Get it on Google Play
Download on the App Store

३ अमर प्रेम १-२

(ही गोष्ट काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ होती .स्वामी नित्यानंदांच्या आश्रमात  ही वेळ प्रार्थनेची होती.सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी स्वामी नित्यानंद प्रार्थना करीत असत .प्रार्थनेमध्ये काही श्लोक, काही वचने, काही अभंग, यांचा अंतर्भाव होता .एका मागून एक विशिष्ट क्रमाने सर्व श्लोक ,वचने, अभंग ,म्हटले जात असत .स्वामी नित्यानंदांच्या  सांगण्यानुसार या दोन्ही वेळी मन फार उत्तम प्रकारे एकाग्र होत असते.या वेळी केलेली कोणतीही प्रार्थना मनाच्या अंतरंगापर्यंत,सुप्त मनापर्यंत ,पोचते.त्यामुळे मनाला खरी समज येण्याला मदत होते .

प्रार्थनेचा एकूण आशय परमेश्वराचे आभार व स्वतःतील सामर्थ्यांचा विकास  अशा स्वरूपाचा होता.

त्या दयाघन प्रभूने आपल्याला या जगात काही कार्य करण्यासाठी पाठविले आहे.ते कार्य ओळखण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो आणि त्याचबरोबर ते कार्य पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होवो .  

सर्व नद्या ज्याप्रमाणे एकाच महासागराला मिळतात त्याचप्रमाणे सर्व धर्म त्या सर्वशक्तिमान परमेश्वराकडे आपल्याला घेऊन जातात .

धर्म जात पंथ अशा निरनिराळ्या कारणांनी आपला समाज दुभंगलेला आहे .याचे कारण म्हणजे आपण या सर्वातील मर्म ओळखलेले नाही .ते मर्म आपल्याला ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो .

सर्व जग जरी विविधतेने नटलेले असले तरी त्या विविधतेमध्ये एकता आहे ते ओळखण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होवो.

आपण नेहमी आपल्याजवळ असलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जातो आणि नसलेल्या गोष्टींबद्दल ,असलेल्या कमतरते बद्दल दुःख करीत बसतो.आपल्या जवळ असलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो .

प्रत्येक प्राणिमात्रात परमेश्वर आहे त्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राचा आदर आपल्याकडून केला जावो.

भौतिक आणि आध्यात्मिक असा फरक काही जण करतात परंतु भौतिक व आध्यात्मिक एकच आहे असा साक्षात्कार सर्वांना होवो.  

विविधतेतील एकतेचा साक्षात्कार सर्वांना होवो.

प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे .प्रेम म्हणजेच परमेश्वर .या प्रेमाचा म्हणजेच परमेश्वराचा उदय सर्वांच्या अंतःकरणात होवो.

स्वामी नित्यानंदांचा ध्यानमार्ग होता .ते त्यांच्या शिष्यांना अनुग्रह देत असत .विशिष्ट पद्धतीने ध्यान म्हणजेच विशिष्ट पद्धतीने प्राणायाम असे त्याचे स्वरूप होते.

प्रार्थनेचा एक मोठा हॉल होता.त्यामध्ये मंद प्रकाश असे .या प्रकाशात सर्व काही स्वच्छ दिसत असे तरीही डोळ्यांना कुठेही त्रास होत नसे.अशा प्रकारचा हा अप्रत्यक्ष प्रकाश होता .

हॉलमध्ये एका विशिष्ट जागी लोकरी आसनावर स्वामी सुखासनात सहजासनात बसत असत .

मृगार्जिन व्याघ्रार्जिन वापरू नये असे त्यांचे मत होते .या कातड्यासाठी प्राण्यांची,हरीण वाघ इ. हत्या होते.अशी हत्या स्वामींना दुःख देत असे .कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये असे त्यांचे मत होते. ते मऊ लोकरी आसनाचा वापर करीत .

ज्याप्रमाणे मन ताणरहित पाहिजे त्याप्रमाणेच अासनही ताणरहित पाहिजे असे त्यांचे मानणे होते .

त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला रांगेत सर्वजण प्रत्येकाला जे सुखासन सहजासन वाटे त्या आसनात बसत असे.

प्रत्येकाने एका विशिष्ट आसनात बसले पाहिजे असा त्यांचा आग्रह नसे . 

किंबहुना त्यांचा कुठलाच कसलाच आग्रह नसे .खऱ्या अर्थाने ते अनाग्रह योग आचरत असत. 

त्यांच्या डाव्या बाजूला एक व उजव्या  बाजूला एक अासन रिकामे ठेवलेले असे.

ही आसने रिकामी का असतात असे त्यांना कुणीतरी विचारले होते.त्यावर स्वामींनी मोठे मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले होते माझे दोन परममित्र सुहृद  या जगात कुठेतरी आहेत .ते इथे नसले तरी प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर आहेत असे मी समजतो .आपणा सर्वांबरोबरच ते प्रार्थना करीत आहेत असा माझा दृढ विश्वास आहे .प्रार्थनेने आपल्यामध्ये जशी समज येईल तशीच समज त्यांच्यामध्येही येईल असा माझा दृढ विश्वास आहे .

स्वामींच्या हृदयाजवळ असलेले सुहृद  कोण ते विचारण्याचे धाडस  कोणीही केले नव्हते .

सुरुवातीची प्रार्थना झाल्यावर नंतर सर्वजण अर्धा तास ध्यान करीत असत .हे ध्यान म्हणजे प्राणायामाची एक विशिष्ट पद्धत होती .त्यामुळे प्राणशक्ती जागृत होते आणि ध्यान करणाऱ्यांमध्ये सकारात्मक जाणीव, समज, निर्माण होते असे स्वामी म्हणत.

पूर्वी स्वामी  शिष्यांना विधीपूर्वक अनुग्रह देत असत .नंतर त्यांनी विशिष्ट विधीची प्रथा बंद केली .त्यांच्या मताप्रमाणे त्यांना जो कुणी  लायक वाटे त्याला ते मी असे असे ध्यान करतो आणि मला आनंद प्राप्त होतो.तुम्हीही असे ध्यान करून पाहा तुम्हालाही आनंद प्राप्त होईल एवढेच सांगत .

जे चांगले आहे ते चांगलेच आहे .त्यासाठी शिष्याची लायकी पारखून घेणे ,विशिष्ट विधी करणे,अनुग्रहाचे अवडंबर माजविणे, त्यांना पसंत नव्हते.

अमृत हे अमृतच ते कुठेही शिंपडा त्याचा सकारात्मक परिणाम होणारच असा त्यांचा दृढ विश्वास होता .    

नित्यानंद स्वामींचा आश्रम स्वामींनी चालवलेला नव्हता .स्वामींच्या शिष्यांनी देणग्या एकत्र करून त्यातून या आश्रमाची उभारणी केली होती . आश्रमाला देणग्या दिल्या जात त्याचा हिशेब अत्यंत चोख ठेवण्याचे काम होत आहे ना या बाबतीत ते काटेकोर होते .शिष्य आश्रमाची कार्यपद्धती ठरवीत असत .त्याप्रमाणे आश्रम कार्यरत आहे की नाही हेही तेच पाहात असत .स्वामींचे आश्रमातील सर्व घटनांवर बारीक लक्ष असे .जरा काही गैर दिसले की ते लगेच त्या व्यक्तीच्या ते लक्षात आणून देत. आपल्या नावावर बुवाबाजी होऊ नये. लोकांची पिळवणूक होऊ नये.यावर त्यांचा कटाक्ष असे .स्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी कळतात असा एक समज होता. 

कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला  बुवाबाजीला येथे वाव नव्हता .आश्रमात निवास हाही अत्यावश्यक नव्हता. प्रत्येकाने त्याच्या वाट्याला आलेले कर्म करीत राहावे. कर्म प्रामाणिकपणे करावे. असे स्वामी म्हणत असत .

कर्मापासून दूर जाऊन कर्मत्याग करुन  परमेश्वर प्राप्ती होणार नाही असे स्वामी  नेहमी सांगत असत .

स्वामी कधीही आवाज चढवून बोलत नसत .शांत हळू आवाजात ते नेहमी बोलत. त्यामुळे अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य होत असत .

स्वामी बोलून दमत नसत.

ते हळू आवाजात बोलत असल्यामुळे दुसऱ्याला एकाग्र होऊन त्यांचे बोलणे ऐकावे लागे.

हळू आवाजात बोलल्यामुळे रागावणे शक्य होत नसे .

आवाज चढविल्याशिवाय रागावताच येत नाही.

तुम्ही आवाज चढविल्याशिवाय खर्जात दुसऱ्यावर रागावता येते का ते पाहा.

स्वामींचे वाचन दांडगे होते .स्वामींची स्मरणशक्ती अफाट होती .कुणीही स्वामींजवळ त्यांची कोणतीही प्रापंचिक आध्यात्मिक इत्यादी समस्या घेऊन येत असे .त्याची समस्या स्वामी शांतपणे ऐकत असत .त्यांनी कधीही आलेल्याला तू अमुक अमुक  कर असे सांगितले नाही.

उठून ते त्यांच्या संग्रहातील एखादे पुस्तक काढीत.पुस्तक जरासे चाळून त्यातील एखादे पान काढीत.आलेल्याला ते वाचण्यासाठी देत .आलेल्या व्यक्तीला त्यातून त्यांच्या समस्येचे उत्तर मिळत असे .त्याचे समाधान होई.असा हा सगळा मामला होता .

स्वामी कुणाकडूनही पैसे स्वीकारत नसत .केवळ फळफळावळ किंवा ड्रायफ्रूट्स ते स्वीकारीत असत .स्वामी भेट म्हणून खडीसाखरही स्वीकारीत असत . भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ड्रायफ्रूट्स ,फळे किंवा खडीसाखर   प्रसाद  म्हणून देत असत .स्वामींना कित्येक जण भेटायला नुसतेच येत असत .ते भेट म्हणून काहीही आणीत नसत .फक्त स्वामींनी दिलेला प्रसाद घेऊन जात .तर काही जण केवळ प्रसादासाठी सुद्धा येणारे होते .त्यांना स्वामींच्या तत्त्वांशी, ध्यानाशी, अध्यात्माशी,काही देणे घेणे नव्हते.ते फक्त प्रसादासाठी येत . स्वामी अशा प्रसाद सन्मुख लोकांना ओळखूनही केवळ स्मित करीत प्रसाद देत असत.

स्वामींनी कधीही कुणालाही अरे जारे केले नाही  एकवचन वापरले नाही .अगदी काही वर्षांच्या, काही महिन्यांच्या, काही दिवसांच्यासुद्धा, मुलाला , ते अहो जाहो करीत.  मग मोठ्या व्यक्तींना गडीमाणसांपासून सर्वांना ते अहो जाहो करीत हे मुद्दाम सांगायला नकोच.  प्रत्येकाच्या आत असलेल्या आदिशक्तीला ते बहुधा  ओळखीत असावेत आणि आदिशक्तीला  अरे जारे करणे त्यांना पसंत नसावे .

कथेचे नाव "अमर प्रेम" आणि आत्तापर्यंत सर्व विवरण स्वामींचे यामुळे आपण कदाचित गोंधळात विचारात पडले असाल.स्वामींच्या प्राणीमात्रावरील प्रेमाबद्दल मी सांगत आहे असे तुम्हाला कदाचित वाटले असेल.तसे प्रेम ते तर करीत होतेच परंतु मला त्यांच्या वेगळ्याच एका प्रेमाबद्दल सांगायचे आहे.

अमर प्रेम वाचून आपल्यापैकी बहुतेक जणांना राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांचा अमरप्रेम हा चित्रपट आठवला असेल .त्यामध्ये अशारीरिक प्रेमाचा एक पैलू दाखविला होता .

इथेही स्वामींच्या प्रेमाचा असाच एक पैलू सांगण्याचे माझ्या मनात आहे .

मी सुरुवातीला प्रार्थनागृहातील दोन रिकाम्या आसनांबद्दल लिहिले आहे .त्यातील डाव्या बाजूच्या एका रिकाम्या आसनाबद्दल लिहावे असे मनात आहे . 

(क्रमशः)

२१/१/२०२०©प्रभाकर  पटवर्धन