०६ असेल माझा हरी २-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
मी समुद्रावर जायला लागल्यापासून एका मुलीने माझे लक्ष वेधून घेतले होते.क्वचित तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी असत.असलीच तर एखादीच मैत्रीण काही वेळा असे.बहुधा ती एकटी असे .त्यावेळी ती आपल्यातच गुंग होऊन बसलेली असे.
ती ठराविक ठिकाणी येऊन बसत असे.
तिच्यात कांही खास असे पाहण्यासारखे नाही, चारचौघींसारखीच ती आहे असे एखाद्याचे मत पडले असते.
परंतु माझे मत वेगळे होते.
मला तिच्यात कांहीतरी खास वाटत होते.तिने माझे लक्ष वेधून घेतले होते.
ती जरी माझ्या मनात भरली असली,तरी तिचे माझ्याकडे लक्ष आहे असे दिसत नव्हते.किंवा ती तिचे लक्ष नाही असे दाखवीत होती.
माझे तिच्याकडे लक्ष जाण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिचे वेगळेपण.इतर मुली स्वाभाविकपणे नट्टापट्टा करतात.निरनिराळी फॅशन करतात.जास्त बाह्यवृत्ती असतात.रोज निरनिराळे कपडे परिधान करीत असतात.कधी जीन्स टी शर्ट,कधी सलवार कमीज,कधी साडी,अशा कपड्यातही निरनिराळ्या फॅशन्स,फेशियल मेकअप इत्यादी जोरात असते.
ही मुलगी अगदी साधी होती.अंतर्मुख होती.रोज ती साडी नेसून यायची.साडीही साधी प्रिंटेड असे.तिचा डामडौल कधीच दिसला नाही.ती एक गरीब तरी असावी. किंवा तिला साधेपणा आवडत असावा.मला आंतून साधेपणा तिला आवडतो हीच शक्यता जास्त वाटत होती.तरीही ती टापटीपिची व व्यवस्थित वाटत होती.ती स्वत:तच गुंग असे.रोज पाहून पाहून तिची मूर्ती माझ्या मनात ठसली होती.मध्यम उंची ,शेलाटी बांधा,कृश असली तरी गुबगुबीत वाटणारी शरीरयष्टी,दाट लांबसडक काळेभोर केस,अपरे नाक,अरुंद नाही व रुंद नाही अशी कपाळ पट्टी,पांढरेशुभ्र जणूकांही कवळी बसवली आहे असे दात,तिला सावळे म्हणता येत नव्हते परंतु गोरीही म्हणता येत नव्हते.तिचे हास्य मनमोहक होते.एकदा तिच्या जवळून जात असताना तिचे बोलणे कानावर पडले, चांदीची घंटा कानात किणकिणल्यासारखे वाटले.कधी कधी आपल्याला जी व्यक्ती आवडते तिचे सगळेच चांगले व प्रिय वाटते.तिच्या बाबतीत माझे तसेही असू शकेल.
तिची ओळख व्हावी असे मला उत्कटतेने वाटत होते.माझ्या जागी दुसरा एखादा असता तर त्याने नाना क्लृप्त्या लढवून तिची ओळख करून घेतली असती.मलाही तिची ओळख करून घेण्यासाठी युक्त्या सुचत होत्या. परंतु मी माझा स्वभाव तुम्हाला सुरुवातीलाच सांगितला आहे.विशेष प्रयत्न करण्याचा माझा स्वभाव नाही.प्रयत्नांती परमेश्वर अशी म्हण असली तरी प्रयत्न करून हवे असलेले साध्य प्राप्त होईलच असे नाही असा माझा अनुभव आहे.परमेश्वर भेटायचा असला तर तो भेटेलच.तोच आपल्याला भेटायला येईल.तोच आपल्याला शोधत येईल.असा माझा विश्वास आहे.असा माझा स्वभाव आहे.
कामानिमित्त कांही खरेदी करण्यासाठी फिरताना सहा महिन्यांच्या काळात दोन तीनदा ती दिसली.एकदा ती सलवार कमीज मध्ये होती.तर एकदा ती जीन्स टीशर्टमध्येही हाेती.म्हणजे ती केवळ साडी नेसत नव्हती तर इतरही कपडे क्वचित घालीत होती. कोणत्याही कपड्यात ती चांगलीच दिसत होती.कपडे कोणतेही असले तरी तिचा साधेपणा उठून दिसत होता.ती कुठे राहते? कॉलेजात जाते कि नोकरी करते?मला कांहीच माहीत नव्हते. तिची सामाजिक शैक्षणिक आर्थिक पार्श्र्वभूमी जाणून घेण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. समुद्रावर ती मला दिसत होती.ती मला आवडत होती. मी तिला विसरायचाही प्रयत्न केला नाही.प्रयत्न करून गोष्टी विसरता येत नाही याची मला पूर्ण जाणीव होती.प्रयत्न करून त्या गोष्टी मनात जास्त ठसल्या जातात.प्रयत्न म्हणजे बऱ्याच वेळा आपली फरफट होते.प्रयत्न करू नये असे नाही.आंतला आवाज जसे सांगेल तसे करावे.सहजता असावी. कृत्रिमता असू नये.स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः याचा हाच अर्थ मी समजतो.
माझी भूमिका,माझे तत्त्वज्ञान,माझा हा स्वभाव, बऱ्याच जणांना पटत नाही.आपण हालचाल केली पाहिजे.आपण धडपड केली पाहिजे.आपण प्रयत्नांची कांस सोडता कामा नये.असे बर्याच जणांना वाटते.माझी निष्क्रियता म्हणजे माझा आळशीपणा असे त्यांना वाटते.
मला या कॉलेजमध्ये रुजू होऊन, या शहरात येऊन सहा महिने झाले होते.दुसरी टर्म सुरू होऊन कांही दिवस गेले होते.आमच्या दोघांच्या तथाकथित संबंधांमध्ये कांहीही प्रगती नव्हती.प्रगती होण्याची शक्यताही दिसत नव्हती.अशा बाबतीत मुलांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे म्हणतात!आणि मी तर कांहीच करायला तयार नव्हतो.दोन्ही बाजूंनी सारखीच आग लागली आहे कि काय तेही कळायला मार्ग नव्हता. मी सुटीत नुकताच पुण्याला जाऊन आलो होतो.जवळजवळ महिनाभर आमचे एकमेकाना दर्शन नव्हते.
त्या दिवशी मी समुद्रावर गेल्यावर तिच्या डोळ्यात मला कुठे गेला होतात? तब्येत बरी आहे ना?मला तुमच्याशिवाय करमत नव्हते.मला काळजी वाटत होती.असे भाव दिसले.निदान मला तसा भास झाला.मनी वसे ते स्वप्नी दिसे असेच केवळ नाही तर मनी वसे ते बाहेर भासे असेही म्हणावे लागेल!
तू न दिसल्यामुळे मलाही करमत नव्हते असे भाव माझ्या डोळ्यात तिला दिसले असावेत. तिच्या डोळ्यात अानंद झाल्याची विशिष्ट चमक दिसत होती.
रोज निदान एक दिवसाआड माझा घरी फोन होत असे.तशी ताकीदच मला माझ्या आईने दिली होती.मी फोन केला नाही तर आईचा फोन हमखास येत असे.आजीला बरे नसल्याचे मला कळले होते.
एक दिवस बाबांचा मला फोन आला.बाबा क्वचितच फोन करीत असत.बाबांचा फोन आला त्या अर्थी कांहीतरी महत्त्वाचे काम असणार हे मी ओळखले.ते म्हणाले,तुझ्या आजीला औषधांनी बरेच बरे वाटत आहे.थंडी व उन्हाळा या ऋतूत पुण्याची हवा शुष्क असते. तिला थंडीचा व शुष्क हवेचा त्रास होत आहे.डॉक्टरांनी दोन तीन महीने समुद्र किनारी जाऊन राहाण्याचा हवापालट करण्याचा सल्ला दिला आहे.तुझी स्वतंत्र जागा असती तर प्रश्नच नव्हता.तुझ्या होस्टेलवर आई व आजी येऊन राहू शकत नाहीत.जरी तू भाडय़ाची जागा बघितलीस तरी मनासारखी जागा मिळे मिळेपर्यंत दोन तीन महिने सहज निघून जातील.तुमच्या शहरात रिसॉर्ट्स असतील,हॉटेल्स असतील परंतु तिथे आजीला तिच्या पथ्यांचे शिजवून खाता येणार नाही.तिचे पथ्यपाणी सांभाळता येणार नाही.तुझ्या आईला व आजीला तिथे घरच्यासारखे वाटणार नाही.त्यांना अॉकवर्ड वाटेल. काय करावे अशा विवंचनेत आम्ही होतो.एवढ्यात माझा मित्र मधुकर मला भेटला आणि सर्वच प्रश्न सुटला.
त्याच्या ओळखीचे सुहास निनावे नावाचे एक गृहस्थ आहेत.त्यांचे स्वतःचे तिथे घर आहे. मधुकर त्यांच्याशी बोलला आहे.त्यांच्या घरातील दोन खोल्या ते तीन महिन्यांसाठी द्यायला तयार आहेत.कांही सामान ते देतील तर कांही सामानसुमान इकडून घेऊन येऊ.कांही तिथे खरेदी करता येईल. तू जावून त्यांना एकदा भेट.तू तिथे कॉलेजवर प्राध्यापक आहेस.तू त्यांना भेटायला येशील असे मी त्यांना सांगितले आहे. त्यांची आपल्याला देण्यासाठी असलेली जागा बघ. कांही सामानसुमान लावून घे.तुला वाटल्यास जागेची स्वच्छता करून घे. त्यांच्याशी बोल आणि मला फोन कर.एकदा जागा घर बघितलेस म्हणजे मला सविस्तर माहिती कळेल.असे सांगून त्यांनी मला सुहासकाकांचा पत्ता दिला.
दुसऱ्या दिवशी मी पत्ता शोधत त्यांच्या घरी गेलो.त्यांचे स्वत:चे टुमदार कौलारू घर होते.सभोवती माड पोफळीची बाग होती. सर्वत्र कोकणी स्पर्श जाणवत होता. दरवाजावरील बेल वाजवली. दरवाजा माझ्या स्वप्नसुंदरीने उघडला.
मी तिला रोज समुद्रावर पाहात होतो. कधी एकटी, कधी एखाद्या मैत्रिणीबरोबर, तर कधी मैत्रिणींच्या घोळक्यात,तिला पाहिली होती.माझे तिच्याकडे लक्ष आहे हे तिच्या लक्षात आले होते.मुली तशा चतुर असतात.त्यांना बहुधा तिसरा गुप्त डोळा असावा.किंवा सहावे ज्ञानेंद्रिय असावे.आपल्याकडे कोण पाहात आहे.कोणत्या दृष्टीने पाहात आहे. सर्व कांही त्यांना उपजत समजत असावे.मी तिच्याकडे जेव्हां जेव्हां पाहात असे, तेव्हां तेव्हां एक विशिष्ट चमक तिच्या डोळ्यात दिसत असे.
मला पाहताच तीच चमक तिच्या डोळ्यात दिसली.ती थोडी गोंधळलेली दिसली.कोणत्या तरी मिषाने तिच्याशी ओळख करून घेण्याचा, तिला भेटण्याचा, कधीही प्रयत्न न करणारा मी एकदम तिच्या घरी आलेला पाहून ती घाबरली होती.त्यापेक्षाही जास्त गांगरली होती.तिच्या घरी अकस्मात येण्याचा माझा उद्देशच तिच्या लक्षात येत नव्हता.
मी तिला सुहासकाका आहेत का म्हणून विचारले.तिच्या वडिलांचे नाव घेवून एकदम विचारल्यामुळे तिच्या गोंधळात भर पडली होती.तेवढ्यात आतून सुहासकाका आले.मी त्यांना माझी ओळख करून दिली.
मधुकरकाकांची ओळख सांगितली.
कारखानीसांचा मुलगा प्रणव येथे कॉलेजात प्राध्यापक असतो तोच मी वगैरे ओळख सांगितली.बाबांचा फोन आला होता.आजीला हवापालटासाठी कुठेतरी समुद्रकाठी जायचे आहे.शुष्क हवामानाचा व थंडीचा तिला त्रास होतो.इत्यादी सर्व गोष्टी सांगितल्या.त्या सुहासकाकांना अगोदरपासूनच माहीत होत्या.बाबानी जागा बघण्यास सांगितले आहे.जागा ताब्यात घेऊन तिथे मला कांही सामान आणून ठेवायचे आहे असे सांगितले.
नमिता चहा घेऊन येतेस ना म्हणून काकांनी ओरडून विचारले.तेवढ्यात नमिता चहा घेऊन बाहेर आली.माझ्या स्वप्नसुंदरीचे नाव नमिता आहे हे मला कळले.किल्ली घेऊन नमिता मला जागा दाखवायला आली.जागेला बाहेरून स्वतंत्र प्रवेशदार होते.मधुकरकाकांचा फोन आल्यावर जागा साफसूफ करून ठेवली होती.नमिता म्हणाली.
मी तिला म्हणालो, तुम्ही रोज मला समुद्रावर दिसता.नेहमी स्वत:तच हरवून गेलेल्या असता.यावर कांहीही न बोलता तिने हसून प्रतिसाद दिला.
मीही तुम्हाला रोज नेमाने समुद्रावर येताना बघते.तुम्ही समुद्राकडे बघताना ध्यानमग्न झालेले असता.मलाही तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.ती बोलली.
रूपेरी घंटेसारखा तिचा आवाज मला ऐकायला मिळाला.मला हवी असलेली चमक तिच्या डोळ्यात दिसत होती.ती अगोदरच दिसली होती परंतु आता त्याची खात्री झाली होती.माझ्याही डोळ्यात तिला अपेक्षित चमक दिसली असली पाहिजे.
जे सामान एका खेपेत आणून ठेवता आले असते त्यासाठी मी चार चकरा मारल्या.नमिता पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती.ती बीएससी करीत होती.एमएससी करून प्राध्यापिका होण्याचे तिचे स्वप्न होते.बोलता बोलता एकमेकांची माहिती एकमेकाना होत होती.
समुद्रावर दुसरा दिसला नाही तर अस्वस्थ व्हायला होते हे आम्ही एकमेकांजवळ बोलता बोलता अप्रत्यक्षपणे मान्य केले.किंबहुना दुसर्याच्या ते लक्षात येइल असे पाहिले.
आई व आजीला घेऊन बाबा पुण्याहून आले. डिक्कीतून येताना त्यांनी बरेच सामान आणले होते.कांही सामान पार्सलने पाठविले होते.काही सामान आम्हाला सुहासकाकांकडून तात्पुरते मिळाले. आई व आजी यांना भेटण्यासाठी मी बहुधा रोज चक्कर मारीत असे.तिथूनच मी समुद्रावर जात असे.समुद्रावर सुरुवातीला नमिता स्वतंत्र येत असे.आम्ही गप्पा मारीत मात्र एकत्रच बसत असू.आई व आजीला माझा इरादा लक्षात आला.सुहासकाकानाही आमचे नाते पसंत होते.आम्ही समुद्रावर एकत्रच जायला सुरुवात केली.काकू तर नमिताचे लग्न वेळेवर जुळल्यामुळे आनंदित होत्या.
* दुसऱ्या वर्षी मी बॅचलर्स क्वार्टर्स सोडून,कॉलेजच्या विवाहितांच्या क्वार्टर्समध्ये गेलो.हे निराळे सांगायला पाहिजे का?*
*जर योग असेल तर ब्रह्मदेवसुद्धा कुणाला अडवू शकत नाही.*
*ही माझी उक्ती पुन्हा एकदा खरी झाली.*
*जे जे जेव्हां जेव्हां घडणार असे ठरलेले आहे ते ते तेव्हां तेव्हां घडणारच.*
(समाप्त)
१९/६/२०२१©प्रभाकर पटवर्धन