Get it on Google Play
Download on the App Store

७ भेट १-२

( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

लग्नाच्या गाठी स्वर्गात मारलेल्या असतात.भूतलावर आपण फक्त त्याचा शोध घेत असतो .ती गाठ सापडली की आपला शोध संपतो.या मताशी मी एकेकाळी सहमत नव्हतो .अजूनही सहमत आहे की नाही  मला निश्चित सांगता येत नाही.माझी गोष्ट सांगतो म्हणजे मी सहमत आहे की नाही ते तुमच्या लक्षात येईल .या वाक्प्रचारात तथ्य आहे की नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा. 

शाळेत आणि कॉलेजात शिकत असताना मला मैत्रिणी व मित्र होते.कोणतीही मैत्रीण पाहून मला माझ्या डोक्यात अमिताभ म्हणतो त्याप्रमाणे टिंग टाँग झाले नाही .मैत्रिणी, मैत्रिणीच राहिल्या.ज्याला प्रेम प्रेम असे आपण म्हणतो त्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा भाग जास्त असतो असे माझे मत आहे .ते वयच असे असते की आपल्याला कोणतीही मुलगी चांगली वाटू लागते.असे असले तरी अनेक गोष्टींचा विचार कळत नकळत केला जात असतो.जात, वय, धर्म, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, संस्कृती,रूप, सौंदर्य,उंची,इत्यादी गोष्टींचा विचार होत असतो .विचार करणाऱ्याला आपण असा विचार करीत आहोत हेही कित्येक वेळा लक्षात येत नाही. पुन्हा व्यक्ती व्यक्तीनुरूप प्रत्येकाच्या अपेक्षा भिन्न असतात.प्रत्येक गोष्टीला दिले जाणारे महत्त्व कमी जास्त असते . अपेक्षापूर्ती व अनुरूपता पाहूनच,इतर अनेक गोष्टींचा विचार करून नंतरच, शेवटी विवाहाचा अंतिम निर्णय घेतला जातो .अर्थात असेही काही वेडे असतात की ते कसलाही विचार न करता धावत सुटतात. आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते .प्रत्येकात काही चांगले काही वाईट असे असते .कशाला किती महत्त्व द्यायचे हे जो तो ठरवीत असतो .आकडे जुळणे असा एक भाग आहे.आकडे जुळणे हा एक योगायोग आहे .आकडे जुळले की सर्व काही जमून जाते .आकडे जुळले म्हणजे दोघेही खत्रूड असले तरी त्यांचे चांगले जमते .आकडे जुळले नाहीत म्हणजे दोघेही चांगले असले तरी त्यांचे जुळत नाही.  आकडे जुळणे म्हणजे  पत्रिका जुळणे असे मला म्हणायचे नाही .स्वर्गातील गाठ ती बहुधा हीच असावी .

काही मुले अशी असतात की फारसा विचार न करता त्यांचे प्रेम दिसेल त्या मुलीवर बसत असते . थोडी अतिशयोक्ती करायचे झाल्यास रस्त्याने जाताना त्यांच्या डोक्यात सारखे टिंग टांग टिंग टांग वाजत असते .अशा आकर्षणाला प्रेम असा गोंडस नांव दिले जाते. गाठ सापडली असे वारंवार साक्षात्कार होत असतात.अर्थात हे प्रकरण फारसे पुढे जात नाही.पन्नास टक्के प्रेमाचा विशेष प्रभाव पडत नाही .असे असले तरी तरुण प्रेम करण्याचे,मोका (चॅन्स )घेण्याचे सोडत नाहीत.एखादे वेळी जमून जाते. एखादे वेळी फिसकटते.अशा प्रेमाचे पुढे जरी  विवाहात रूपांतर झाले  तरी तो विवाह पुढे टिकतो असे नाही .टिकला तरी यशस्वी होतो असेही नाही .बऱ्याच गोष्टी जर तरवर अवलंबून असतात .कांहीजण एकत्र आल्यावर प्रेम निर्माण होते.क़ही प्रेमामुळे एकत्र येतात .कांही कोणत्याही कारणाने एकत्र आल्यावर नाईलाजाने एकत्र राहतात. कांहीजण जुलमाचा रामराम नको म्हणून विभक्त होतात . काही जण जुलमाचा रामराम करीत राहतात .विभक्त झाल्यावरही फार सुखी होतात असे नाही .सुखाचा शोध अविरत चालू असतो .शोधले म्हणजे सापडते असे म्हणतात.सर्वच गोष्टी शोधून सापडतात असे नाही.असो.

शिक्षण संपल्यावर कॉलेजांतील प्रकरणे बऱ्याच वेळा सुलभतेने विसरली जातात .हवेतून मनातून नकळत विरून जातात.मुळात प्रकरण म्हणून काही अस्तित्वात असतेच असे नाही .बऱ्याच वेळा प्रेमाच्या आभासाला प्रकरण म्हटले जाते .बर्‍याच वेळा स्वप्नरंजन असते.दिवा स्वप्न असते.कित्येक वेळा मित्रावर इम्प्रेशन मारण्यासाठी केलेला तो बनाव असतो .

मी कॉलेजात असताना छाया नावाची एक मुलगी  होती.ती आकर्षक तर होतीच .बऱ्यापैकी सुंदर होती .चांगली बुद्धिमान होती.महाविद्यालयातील बऱ्याच  स्पर्धांत ती भाग घेत असे.त्यामुळे ती प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या नजरेत भरत असे.तिचे मित्र मैत्रिणींचे वर्तुळ दांडगे होते. तिच्या मित्रांपैकी मीही एक होतो.जरी प्रत्यक्ष बोलणे फार होत नसले तरी इतर समाजमाध्यमांतून , व्हॉट्स अॅपवरील ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्रॅम, इत्यादीमार्फत  आम्ही संपर्कात असू.  

माझ्या मित्रांपैकी दीपक व अनिल हे मला अजूनही आठवतात.कॉलेजात होतो तेव्हांची गोष्ट आहे. एक दिवस दीपक मला सांगत आला. त्याचे छायावर प्रेम बसले आहे . छाया आमची मैत्रीण होती .आम्ही कॉलेज कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारीत असू .नाटक वक्तृत्व स्पर्धा इत्यादींमध्ये भागही घेत असू .कधी कधी आमचा गट सिनेमा रेस्टॉरंटमध्येही जात असे.परस्परांची चेष्टा मस्करीही होत असे.मला येऊन दीपक सांगत होता की त्याचे छायावर  प्रेम आहे. मी त्याला म्हटले म्हणजे नक्की काय आहे?तो म्हणाला मला ती आवडते .मला तिच्याशी लग्न करावे असे वाटते. मी तिला लग्नाची मागणी घालणार आहे.ठीक आहे असे म्हणत मी तो विषय सोडून दिला .

नंतर मधून मधून दीपक मला येऊन निरनिराळ्या गोष्टी सांगत असे .आज छायाबरोबर सिनेमाला गेलो आज रेस्टॉरंटमध्ये गेलो.येत्या रविवारी आम्ही पिकनिकला जाणार आहोत .तीही माझ्यावर प्रेम करते .ती मला होकार देईल .इत्यादी इत्यादी .दीपकच्या सांगण्यावरून छाया  व तो यांचे चांगले  रहस्य जमले आहे अशी माझी समज झाली.

बरेच दिवसात मला दीपककडून छायाबद्दल कांही ऐकायला मिळाले नाही.  एक दिवस मी त्याला विचारले अरे पुढे तुझ्या प्रकरणाचे काय झाले ?त्यावर तो म्हणाला मला  तिला मागणी घालण्याचा धीर होत नाही.मग मी त्याला  म्हणालो  एक दिवस तुला  छायाची  लग्नपत्रिकाच मिळेल.  त्यावर तो कसनुसे हसला. त्यानंतर मी त्याला कधीही छाया व तो यांचे काय झाले ?किंवा काय होणार आहे? ते विचारले नाही.  त्याच्या कहाणीचा शेवट त्याला प्रतिकूल झाला असावा.किंवा ती कहाणी त्रिशंकूप्रमाणे अधांतरी लोंबकळत असावी .

आम्ही सर्व मित्रमंडळी नेहमीप्रमाणे एकत्र जमत होतो .त्यात कधी मधी छायाही असे.कां कोण जाणे परंतु छाया दीपक बरोबर फिरते,सिनेमाला पिकनिकला जाते,ही गोष्ट मला विशेष रुचली नव्हती.

दीपकची पुनरावृत्ती अनिलने केली.त्यानेही एक दिवस मी छायाच्या प्रेमात पडलो आहे वगैरे हकीकत सांगितली .तोही अधूनमधून कांहीबाही सांगत असे .मी ऐकून घेत असे.त्याचीही विशेष डाळ शिजली नसावी.

आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता .त्यावर आम्ही अधूनमधून बोलत असू.संवाद करत असू .हसत खेळत कॉलेजचे दिवस एक दिवस संपले .जो तो आपापल्या मार्गाने गेला .नंतर क्वचितच परस्पर संभाषण होत असे.

दीपक व अनिल यांच्या एकूण बोलण्यावरून छायाबद्दल माझे चांगले मत झाले नाही .ती मुलांबरोबर फिरते .त्यांच्याकडून गिफ्ट्स मिळविते.त्यांच्या पैशाने नाटक सिनेमाला जाते.शेवटी त्यांच्या तोंडाला पाने पुसते.ती कुणाचीही डाळ शिजू देत नाही . एकंदरीत बिलंदर पोरगी आहे .असा माझा समज झाला होता. 

असतात एक एक पोरी अशा,दुसर्‍यांकडून मिळेल तेवढे फुकट घ्यायचे,मॉलमध्ये खरेदी नाटक सिनेमा यासाठी होणारा खर्च,सर्व मुलेच करीत असणार .

मुलांना अाशा दाखवायची.शेवटी त्यांच्या हाती काही लागू द्यायचे नाही .

त्यांच्या तोंडाला पाने पुसायची .

शेवटी एखादा  स्थानिक श्रीमंत किंवा परदेशस्थ स्थायिक मुलगा गाठायचा आणि विवाह करून मोकळे व्हायचे.

असा माझा ग्रह झाला होता.तो फारसा चूक होता असे नाही .

*परंतु सर्वच मुली अशा नसतात .

* एकूण मुलींपैकी फार थोड्या अशा असतात, असाव्यात,असा विचार माझ्या मनात कधी आला नाही.*

*आला तरी मी त्याकडे लक्ष दिले नाही .*

*एकूणच मुलींबद्दल माझे मत कां कोण जाणे कलुषित झाले होते .*

*गढूळ झाले होते.असा विचार बरोबर नाही असे आतून केव्हां तरी वाटे.*

*परंतु नकारात्मक विचार जास्त प्रभावी ठरत असे .*

(क्रमशः)

९/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन