Get it on Google Play
Download on the App Store

५ ती अशी कां वागत होती १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

स्वप्नील व स्नेहल  यांची लहानपणापासून मैत्री होती .दोघांचे आई वडील  एकाच सोसायटीत राहत होते .दोघांच्याही कुटुंबांची मैत्री होती .स्वप्नीलची आई व स्नेहलची आई या लग्नाअगोदरच्या मैत्रिणी होत्या.लग्नानंतर एकाच सोसायटीत त्या आल्यामुळे त्यांची मैत्री आणखी दृढ होत गेली .एकीला मुलगा दुसरीला मुलगी झाल्यामुळे दोघेही आपण विहिणी होऊ असे म्हणत असत.आपले मैत्रीचे संबंध नात्यात बदलू असेही दोघीजणी म्हणत असत .

स्वप्नील व स्नेहल  लहानपणी इतर मुलांबरोबर एकत्र खेळत असत .स्वप्नील तीन वर्षांनी मोठा तो नेहमी स्नेहलला शेंबडी म्हणून चिडवत असे . लहानपणी स्नेहल चिडवल्यावर रडत रडत घरी जाई, तर जरा मोठी झाल्यावर ती  स्वप्नीलच्या अंगावर धावून जात असे आणि त्याला बोचकारीत असे.त्यावर  स्वप्नील तिला मांजरी मांजरी म्हणून चिडवत असे .अशाप्रकारे भांडत भांडत खेळत खेळत  दोघेही मोठी झाली .स्वप्नील माँटेसरीतून पहिलीमध्ये शाळेत दाखल झाला आणि स्नेहल माँटेसरीत दाखल झाली .

दोघांची शाळा एकच असल्यामुळे कित्येक वेळा दोघांनाही कुणाची तरी आई किंवा वडील बरोबरच शाळेत सोडत असत .दोघेही अशाप्रकारे हळूहळू मोठी होत होती .लहानपणी स्नेहलचे अंग थंडीमध्ये जास्त उलत असे.खेळताना त्यांमध्ये धूळ माती गेल्यामुळे ती काळी दिसत असे .प्रत्यक्षात ती मुळीच काळी नव्हती .जशी ती मोठी होत गेली तसे तिचे धुळीत खेळणे कमी कमी होत बंद झाले.ती आपल्या त्वचेची चांगल्याप्रकारे काळजी घेऊ लागली .मॉश्चरायजर वगैरे वापरल्यामुळे हळूहळू तिची त्वचा नितळ व उजळ होत गेली.हळूहळू ती गोर्‍यामध्ये सावळी किंवा सावळ्यामध्ये गोरी दिसू लागली.

अकरा बारा वर्षांनंतर मुलींमध्ये एकदम फरक पडू लागतो .साध्या मुलीसुद्धा चांगल्या दिसू लागतात इथे तर ही मुळातच बऱ्यापैकी देखणी  होती त्यामुळे तिचे रूप आणखीच खुलत गेले .तारुण्यात पदार्पण केल्यावर ती आपली काळजी जास्तच घेऊ लागली.त्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलत गेले होते .समोरून येताना दिसल्यावर तिच्याकडे पाहात राहावे ती आपल्याला ओलांडून गेल्यावर मागे  वळून पाहावे असे कुणालाही वाटेल अशी कांती व रूप तिला प्राप्त झाले होते .

स्वप्नील व स्नेहल  यांच्यामध्ये पूर्वी मैत्री होतीच आता त्यात वेगळे  रंग निर्माण होऊ लागले .दोघे हळूहळू मोठी होत होती त्यांची मैत्री जास्त घट्ट होत होती .

दोघे बरोबर येत जात असत. हसत खेळत असत.गप्पा मारीत असत.त्याचे कुणालाच वावगे वाटत नसे.स्वप्नील कॉलेजमध्ये गेला आणि त्याला स्कुटर मिळाली .स्वप्नील स्नेहलला मागे बसवून शाळेत सोडू लागला. काही दिवसांनी स्नेहल कॉलेजमध्ये आली .त्यानंतर दोघांच्या गाठी भेटी वाढू लागल्या .स्नेहललाही स्कूटर मिळाली .स्वप्नील केव्हा केव्हा स्नेहलच्या मागे बसून कॉलेजवर येऊ लागला .दोघेही लग्न करणार हे सोसायटीत व  कॉलेजमध्येही सर्व गृहीत धरून चालले होते .घरच्या कोणाचाही याला विरोध नव्हता .असे सर्व काही छान चालले होते.कसलाही अडथळा न येता यांची गाडी व्यवस्थित मुक्कामाला पोचणार यांची त्यांना व सर्वांना खात्री होती.

आणि अकस्मात यामध्ये काहीतरी गडबड उडाली .कुठे तरी माशी शिंकली .स्नेहल स्वप्नीलला टाळू लागली .

काहीतरी कारण सांगून ती त्याच्याबरोबर जायचे टाळीत असे .पूर्वी दोघांचे दिवसातून निदान तीन चारदा तरी फोन होत असत .केंव्हा केंव्हा फोनवरील बोलणे अर्धा अर्धा तास सुद्धा चालत असे.हल्ली ती आपणहून फोन करीत नसे.स्वप्नीलने फोन केल्यास ती जेवढ्यास तेवढे बोलत असे.तिच्यातील या फरकाचे कारण काय ते त्याला कळत नव्हते.आपली बालमैत्रीण,  प्रत्येक वेळी आपल्याजवळ मनातील सर्व काही भडाभडा बोलणारी,अशी ही एकदम अबोल का झाली ते त्याला कळत नव्हते. स्वप्नीलला आपल्याला ती का टाळते याचा  उलगडा होत नव्हता.कॉलेजमधील अनेक मंडळांमध्ये दोघेही एकत्र होती .स्नेहलने हळूहळू अभ्यासाचे कारण सांगून आपले नाव मंडळांमधून काढून घेतले.तिच्या अंगाची गोलाई हळूहळू कमी होत आहे असे स्वप्नीलच्या लक्षात आले.ती कृशही दिसू लागली होती .स्वतःकडे तिचे दुर्लक्ष होत आहे असेही स्वप्नीलच्या लक्षात आले.तिचा चेहरा काळवंडला आहे असेही त्यांच्या लक्षात आले.तिच्या डोळ्याखाली काळी अर्धवर्तुळे दिसू लागली होती .

.बहुधा तिचे दुसऱ्या कुणावर तरी प्रेम असावे. त्याने आता नकार दिल्यामुळे तिचे असे स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे असा एक विचार स्वप्नीलच्या मनात आला .परंतु तो त्याच्या ह्रदयाला पटत नव्हता.ती सांगत नाही, बोलत नाही,तर आपण संशोधन करून कारण शोधून काढावे असे स्वप्नीलने ठरविले .स्वप्नील मनापासून तिच्यावर प्रेम करीत होता .तिने दुसऱ्या कुणाशी लग्न केले असते तर त्याला जरूर वाईट वाटले असते परंतु ती दुःखी झालेली त्याला पहावत नव्हते .

तिचा पाठलाग करून त्याने तिच्या नाराजीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला .परंतु कांही कारण त्याला कळले नाही .ती दुसर्‍या कुणाला भेटत नाही .तिचे बहुधा दुसर्‍या  कुणावर प्रेम नाही. मग ती अशी का वागते ?त्याचा त्याला उलगडा होईना. त्याने तिला विचारून पाहिले .परंतु ती धड उत्तर देत नव्हती .

एकदा तर त्याने तिला तू पूर्वी किती छान दिसत होतीस ,किती छान बोलत वागत होतीस , स्वतःकडे किती लक्ष देत होतीस,किती खळखळून हसत होतीस ,आणि आता असे काय झाले ?तू उदास का असतेस?तुझ्या उदासीचे कारण मला सांगशील का ?

मी तुझा प्रथम मित्र आहे.मग मला सांगून आपले दुःख कमी का करीत नाहीस?

*दुसऱ्याला सांगितल्याने आनंद वाढतो आणि दुःख कमी होते तू  मनात कुढत बसू नकोस .*

*तुझे दुःख माझ्या जवळ शेअर कर.असे स्पष्टपणे बोलूनही पाहिले . *

*त्यावर तिने कुठे काय सगळे तर ठीक आहे असे म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न केला .*

*तिचे दुःख, तिच्या ह्रदयाचा  सल तिने सांगितला नाही.*

(क्रमशः)

१०/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन