Get it on Google Play
Download on the App Store

८ अमानुष अस्तित्त्व ३-३

( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

मी जेव्हां कुणाच्याही आंत शिरत असे तेव्हां तो मनुष्य थरथर कापत असे.

त्याला आंत कुणीतरी आला त्याने आपल्यावर ताबा मिळविला याची कुठेतरी खोल जाणीव होत असे.

मी बाहेर पडे त्यावेळी याच्या उलट होत असे.मी जेव्हां आत शिरे तेव्हा त्या माणसात एकदम बदल होत असे.त्याच्या मनाचा ताबा सोडताना याच्या उलट होई.

मधुरा मी बाहेर पडल्याबरोबर नॉर्मल वाटू लागली.मी आंत बाहेर करताना व्यक्तींमध्ये होणारा हा फरक कुणालाही जाणवण्यासारखा असे.

नाजुकपणे धसमुसळेपणा केल्याशिवाय कुणाच्या मनावर ताबा मिळवणे मला कधी शक्य झालेच नव्हते.

मला तीन गोष्टी जमत नव्हत्या.नाजूकपणा, संयम व स्थैर्य.कुठेही माझे बूड जास्त वेळ स्थिर राहू शकत नसे.मी माझ्या स्वभावानुसार पुरेसा गोंधळ घातला होता.आता मी कंटाळलो होतो.टेबलावर एक फुलदाणी दिसत होती.त्यात जाऊन थोडावेळ विश्रांती घ्यावी नंतर काय करायचे ते बघता येईल असे मी ठरविले.फुलदाणीत जाऊन मी विसावलो.आणि इथेच माझा घात झाला. 

***

~रमाकांत~

मला लहानपणापासून अशुभ, अदृश्य,अस्तित्वाची चटकन जाणीव होते.एखाद्याला कांही अंगभूत सिद्धी जन्मापासून प्राप्त असतात त्यातील ही सिद्धी मला प्राप्त होती. मी एका महान मांत्रिकाचा मुलगा होतो.मी धाकटा मुलगा होता.आपले सर्व ज्ञान मोठ्या मुलाला द्यावे अशी आमच्या घराण्यात प्रथा होती.पहाटे उठून माझे वडील दादाला मंत्र तंत्र शिकवीत असत.त्यावेळी मी जागा असे.मी एकपाठी आहे .पडल्या पडल्या बरेच मंत्र,कृती, मला माहीत झाल्या होत्या.ज्यावेळी म्हाताऱ्याने दरवाजा उघडला तेव्हांच मला अशुभाची जाणीव झाली होती.म्हातार्‍याकडे पाहिल्याबरोबर हा म्हातारा सामान्य नाही याच्यावर कुणाचा तरी ताबा आहे असे माझ्या   लक्षात आले होते.जर शक्य असते तर मी सर्वांना आत जाण्यापासून रोखले असते.घनदाट जंगल, धुवाँधार पाऊस, चमकणार्‍या विजा, या संकटातून सुटल्याबद्दल सर्वजण देवाला दुवा देत होते.मला धोका वाटत होता परंतु धोक्याचे स्वरूप मला माहीत नव्हते.या गडबडीत कोणाला रोखणे शक्य नव्हते.मी मुकाट्याने सर्वांबरोबर कोठीमध्ये शिरलो.

म्हातार्‍याचे वय जवळजवळ सत्तर असावे.प्रत्यक्षात त्याची हालचाल जास्त चपळ एखाद्या तरुणासारखी हाेती.मला तेव्हांच त्याच्यावर कुणाचा तरी ताबा आहे त्यामुळे त्याची हालचाल अशी  एखाद्या तरुणासारखी तडफदार  आहे असा संशय आला होता.अर्थात तो म्हातारा वाकून चालण्याचा, हळूहळू चालण्याचा ,प्रयत्न करीत होता.परंतु तो अभिनय आहे हे माझ्या कसे कोण जाणे लक्षात आले होते.

ते अस्तित्व जेव्हां एखाद्याच्या आंत शिरत असे आणि बाहेर पडत असे त्या वेळी त्या व्यक्तीची चर्या,देहबोली यामध्ये जाणवण्यासारखा फरक पडत असे.ते अस्तित्व एखाद्याचे आंत जाताना व बाहेर पडताना झटका बसल्यासारखा मनुष्य मुळापासून हादरलेला वाटत असे.मी शांतपणे कोठी व म्हातारा यांचे निरीक्षण करीत होतो.थोड्या वेळात म्हाताऱ्याला झटका बसला.ते अस्तित्त्व म्हाताऱ्यामधून बाहेर पडले होते.ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही.येथे दिसत आहेत त्यापेक्षा आणखी कुणीतरी आहे असे मला ठामपणे वाटत होते.कांही क्षणांतच माझा मित्र जयंत याला झटका बसल्याचे जाणवले.त्या अस्तित्वाने जयंतचा ताबा घेतला होता.नंतर जयंतने आम्हाला वाटेत भेटलेल्या, आमच्याबरोबर आश्रय म्हणून आलेल्या,रानात चुकलेल्या, विश्रामशी भांडण उकरून काढले.त्याचा खून केला.

ते अस्तित्व बाहेर पडल्यावर म्हातारा नॉर्मल झाला होता.खूनखराबा बघून म्हातारा चांगलाच चवताळला होता.त्याने आम्हा सर्वांना ताबडतोब कोठी सोडून जाण्याची आज्ञा केली.त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याला आपली गाठ कुणाशी आहे त्याची कल्पना नव्हती.जयंतमधील अस्तित्व अगोदरच खूनखराबा करण्यास उत्सुक होते.त्याला चालना  मिळाल्यासारखे झाले.भुताच्या हाती कोलीत ही म्हण अक्षरशः प्रत्यक्षात आली.जयंतने म्हणजेच त्या अशुभ अस्तित्वाने म्हातार्‍याचे डोके छाटून टाकले.आणि खुंटीला टांगून दिले.त्या अस्तित्वाला काबूत आणणे मला शक्य नव्हते.नाहीतर तेव्हांच मी त्याचा बंदोबस्त केला असता.जे जे कांही होईल ते ते उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.ते अस्तित्व मधुरामध्ये शिरल्याचे मला जाणवले.थोड्याचवेळात मधुरा आणि माधुरी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.दोघीही एकमेकांच्या अक्षरशः झिंज्या ओढू लागल्या.त्या अस्तित्वाचा इरादा चांगला दिसत नव्हता.मधुरामार्फत माधुरीला मिठी मारून ते अस्तित्त्व चाळे करीत होते. 

थोड्याच वेळात ते अस्तित्व मधुरामधून बाहेर पडले.त्या अस्तित्वाला कुठेही स्थिर राहता येत नव्हते.त्याचा तो स्वभावच नव्हता.ते अतिशय चंचल होते.क्षणात इथे तर क्षणात तिथे अशी त्याची नाचानाच चालली होती.प्रत्येक वेळी खून खराबा भांडण केल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हते.मधुरामध्ये असताना ते अस्तित्व माधुरीला इजा करील की काय अशी मला भीती वाटत होती.माधुरीमध्ये त्या अस्तित्वाला रस असल्यामुळे तसे कांही झाले नाही.

उपजत शक्ती, मांत्रिकाचा मुलगा आणि लहानपणी दादाला शिकवत असताना ऐकलेले मंत्र यामुळे या सर्वांची मला जाणीव होत होती.मी अशुभ अस्तित्वाला  रोखू शकत नव्हतो.त्याच्यावर कब्जा मिळवू शकत नव्हतो.थोड्याचवेळात ते अस्तित्व एका फुलदाणीत फ्लॉवरपॉटमध्ये विसावले. ती गोष्ट फक्त माझ्या लक्षात आली.मला हीच सुवर्णसंधी होती.त्या फुलदाणीवर रुमाल टाकून मी दोरीने तो गच्च बांधून टाकला.आता त्याला बाहेर पडता येणार नव्हते.एका गडूच्या आकाराच्या तांब्याच्या भांड्याची ती फुलदाणी होती.तिला आटे होते.कोठीमध्ये फिरून मी त्या फुलदाणीचे झाकण शोधून काढले. सुदैवाने मला ते झाकण सापडले. फुलदाणीवर बांधलेल्या रुमालाचा दादरा काढून घेऊन ते झाकण मी चपळाईने घट्ट बसविले. हे करताना  ते अस्तित्व बाहेर निसटणार नाही याची मला पूर्ण काळजी घ्यावी लागली होती.आता ते घातकी अस्तित्व जखड बंद झाले होते.विश्राम मेला होता.म्हातार्‍याचाही खून झाला होता.बोटांचे ठसे आणि इतर पुरावा पाहिला असता जयंत पूर्णपणे अडकला होता.सुटकेचा एकच मार्ग दिसत होता.कोठीला आग लावून देणे.कोठी संपूर्णपणे भस्मसात होईल अशी व्यवस्था करणे.

दोन्ही खून जयंतने केलेले नाहीत.घातक अस्तित्वाने ते केले आहेत.ते अस्तित्व आता फुलदाणीत बंद आहे.या गोष्टी मी माझ्या मित्रांना पटवून दिल्या.आज ना उद्या पोलीस कोठीपर्यंत येतील.ते जयंतपर्यंत पोहोचतील.जयंत केवळ वाहक होता ही गोष्ट पोलीस किंवा कायदा मान्य करणार नाही.सर्व पुरावे नष्ट करणे सर्वांच्या हिताचे ठरेल ही गोष्ट सर्वांना पटवून दिली.

रात्री कुणालाच झोप लागणे शक्य नव्हते.पहाट होताच आम्ही आमच्या सामानासह बाहेर पडलो.सकाळी सकाळीच म्हाताऱ्याला भेटण्यासाठी कुणी येता तर आम्ही सर्वच अडकलो असतो. कोठीमध्ये गॅस सिलिंडर उघडा करून ठेवला.एका कापडाची वात केली.ती तेलात भिजवून तिचे एक टोक कोठीमध्ये, तर दुसरे टोक   कोठीपासून लांबवर नेले.ती पेटवून   आम्ही दूर पळालो.थोड्याचवेळात कोठीने पेट घेतला.फटाके फुटल्यासारखे धडाधड आवाज येत होते.तासाभरात कोठी जळून खाक झाली.कोठी कुणी नंतर पाहिली असती तर त्याला राखेमध्ये केवळ हाडे मिळाली असती.सर्व पुरावा जळून खाक झाला होता.

बाहेर पडताना मी स्मरणपूर्वक फुलदाणी बरोबर घेतली हाेती.अरण्यात एक नदी वाहत होती

त्यामध्ये ती मी फेकून दिली.कुणाला तरी केव्हांतरी तो गडू सापडेल.कुतूहलाने तो गडूचे झाकण कदाचित उघडील.ते अशुभ घातक अमानुष अस्तित्व बाहेर येण्यासाठी उत्सुक असेलच.नंतर काय होईल माहीत नाही.

***

मी नदीच्या डोहात आता पडलेला आहे.फुलदाणीत मी आश्रय घेतला ती घोडचूक होती.रमाकांत भलताच हुशार निघाला.त्याला माझे अस्तित्व जाणवत असणार.माझ्या दुर्दैवाने ती गोष्ट माझ्या लक्षात आली नाही.नाहीतर म्हाताऱ्यामार्फत किंवा जयंतामार्फत मी त्याला कापला असता.

* माझा चंचल स्वभाव मला नडला.एखाद्यात स्थिर स्वरूपी राहून जर मी सर्वांना कापून काढले असते आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावली असती.तर आता आरामात कोठीत राहिलो असतो.*

*कधी तरी केव्हां तरी हा गडू कुणाला तरी सापडेल.*

जिज्ञासेपोटी उत्सुकतेने तो झाकण काढील.*

*मी मुक्त होईन.*

*नंतर जर मला रमाकांत सापडला तर त्याची कांही खैर नाही.*

(समाप्त)

४/२/२०२२©प्रभाकर  पटवर्धन