Get it on Google Play
Download on the App Store

३ लव्ह मॅरेज (अॅरेन्ज्ड मॅरेज) १-२

(ही कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी  कुठलेही  साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

(कुशाभाऊ )

आमचा गाव शहरापासून फार दूर आहे . काही वर्षांपूर्वी गावात, शाळा फक्त सातवीपर्यंत होती .पुढील शिक्षणासाठी एस एस सी होण्यासाठी शहरात जावे लागत होते.शहरात जाण्यासाठी बसने जावे लागते  . शहराचे अंतर वीस बावीस किलोमीटरच असले तरी शहरात बस पोचेपर्यंत एक तास सहज निघून जातो .घरापासून बसस्टॅन्ड पर्यंत जाणे, बसची वाट पाहणे, बसस्टँडपासून शाळेपर्यंत जाणे, हा सर्व वेळ दोनआडीच तासाहून जास्त होतो .

थोडक्यात रोज जाऊन येऊन शाळा करायची असे म्हटले तर मुलाचा सहज  दिवस  जातो . पावसाळ्यात तर गाड्यांची अनियमितता फारच वाढते आणि शाळेत बऱ्याच वेळा मुलाला  जाता येत नाही .शहरात शिक्षणासाठी मुलाला किंवा मुलीला ठेवायचे असे म्हटले तर  खर्च फार येतो आणि ते सगळ्यांनाच परवडत नाही.

पंचक्रोशीत एखादी तरी एस.एस.सी. पर्यंतची शाळा असावी असा आम्हा सर्व ग्रामस्थांचा प्रयत्न होता .त्या प्रयत्नाना यश येऊन शाळा सुरू झाली .आता विद्यार्थ्यांना चालत कमाल एक तासात तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्ध्या तासात शाळेत जाता येऊ लागले . अासपासचे विद्यार्थी तर पाच दहा मिनिटांत पोचतात.  शाळेमुळे  फार मोठी सोय झाली आहे. 

शाळेतील शिक्षक अर्थातच बाहेरून आले आहेत.जे शिक्षक सडेफटिंग होते त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था काहीतरी करणे जरूर होते.गावातीलच काही लोकांनी आपल्या घरात  शिक्षकांना राहण्यासाठी जागा दिल्या .त्यांची जेवणाची सोयही कुठेना कुठे करण्यात आली .जे शिक्षक विवाहित होते त्यांना, त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी जागेची व्यवस्था करण्यात आली .काहीजण शहरापासून अप डाउन करीत होते . त्यांचा काही प्रश्नच नव्हता .शाळेच्या संचालक मंडळावर मीही असल्यामुळे मला बराच भाग या सर्व नियोजनात घ्यावा लागला .

माझ्या मुलीला दहावीपर्यंत  शिक्षणासाठी शहरात नातेवाईकांकडे ठेवावे लागले .त्यासाठी बऱ्याच अडचणी मुलीला सोसाव्या लागल्या .माझी शिक्षणाची अावड व मुलीचीही हुषारी व शिक्षण घेण्याची कळकळ यामुळे त्रास झाला व खर्च झाला तरीही  माझी मुलगी ग्रॅज्युएट झाली .

माझ्या लहान मुलाला शिक्षणासाठी शहरात जावे लागले नाही .गावातच शाळा झाल्यामुळे त्याची चांगली सोय झाली .

( मुकुंदा)

वर्तमानपत्रात शिक्षक पाहिजे म्हणून जाहिरात पाहिली आणि मी नकाशावर हे गाव शोधू लागलो .तिथे कसे जायचे इत्यादीही नेटवरून शोधून काढले .ठरलेल्या दिवशी मी मुलाखतीला गेलो. सुदैवाने माझी निवडही झाली .अनंतरावांकडे  राहण्याची व जेवण्याचीही व्यवस्था झाली.गावात वेळ घालविण्याचे काहीही साधन नसल्यामुळे शाळा झाल्यावर किंवा सुट्टी असेल त्यावेळी वेळ जात नसे.या गावात मोबाइलला बऱ्यापैकी रेंज होती .त्यामुळे थोडा बहुत वेळ जात असे.सुट्टीच्या दिवशी मी हमखास शहरात पळत असे.जवळच दोन तीन किलोमीटरवर सुंदर समुद्र किनारा आहे हे मला कळल्यापासून मी रोज संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ लागलो . कपडे पुस्तके गृहउपयोगी वस्तू करमणूक प्रत्येक गोष्टीसाठी सर्वांना शहरात जावे लागे.

मी खेडेगावातील असल्यामुळे मला खेडेगावात राहण्याची सवय होती .त्यामुळे माझा वेळ सहज जात असे.परंतु जे माझे सहकारी शिक्षक होते व ज्यांचे लहानपण शहरात गेले होते  त्यांचा वेळ मुळीच जात नसे.त्यांची शहरात नोकरी मिळवण्याची फारच धडपड असे.नाईलाजाने ते या खेडेगावात नोकरी करीत होते . काही जण तर शहरात राहून अप डाऊन करीत असत .

या गावापासून समुद्र किनारा दोन तीन किलोमीटरवर  होता .सायकल  स्कूटर मोटरसायकल याने सहज तिथे पोचता येत असे.हे मला कळल्यापासून  पावसाळी दिवस सोडले तर समुद्रावर फिरण्यात मोकळी हवा खाण्यात वेळ सहज जात असे.मला समुद्र फार आवडतो त्यामुळे मला वेळ घालविण्याचा विशेष प्रश्न नसे.

(राधिका ) 

आम्ही बी. कॉम.च्या परीक्षेचा शेवटचा पेपर दिला आणि आम्हा सर्वांना सुटल्यासारखे वाटले.आम्ही हॉस्टेलवर राहणाऱ्या सर्व मुलींनी दोन चार दिवस सुटकेचा चांगलाच गोंधळ घातला.बाबांचा व आईचा रोज केव्हा येतेस म्हणून फोन  येतच होता.गावात शाळा नसल्यामुळे आठवीपासून मी शहरात शिक्षणासाठी होते .दहावीपर्यंत नातेवाईकांकडे राहात होते.नंतर मी कॉलेजच्या हॉस्टेलवर राहू लागले .आमचा मुलींचा एक चांगला ग्रुप निर्माण झाला.चार वर्षे केव्हा निघून गेली ते कळलेच नाही .सुट्ट्यांमध्ये मी अर्थातच गावाला जात होते .समुद्र किनारा हा माझा वुईक पॉइंट आहे .आमच्या गावाला समुद्र किनारा आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ,रात्री ,चांदण्या रात्री, काळोख्या रात्री, केव्हाही  मला समुद्रावर जायला आवडते. आमच्या गावचा समुद्र खोल असला तरी शांत आहे. मला पोहायलाही  खूप आवडते.

चार दिवस मजा मारल्यावर  आम्ही सर्व मैत्रिणी आपापल्या गावाला गेलो .एकमेकिनी एकमेकांना आमच्या घरी नक्की या आणून निमंत्रण दिले.

घरी गेल्यावर माझी नेहमीप्रमाणे समुद्रावर चक्कर सुरू झाली.

(रमाकाकू)

मी यांच्या कानी कपाळी इतके दिवस रोज ओरडत होते .मुलगी मोठी झाली तिच्या लग्नाचे पाहा नाहीतर एक दिवस घरातून पळून जाईल.हे नेहमीप्रमाणे ते हसण्यावारी नेत होते.मुलीच्या जातीला एवढे शिक्षण काय करायचे असा माझा नेहमींचा सवाल.त्यावर यांचे सांगणे माझी मुलगी असे काहीही करणार नाही.ती मी सांगेन त्याच्याशी विवाह करील.आणि ती  जो मुलगा  पसंत करील त्याच्याशी मी तिचा विवाह लावून देईन .असे म्हटले की सर्वच संपले .दोघेही बापलेक काहीही करण्यास मोकळे .

मी यांना माझ्या माहेरची तीन चार स्थळे सुचविली .सर्व चांगले सुशिक्षित आहेत.चांगल्या नोकरीवर आहेत.मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहतात .परंतु दोघेही प्रत्येकात काही ना काही खोडी काढतात .कुणी उंच आहे .कुणी ठेंगू आहे. कुणी काळा आहे.कुणाच्या घरचा बारदाना फार मोठा आहे .कुणाला विशेष नातेवाईकच नाहीत. भाऊबहीण नाहीत. एकुलता एक आहे.अडचण आली, वेळ प्रसंग आला, तर मदत कुणाचीही नाही.मी म्हणते मग आम्ही कशाला आहोत अडीअडचणीला आम्ही उभे राहणार नाही काय?यावर यांचे  सांगणे आपण काय तिच्या आयुष्याला पुरणार आहोत.

हल्ली मी तिच्या लग्नाबद्दल बोलण्याचेच सोडून दिले आहे.बाप लेक जो काही गोंधळ घालणार आहेत तो घालू देत .हे राधिकासाठी कोणता राजपुत्र आणणार आहेत तो मला पाहायचाच आहे.

(कुशाभाऊ)   

मलाही हल्ली हिचे सांगणे पटू लागले आहे.राधिकाला एखादा योग्य वर पाहिला पाहिजे .मुलगा असा पाहिजे की तो सुशिक्षित पाहिजे, सालस पाहिजे, स्वतंत्र वृत्तीचा पाहिजे, माझ्या मुलीला त्याने सुखात ठेविले पाहिजे.त्याने मुलीला नोकरी करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे .तिला वाटले तर ती नोकरी करील किंवा करणार नाही तो तिच्या मर्जीचा प्रश्न असेल . तो श्रीमंत पाहिजे असे नाही परंतु सालस पाहिजे .आपल्याजवळ भरपूर पैसा आहे .मुलीला आपण काहीही कमी पडू देणार नाही.एखादा तरुण मुलगा दिसला की हल्ली मी त्याच्याकडे विशिष्ट दृष्टीने पाहू लागतो .राधिकेला हा अनुरूप आहे का असा माझा आपोआपच  विचार चालू असतो .

मुकुंदाचा इंटरव्ह्यू घेतानाही माझा तसाच दृष्टिकोन होता.त्याला विचारलेल्या प्रश्नातून तो शिक्षक म्हणून किती लायक आहे हे पाहात होतोच परंतु त्याचबरोबर तो राधिकेला अनुरूप आहे की नाही तेही पाहात होतो .

तो ग्रामीण भागातून आला आहे .त्याचे वडील एक सामान्य शेतकरी आहेत .कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे .त्याला व त्याच्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड व तळमळ आहे.त्याने घरापासून दूर शहरात राहून कष्ट घेऊन , शिक्षण मिळविले आहे .बऱ्याच वेळा त्याने कुठे ना कुठे लहान सहान वाटेल ती नोकरी करून शिक्षण पूर्ण केले आहे .गावी गेल्यावर अजूनही त्याला शेतामध्ये जोत धरायला लाज वाटत नाही.म्हटला तर शहरी म्हटला तर ग्रामीण असा त्याचा दुरंगी बाज आहे .व्यायामाची त्याला आवड आहे . मुलगा सुदृढ आहे . उजळ आहे.निर्व्यसनी आहे . उंचनिंच आहे .राधिकेबरोबर त्याचा जोडा शोभून दिसेल . प्रथम श्रेणीत पास झाला आहे .त्याला पुढे शिकायचे आहे .एमएससी पीएचडी वगैरे होऊन कॉलेजात प्राध्यापक किंवा एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये  त्याला संशोधन करायचे आहे .

या सर्वासाठी लागणारा पैसा आर्थिक बळ त्यांच्याकडे नसल्यामुळे तो नोकरी करीत आहे .जर पुरेसा पैसा मिळाला, नोकरीतून संचय करता आला, तर तो निश्चित कुणीतरी मोठा नामवंत संशोधक होईल किंवा एखादा शिक्षणतज्ञ होईल .मला राधिकेसाठी हा मुलगा योग्य वाटतो.मला कुणावरही काहीही लादायचे नाही .पैसा मिळतो, आपली आकांक्षा पुरी होते, म्हणून मुकुंदाने राधिकेशी लग्न करणे मला पसंत पडणार नाही .मला आवडतो ,आईला आवडतो ,म्हणून राधिकेने त्याच्याशी लग्न करणे मला पसंत पडणार नाही.दोघांनी खरेच एकमेकांना पसंत केले पाहिजे .पाहू या काय होते ते.हिच्याजवळ माझ्या मनातील गोष्ट बोलण्यात अर्थ नाही.ती लगेच मुकुंदाची सरबराई सुरू करील किंवा तो राधिकेला योग्य कसा नाही हे पटवून देऊ लागेल .

सर्व काही माझ्या मनासारखे झाले पाहिजे परंतु त्याचा सुगावा कुणालाही लागता कामा नये .माझा  विधिलिखितावर दैवावर विश्वास आहे .याचा अर्थ आपण काही प्रयत्न करायचा नाही असे नाही .परंतु जर दैवात असेल, योग असेल, विधिलिखित असेल, तरच आपल्या प्रयत्नांना यश येते अन्यथा नाही असा माझा नेहमीच आयुष्यात दृष्टिकोन असतो .त्यामुळे प्रयत्न करीत राहावयाचे आणि यशाची आशा विशेष करायची नाही असे माझे धोरण असते .

आता समुद्र आहे. राधिका आहे. मुकुंदा आहे.दोघांनाही समुद्राची आवड आहे .दोघेही समुद्रावर फिरायला जातात .पाहू या काय होते ते ?

( क्रमशः)

४/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन