Get it on Google Play
Download on the App Store

८ भेट २-२

( हीकथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

परंतु सर्वच मुली अशा नसतात .फक्त एकूण मुलींपैकी फार थोड्या अशा असतात, असाव्यात,असा विचार माझ्या मनात कधी आला नाही.

आला तरी मी त्याकडे लक्ष दिले नाही .

एकूणच मुलींबद्दल माझे मत कां कोण जाणे कलुषित झाले होते .

गढूळ झाले होते.असा विचार बरोबर नाही असे आतून केव्हां तरी वाटे.

परंतु नकारात्मक विचार जास्त प्रभावी ठरत असे

दीपक किंवा अनिल मला ज्या कहाण्या सांगतात त्या खऱ्या आहेत की नाही याचा शोध घेण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही .जरी दोन्ही बाजूनी विचार करायची माझी पद्धत असली तरी एकंदरीत छायाच्याविषयी माझे मत प्रतिकूल झाले होते एवढे खरे.

यथावकाश आम्ही एमबीए झालो.काही आणखी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले.काही आपल्या वडिलांच्या व्यवसायात गेले.स्वतःचा धंदा सांभाळू लागले. वडिलांना मदत करू लागले. तर माझ्यासारखे काही चांगल्या नोकरीचा शोध घेऊ लागले .रिकामे बसण्यापेक्षा तूर्त आहे ती नोकरी स्वीकारावी असा माझा कल होता.मी एका कंपनीत नोकरीला लागलो .कंपनी मोठी होती.अनेक लहान मोठ्या कंपन्यांची कामे ती घेत असे.ती आयटी क्षेत्रातील नावाजलेली कंपनी  होती .अवाढव्य यंत्रणेतील मी एक लहान चक्र होतो .किंबहुना प्रत्येकजण एक लहान मोठे चक्र होता. पांच सहा बहुमजली इमारतीत आमच्या कंपनीचा अवाढव्य पसारा पसरलेला होता.सर्व परिसराला एक उंच कंपाउंड होते .गेटवर तुमची ओळख पटविल्याशिवाय आत येता येत नसे.एखादा अभ्यागत असेल तर त्याला आपले काम कुणाशी आहे ते गेटवर सांगावे लागे. खात्री पटल्यावरच त्याला आत येऊ दिले जाई.प्रत्येक इमारतीत एक कँटिन होते .याशिवाय एका प्रशस्त हिरवळीवरही खुर्च्या टेबले टाकून बसण्याची सोय केलेले कँटिन होते.इथे जास्त वेळ तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर किंवा अभ्यागताबरोबर बसता येई .शांत वातावरणात व्यावसायिक किंवा इतर गप्पा होऊ शकत .

आमच्या कंपनीतील बहुतांशी सर्व सेवक वर्ग तरुण होता.दहा टक्के वरिष्ठ प्रशासकीय  व्यक्ती वगळल्या तर सर्वांचे सरासरी वय अठ्ठावीस ते तीस असावे.सेवक वर्गातील निम्मे मुली होत्या .येता जाताना कॅन्टिनमध्ये लिफ्टमध्ये  त्यांचा चिवचिवाट चाललेला असे.माझे त्यांच्याकडे विशेष लक्ष  नसे.

वर सांगितल्याप्रमाणे आमच्या ग्रुपपैकी सर्व पांगले होते.कोण कुठे आहे हे जरी केव्हातरी सांगितले जात असले तरी ते विशेष लक्षात ठेवले जात नसे. केव्हां तरी कुणाला तरी फोन होत असे .जो तो आपल्या कामात वर्तुळात मग्न होता .  

एक दिवस माझ्या फोनवर एक संदेश झळकला .

मी हल्ली कुठे आहे? तुला माहीत आहे काय ?~छाया~

मी अर्थातच त्याला उत्तर दिले,~ मला माहित नाही. तू कुठे आहेस ? ~

त्यावर तिचे उत्तर आले,~ तू हुषार आहेस .मला माहित आहे. मी कुठे आहे ते तू शोधून काढ.~

दीपक व अनिल यांना मी फोन केला .दोघेही छायावर प्रेम करीत होते .दोघांनाही तिच्याशी लग्न करायचे होते .त्यांच्या त्यावेळच्या सांगण्याप्रमाणे ती दोघांबरोबर फिरत होती.त्यांनी तिला त्यावेळी प्रपोज केले न केले काही माहिती नव्हते.मी माहिती करून घेण्याचा प्रयत्नही केला नव्हता .त्यांच्या सांगण्याप्रमाणे, त्यांना खात्री न वाटल्यामुळे त्यानी तिला प्रपोज केले नव्हते असे सांगितल्याचे मला स्मरत होते.

त्या दोघांना ती हल्ली कुठे आहे ते माहीत असणार असा माझा समज होता.फोन केल्यावर त्यांनी सांगितले त्यांच्या पुरता तो विषय तिथेच संपला होता .तिच्याविषयी मला जेवढी माहिती होती तेवढीच त्यांना होती.

छाया जरी आमची मैत्रीण असली तरी आम्ही कधी तिच्या घरी गेलो नव्हतो.तिच्या घराचा पत्ता अर्थातच माहीत होता .मी तिथे जावून चौकशी केली .तिचे वडील जागा सोडून गेल्याचे सांगण्यात आले .त्यांची बदली दुसऱ्या गावी झाल्याचे कळले .यानंतर हल्ली ते कुठे आहेत ते कुणाला माहित नव्हते.ते कोणत्या ऑफिसमध्ये काम करतात तेही कळले नाही.तिथे जावून तिच्या वडिलांचा तपास करण्याचा व त्यामार्फत छायाला शोधून काढण्याचा प्रयत्नही अयशस्वी झाला .

छायाच्या एका लहानश्या संदेशाबरोबर मी तिला शोधून काढण्याचा एवढा आटोकाट प्रयत्न कां करीत होतो ते मलाही नीटसे कळले नाही .कदाचित आव्हान  म्हणून मी त्याचा स्वीकार केला असावा.कदाचित छाया माझ्या मनात कुठेतरी खोलवर घर करून बसलेली असावी .त्याचा माझा मलाच पत्ता नसावा. तिच्या एका संदेशाबरोबर तिला शोधून काढण्याची मला निकड वाटली असावी.मनाचे खेळ अजब असतात.आपले आपल्याला सुद्धा कधीकधी ते लक्षात येत नाहीत.   

माझ्याजवळ छायाचा फक्त फोन नंबर  होता. तेवढ्यावर ती कोठे राहते ते शोधून काढणे शक्य नव्हते .माझ्या मनात एक कल्पना चमकली .ज्याअर्थी छाया ती कुठे आहे ते शोधून काढण्याचे मला आव्हान देत आहे त्याअर्थी ती   इथेच कुठेतरी माझ्या जवळपास असली पाहिजे .माझी नोकरी करीत असलेली कंपनी फार मोठी आहे .त्यातच ती नोकरी करीत असली पाहिजे.तिने मला केव्हातरी कंपनी परिसरात पाहिले असले पाहिजे.त्यामुळे ती माझी परीक्षा घेत असावी .

मी तिला संदेश केला.मी ज्या कंपनीत नोकरी करतो त्याच कंपनीत तू नोकरी करीत आहेस. बरोबर आहे ना?

यावर तिचे होय असे उत्तर आले.मी तिला कंपनीत शोधून काढण्याचा फारसा प्रयत्न केला नाही .परंतू आमच्या व्हॉट्सअॅपवर गप्पा मात्र सुरू झाल्या .प्रत्यक्ष फोनवर बोलण्याऐवजी संदेश वहनच जास्त होत असे.

माझ्या स्वभावाप्रमाणे मी आपणहून क्वचितच संदेश करीत असे.मात्र तिच्याकडून आलेल्या संदेशाला उत्तर देण्यात मी तत्पर असे.मी ऑफिसच्या परिसरात फिरत असताना जेव्हां जेव्हां मुलींचा  चिवचिवाट ऐकू येई तेव्हा तेव्हा कळत नकळत  छायाचा शोध घेत असे. 

एक दिवस तिचा संदेश आला.~मी तुझ्याच ऑफिसमध्ये नोकरी करते हे बरोबर परंतु तू मला शोधून काढण्यात अयशस्वी झालास.किंवा तू मला शोधण्याचा विशेष प्रयत्न केला नाहीस.  मी तुला रोज पाहते.कॉलेजच्या दिवसांपासून तू मला आवडतोस.तू कधीही जास्त जवळ येण्याचा प्रयत्न केला नाहीस .नेहमीच तू सर्वांपासून एक विशिष्ट अंतर राखून राहिलास.तू  माझ्याजवळ येशील मला मागणी घालशील म्हणून मी वाट पाहत होते व आहे .शेवटी मीच तुला प्रपोज करण्याचे ठरविले आहे .~

वरील संदेश वाचून मी चांगलाच चमकलो. अक्षरश: हा माझ्यावर बॉम्ब होता.छायाचा त्या दृष्टीने मी कधी विचारच केला नव्हता.दीपक किंवा अनिल किंवा आणखी कुणीतरी तिच्याशी लग्न करील.आतापर्यंत कदाचित तिचे लग्न झालेही असेल असे मी समजून चाललो होतो.मी एवढा गांगरून गेलो होतो की तिला काय उत्तर द्यावे ते मला समजत नव्हते .~मला विचार करायला अवधी पाहिजे.~असे त्रोटक उत्तर देऊन शेवटी मी मोकळा झालो .

मी दीपक व अनिल यांना फोन केला.त्यांच्याबद्दल व त्यांच्या छायाविषयीच्या मताबद्दल चौकशी केली.दीपक आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता .लग्न करून तो सुस्थिर झाला होता .अनिल एका आयटी कंपनीत बंगलोरला नोकरी करीत होता.तो अजून अविवाहित होता 

दोघांनीही मला छायाबद्दल पुढील माहिती सांगितली.

त्यावेळी माझ्याजवळ ते जे जे बोलले होते त्यातील बराच भाग स्वप्नरंजन या स्वरूपाचा होता.छाया त्यांची मैत्रीण जरूर होती.तरी तिने त्यांना विशिष्ट अंतराबाहेरच ठेवले होते.तिच्या मनात नक्की काय चालले आहे त्याचा त्यांना पत्ता लागत नव्हता .        

~  तू मला शोधून काढले आहेसच.मला प्रत्यक्ष भेट .मी हिरवळीवरील रेस्टॉरन्टमध्ये तुझी आज संध्याकाळी सात वाजता वाट पाहीन .~   असा संदेश मी तिला पाठविला.

संध्याकाळी हिरवळीवरील एका खुर्चीवर मी तिची वाट पाहत थांबलो होतो .थोड्याच वेळात ती आली .तिला मी जवळजवळ एक वर्षाने पाहात होतो .ती पूर्वीपेक्षा जास्त सुंदर व आकर्षक वाटत होती . 

*त्यानंतर आम्ही किती वेळ बोलत होतो, किती वेळा भेटलो, काय काय बोललो, हे सांगण्यात मी वेळ दवडत नाही .*

*मी छायाची माझ्या आई वडिलांशी ओळख करून दिली.तिनेही तिच्या आईवडिलांशी माझी ओळख करून दिली.*

*आज छाया  व मी सुखाने संसार करीत आहोत.*

*आता तुम्हीच ठरवा. गाठी कुठे मारल्या जातात व कोण मारतो.*

*गाठी स्वर्गात मारल्या जातात. आपण फक्त ती गाठ शोधत असतो.हा वाक्प्रचार बरोबर आहे की नाही ते तुमचे तुम्हीच ठरवा .*

(समाप्त)

९/१०/२०२०©प्रभाकर  पटवर्धन