Get it on Google Play
Download on the App Store

९ तुला पाहते रे १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)       

~अनिकेत ~

संजना आणि मी एकाच शाळेत पहिलीपासून आहोत .ज्या दिवशी प्रथम संजनाला पाहिले तेव्हा ती आपली मैत्रीण असावी असे मला वाटले.त्या वेळेला प्रेम वगैरे काही कळत नव्हते .आम्ही केवळ सहा वर्षांचे होतो .आमच्या शाळेत मुले आणि मुली वेगवेगळ्या बाकावर बसत नसत . शाळेची तशी सक्ती नव्हती .थोड्याच दिवसांत माझी संजनाशी ओळख झाली .नंतर आम्ही एका बाकावर बसू लागलो.खेळत होतो भांडत होतो एकमेकांच्या वस्तूंची अदलाबदल करत होतो.  एकमेकांचे खाऊचे डबे वाटून घेत होतो .वर्षे चालली होती .हा हा म्हणता आम्ही दोघे आठवीमध्ये आलो .

संजना आता वेगळी दिसू लागली होती .आता आम्ही एका बाकावर बसत नव्हतो .ती तिच्या मैत्रिणींबरोबर असे. मी माझ्या मित्रांबरोबर असे.आम्ही भेटत होतो .एकमेकांकडे पाहून हसत होतो.बोलत होतो .परंतु आता एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.बोलण्या वागण्यात थोडा संकोच आला होता .दहावीची  शाळेतील परीक्षा झाली .शाळेने आम्हाला सेंड ऑफ  दिला.आता रोज भेट होणार नव्हती .मला थोडी हुरहुर वाटत होती .

तू मला आवडतेस असे मला सांगायचे होते.परंतु ते राहून गेले .

तिला काय वाटत होते काही कळले नाही . 

~ संजना~

अनिकेत मुलखाचा लाजरा बुजरा मुलगा .शाळेत पहिल्याच दिवशी मी त्याला पाहिला .सगळीकडे तो बुजर्‍या नजरेने पाहात होता .खेडेगावातून आला होता की काय कोण जाणे .सगळीकडे नवीन दृष्टीने तो पाहात होता .आम्ही काही मुले बालवाडीत बरोबरच असल्यामुळे एकमेकांना ओळखत होतो .हा कुणालाच ओळखत नव्हता .शाळा संपल्यावर तो बसमध्ये बसला व गेला.असे आठ पंधरा दिवस गेले.हा एकटाच असे .विशेष कुणाशी बोलत नसे .मी पहिल्यापासूनच चुणचुणीत व बोलकी .मी त्याच्याशी ओळख करून घेतली.आमच्या शाळेत मुले मुली एकाच बाकावर बसली तरी चालत असे .मी त्याच्या शेजारी बसायला सुरुवात केली .हळूहळू आमची मैत्री दाट होत गेली .तो बुजरा असला तरी स्वभावाने चांगला होता .कुणालाही मदत करायची त्याची वृत्ती होती.त्याला भावंड नव्हते. तो एकटाच होता.त्याच्या वडिलांची नुकतीच येथे बदली झाली होती .त्याने कुठलाहीही क्लास सुरू केला नव्हता .दहावीत गेल्यावरहि  त्याने क्लास सुरू केला नाही.त्यामुळे आम्ही दोघे क्लासमध्ये भेटण्याचा संभवच नव्हता.मी  गणित व सायन्स या क्लासना जात होते.हा हा म्हणता दहावीचे वर्ष संपले .शाळेतर्फे सेंड ऑफ झाला.तो माझ्याकडे विशेष नजरेने पाहात आहे हे माझ्या लक्षात आले होते .मी त्याला आवडते हेही मला माहीत होते .तोही मला आवडत होता .सेंड ऑफ झाल्यावर आम्ही दोघे भेटण्याची शक्यता नव्हती .जर शाळेमध्ये नंबर पाहण्यासाठी किंवा काही इतर कारणाने दोघे एकाच वेळी  आलो तर भेट होण्याची शक्यता होती .मला थोडी हुरहुर लागून राहिली होती .त्याच्याहि नजरेत ती हुरहुर मला दिसत होती.तो काहीतरी निरोपाचे बोलेल म्हणून मी वाट पाहात होते .त्याला काहीतरी बोलायचे आहे असे वाटत होते .परंतु शेवटी तो काही बोलला नाही .आम्ही एकमेकांचे लँडलाइन नंबर घेतले होते .आमच्याजवळ अजून मोबाइल आला नव्हता .अकरावीत गेलीस म्हणजे मोबाईल घेऊ असे बाबा म्हणाले होते .

~अनिकेत ~

अकरावीला कोण कुठे जाणार ?कुठे अॅडमिशन घेणार? कोणत्या शाखेला जाणार ?सर्वच अनिश्चित होते .संजना जवळ बोलण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे टेलिफोन .मी कुठचाही क्लास जॉईन केलेला नसल्यामुळे आमची क्लासमध्ये भेट होण्याचा संभवच नव्हता .सेंड ऑफ नंतर निरोप घेताना मला तिच्या जवळ खूप काही बोलायचे होते परंतु मी मुखस्तंभासारखा गप्पच राहिलो.परंतु गमतीची गोष्ट म्हणजे आमचे नंबर एकाच खोलीत एका मागोमाग एक आले .त्यामुळे शाळेत नंबर कुठे आहेत ते पाहताना व नंतर रोज परीक्षेच्या वेळी आमची भेट होत होती .संजना हुषार होती. तिला सर्व पेपर्स चांगले गेले होते. हे ती उत्साहाने सांगत असे.परीक्षा संपली .आता परीक्षेच्या निमित्ताने हॉलमध्ये भेट होण्याचा संभव नव्हता .परीक्षा संपल्यावर निरोप घेताना ती कोणत्या शाखेला जाणार याची मी चौकशी केली.ती कॉमर्सला जाणार होती .तिला मी सायन्सला जाणार आहे हे मला सांगायचे होते .परंतू तिने विचारले नाही आणि मीही आपणहून सांगितले नाही.अनेक गोष्टी बोलायच्या राहून गेल्या तसेच हेही राहुन गेले.आमच्याकडे एकमेकांचे फोननंबर होते.  तिला फोन करावा असे रोज वाटत असे.परंतु फोन करण्याचे धाडस मला होत नव्हते .एके दिवशी तिचाच फोन आला.तिने सहज फोन केला म्हणून सांगितले. तिने क्लास लावला म्हणून सांगितले .इकडच्या तिकडच्या गप्पा मारून नंतर तिने मोबाईल घेतल्याचे सांगितले .मी तिला तिचा मोबाइल नंबर विचारला .मीही मोबाइल घेतल्याचे तिला सांगितले .तिला माझा नंबर दिला .

आता एकमेकांशी केव्हाही बोलण्याची सोय झाली होती.तिच्याशी मोबाइलवर बोलताना मी सायन्सला जाणार आहे असे तिला सांगितले .

~ संजना~

अनिकेत म्हणजे  अनिकेत आहे .पठ्ठया फोनवरही चाचरत बोलत होता.मी कुठला क्लास लावला तेही त्याने विचारले नाही .खरे म्हणजे मी कोणताच क्लास अजून लावला नव्हता.तो  कुठल्या शाखेला जाणार हे कळल्यावर मी त्या शाखेला जाणार होते .नंतर क्लास लावणार होते . तो सायन्सला जाणार असे म्हणाला म्हणून कॉमर्स न घेता मीही  सायन्स घेतले .ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी आम्ही एकमेकांना फोन केला .दोघेही चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालो होतो .त्याचा व माझा क्लास एकच होता.आता क्लासमध्ये व कॉलेजमध्येही रोजच एकमेकांच्या भेटी होणार होत्या.केवळ त्याच्यासाठी मी कॉमर्स ऐवजी सायन्स घेतले.हे त्यांच्या लक्षात आले की नाही कोण जाणे ?त्याने त्याच्या स्वभावानुसार मला तू कॉमर्स घेणार होतीसना मग सायन्स का घेतले? एवढेही विचारले नाही.आता आमच्या रोज भेटी होत होत्या .एकमेकांच्या डिफिकल्टीज आम्ही सोडवित होतो.कॉलेजमध्ये वर्गात, प्रॅक्टिकलसाठी, कॅंटीनमध्ये ,बरोबर जात येत होतो .आमची सलगी अनेक जणांच्या लक्षात आली . मैत्रिणी मला त्याच्यावरून चिडवू लागल्या .तो घुम्या तुला कसा काय आवडला ? हे एक बरे झाले तू बोलत बसशील आणि तो नुसता ऐकत बसेल.

लहानपणी तो अबोल होता. बरोबर आहे .घुम्या  होता ठीक आहे . आठवी नववीमध्ये आल्यावर तो त्याच्या मित्राशी चुरू चुरू बोलू लागला होता.गॅदरिंगमध्ये भाग घेऊ लागला होता.वक्तृत्व स्पर्धेमध्येही तो स्टेजवर येऊन छान बोलत होता.एक दोनदा त्याने पहिल्या नंबरचे बक्षीसही मिळविले होते . त्याचे मित्रमंडळही बऱ्यापैकी होते .त्याची हुषारी केवळ पेपरमध्ये नव्हे तर इतरत्रही दिसत होती.परंतु माझ्यासमोर तो आला की त्यावेळीही नुसता बघत बसे.हल्ली हल्ली तो जरा गप्पा मारू लागला होता .हळूहळू तो थोडा मोकळा होत आहे असे वाटत होते .

*मी त्याला आवडते हे त्याच्या चेहऱ्यावर व डोळ्यात दिसत असे.*

*परंतु कधीही त्याने ते कोणत्याही मार्गाने सुचविले नाही .*

*त्याबाबतीत तो मुखस्तंभ तर मुखस्तंभच राहिला.*

*आता आपणच काहीतरी केले पाहिजे असे मला वाटू लागले.*

(क्रमशः)

१३/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन