे नव्हते.तुम्ही जागा बदलली म्हणजे आईचे विचार तुमच्या मनात कमी येतील आणि तुम्हाला बरे वाटेल असे मुलगा व मुलगी दोघेही म्हणत होती. जागा बदलली म्हणजे तुझे विचार माझ्या मनात येणार नाहीत,असे त्यांचे म्हणणे होते.
असे कधी होणे शक्य होते काय?पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तुझी आठवण, तुझे विचार, माझ्या मनात रुंजी घालत राहणारच.तुझे हसणे, तुझे बोलणे, तुझे चालणे, तुझे एखादी गोष्ट समजावून सांगणे,याची सतत आठवण येत राहणारच!तुझ्या आठवणीने मी वेडापिसा झालो होतो.
तुझा आणि माझा संसार जिथे फुलला,जिथे प्रत्येक वस्तूत तुझा स्पर्श आहे,जिथे हवेत तुझा श्वास आहे,जिथे हवेत तुझा शब्द आहे,जिथे तुझ्या आठवणी प्रत्येक गोष्टीत दडलेल्या आहेत, तिथेच राहणे मी पसंत केले.तू नसलीस तरी वस्तुरूपाने, आठवणींच्या रूपाने, तू माझ्याजवळ सतत आहेस असे मला वाटत होते.
आणि एक दिवस चमत्कार झाला.सकाळी मी उठलो तेव्हां स्वयंपाकघरात भांड्यांचे आवाज येत होते.कुणीतरी मंजुळ स्वरात गाणे गुणगुणत होते.ती तू होतीस.मी लगबगीने उठून स्वयंपाकघरात आलो.तू चहा करण्यात मग्न होतीस .तुझे माझ्याकडे लक्ष नव्हते.तू आंत कशी आलीस असा मला एक प्रश्न पडला.तुझ्याजवळ घराची किल्ली नेहमीच असते याची आठवण झाली.तू घरात अशी हिंडू फिरू लागलीस की जशी काही तू मला सोडून गेलीच नव्हतीस.माझा आनंद गगनात मावेना.तुला तुझी चूक उमगली होती.मला अर्ध्या संसारात सोडून जाण्याची चूक तू केली होतीस.ती चूक तू आता सुधारली होतीस.
मुलाला व मुलीला तू परत आल्याचे कळवले.दोघेही लगेच घरी आली.त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितले.आई कोठे आहे म्हणून मला विचारले.तू तिथेच सोफ्यावर भाजी निवडीत बसली होतीस.ही काय तुमच्या समोर असे मी त्यांना म्हणालो.एवढी समोर बसलेली तू त्यांना दिसू नयेस याचे मला आश्चर्य वाटत होते.उलट ती दोघे माझ्याकडे केविलवाण्या नजरेने बघत होती.गेलेली तू परत आलीस यांत आनंद होण्याऐवजी मुलांना असे कां वाटावे ते मला कळत नव्हते.दोघानी एकमेकांकडे बघत काही खाणाखुणा केल्या.त्यांच्या खाणाखुणांचा अर्थ मला कळणार नाही असे त्यांना कसे वाटले?
त्यांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी केविलवाणी होती.तुझ्या जाण्यामुळे माझ्या डोक्यावर विपरीत परिणाम झाला आहे असे त्यांना वाटत होते.आता माझे काय करावे अशी चिंता त्यांना लागली होती.शेवटी तुझ्यात आणि माझ्यात काहीही लुडबूड न करण्याचे त्यांनी ठरविले होते.मी भाजी आणित होतो. तू भाजी निवडीत होतीस. स्वयंपाक करीत होतीस. आपण एकत्र जेवत होतो. आर्थिक व्यवहार सांभाळत होतो.जग तेच होते.फक्त आता नेहमीप्रमाणे तू माझ्याबरोबर होतीस.दोघेही चार आठ दिवस येथे राहिली.सर्व काही ठीक चालले आहे याची खात्री करून घेतली.आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेली.
इतके दिवस येथे दोघेही होते.त्यांच्या आवडीचे पदार्थ करून तू त्यांना जेवू घालीत होतीस.तू त्यांचे लाड पुरवीत होतीस.पण ती दोघे तुझ्याजवळ एकही शब्द बोलली नाहीत.याचे मला फार वाईट वाटले. त्या दोघांच्या हिशोबी जशी काही तू इथे नव्हतीसच.मी इथे फक्त एकटा होतो.तू येथे आहेस हा माझा भास होता.माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे त्यांना वाटत होते.त्यांचेच डोके ठिकाणावर नाही हे त्यांना कोण कसे समजून सांगणार?मीही कांही बोललो नाही.
ती दोघे निघून गेली आणि पुन्हा तुझा व माझा संसार सुरू झाला.आपण रोज सकाळी फिरायला जात असू.आपल्या व्यायामाचा तो एक भाग होता.प्रकृती सुदृढ राखण्यासाठी, सकाळी जेव्हां हवेत प्राणवायू (ऑक्सिजन) भरपूर असतो तेव्हां फिरणे अत्यावश्यक आहे.आपण तेच करत होतो. फिरताना तुझ्याशी मी नेहमीप्रमाणे गप्पा मारीत असे.तूही माझ्याशी निरनिराळय़ा विषयावर बोलत असस. यामध्ये इतरांना वैषम्य वाटण्यासारखे काय होते?परंतु रस्त्यावरून येणारे जाणारे,मैदानावर फिरणारे आपल्याकडे विचित्र नजरेने बघत असत.
त्यांची आपल्याकडे बघण्याची नजर व मुलांची आपल्याकडे बघण्याची नजर यांत कुठेतरी साम्य होते.त्या नजरेत कारुण्य होते.दया होती. थोडेबहुत आश्चर्य होते.मला वेड लागले आहे. माझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे सर्वांना वाटत होते.बोलत कुणीही कांहीही नव्हते.मला त्यांच्या नजरा कळत होत्या.मी तुझ्याशी बोलतो. मी तुझ्याबरोबर फिरतो.तू मला स्वयंपाक करून जेवू घालतेस. तू माझ्याबरोबर सदैव असतेस यांत ऑब्जेक्शन घेण्यासारखे, नाव ठेवण्यासारखे, दोष देण्यासारखे, काय होते?
अशी काही वर्षे गेली.आणि एक दिवस पुन्हा तू दिसेनाशी झालीस.मी तुला घरात सर्वत्र शोधले.कदाचित एकटी फिरायला गेली असशील म्हणून मैदानाच्या वाटेवर व मैदानातही शोधले.तू कुठेही नव्हतीस.जशी आलीस तशी पुन्हा गेली होतीस.मी शेजारी तुझी चौकशी केली. नातेवाईकांकडे फोन करून तू आली आहेस का? म्हणून विचारले.तू कुठेही सापडली नाहीस.शेजारी माझ्याकडे दयार्द्र नजरेने कां बघतात? नातेवाइकांचा माझ्याबरोबर बोलताना स्वर, माझी कींव करीत असल्यासारखा, माझ्याबद्दल वाईट वाटत असल्यासारखा, कां असतो ते मला कळले नाही.
मी तुला पुन्हा अशी नाहीशी होवू देणार नव्हतो.तू पाताळात जरी लपली असलीस तरीही मी तुला शोधून काढणार होतो.मी निरनिराळ्या रस्त्यांवर तपास केला .पोलीस चौकीवर जावून मिसिंग कम्प्लेंट हरवल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला.कुणीही माझी तक्रार लिहून घेण्यास तयार नव्हते. मी निरनिराळ्या बागांमध्ये जावून तुला शोधले.तू कुठे सापडली नाहीस.शेवटी फिरत फिरत मी समुद्रावर आलो .तू समोर लाटांवर उभी असलेली मला दिसलीस.जमिनीवर चालावे त्या सफाईने तू लाटांवर चालत होतीस.तरंगत होतीस.उभी होतीस.माझ्या डोळ्यासमोर असलेल्या तुला मी पुन्हा गुप्त होऊ देणार नव्हतो.कोणत्याही परिस्थितीत तुला परत आणायचेच असे मी ठरविले.मी तुझ्या दिशेने तुला पकडण्यासाठी धावत सुटलो.खरे म्हणजे धावण्याची गरज नव्हती.दोन्ही बाहू उभारून तू मला मिठीत घेण्यासाठी उत्सुक झाली होतीस.मी तुझ्या कवेत जाऊन विसावलो.
+++++++++
* दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र किनाऱ्यावर एका ठिकाणी गर्दी होती.*
*एका मध्यमवयीन गृहस्थाचे प्रेत समुद्रकिनाऱ्याला येवून लागले होते.*
*कुणीतरी पोलिसांना फोन केला होता.*
पोलिसांची जीप थोड्याच वेळात आली.*
*पंचनामे इत्यादी सोपस्कार चालू झाले.*
* बिचाऱ्याने आत्महत्या केली म्हणून हळहळत लोक पांगले.*
*जगरहाटी नेहमीप्रमाणे सुरू झाली.*
३/१२/२०२०©प्रभाकर पटवर्धन