Get it on Google Play
Download on the App Store

२ कोकणातील गोष्ट २-३

आम्ही कितीही कुरकुर कुरबूर केली तरी घरात झोपणे अशक्य होते.घरात जिकडे तिकडे घाण, नळे, माती, पातेरी, पडलेली होती.आम्ही नाईलाजाने एक रात्र आजोबा व आजी यांच्यामध्ये जीव मुठीत धरून झोपलो.कांही केल्या झोप लागत नव्हती.मध्येच वाघाने कोणते तरी कुत्रे धरल्याचा क्याँक असा आवाज आला.आजोबा म्हणाले भिकाजीचे कुत्रे बहुधा वाघाने धरले.आजोबांकडे कामावर येणार्‍या गड्यांपैकी भिकाजी हा एक.त्याचे घर आमच्या घराजवळच होते.भिकूचे कुत्रे वाघाने धरले हे   ऐकून माझी छाती धाडधाड उडायला लागली.वाघ आमच्या अगदी शेजारी आला होता.माझी लहान भावंडे विशेष घाबरली नाहीत असे वाटते.किंवा झोपेने विजय मिळविला आणि ती गाढ झोपी गेली.मी मात्र डोळे उघडे ठेवून कितीतरी वेळ जागी होते.कुठेही खट्ट झाले की वाघ आला असे वाटे.वाऱ्यावर कुठे काटकी झाडावरून खाली पडते.कुठे एखादा सरडा सरसरत जातो.कुठे ना कुठे कांही ना कांही कसले तरी आवाज येतच असतात.अशा  परिस्थितीत केव्हांतरी मला झोप लागली.दुसर्‍या दिवशी माझे डोळे लाल बुंद दिसत होते. 

माझी बिकट अवस्था आजीच्या चांगलीच लक्षात आली.ती अजोबांजवळ म्हणाली मुलांच्या झोपेची कांहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आजोबा मोठ्याने हसत म्हणाले चार दिवस गेले की त्यांना चटदिशी सवय होईल.कांही काळजी करू नको.आजीला माझी दशा पहावेना.आजीनेच एक उपाय सुचविला.त्यामुळेच आमची दत्तोपंतांच्या भुताशी भेट झाली. 

आमच्या गावांत ब्राह्मणांचे कितीतरी चौथरे ओसाड पडलेले आहेत.इथे पुरेसे उत्पन्नाचे साधन नाही म्हणून एकेक जण परदेशी परगावी गेला.दिल्ली इंदूर नागपूर नाशिक पुणे मुंबई सांगली कोल्हापूर अशा विविध ठिकाणी मंडळी पांगली.तिथेच जाऊन स्थायिक झाली.कित्येक जणांना आपले मूळ गाव कोणते तेच माहीत नाही. हा अमक्याचा चौथरा,तो तमक्याचा चौथरा, म्हणून ओळखला जातो.चौथऱ्यावरील सर्व घरे जमीनदोस्त झाली आहेत.कांही चौथऱ्यांचे तर चिरेही ढासळले आहेत. बाहेर गेलेल्यांपैकी कांहीजण जे गेले ते गेलेच त्यांनी परत गावाकडे ढुंकूनही पाहिले नाही.परंतु कांही जणांनी आपले घर उभे राहील असे पाहिले.ते गावाला विसरले नाहीत.गावात कांही कुटुंबे राहतातच.त्यांना असे परगावी गेलेले लोक त्यांच्या घराची झाड फेड व दुरूस्ती करून त्यांचे घर व्यवस्थित ठेवायला सांगतात.त्यासाठी लागणारा पैसाही वेळोवेळी पाठवितात.अशी मंडळी पाचदहा वर्षांनी कां होईना,घरी येऊन जातात.चार आठ दिवस येथे राहतात.देवावर अभिषेक वगैरे करतात.कांहीजण तर दोन चार वर्षानी सुद्धा भेट देतात.गावात होणार्‍या  देवळातील वार्षिक  उत्सवाला वर्गणीही पाठवतात.गावातील उत्सव हा गावातील लोकांना व आसपासच्या गावातील लोकांनाही विरंगुळ्याचा आणि करमणुकीचा विषय असतो.त्या निमित्ताने स्पर्धा आयोजित केल्या जातात.गावातील मंडळी नाटक बसवून तेही उत्सवात सादर करतात.  

गावात राहणार्‍या ज्या कुटूंबांकडे ही घरे देखभालीसाठी सोपवली आहेत ते या घरांचा उपयोग विविध कारणांसाठी करतात.गोठ्यामध्ये गोचिड्या(गुरांना चिकटून बसणारा, त्यांचे रक्त पिणारा ढेकणासारखा लहान प्राणी)   फार झाल्या म्हणून, गोठा दुरूस्ती करायची आहे म्हणून,घराचा उपयोग गुरे बांधण्यासाठी कांही दिवस केला जातो.उन्हाळ्यात आंबे प्रत्येकाकडे असतात.त्याच्या आड्या(आंबे पिकवण्यासाठी गवतामध्ये ठेवणे) घालण्यासाठी, झाडावरून काढलेले आंबे सुरक्षित( उघडय़ावर ठेवलेले आंबे ,पाऊस दव यामुळे खराब होतात. चोरही चोरतात.)  ठेवून पेटय़ा भरण्यासाठी,काढलेले फणस,

कापलेले भाताचे गवत,झोडलेले भात(करले काढण्याआधीचा तांदूळ),गूत(एक प्रकारचे गवत), पावसाळ्यात बेगमीचे गवत, लाकडे  ठेवण्यासाठी,इत्यादी अनेक कारणांसाठी वापर करतात.

कोकणात हल्ली पर्यटन फार वाढले आहे.अशा पर्यटकांना राहण्यासाठी घराचा वापर केला जातो.त्यांची जेवणाची सोयही केली जाते.येथे राहणाऱ्यांना एक उत्पन्नाचे साधन होते.

तरीही एखादे दुसरे घर पूर्ण रिकामे असते.त्यामध्ये फक्त मालकाचे सामान असते.आजीने आमच्या घराच्या जवळच असलेल्या एका घराचा अाजोबांजवळ उल्लेख केला.त्यामध्ये मुलांना रात्रीचे झोपायला जाऊ दे.भिकूकडून झाडफेड करून जागा थोडी स्वच्छ करून घेऊ.मुले तिथे झोपतील.त्यांच्या सोबतीला नर्मदेला पाठवू.

ही योजना ऐकून आम्ही विशेषतःमी खुष झाले.घर स्वच्छ करून घेण्यात आले.आमच्या गाद्या वगैरे सामान त्या घरात नेऊन टाकण्यात आले.नर्मदा सोबतीला येणार होती.त्यामुळे सोबतीचाही प्रश्न नव्हता. 

त्या घराच्या मालकाने वीजही घेतली होती.त्यामुळे सर्वत्र पंखे व विजेचे दिवे होते.

घर बघून व्यवस्था बघून आम्ही एकदम खूष होऊन गेलो.

आजोबांच्या घराची(म्हणजे आमच्याही) नळे परतणे होऊन, घर स्वच्छ होऊन, भिंती वगैरे सारवून, सर्व कांही व्यवस्थित होईपर्यंत आमची छान सोय झाली होती.

आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला नर्मदेने अशी एक हकिगत रंगवून सांगितली कि आम्ही पूर्णपणे हादरून गेलो. नर्मदा म्हणाली आजींनी ही हकिगत तुम्हाला सांगू नको म्हणून सांगितले आहे.परंतु मला सांगितल्याशिवाय राहवत नाही.

नर्मदा म्हणाली.

दत्तोपंतांचे भूत या घरात फिरत असते.

मी कोण दत्तोपंत म्हणून विचारले.नर्मदा म्हणाली या घराचे मालक ते उच्च शिक्षित होते.ते मुंबईतल्या एका नामांकित हायस्कूलचे प्राचार्य होते.किंचित स्थूल शरीरयष्टी,कोकणस्थी गोरेपणा,घारे डोळे,भरदार मिश्या,जुन्या काळातील त्यावेळच्या कपडय़ांनुसार सूट बूट टाय असा पोशाख,असा एकूण त्यांचा थाट असे. त्या काळच्या  नामांकित इंग्लिश माध्यमाच्या शाळेचे प्राचार्य असल्यामुळे असा पोशाख त्याना शोभून दिसत होता.आवश्यकही होता.घरी मात्र किंवा मुंबईत फिरताना धोतर शर्ट असा त्यांचा साधा पोशाख असे. गृहस्थ अतिशय वक्तशीर, काटेकोर, स्वच्छतेचा प्रचंड भोक्ता,अत्यंत व्यवस्थित,असा होता.

शाळेत ते अत्यंत नियमितपणे बरोब्बर दहाच्या ठोक्याला येत असत.शिपायापासून शिक्षकांपर्यंत प्रत्येकाचा पोशाख नीटनेटका व्यवस्थित असलाच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे. तसेच मुलांसकट सर्वांनी वेळेवर हजर राहिलेच पाहिजे अशी त्यांची शिस्त होती.उशिरा येणाऱ्याला शिक्षा होत असे. येणार्‍या जाणार्‍याला दिसेल अशाप्रकारे वऱ्हांड्यात उभे करणे,मी उशिरा आलो म्हणून पाटी हातात देऊन त्याला सर्व वर्गातून फिरविणे,पालकांना भेटायला बोलाविणे,हातावर छडी मारणे,दंड करणे,अशा विविध प्रकारच्या शिक्षा ते मुलांना करीत असत.हातात वेताची छडी घेऊन ते फिरत असत.शिक्षक दहा मिनिटे जरी उशीर झाला तरी त्याची अर्धी रजा धरत.आपल्या खोलीत बोलावून त्यांना समज देत.शिपायांसकट सर्व नोकरवर्ग नऊला हजर राहिलाच पाहिजे असा त्याचा दंडक होता.कुठेही कचरा कागदाचा कपटा दिसता कामा नये यावर त्यांचा कटाक्ष होता.उपप्राचार्य असले तरी स्वतः जातीने ते सर्व पाहात असत.जो दोषी असेल त्याला शिक्षा होई.त्यांनी कधीही शिपाई ऑफिस स्टाफ किंवा शिक्षक यामध्ये भेदभाव केला नाही.सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थना म्हटली जात असे.प्रार्थनेमुळे पवित्र वातावरण निर्माण होते असे त्यांचे म्हणणे होते. प्रार्थनेला सर्व ऑफिस  स्टाफ, शिक्षक, शिपाई, व्हरांड्यात उभे राहात असत.प्रार्थनेला हजर रहाणे सक्तीचे होते.प्रार्थनेला गैरहजर असलेली व्यक्ती गैरहजर धरली जाई.शिवाय प्राचार्यांच्या खोलीत बोलवून त्या व्यक्तीची हजेरी घेतली जाई. या युक्तीमुळे सर्व जण वेळच्या वेळी येत असत.सर्वांनी वेळेवर हजर राहावे यासाठी ती एक युक्ती होती.कोण आला आहे आणि कोण नाही तेही लगेच समजत असे.   

मी मध्येच विचारले,तू दत्तोपंत पुराण लावले आहेस.ते मुंबईत त्यांचे भूत इथे हा काय प्रकार आहे? त्यांचे भूत कसे झाले?ते या घरात काय करीत आहेत?

नर्मदा म्हणाली मला माझ्या पद्धतीने सांगू दे.मी दत्तोपंत भूत कसे झाले त्या घटनेकडेच येत आहे.दत्तोपंत कसे होते ते कळल्याशिवाय भूत असे कां आहे ते कळणार नाही.आम्हाला ती सांगत असलेली हकिगत गुपचूप ऐकू लागलो.ती पुढे सांगू लागली. 

दत्तोपंत स्वतः व्हरांड्यात किंवा शाळेच्या फाटकामध्ये उभे राहात असत.त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत असे.त्यांच्या धाकाने सर्वजण वेळेअगोदर हजर राहात असत.त्यांची शिस्त जरी कडक होती,शिस्त मोडणाऱ्याला ते जरी शिक्षा करीत होते,तरी अंत:करणाने ते कनवाळू होते. सर्व कर्मचार्‍यांवर त्यांचे मुलाप्रमाणे प्रेम होते.ही गोष्ट सर्वांना माहित असल्यामुळे, ती त्यांच्या वर्तणुकीतून केव्हां केव्हां जाणवत असल्यामुळे सर्वजण त्यांच्यावर प्रेम करीत असत.त्यांच्या कनवाळूपणाच्या अनेक गोष्टी आहेत.नर्मदेने त्या आम्हाला   सांगितल्या.विस्तारभयास्तव त्या इथे देत नाही.

*दत्तोपंत कितीही कनवाळू  असले तरी त्यांचे भूत या घरात फिरत असते हे ऐकल्यावर आमची अवस्था केविलवाणी झाली.*

* "भीक नको पण कुत्रा आवर." "मागच्या खोता तूच बरा""घी देखा लेकिन बडगा नही देखा" यांतील कोणती म्हण वापरावी तेच आम्हाला कळेना. *

(क्रमशः)

४/७/२०२१©प्रभाकर  पटवर्धन