Get it on Google Play
Download on the App Store

९ शुभ्र असत्य १-२

( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

जय मल्हार ही दहा मजली इमारत डौलात उभी होती.इमारतीला तीन लिफ्ट होते .एक लिफ्ट एक ते पाच मजल्यांसाठी,दुसरा सहा ते दहा मजल्यांसाठी व तिसरा एक ते दहा मजले सर्वांसाठी अशी योजना होती.प्रत्येक मजल्यावर ४बीएचके,३बीएचके,२बीएचके असे तीन फ्लॅट होते . इमारतीला तीन विभाग होते अ.ब.क प्रत्येक विभागाची रचना समान होती.प्रत्येक विभागात तीन लिफ्ट होते . तळमजला व तळघर यांमध्ये पार्किंगची व्यवस्था होती.

अ विभागांमध्ये मालतीबाईंचा चार शयनगृहांचा फ्लॅट सहाव्या मजल्यावर होता.मालतीबाई सुमारे साठ वर्षांच्या होत्या.त्यांचे यजमान दोन वर्षांपूर्वी वारले होते.त्यांचे यजमान माधवराव यांनी चार शयनगृहांचा फ्लॅट मुद्दाम घेतला होता .एक शयनगृह स्वतःसाठी, एक मुलासाठी,एक नातवांसाठी,व एक पाहुण्यांसाठी अशी त्यांची योजना होती .वर्षभरापूर्वी मुलगा दिल्लीला एका कंपनीत भरपूर पगार व मनासारखी नोकरी मिळाल्यामुळे गेला होता.मालतीबाईना तो दिल्लीला चल असे म्हणत होता.परंतु दिल्लीची हवा मालतीबाईंना पसंत नव्हती. याच कंपनीत बदली घेऊन किंवा दुसऱ्या कंपनीत मनासारखी नोकरी मिळाल्यावर तूच येथे ये असा त्यांचा आग्रह होता.

एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटे राहणे मालतीबाईंना जड जात होते.मुलाने त्यांना तू एकटी राहतेस त्यापेक्षा जर मुली सशुल्क अतिथी (पेइंगगेस्ट) म्हणून ठेवल्यास तर तुला सोबतही होईल आणि उत्पन्नही मिळेल असे सुचविले होते.मालतीबाईना ती कल्पना आवडली .त्यांनी सशुल्क अतिथी  म्हणून मुली ठेवण्याला सुरुवात केली.

चार शयनगृहापैकी एक शयनगृह अर्थातच त्या वापरीत असत.उरलेल्या तीन शयनगृहामध्ये त्यांनी प्रत्येक शयनगृहामध्ये दोन याप्रमाणे सहा मुलींची सोय केली.प्रत्येक मुलीकडून त्या दोन हजार रुपये भाडे आकारीत असत .मुलींना स्वयंपाकघरात येऊन चहा करण्याची किंवा नूडल्स वगैरे पदार्थ तयार करण्याची परवानगी होती .मुली जेवण बाहेर घेत असत. नोकरी करणाऱ्या मुलीना अशाप्रकारे राहणे सुखावह होत असे.तिन्ही खोल्या नेहमी भरलेल्या असत.

एका खोलीत दीपिका नावाची एक मुलगी सशुल्क अतिथी  म्हणून रहात होती .एक दिवस तिला तिच्या सुनंदा नावाच्या मैत्रिणीचा फोन आला .दीपिका चिपळूणमधील होती .ही सुनंदा तिच्याबरोबर शिकत होती .नोकरी लागल्यामुळे दीपिका मुंबईला आली .या सुनंदालाही मुंबईला नोकरी मिळाली होती .तिची मुंबईला राहण्याची कोणतीही सोय नव्हती .सुनंदाने दीपिकाला ती राहते तिथे सशुल्क अतिथी  म्हणून तिला राहायला मिळेल का असे विचारले .

सुनंदाच्या सुदैवाने एक जागा नुकतीच रिकामी झाली होती .एका मुलीचा विवाह झाल्यामुळे ती जागा सोडून गेली होती .सहा महिन्याचे आगावू भाडे एक महिन्याचे भाडे अधिक दहा हजार रुपये सुरक्षा पैसा म्हणून चोवीस हजार रुपये भरावे लागतील असे दीपिकाने तिला सांगितले .सुनंदाला एक रकमी चोवीस हजार रुपये भरणे शक्य नव्हतें .ती फार तर दहा बारा हजार रुपये भरू शकली असती .मालतीकाकूंना विचारून तुला कळविते असे उत्तर दीपिकाने दिले.

मालतीकाकूंनी सुनंदाला भेटायला बोलावले.काकूना पैशांची काहीही कमी नव्हती.मुली पारखून घेण्याकडे त्यांचा कल असे . त्यांचे नियम कडक होते.प्रेमी मुलगा(बॉयफ्रेंड)किंवा अन्य कुणी पुरुष तेथे भेटायला येऊ शकत नसे.पुरुष  नातेवाईक असल्यास तो येऊ शकत असे .मात्र त्याने दिवाणखान्यातच भेट घेतली पाहिजे असा नियम होता. एखादी मुलगी मैत्रीण म्हणून आली तरी तिला रात्री नऊनंतर तिथे राहता येत नसे.रात्री दहाच्या आत सर्व मुलीनी घरी परत आले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.एखाद्या मुलीला काही कारणाने रात्री उशिरा यायचे असेल तर काकूंची पूर्वपरवानगी घ्यावी लागे.प्रत्येक महिन्याचे भाडे दहा तारखेपूर्वी द्यावे लागे.वगैरे  वगैरे.

सावळी, रेखीव, सडपातळ ,पाणीदार डोळ्यांची,काळेभोर दाट केस व प्रफुल्लीत चेहरा असलेली, मध्यम चणीची ,सुनंदा काकूंना आवडली .सुरक्षा पैसा चार पाच महिन्यांमध्ये दिला तरी चालेल असे त्यांनी तिला सांगितले.तिला दहा हजार रुपयांची सूट मिळाली.आता तिला फक्त चौदा हजार रुपये एक रकमी भरायचे होते.तेही भरणे तिला  जड होते.त्यातील सात हजार रुपये तिने भरले. सात हजार दीपिकाकडून उसने घेतले होते. दीपिकाची पार्टनर म्हणून सुनंदा तेथे राहायला आली .

या अगोदर सुनंदा,बीए बीएड, झाल्यावर  चिपळूण जवळील  खेडेगावात शिक्षिका म्हणून काम करीत होती .हल्ली कुठेही गेले तरी संगणकाचे  बऱ्यापैकी ज्ञान आवश्यक असते .तिने संगणकाचा एक कोर्स केला होता .पांढरी साडी व पांढरा ब्लाऊज असा त्यांच्या शाळेचा शिक्षकांसाठी गणवेश होता . त्यामुळे तिच्याजवळ पाचसहा पांढऱ्या साड्या व ब्लाउज  होते.रंगीत कपडे विशेष नव्हते .एखादा दुसरा सलवार कमीज होता .त्यांच्या घरची गरिबी असल्यामुळे, तिच्या पाठीवर तीन भावंडे शिकत असल्यामुळे,व कुटुंबात आणखी कुणी कमावते नसल्यामुळे तिचा सर्व पैसा कुटुंबावर खर्च होत असे.तिचे वडील इंग्रजी शाळेत शिक्षक होते .प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी लवकर निवृत्ती घेतली होती .त्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनवर व सुनंदाच्या पगारावर कुटुंबाचा गाडा चालत असे .तिला मुंबईला यायचे नव्हते .परंतू शिक्षिकेची नोकरी तात्पूर्ती असल्यामुळे व मुंबईला जवळजवळ दुप्पट पगार मिळत असल्यामुळे ती मुंबईला आली होती. 

मुंबईच्या राहणीला अनुसरून रंगी बिरंगी कपडे फॅशनेबल कपडे तिच्याजवळ नव्हते .नवीन कपडे विकत घेण्यासाठी तिच्या जवळ पैसाही नव्हता .पगार झाल्यावर तिला काकूंचे पैसे पांच सहा महिन्यांत द्यायचे होते.घरी कुटुंबासाठी पैसे पाठवायचे होते.एकूण काय कांही महिने तरी तिला मुंबईच्या रंगीबिरंगी  दुनियेला शोभतील असे कपडे खरेदी करणे शक्य नव्हते.

अपरिहार्यपणे रोज पांढरे शुभ्र कपडे घालून तिला ऑफिसला जावे लागे.तिची मैत्रिण दीपिका हिची उंची व जाडी तिच्यापेक्षा जास्त असल्यामुळे,तिचे रंगीबिरंगी फॅशनेबल कपडे सुनंदाला वापरणे शक्य नव्हते.

ती ज्या ऑफिसमध्ये काम करीत होती तेथील प्रमुख नचिकेत नावाचा एक तरुण होता.सुनंदाचे या नचिकेतबद्दल चांगले मत झाले होते.तेवढेच नव्हे तर ती त्याच्यावर प्रेमही करू लागली होती.मितभाषी, आपला आब राखून राहणारा ,ज्याच्याबद्दल ऑफिसातील कर्मचाऱ्यांना  एकाचवेळी प्रेम,आदर व वचक  वाटेल अशी त्याची वर्तणूक होती.मुलींशी त्याची वर्तणूक जेवढ्यास तेवढे अशी होती.कोणत्याही मुलीचा केव्हाही कोणत्याही प्रकारे गैरफायदा घेण्याचा त्याने कधीही प्रयत्न केला नव्हता.एवढेच नव्हे तर तसा विचारही त्याच्या मनात आला नसेल अशी त्याची वागणूक असे .

तो अजून अविवाहित होता . स्वाभाविकपणे अविवाहित मुली आपल्याबद्दल त्याचे मत चांगले व्हावे याची काळजी घेत असत.सुनंदाची वागणूकही इतर मुलीहून विशेष निराळी नव्हती. तिला एकच वैषम्य वाटत असे .इतर मुली फॅशनेबल रंगीबिरंगी पोशाख करून येतात.मेकअप,फेशियल इत्यादी गोष्टी करतात, आपण मात्र काकूबाईसारखे, एखाद्या विधवेसारखे, नेहमी शुभ्र कपडे घालून जातो.हल्ली विधवाही क्वचितच पांढरे शुभ्र कपडे घालून फिरतात,तो भाग निराळा .

सुनंदाला आपण फॅशनेबल कपडे घालावे असे कितीही वाटले तरी आर्थिक  परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते.तिच्या  पांढर्‍याशुभ्र कपड्यांमुळे नचिकेतचे तिच्याकडे जास्त लक्ष जात असे.इतर मुली विविध रंगी फॅशनेबल पोशाख करून रोज येतात .आपल्यावर इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न करतात .आपल्या डोळ्यात भरण्याचा प्रयत्न करतात .ही मुलगी मात्र साधा पोषाख करते व काटेकोर वर्तणूक ठेवते.त्याचे त्याला कौतुक होते. त्यामुळेंच त्याचे तिच्याकडे जास्त लक्ष जात असे.नचिकेतला ती आवडली होती .तिने त्याच्या हृदयात कुठेतरी जागा निर्माण केली होती .त्याची तिला मात्र कल्पना नव्हती.तो ऑफिस प्रमुख असल्यामुळे जास्त सलगी दाखवणेही योग्य ठरणार नव्हते.तसा सुनंदाचा स्वभावही नव्हता .

सावळा वर्ण, साधी राहणी,यामुळे नचिकेतला आपण कधीच पसंत पडणार नाही अशी समजूत सुनंदाने करून घेतली होती .आपल्याला नचिकेत कितीही आवडत असला तरी कधीही सत्यात न उतरणारे ते एक स्वप्न आहे असे ती समज होती .ती त्याच्यापासून  चार पावले दूरच राहात होती.

नचिकेतला अनेकदा तिला तिच्या पांढऱ्या शुभ्र पोषाखाचे रहस्य विचारावे असे वाटे. परंतू तो आगाउपणा ठरेल असे लक्षात आल्यामुळे त्याने कधीही तो प्रश्न तिला विचारला नाही .सुनंदाला नोकरीला लागून दहा बारा दिवस झाले होते .

एक दिवस ती काही कामासाठी त्याच्या केबिनमध्ये आलेली असताना त्याने तिला विचारले .माफ करा मी जरा जास्त व्यक्तिगत प्रश्न विचारीत आहे .

वस्तुतः हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा मला अधिकार नाही .केवळ कुतूहल म्हणून मी विचारीत आहे .तुम्हाला प्रश्न अयोग्य वाटला तर उत्तर देऊ नका .

त्यावर मंद स्मित करीत सुनंदा म्हणाली इतकी लांबलचक प्रस्तावना करण्याचे कारण नाही .

तुम्ही एखादा व्यक्तिगत ऑफिसबाह्य प्रश्न विचारला तरी माझी हरकत नाही.तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मला आवडेल.मला आनंद होईल.

ऑफिसमध्ये आपण अगदी औपचारिकच असले पाहिजे असे नाही .अधूनमधून अनौपचारिकता सकस संबंधांसाठी( हेल्दी रिलेशनसाठी) चांगली असते . 

*त्यावर नचिकेत  म्हणाला तुम्ही रोज पांढरा शुभ्र पोशाख करून येता .*

*अर्थात तो पोषाख तुम्हाला खुलून दिसतो हा भाग निराळा.(त्यावर सुनंदा छानपैकी लाजली.)*

*तो पुढे म्हणाला याचे काही विशेष कारण आहे का?*

(क्रमशः)

१५/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन