१० समंजस २-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
तो आरशात पहात होता.तो मला पहात होता.माझ्या प्रतिबिंबाने खाली वाकून कंगवा उचलला आणि त्याच्या हातात दिला. हे त्याने स्पष्टपणे पाहिले होते.
त्याने त्याच्या शेजारी पाहिले.मी त्याला दिसत नव्हते.
माझे प्रतिबिंब मात्र त्याला दिसत होते.आपल्याला भास होत असावा असे त्याला बहुधा वाटले असावे.
त्याने खोलीत एक चक्कर मारली.तो पुन्हा आरशासमोर येऊन उभा राहिला.
मी तिथे होतेच.
त्याने आरशावर पाणी मारून आरसा स्वच्छ पुसून काढला.
आरसा स्वच्छ होताच.मीही त्याला स्पष्टपणे दिसत होते.
त्या अपघातात मी मृत झाले होते.माझे और्ध्वदेहिकही झाले हाेते.तरीही मी येथे होते याची त्याला खात्री पटली.त्याने आरशातील प्रतिबिंबाकडे पाहून हास्य केले.मीही हास्य केले.त्याने माझ्याकडे पाहून हाय तू कशी आहेस असे विचारले.मीही ठीक आहे तुझी वाट पाहत आहे असे सांगितले.माझे प्रतिबिंबातील ओठ हालले आवाज आला नाही.कसे कोण जाणे मी बोललेले त्याला कळले असे मला वाटले.मी मरूनही अजून अस्तित्वात आहे आणि त्याच्या मागे पुढे फिरत आहे, हे लक्षात येऊनही त्याला भीती वाटली नाही.तो नंतर कॉलेजांत निघून गेला.मीही अर्थातच त्याच्याबरोबर होतेच.प्रत्येक क्षणी मी त्याच्याबरोबर आहे हे त्याला कसे समजून सांगावे तेच मला कळत नव्हते.त्याची मोटारसायकल अकस्मात बंद पडली होती.किक मारून मारून तो थकून गेला होता.शेवटी त्याने मेकॅनिकला बोलावण्याचा निर्णय घेतला.मीही मोटारसायकलमधील फॉल्ट सापडतो का ते बारकाईने पाहत होते.पेट्रोल पाईपमध्ये हवेचा बुडबुडा आला होता.मी पाईप काढून पेट्रोलला प्रवाही केले.
लगेच पाइप जाग्यावर बसवला.दोन चार किक मारल्या.गाडी सुरू झाली.अरविंदला मी दिसत नव्हते. माझ्या हालचाली दिसत नव्हत्या. तरीही पेट्रोलचा पाईप काढला गेला. पेट्रोल प्रवाही करण्यात आले.तसाच पाइप जाग्यावर बसवण्यात आला.नंतर किक मारण्यात आल्या.या सर्व गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.मी त्याच्या आसपास आहे.मी त्याला मदत करण्यास तत्पर उत्सुक आहे.ही गोष्ट त्याला कळली होती.
तो मोटारसायकलवर बसला.तेवढ्यात त्याच्या खिशाला लावलेले पेन निसटून खाली पडले.गाडी बंद पडली त्या वेळी सुरू करण्याच्या खटाटोपात ते वेडेवाकडे झाले असावे.जमिनीवरून पेन उचलून मी ते त्याच्या खिशात ठेवले.तो आश्चर्यचकित झाला होता.सुदैवाने या गोष्टी कुणाच्या लक्षात आल्या नव्हत्या. अदृश्य रूपातून दृश्य रूपात यावे.माझ्या लाडक्या अरविंदाजवळ मला बोलता यावे यासाठी माझे प्रयत्न चालले होते.कांही महिने असेच गेले.अरविंदला मी त्याच्या आसपास आहे हे जाणवत होते.मी त्याला प्रतिबिंब रूपाने आरशात दिसत होते.मात्र प्रत्यक्ष दर्शन देऊ शकत नव्हते.बोलू शकत नव्हते.मी बोलण्याचा प्रयत्न करीत असे.प्रतिबिंबाचे ओठ हालत.आवाज येत नसे.
एक ना एक दिवस मी यात यशस्वी होईन याची मला खात्री होती.आरशाच्या पुढ्यात उभा राहून अरविंद माझी छबी न्याहाळत बसे.माझे प्रतिबिंबरूप दर्शन त्याला सुखवीत असे.तो मला कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असे.त्याचे ओठ हलताना दिसत.तो काय बोले ते मला कळत नसे.असे फार दिवस होणार नाही मी त्याला दिसेन.मी त्याच्याशी बोलेन. तो माझ्याशी बोलेल.आमचे आवाज एकमेकांना ऐकू येतील याची मला खात्री होती.आणि तसेच झाले एक दिवस मी बोलताना त्याला ऐकू गेले.आता मी खूष होते.मला अरविंदला माझ्या जगात आणायचे होते.या जगात तो आणि मी सुखाने राहिलो असतो.माझ्या मनात असते तर मी त्याला केव्हांच माझ्या जगात आणू शकले असते.तो गच्चीत असताना एक धक्का आणि थोड्याच वेळात तो माझ्या जगात आला असता.गच्चीतून जमिनीवर आपटेपर्यंत जेवढा वेळ लागला असता तेवढाच वेळ मध्ये गेला असता.तो मोटारसायकलवरून जात असताना स्टेअरिंग किंचित वाकडे करावे की दुसऱ्याच क्षणी तो माझ्या जगात आला असता.परंतु मला त्याच्या मनाविरुद्ध कांहीही करायचे नव्हते.त्याच्या संमतीने मला, माझ्या जगात त्याला आणायचे होते.हे साध्य होईल की नाही मला माहीत नव्हते. मी गेले नाही. मी येथे आहे. मी येथे त्याच्यासाठी आहे. हे त्याच्या लक्षात आणून द्यायचे होते.बऱ्याच महिन्यांनंतर आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यात मी सफल झाले होते.प्रतिबिंबरूपी दर्शन देऊन मी त्यात सफल झाले होते.आता मला त्यांच्याशी संवाद साधायचा होता.प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटलेच आहे.त्यातही मी एक दिवस यशस्वी झाले.
वेळ रात्रीची होती.भुते रात्री बारानंतर जास्त शक्तिशाली होतात वगैरे सांगितले जाते.कदाचित त्यात तथ्य असेलही.परंतु माझ्या बाबतीत मी केव्हांही कुठेही दिवसा रात्री जाऊ येऊ शकत होते.जिथे देव असतो तिथे भुते जाऊ शकत नाही असे म्हणतात.मी कोणत्याही देवळात जात होते.मला कसलाही प्रतिबंध होत नव्हता.मला कोणाचाही कोणताही प्रतिबंध नव्हता.कदाचित मी तुमच्या जगात, तुमच्यासारखी असताना,देवप्रिय होते.म्हणजे देव मला प्रिय होते.मी नेहमी गणपती मंदिरात जात असे.गणपती हे माझे अाराध्य दैवत होते.संकष्टी चतुर्थीचा उपवास नेहमी मी करीत असे. मी नेहमी गणेश स्तोत्र,अथर्वशीर्ष,म्हणत असे.मी अष्टविनायकालाही जाऊन आले होते.कदाचित त्यामुळेच मी दिवसरात्र केव्हांही कुठेही जाऊ शकत असे.अजूनही मी सूक्ष्म रुपात,धूम्र रूपात, अदृश्य रूपात, गणपती मंदिरात रोज दर्शनाला जाते.हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हे मला माहीत आहे.भूत आणि देवभोळे!अक्रितच आहे असे कुणीही म्हणेल.पण आहे हे असे आहे खरे.विश्वास ठेवा किंवा ठेवू नका.या सर्वामुळे मी भूत योनीत असूनही मला देऊळ अडवीत नसावे.उलट आता माझ्या हालचाली गतिमान झाल्या होत्या.मी खिडकीतून बाहेर सहज पडू शकत असे.कोणत्याही मजल्यावर केव्हांही खिडकीतून आत जाऊ शकत असे.मला कशाचीच आडकठी नव्हती.जराशी फट कि मी आंत जावू शकत होते.
तर मी तुम्हाला माझी व अरविंदची गोष्ट सांगत होते.आमच्या आयांच्या आम्ही लहान असताना ऐकलेल्या बोलण्यामुळे आमच्या दोघांच्या मनात बीज रोवले गेले.त्याचा हळूहळू वटवृक्ष होत होता.दुर्दैवाने मला अपघाती मृत्यू आला.मी अरविंदशी बांधले गेले होते.मी पुढे गती का काय म्हणतात तिकडे जाऊ शकले नाही.मला अरविंदचे अदृश्य पाश बांधून ठेवीत होते.
तर वेळ रात्रीची होती.अरविंद मोबाइलमध्ये खेळत बसला होता.खेळता खेळता बहुधा तो माझाच विचार करीत असावा.मी त्याच्या समोरच्या खुर्चीत दृश्यरूपात प्रकट झाले.त्याचे लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे मी खुर्चीत प्रगट झाल्याचे त्याच्या लक्षात आले नव्हते.मी किंचित खाकरले.त्याने दचकून वर पाहिले.मला समोर पाहताच तो आणखीच दचकला. मला आरशात प्रतिबिंब रूपाने पहाण्याची त्याला सवय होती.प्रत्यक्ष समोर पाहल्यामुळे तो दचकला होता.दचकून तो उभा राहिला.मी स्मितहास्य करीत त्याला बस म्हटले.तो पटकन सोफ्यावर बसला.तू तर मेली होतीस.तुला अपघात झाला होता.तू मला प्रतिबिंब रुपाने दिसत होतीस.कदाचित मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे मला तू आरशात दिसत असावीस असा माझा ग्रह होता.आता तू इथे कशी? असे त्याने विचारले.मी त्याला सर्व हकिगत सांगितली.मी तुझ्याशी बांधले गेले आहे.त्यामुळे मी येथेच तुझ्या आसपास असते.मला तुमच्या जगात येणे आता शक्य नाही.परंतु तू आमच्या जगात येऊ शकतोस.रेल्वे ट्रॅक, तलाव, उंच इमारत, उंच पहाड, कुठेही तू तुझा देह सोडू शकतोस.पुढच्या क्षणी आमच्या जगात येशील.आपले त्या जगात नाही तरी या जगात मिलन होईल.आपण आनंदाने येथे राहू.
माझ्या बोलण्यावर त्याचा चेहरा विचारमग्न झाला.तो म्हणाला,हे जग काय आणि ते जग काय,आपण बरोबर असणे महत्त्वाचे हे तुझे म्हणणे मला पटते.परंतु या जगातील माझ्या कांही जबाबदाऱ्या आहेत.मी आई वडिलांचा एकुलता एक आहे.मी त्यांची म्हातारपणची काठी आहे.दुसरी गोष्ट मी तुझ्या जगात येणे अनैसर्गिक आहे.जर गजाननाच्या मनात तुझा आणि माझा संसार व्हावा असे असते तर तुला अपघात झालाच नसता.तुझा आणि माझा तेवढाच ऋणानुबंध होता.तू स्वत:ला तुझ्या जगात उगीचच अडकवून ठेवू नयेस असे मला वाटते.गजाननाच्या मनात असेल तर आपली भेट पुन्हा केव्हांतरी होईलच.
त्या दिवशी रात्री जवळजवळ तासभर आमचा दोघांचा वाद विवाद चालला होता.मी त्याला आमच्या जगात ये म्हणून सांगत होते.ते कसे अनैसर्गिक आहे. अशक्य आहे.हे तो मला समजावून सांगत होता.
*जर गजाननाच्या मनात असते तर मला अपघात झालाच नसता.झाला असता तरी जीवघेणा झाला नसता.*
*मला त्याचे म्हणणे शेवटी पटले.*
*मी त्याला माझ्या जगात केव्हांही घेऊन जाऊ शकत होते.परंतु मला तसे करावयाचे नव्हते.*
*त्याच्या मनाविरुद्ध,
सक्तीने कांही व्हावे असे मला कधीच वाटले नव्हते.*
*तुमच्या जगात असतानासुद्धा जर त्याने माझ्याशी लग्न करण्याला विरोध केला असता, मान्यता दिली नसती, तर तेही मी स्वीकारले असते.*
*या जगात असताना तर प्रश्नच नव्हता.त्याच्या जगात त्याने राहावे आणि मी या जगातून पुढे यदृच्छेने, अदृष्टातच असेल त्याप्रमाणे जावे हेच उचित ही गोष्ट मला पटली.*
*मी त्याला शेवटची मिठी मारली.डोळे भरून त्याचे रूप माझ्या मनात साठवले.*
*आणि पाण्यात ढेकूळ विरघळावे त्याप्रमाणे मी अवकाशात विरघळून गेले.*
(समाप्त)
१०/२/२०२२©प्रभाकर पटवर्धन