Get it on Google Play
Download on the App Store

७ अमानुष अस्तित्त्व २-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी सुरा काढला आणि विश्रामच्या छातीत खुपसला.विश्राम दोन आचके देऊन तिथेच खलास झाला.

भास्कर व रमाकांत आ वासून हे पहात होते.अकस्मात असे कांही होईल याची त्यांना कल्पना नव्हती.

सर्व माझ्याकडे अवाक् होऊन पाहत होते.माझ्या हातात रक्ताने भरलेला सुरा होता.

कुणीही कांकणभरही कांही बोलत नव्हता.एखाद दुसरा कमी जास्त शब्द आणि मी लगेच त्याला ढेर करीन याची त्यांना खात्री पटली होती.

भास्कर व रमाकांत याना जयंत असा नाही हे पूर्णपणे माहीत होते.

डोके फिरल्यासारखे अकस्मात तो असा काय करतो असे त्याना वाटत होते.

जयंतचे डोके बिके फिरले नव्हते.तो जयंत नव्हताच.तो मी होतो.ते भयानक दृश्य पाहून सर्व जण थरथर कापत होते        

म्हातारा हे सर्व पाहात होता.तो आता पुढे आला.तुम्ही पावसात भिजत होता.बाहेर मोठे वादळ सुरू होते.तुम्हाला आंत घेतले नसते तर या जंगलात तुम्ही गारठून गेला असता.जंगली श्वापदांनी तुमच्यावर हल्ला केला असता.तुमच्या जिवाला असलेला धोका मला दिसत होता.म्हणून मी    माझ्या कोठीमध्ये तुम्हाला आसरा दिला.तुम्ही असे हिंस्त्र प्रवृत्तीचे असाल असे वाटत नव्हते. तुमच्यापेक्षा जंगली श्वापदे बरी. तुम्ही ताबडतोब माझ्या कोठीतून बाहेर जा.तुमच्यासारखे सुशिक्षित सभ्य वाटणारे परंतु स्वभावाने खुनशी वृत्ती असणारे माझ्या घरात नको असे तो म्हणाला.म्हातारा   चांगलाच चिडलेला दिसत होता.मी कुणीतरी कांहीतरी बोलेल याची वाटच पाहत होतो.सुर्‍याने मी म्हाताऱ्याची मान तत्काळ एका घावात कापून टाकली.म्हातार्‍याला शेंडी होती.शेंडीच्या आधारे त्याचे शिर खुंटीला टांगून ठेवले.कापलेल्या शिरातून रक्त जमिनीवर ठिपकत होते.बघता बघता मी दोन खून केले होते.माझी तबियत खूश झाली होती.मी सुरा डाव्या हातातून उजव्या हातात आणि उजव्या हातातून डाव्या हातात असा झेलत होतो.कुणाला कांही बोलायचे आहे का? मी कडक शब्दात विचारले.त्यामध्ये सरळ सरळ असा भाव होता कि जो मला विरोध करील त्याला मी ठार मारीन.कुणीही एकही शब्द उच्चारत नव्हता.खिळे मारून जागच्या जागी स्थिर केल्यासारखे सर्व उभे होते.आता मधुरा माधुरी जयंत (मी )भास्कर आणि रमाकांत एवढेच शिल्लक होतो.

बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.माझ्याशिवाय सर्वांना बाहेर पळून जावे असे वाटत होते.परंतु अशा पावसात बाहेर पडणेही धोक्याचे होते.वादळ, धुवाँधार पाऊस, विजा,प्रचंड गारठा, जंगली श्वापदे, या सर्वाची भीती होती.सर्व पळून चालले तर मी (जयंत)काय करील ही भीती होतीच. 

सर्वांना भुका लागल्या होत्या.सर्वजण जंगलात फिरताना वाट चुकले होते.या कोठीमध्ये त्यांना आसरा मिळाला तेव्हा आनंद झाला होता.

आता त्या आनंदाचा लवलेशही उरला नव्हता.जयंत असे कांही करील याची एकालाही कधीही पुसटशीसुद्धा कल्पना आली नव्हती.

जयंत स्वभावाने गोड सज्जन सुसंस्कृत मुलगा होता.त्याचे असे काय झाले म्हणून सर्व जण आश्चर्यचकित झाले होते. जयंत जयंत नव्हताच.त्यात मी होतो.अर्थात ही कल्पना बहुधा  कुणालाच नव्हती.  

जयंतामध्ये मी शिरलो खरा परंतु तिथे मला चैन पडत नव्हते. त्याचा स्वभाव माझ्या स्वभावाच्या बरोबर विरुद्ध होता. मला तिथे गुदमरल्यासारखे होत होते.मी त्याच्या शरीरातून बाहेर पडलो.मला एका जागी फार वेळ राहावत नसे.माझा स्वभाव कमालीचा चंचल आहे.

जयंतामध्ये मी शिरलो खरा परंतु तिथे मला चैन पडत नव्हते.मला एका जागी राहणे विशेष आवडत नाही.माझा स्वभाव चंचल आहे.आता इथे तर मग तिथे असे माझे आहे.स्वतंत्रपणे अवकाशात विहरत राहणे, असणे मला आवडत नाही.मला कसला तरी सहारा असला की मी खूश असतो.तो सहारा जिवंत माणूस प्राणी याचा असो किंवा निर्जीव वस्तूंचा असो. 

जयंतचा स्वभाव माझ्या स्वभावाच्या बरोबर विरुद्ध होता.गोड, सज्जन, प्रामाणिक, एकनिष्ठ, विचारवंत, सौम्य स्वभावाचा, अहिंसक,असा तो होता.मला त्याच्या मनाचा ताबा घेणे कठीण पडले.माझ्या स्वभावाशी मिळताजुळता असेल तर त्याच्या मनाचा ताबा मला सहज घेता येत असे.

मला तिथे गुदमरल्यासारखे होत होते.

मी त्याच्या शरीरातून बाहेर पडलो.त्याच्या शरीरातून बाहेर पडल्यावर आता काय करावे अशा विचारात मी होतो.जयंत बेशुध्दीतून  शुद्धीवर आल्यासारखा किंवा निद्रेतून जागा झाल्यासारखा दिसत होता.नुकताच रानात भेटलेला विश्राम त्याच्या छातीत सुरा खुपसल्यामुळे आडवा पडलेला होता.ज्या म्हाताऱ्याने आपल्याला संकटसमयी सहारा दिला त्याचे मुंडके छाटलेले आणि खुंटीला टांगलेले दिसत होते. 

जयंत आश्चर्यचकीत झाला होता.हे सर्व पापकर्म कुणी केले तो विचारीत होता.जेव्हा सर्वांनी त्याला हे तूच केलेस असे सांगितले तेव्हा तो ते नाकारत होता.तो म्हणाला, तुम्हाला माहित आहे मी कसा आहे. मी असे कधी करीन का?त्यावर सर्व जण एका कोरसमध्ये उद्गारले कधीच नाही. तरीही तू हे केले आहेस.असे तू कसे करू शकलास अशा विचारात आम्ही आहोत.आम्ही तुला प्रत्यक्ष हा खून खराबा करताना पाहिले आहे ते आम्ही कसे विसरणार?त्यावर जयंत म्हणाला,मी खात्रीपूर्वक सांगतो, मी हे केलेले नाही. जरी कदाचित मी हे केले असे तुम्हाला वाटत असले तरी तो मी नव्हतो.माझ्या मनाचा कुणीतरी अशुभ अमानवी अमानुष शक्तीने   ताबा घेतला असावा.मला माझ्या मानेवर कुणीतरी बसले आहे असे सतत वाटत होते.आता मला मोकळे मोकळे वाटत आहे.

हे सर्व बोलत असताना मी कुत्सितपणे हसत होतो.या जयंतला जो संशय आला तो खराच होता.तरीही सर्वांनी त्याला हे दोन खून करताना पाहिले होते.ते अर्थातच त्यांना नाकारणे शक्य नव्हते. 

आता काय करावे अशी माझी चुळबुळ सुरू होती.मला माधुरी खूप आवडली होती.तिचा उपभोग घेणे मला आवडले असते.कोणामध्ये शिरावे आणि हे कसे करावे,केव्हां करावे,अशा   विचारात मी होतो.    

मी जयंतमध्ये त्याच हेतूने शिरलो होतो. माधुरीशी गोडगोड बोलून सर्व निद्राधीन झाल्यावर रात्री आपला हेतू साध्य करून घ्यावा असा विचार होता.परंतु माझ्या स्वभावानुसार विश्रामशी बोलताना  बोलण्याला वेगळेच वळण लागले.आणि बघता बघता मी त्याच्या छातीत सुरा खुपसला.हे सर्व पाहून म्हातार्‍याचे डोके सटकले आणि त्याने आम्हाला घराबाहेर जायला सांगितले.माझ्या आततायी तामसी खुनशी स्वभावानुसार मी म्हातार्‍याचे शिर छाटून टाकले.सगळ्याच गोष्टींना वेगळे वळण मिळाले.

मधुरामध्ये शिरावे.ती माधुरीची मैत्रीण आहे.तिच्यामार्फत माधुरीला स्पर्श करता येईल, आलिंगन देता येईल, म्हणून मी मधुरामध्ये शिरण्याचे ठरविले.एकदा भास्कर किंवा रमाकांत यांच्यात शिरावे आणि आपला कार्यभाग साधून घ्यावा असा विचार होता.परंतु त्यांच्यामार्फत आपला कार्यभाग साध्य करता येईल असे मला वाटले नाही.मी मधुरामध्ये शिरलो. माधुरीशी गोडगोड बोलण्याऐवजी माझ्या स्वभावानुसार  मी तिच्याशी भांडण उकरून काढले. माधुरीला माझे जयंतवर प्रेम आहे तू मध्ये अडमडलीस म्हणून आरोप केला.माधुरीशी माझे भांडण सुरू झाले.मी तिला बोचकारले.तिला घट्ट मिठीत धरून पाठीवर बुक्क्या मारल्या.तिच्या आणखी कुठे कुठे हवा तसा हात लावला.माधुरी भयंकर चिडली होती.तू अशी असशील असे वाटले नव्हते ती रागाने मला बोलली.कांही नाही तरी माझा बराच कार्यभाग साध्य झाला होता.मला मधुरामध्ये राहण्याचा कंटाळा आला.मी लगेच बाहेर पडलो.

*मी जेव्हां कुणाच्याही आंत शिरत असे तेव्हां तो मनुष्य थरथर कापत असे.*

*त्याला आंत कुणीतरी आला त्याने आपल्यावर ताबा मिळविला याची कुठेतरी खोल जाणीव होत असे.*

*मी बाहेर पडे त्यावेळी याच्या उलट होत असे.मी जेव्हां आत शिरे तेव्हा त्या माणसात एकदम बदल होत असे.त्याच्या मनाचा ताबा सोडताना याच्या उलट होई.*

*मधुरा मी बाहेर पडल्याबरोबर नॉर्मल वाटू लागली.मी आंत बाहेर करताना व्यक्तींमध्ये होणारा हा फरक कुणालाही जाणवण्यासारखा असे.*

*नाजुकपणे धसमुसळेपणा केल्याशिवाय कुणाच्या मनावर ताबा मिळवणे मला कधी शक्य झालेच नव्हते.*

(क्रमशः)

४/२/२०२२©प्रभाकर  पटवर्धन