९ समंजस १-२
( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
या कांही बायकांचे मला कांही कळत नाही.यांना फावल्या वेळेत मुला मुलींची लग्ने जुळविण्याशिवाय दुसरा कांही उद्योग नसतो का?असे बोलून लहान मुलांच्या व मुलींच्या मनात उगीचच कांही भावना निर्माण होतात.त्याचा परिणाम एखादवेळेस भयानक होऊ शकतो.याची या बायकांना कल्पना आहे का?मी माझ्याच उदाहरणावरून सांगते.माझी आई आणि अरविंदची आई या दोघी मैत्रिणी.त्यांनी त्यांचे लग्न झाले तेव्हांच,तेव्हांच काय त्याच्या अगोदरपासून आपण दोघी विहिणी होऊ असे ठरविले होते.दोघांनाच मुलगा झाला किंवा मुली झाल्या तर इलाज नाही.परंतु एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली तर आपण त्यांचा विवाह नक्की लावून देऊ. हे सर्व दोघींनी लग्नाअगोदरच ठरविले होते.
माझी आई निर्मला आणि अरविंदची आई कमला या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी.शेजारीशेजारीच रहात होत्या. बरोबरच शिकल्या. कॉलेजात गेल्या. त्यांचे विवाहही आगेमागे झाले.सुदैवाने दोघी एका शहरातच आल्या.सुदैवाने एकीला मुलगी म्हणजे मी सुहास झाले तर दुसरीला मुलगा अरविंद झाला.मग काय विचारता दोघी मैत्रिणींना आपण दोघी विहिणी विहिणी म्हणून शिक्कामोर्तब केले.दोघींमुळे त्यांच्या मिस्टरांचीही ओळख झाली.त्यांचेही बऱ्यापैकी मेतकूट जमले.एकाच संकुलात दोघांनीही फ्लॅट घेतले.येणे जाणे कोणत्याही कौटुंबिक प्रसंगी एकत्र येणे या गोष्टी सुरू झाल्या.
तर लहानपणापासून या आयांच्या गप्पांमुळे अरविंद माझा नवरा ही गोष्ट माझ्या डोक्यात कळत नकळत ठसवली गेली.अरविंदचे काय झाले माहीत नाही.तो कधी या बाबतीत माझ्याशी बोलला नाही.परंतु त्याचीही दृष्टी माझ्यासारखीच झाली असावी असा माझा अंदाज आहे.अरविंद आणि मी लहानपणापासूनच एकत्र खेळत वाढलो.अरविंद माझा नवरा हे माझ्या डोक्यात फिट बसण्यासाठी आईची बडबड कामी आली असेलच परंतु कांही असो मला लहानपणापासून अरविंद आवडत होता ही गोष्ट तेवढीच खरी.आम्ही दोघे एकाच वर्गात एकाच शाळेत होतो.प्रथम आम्हाला कुणीतरी स्कूटरवरून बालवाडीत पोहोचवत असे.कधी अरविंदचे बाबा आम्हाला शाळेत सोडत तर कधी माझे बाबा आम्हाला सोडत.
माझ्या बाबांच्या व अरविंदच्या बाबांच्या ऑफिसच्या वेळा व आमच्या शाळेच्या वेळा जुळत नाहीशा झाल्या.आमच्या आयानाही आम्हाला शाळेत सोडणे जमेना.शेवटी आम्हाला शाळेची बस लावण्यात आली.आमचे शिक्षण, शाळेत येणे जाणे, अभ्यास,खेळ,एकत्र होत असे.वाढत्या वयाबरोबर मला मित्र मैत्रिणी मिळत गेल्या.अरविंदला मित्र मैत्रिणी मिळत गेल्या.आम्ही आपापल्या मित्र मैत्रिणींमध्ये रमू लागलो.परस्परांना भेटणे कमी होत गेले.तरीही आमचे परस्परांशी संवाद प्रत्यक्ष भेट, किंवा मोबाइलवरील गप्पा, यामार्फत चालूच राहिला.शेजारी शेजारी तर आम्ही रहात होतोच.दिवसातून दोन तीनदा एकमेकांचे मुखदर्शन होत असे.त्यावेळी घाईगर्दी असली तर स्मितहास्य किंवा वेळ असेल तर थोडा वेळ थांबून एकमेकांची चौकशी होत असेच.लहानपणी अरविंद माझा नवरा हे मनावर बिंबवले गेले होते.मी जसजशी हळूहळू मोठी होत गेले तसतसा तो परिणाम कमी होत गेला.तरीही पूर्णपणे नाहीसा झाला नाही.
प्रत्येकाच्या मनात मग मुलगी काय किंवा मुलगा काय आपला जोडीदार कसा असावा याबद्दल कांही कल्पना असतातच.तशा कल्पना माझ्याही मनात वाढत्या वयाबरोबर निर्माण होत होत्याच.अरविंद त्या कल्पनांशी कितपत जुळतो याची कळत नकळत तुलना होतच होती.एकदा तर माझ्या मनात एक विलक्षण शंका आली.अरविंद स्टँडर्ड धरून त्याच्याशी मिळत्याजुळत्या, जोडीदाराबद्दलच्या कल्पना माझ्या मनात येत तर नाहीत ना?
आम्ही दोघेही कॉलेजात गेलो.सुदैवाने आमचे कॉलेज एकच होते.मला बाबांनी स्कूटर घेऊन दिली होती.अरविंदजवळ मोटारसायकल होती.उगीच खोटे कशाला बोलू.अरविंद मला मनापासून आवडत होता.मित्र, शेजारी, म्हणून तर आवडत होताच.परंतु जोडीदार म्हणूनही आवडत होता.माझ्या जोडीदाराबद्दलच्या कल्पनात तो अलगद बसत होता.किंवा असे म्हणूया की माझ्या जोडीदाराबद्दलच्या कल्पना अरविंदवरून तयार झाल्या होत्या!
त्याचा सहवास जास्त मिळावा म्हणून मी एक युक्ती योजली.स्कूटर कांही ना कांही कारणाने मी कॉलेजला आणू शकत नाही असा बहाणा करून त्याच्या मोटारसायकलवरून कॉलेजला जाऊ लागले.अर्थात ते रोजच शक्य होत नसे.परंतु अधूनमधून आठवड्यातून दोन तीनदा मी ते जमवून आणित असे.मोटारसायकलवर पाठीमागे बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवून किंवा कमरेला विळखा घालून जाताना मला खूप खूप आनंद होत असे.माझा बहाणा, माझा अभिनय, त्याच्याबरोबर जाण्यासाठी आहे हे बहुधा त्याच्या लक्षात आले असावे.त्यालाही मला घेऊन जाताना आनंद होत असावा.कॉलेजवर पोहोचल्यावर मैत्रिणींच्या समोर त्याच्या गाडीवरून खाली उतरताना मला अरविंदवर मालकी हक्क असल्यासारखे वाटे.
लहानपणी केवळ आयांचे ऐकून मी त्याला जोडीदार मानत होते.आता समजून उमजून मी त्याला जोडीदार मानू लागले.दोघेही हळूहळू एकमेकात गुंतत जात होतो.एकमेकांवर हक्क गाजवू लागलो होतो.अरविंदची एखाद्या मैत्रिणीशी जास्त घसट होत आहे,तो तिला जास्त महत्त्व देत आहे,असे पाहताच माझा मत्सर व राग उफाळून येत असे.हा मत्सर आहे, राग आहे,कि असुरक्षितता आहे याचा नक्की उलगडा मला होत नव्हता.बहुधा अनेक भावभावनांचे मिश्रण असावे.
दिवस असेच चालले होते.अरविंद माझा आहे दुसऱ्या कुणाचा नाही.ही माझी भावना जास्त जास्त दृढ होत होती.आणि एक दिवस, तो अशुभ अपघाती दिवस उजाडला.त्या दिवशी मला कांहीतरी काम होते म्हणून मी माझ्या स्कूटरवर बाहेर निघाले होते.संकुलातून बाहेर पडत असतानाच तिकडून एक मोटार वेडीवाकडी होत आली.बहुधा चालक दारू प्यालेला असावा किंवा त्याला हार्ट अटॅक आला असावा किंवा त्याच्या मोटारीत कांहीतरी बिघाड झाला असावा.कांहीही असो तो माझा काळ होता एवढे निश्चित.मला स्कूटरवरून त्याने उडविले आणि तो संकुलाच्या कंपाउंड वॉलवर जाऊन आदळला.मी हेल्मेट घातले होते.तरीही मी इतक्या जोरात उंचावरून येऊन काँक्रीटच्या रस्त्यावर डोक्यावर आदळली की नंतर पुढे काय झाले ते मला स्मरत नाही.हवेत उंच उडाले आणि रस्त्यावर येऊन जोरात आदळली हीच माझी शेवटची आठवण.बहुधा मेंदूत अंतर्गत रक्तस्त्राव झाला असावा.माझा मृत्यू झाला.त्यानंतर मी मनुष्यरूपात अस्तित्वात नव्हते एवढे खरे.माझ्या आईला खूप वाईट वाटले.अरविंदही एवढेसे चिमुकले तोंड करून बसला होता.मला ते स्पष्ट दिसत होते.त्यांचे सांत्वन करावे असे मला वाटत होते.परंतु ते शक्य नव्हते.मला ती शक्ती नव्हती.दिवस असेच जात होते.
या जगात कुणी कुणासाठी थांबत नाही हेच खरे.कुणाला थांबताही येत नाही.जीवन प्रवाही आहे ते वाहतच राहते आणि तेच बरोबर आहे. कविवर्य भा.रा.तांबे यांनी म्हटलेच आहे ."जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहिल कार्य काय ."
असे असले तरी मी अरविंदसाठी थांबले होते.अरविंद मला दिसत होता.मी मात्र अरविंदला दिसत नव्हते.मी वायुरूप होते.त्याच्या आगेमागे फिरत होते.तो मोटारसायकलवर बसला की मी पाठीमागच्या सीटवर बसत असे.त्याच्या खांद्यावर हात ठेवत असे.कधी त्याच्या कमरेला हाताची मिठी मारीत असे.त्याला मात्र यातले कांहीही कळत नसे.मलाही त्याचा स्पर्श जाणवत नसे.मला दुसऱा उद्योगच नव्हता.जिथे तो तिथे मी असे होते.
कांहीतरी करून माझे अस्तित्व त्याला जाणवून द्यावे असे मला वाटत होते.हे कसे करावे ते मला कळत नव्हते.माझे मनोगत त्याला कळावे असेही वाटत होते.हे कसे साध्य होईल तेच समजत नव्हते.एक दिवस मी अशीच त्यांच्या खोलीत फिरत होते.मी हळूच त्याच्या बाथरूममध्ये शिरले.आरशात आपले प्रतिबिंब दिसेल का असे मला वाटले.माझे प्रतिबिंब दिसत नव्हते.मी माझे मन एकाग्र केले.प्रतिबिंब दिसलेच पाहिजे असा मनोनिग्रह केला.मन एकवटले.आणि काय आश्चर्य प्रतिबिंब अारशात दिसू लागले.माझे अस्तित्व अरविंदला जाणवून द्यायची वाट मला सापडली.
स्नान झाल्यावर दुसऱ्या दिवशी अरविंद भांग पाडत होता.त्याच्या शेजारी माझी प्रतिमा दिसू लागली.
भांग पाडता पाडता तो एकदम दचकला.त्याच्या हातातील कंगवा निसटून खाली पडला.
माझ्या मनात आणखी एक कल्पना आली.मी कंगवा उचलण्याचा प्रयत्न केला.मला कंगवा उचलता आला.तो उचलून मी अरविंदच्या हातात दिला.
तो आरशात पहात होता.तो मला पहात होता.माझ्या प्रतिबिंबाने खाली वाकून कंगवा उचलला आणि त्याच्या हातात दिला. हे त्याने स्पष्टपणे पाहिले होते.
*त्याने त्याच्या शेजारी पाहिले.मी त्याला दिसत नव्हते.*
*माझे प्रतिबिंब मात्र त्याला दिसत होते.आपल्याला भास होत असावा असे त्याला बहुधा वाटले असावे.*
*त्याने खोलीत एक चक्कर मारली.तो पुन्हा आरशासमोर येऊन उभा राहिला.*
*मी तिथे होतेच.
त्याने आरशावर पाणी मारून आरसा स्वच्छ पुसून काढला.*
*आरसा स्वच्छ होताच.मीही त्याला स्पष्टपणे दिसत होते.*
(क्रमशः)
१०/२/२०२२©प्रभाकर पटवर्धन