Get it on Google Play
Download on the App Store

१ खजिन्याचा शोध १-२

( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

सतीश फिजिओथेरपिस्ट होता .त्याने फिजिओथेरपीमध्ये पोस्ट ग्रॅजुएट केले होते.त्याचे क्लिनिक रात्री नऊला बंद होत असे .त्याचे वय केवळ अठ्ठावीस होते .त्याने अजून लग्न  केले नव्हते.आईवडील लग्न कर म्हणून त्याच्या पाठीमागे गेले वर्षभर लागले होते.तो क्लिनिक व्यवस्थित चालू लागल्यावर करूया म्हणून टाळाटाळ करीत असे.त्याचे क्लिनिक झकास चालले आहे हे आईवडीलांना माहिती होते.केवळ ती सबब होती . क्लिनिक सुरू केल्यापासून गेल्या तीन वर्षात त्याने सर्वदूर नाव कमावले होते .अनेक डॉक्टर अर्थातच आर्थोपेडिक सर्जन, सर्जरी झाल्यावर आपल्या पेशंटला त्याच्याकडे जाण्याचे सुचवीत असत.ऑर्थोपेडिक डॉक्टर कोणते व्यायाम करून घेतले पाहिजेत हे तर सुचवीत असतच .त्याप्रमाणे तो व्यायाम करून घेत असेच.  परंतु त्यात आणखी आपली काही भर घालून पेशंट लवकर कसा बरा होईल ते पाहत असे. कांही पेशंट सरळ त्याच्याकडे येत असत.ज्यांना कोणत्याही प्रकारच्या सर्जरीची आवश्यकता नसते त्यांना तो विविध व्यायामप्रकारामार्फत दुःख हलके करण्याला, शरीराच्या हालचाली गतिमान करण्याला, पूर्ण बरे करायला  मदत करीत असे.  

सतीश रात्री साडेनऊला नेहमीप्रमाणे घरी आला.त्याचे वडील नुकतेच निवृत्त झाले होते.दिवाणखान्यात त्यांच्याबरोबर एक वृद्ध खेडूत बसलेले होते.सतीशच्या वडिलांनी अण्णासाहेबांनी याला ओळखलेस का असे म्हणेपर्यंत त्याने वाकून नमस्कार केला होता .काय काका बरे आहात ना असे त्याने विचारले .ते त्यांच्या गावचे म्हादबाकाका होते .सतीशचे गावाला वडिलोपार्जित घर होते.थोडी शेतीही होती.घराची देखभाल आणि शेती म्हादबा सांभाळीत असत.जमेल तेव्हा गावी जाऊन सर्व मंडळी काही काळ थांबत असत.सतीश त्याच्या बाबांबरोबर अनेकदा गावाला गेला होता.त्यामुळे त्याने लगेच म्हादबाकाकाना ओळखले होते.

काका गावाहून येताना त्यांच्या बरोबर काहीतरी भेटवस्तू आणित असत.ताजी भाजी, केळी, आंबापोळी, फणसपोळी, आंबे इत्यादी .आजही त्यानी अशाच काहीतरी वस्तू आणल्या असतील असा त्याचा समज होता.भाजी केळी पेरू तर त्यांनी आणले होतेच परंतु आणखी एक वस्तू त्यांनी आणली होती.त्यांनी फक्त त्या वस्तूचा उल्लेख केला होता.ती अजून दाखविली नव्हती .जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी त्यांच्या पोतडीतून ती वस्तू बाहेर काढली.

तो एक चौकोनी तांब्याचा तुकडा होता. फूटभर लांब रुंद असा तो तुकडा होता.विहीरीतील गाळ दोन तीन वर्षांनी साफ करीत असत.या वर्षी त्यांनी पाणी जास्त राहावे यासाठी गाळ काढल्यावर विहीर खोल करण्याचे ठरविले होते .खणीत असताना त्याना हा पत्रा सापडला होता. त्यावर काहीतरी महत्त्वाचा मजकूर लिहलेला असावा म्हणून ते तो तुकडा घेऊन आले होते .त्यावर कांहीतरी  आकृत्या काढलेल्या दिसत होत्या.सतीशने तो पत्रा काही रसायने टाकून स्वच्छ केला .   

पत्रा स्वच्छ केल्यावर त्यावर एक नकाशा कोरलेला दिसू लागला.सतीश तो नकाशा निरखून पाहात होता .विहिरीत एवढ्या खोल तो तुकडा कसा आला याची काहीच कल्पना करता येत नव्हती .कदाचित शेकडो वर्षांपूर्वी तुकडा तयार करण्यात आला असावा .नंतर सुरक्षिततेसाठी जमिनीत तो खोलवर पुरण्यात आला असावा.भूगर्भीय उलथापालथीमध्ये तो जास्त खोल गेला असावा.तो नकाशा सरळ रेघांच्या  स्वरूपात होता.नकाशामध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर दाखविले होते . म्हणजे नकाशाला सुरुवात तिथून होत होती.नकाशावर स्केल दिलेले होते.एक पेर बरोबर एक कोस असे ते स्केल होते.किलोमीटरच्या अगोदर ब्रिटिश काळात  मैल होते.त्याअगोदर कोस हे परिमाण वापरले जात असे. हात वाव कोस असे परिमाण होते .साधारणपणे हात म्हणजे दीड फूट व कोस बरोबर दोन मैल किंवा तीन किलोमीटर असे परिमाण धरता येईल.पूर्वी शरीराच्या निरनिराळया  मापावरून  उदाहरणार्थ पायाची लांबी(फूट) कोपरापासून हाताची लांबी.(हात)उंची(पुरुषभर ),हात काटकोनात ताणले असताना त्यामधील अंतर,(वाव) मधल्या बोटाचा शेवटचा भाग(पेर)इत्यादी. यावरून अंतर मोजले जात असे .

त्यांच्या घरापासून उत्तरेला  तीन इंच(पेर)रेषा काढली होती.नंतर दक्षिण वायव्य पश्चिम अशा रेषा गेल्या होत्या.अंतिम रेषेच्या शेवटी एक गोल आकार होता .बहुधा त्या गोल आकृतीने प्राचीन होन किंवा तत्सम एखादे नाणे दाखविलेले असावे.म्हादबाकाका दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेले. सतीश त्याच्या क्लिनिकमध्ये गेला तरी त्याच्या डोक्यातून तो तांब्याचा तुकडा जात नव्हता .तो तुकडा खजिन्याची वाट दाखवीत असावा असा त्याचा तर्क होता.गावापासून, आपल्या घरापासून,इतका दूर खजिना कां पुरला असावा असा प्रश्न त्याच्या समोर होता.कदाचित आपल्या एखाद्या पूर्वजाला त्या खजिन्याचा शोध लागला असावा.त्या काळात खजिना काढणे त्याला शक्य झाले नसावे.त्यामुळे त्याने या तुकड्यावर त्याचा नकाशा काढला आणि तो जमिनीत पुरून ठेवला.पुढे काळाच्या ओघात भूकंप, भूगर्भीय हालचाली , यामुळे तो खोलवर गेला.कर्मधर्मसंयोगाने विहीर आणखी खोल करीत असताना तो तुकडा सापडला आणि तो खजिना आपल्या नशिबात असल्यामुळे तांब्याचा तुकडा आपल्यापर्यंत  पोचला. असे सतीशला वाटत होते .

खात्री करून घेण्यासाठी सतीशने तो तांब्याचा तुकडा त्याच्या एका मित्राला दाखविला.हा मित्र पुरातत्व संशोधन खात्यात काम करीत होता .त्या मित्राने तो तुकडा काळजीपूर्वक पाहून सतीश सारखेच मत नोंदवले.तो मित्र गजानन त्याच्याबरोबर यायला तयार झाला.होकायंत्र, सर्व्हे घेण्याची इतर मापन साधने बरोबर घेऊन चार दिवसांची फुरसत काढून दोघेही सतीशच्या गावाला रवाना झाले.

गांवाला पोचल्यावर त्यांच्यापुढे प्रथम सुरुवात कुठून करावी सुरुवातीचा बिंदू कोणता असावा असा प्रश्न निर्माण झाला.सतीशला घर हा सुरुवातीचा बिंदू वाटत होता .त्याच्या मित्राच्या गजाननच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा हा नकाशा तयार केला गेला ,कोरला गेला,तेव्हा घर आजच्या ठिकाणी असेलच असे सांगता येत नाही. सतीशच्या परसदारात आग रात फिरता  फिरता गजाननला एक घुमटी दिसली.त्यामध्ये शंकराची एक पिंडी होती.त्या पिंडीची, घुमटीची ,घुमटासाठी वापरलेल्या दगडाची ,गजाननने काळजीपूर्वक तपासणी केली. ती घुमटी निदान सातशे आठशे वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज त्याने केला.घुमटीचा मध्यबिंदू हा स्टार्टिंग पॉइंट असावा असा निष्कर्ष त्याने काढला.त्यांनी तेथून नकाशात दाखविल्याप्रमाणे अंतरे मोजायला सुरुवात केली .

त्यांच्या वाटेत सरळ रेषेत जाताना नदी नाले घरे देवळे झाडे येत होती.त्यामुळे कांहीवेळा अंदाज करावे लागत होते.गजाननचे या विषयातील शास्त्रोक्त शिक्षण व अनुभव कामी येत होता.त्यांना  प्रवास पायी करावा लागत होता.अधून मधून मोटार वापरता येत होती .शेवटी ते समुद्रकिनारी येऊन पोचले.किनाऱ्याने सरळरेषेत उत्तरेकडे एक किलोमिटर गेल्यावर त्यांना एक टेकडी लागली .

हा खजिना या  टेकडीवर कुठे तरी असला पाहिजे असे गजानन म्हणाला .टेकडी सुमारे पाव किलोमीटर उंच असावी .त्याचा घेर सुमारे  दोनअडीच किलोमीटर असावा.एवढ्या प्रदेशात खजिना शोधायचा होता .गजाननाची क्षमता कसोटीला लागणार होती .प्रथम त्यांनी टेकडीला एक चक्कर मारली . खाचखळगे, काटेकुटे, लहान लहान झुडपे, नाले ओहोळ, दगड गोटे,यातून त्यांना प्रवास करावा लागला .टेकडीच्या अर्ध्या भागाला समुद्र किनारा होता .फिरत असताना गजानन साध्या डोळ्यांनी आणि दुर्बिणीने निरीक्षण करीत होता .प्रदक्षिणा घालीत असताना तो अधूनमधून थांबत होता .

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ते टेकडीच्या वरच्या भागाचे निरीक्षण करण्याला सुरुवात करणार होते.परंतु तोपर्यंत संध्याकाळ झाली होती .दोघेही कमालीचे दमले होते.टेकडीच्या समुद्र किनाऱ्याच्या बाजूच्या अर्ध्या भागावर पायथ्याला फिरत असताना श्रम मुळीच जाणवत नव्हते.पश्चिमेचा सायंकाळचा गार वारा घाम केव्हाच सुकवीत होता.परंतु पलीकडचा अर्धा भाग फिरत असताना वारा मुळीच नसल्यामुळे घामाच्या धारा सतत वहात होत्या.अंग चिकचिकले होते.नको तो शोध.नको तो खजिना.  असे झाले होते.

उद्यां ताज्या दमाने येथे येऊ आणि पुन्हा संशोधनाला सुरुवात करू असे त्यांनी ठरविले.

टेकडीच्या वरच्या भागाचे संपूर्ण निरीक्षण करायचे म्हणजे कदाचित एक संपूर्ण दिवस लागला असता.

टेकडीकडे येत असताना त्यांनी समुद्र किनारी एक विश्रांतिस्थान रिसॉर्ट पाहिले होते.तिथे जाऊन आज वस्ती करण्याचे त्यांनी ठरविले .

* समुद्र किनाऱ्यावर वाळूत दोघेही अर्धा तास आराम करीत होते .*

*सूर्य अस्ताला गेल्यावर ,संपूर्ण श्रमपरिहार झाल्यावर ,दोघेही विश्रांतिस्थानाच्या दिशेने चालू लागले.*

*त्यांनी त्यांची मोटार तिथेच ठेवली होती .*

*पौर्णिमा होती.स्वच्छ चंद्रप्रकाश पडला होता .*

*विश्राम स्थळाकडे जाताना त्यांनी चांदण्यात न्हाऊन निघालेल्या टेकडीकडे एकदा पाहिले.*

*उद्या ती टेकडी कदाचित त्यांच्यासमोर रत्नभांडार मोकळी करणार होती.*

(क्रमशः)

१९/९/२०२०©प्रभाकर  पटवर्धन