Get it on Google Play
Download on the App Store

७ योगायोग १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

सागर लहानपणापासून एकलकोंडा बुजरा होता .त्याला बघितले की  लहानपणी वाचलेली  भित्र्या सशाची गोष्ट आठवे.हाही त्या भित्र्या सशासारखा नेहमी सर्वांना घाबरून असे. शाळेत मुले दंगा करीत, मारामाऱ्या करीत,मास्तरांच्या नकला करीत ,परंतु हा कुठेही त्यामध्ये नसे.हा आपल्या बाकावर गुपचूप अभ्यास करीत बसलेला असे.

ग्राऊंडवर खेळाच्या तासाला किंवा पीटीच्या तासालाही हा नेहमी मागेमागेच असे .तशी त्याची तब्ब्येत उत्कृष्ट होती.त्याला व्यायामाची गोडी होती. का कोण जाणे मागे मागे राहायची त्याला सवयच लागली होती .त्याचा बुजरेपणा कधी जाणार होता देव जाणे .

हळू हळू तो मोठा झाला मुली त्याच्याशी बोलायला बघत .काही सहज रित्या, तर काही मुद्दाम विशिष्ट हेतूने, परंतु हा पठ्ठया  त्यांच्याशी बोलताना लाजत असे.ज्या वयात मुले मुलींकडे डोळ्यात डोळा घालून,किंवा चोरून बघतात, त्या वयातही हा मुलींजवळ बोलताना लाजत असे .खाली मान घालून किंवा इकडे तिकडे अंतराळात पाहात बोलत असे. शाळेत मुली बिनधास्तपणे त्याच्याशी बोलायला येत.हा कधीच स्वतःहून मुलींजवळ बोलायला गेला नाही .त्याला मनातून मुलींजवळ बोलावे गप्पा माराव्यात मैत्री करावी असे खूप वाटे.प्रत्यक्षात त्याची जीभ चाचरत असे. पाय थरथरत असत.ओठ शुष्क पडत .

सागर कॉलेजात गेला. इतर मुले विविध कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत.याला तसे करावे असे खूप वाटे परंतु ते प्रत्यक्षात उतरत नसे.गॅदरिंग पिकनिक असे अनेक कार्यक्रम कॉलेजात चाललेले असत .यांने कधीही कुठेही कोणत्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही .कॉलेजातील मुली, सोसायटीतील मुली, कॉलनीतील मुली, त्याच्याशी अनेकदा बोलायला येत.हे लाजाळूचे झाड आपले पान मिटून राहात असे .कॉलेज कट्ट्यावर  तो कधीही आढळला नाही .मनातल्या मनात तो अनेकदा कॉलेजातील मुलीशी गप्पा मारीत असे .त्यांच्याबरोबर फिरायला जात असे.विनोद करीत असे परंतु हे सगळे मनातल्या मनात प्रत्यक्षात त्याला पाऊल उचलता येत नसे .त्याची जीभ चाचरत असे.पहिल्यापासून आपल्याच कोषात राहायची त्याला जी सवय जडली ती कायम राहिली.त्याचा बुजरेपणा तसाच राहिला .

तो दिसायला चांगला होता.त्याचे वक्तृत्व बऱ्यापैकी होते . तो हुषार होता .त्याचा नंबर नेहमी वर असे .चांगल्या मार्कांनी नेहमी तो उत्तीर्ण होत असे. कुठेच काही कमी नव्हते.फक्त त्याला धीर होत नसे .मनातल्या मनात तो असे करीन तसे करीन असे ठरवीत असे प्रत्यक्षात त्यातील काहीच होत नसे.त्याची आई नेहमी म्हणे याचे कसे होणार कोण जाणे ?हाअसा कसा? त्याच्यात काही कमी नव्हते परंतु तो बुजरा तो बुजराच राहिला .

त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले.यथावकाश एका कंपनीत त्याला नोकरी लागली .त्याच्या ऑफिसात स्टाफमध्ये वीस पंचवीस जण होते .त्यातील निम्या मुली होत्या .हल्ली हळूहळू हाही आत्ता कुठे मुलींजवळ बोलू लागला होता.कामाच्या निमित्ताने किंवा एरवीही हाय हॅलो करावे लागे.रस्त्यात, बसस्टँडवर, रेल्वेत,थिएटरमध्ये, आणखी कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात  भेटल्यावर, हसावे लागे. बोलावे लागे. परंतु जेवढय़ास तेवढेच तो बोलत असे . एकूण तो माणूसघाणा आहे असे सर्वांचे मत बनले होते .

ऑफिसात वातावरण खेळीमेळीचे होते .ऑफिसमध्ये वारंवार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पार्टी चाललेल्या असत.किंबहुना प्रत्येक जण पार्टीसाठी काही ना काही कारण शोधीत असे.काम भरपूर असे. ओव्हरटाइम करावा लागे. परंतु त्याचे कुणालाच काही वाटत नसे .सर्व तरुण होते .उत्साही होते त्यांच्या अंगातून ऊर्जा सळसळत होती . असेच दिवस मजेत आनंदात चालले होते .ऑफिस पाच दिवस असे . शनिवार रविवार सुटी असे.

एकदा केव्हा तरी शनिवार रविवारला लागून एक सुट्टी आली .तीन दिवसांच्या सलग सुटीमध्ये घरी बसण्यापेक्षा कुठेतरी पिकनिकला जावे असे कुणीतरी म्हणाले.त्याचे बोलणे सर्वांनीच उचलून धरले .एक मिनीबस ठरविण्यात आली .कुठे जावे यावर बराच वादविवाद झाला .शेवटी सर्वानुमते नाशिकला जावे असे ठरले .शनिवारी सकाळी निघावे व सोमवारी रात्री परत यावे .टू नाइट्स थ्री डेज अशी टूर काढावी असे सर्वानुमते ठरले .नाशिकमधील एक हॉटेलही बुक करण्यात आले.शनिवारी संध्याकाळी नाशिकमधील काही ठिकाणी फिरणे ,रविवारी त्र्यंबकेश्वर व पुन्हा जमल्यास नाशिकपर्यटन आणि सोमवारी शिर्डी करून मुंबईला परत असा कार्यक्रम आखण्यात आला .

हास्य विनोदात गप्पाटप्पा मारत भेंड्या खेळत गाणी ऐकत सर्व मंडळी शनिवारी अकरापर्यंत   नाशिकला पोचली. दुपारी जेवण  झाल्यावर मंडळी नाशिक दर्शनाला बाहेर पडली.सागर मूळचा नाशिकचाच होता.वडिलांची बदली झाल्यामुळे तो  मुंबईला आला होता.सर्वजण गंगेवरील देवदर्शनासाठी निघाले होते .सागरला देवदर्शनात विशेष रस नव्हता .त्याने मी येथे आराम करतो . तुम्ही जाऊन या . लहानपणी मी सर्व काही अनेकदा पाहिलेले आहे .असे सर्वांना सांगितले .त्याला थोडासा आग्रह केल्यावर तो येत नाही असे पाहून सर्वजण निघून गेले .

सागरने थोडावेळ रूमवर लोळण्यात काढला .

थोड्याच वेळात  त्याला कंटाळा आला .

*हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफी घ्यावी म्हणून तो कॉफी शॉपमध्ये आला .*

*कॉफी पिता पिता त्याची नजर सहज समोर गेली . *

*तिथे त्याची सहकारी विशाखा एकटीच कॉफी पीत बसली होती .*

(क्रमशः)

८/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन