४ लव्ह मॅरेज (अॅरेन्ज्ड मॅरेज) २-२
(ही कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी कुठलेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
( राधिका)
घरी आल्यापासून मी नेहमीप्रमाणे रोज समुद्रावर फिरायला जाते .माझ्या लहानपणी समुद्रावर कुणाचीही गर्दी नसे .हल्ली समुद्रावर बरेच लोक दिसून येतात .पर्यटक येतात त्याचप्रमाणे आसपासच्या गावातील लोकही रस्ता चांगला झालेला असल्यामुळे ,आर्थिक सुबत्तेमुळे दुचाकी चारचाकी स्वयंचलित वाहने बऱ्याच जणांकडे असल्यामुळे, फिरायला येतात.अजून विशेष गर्दी नसली तरी नेहमी दहा वीस डोकी समुद्रावर फिरताना दिसतात .
गेले काही दिवस मला रोज एक मुलगा दिसतो .तो बरोबर साडेसहा वाजता येऊन आपली मोटरसायकल उभी करतो .समुद्रावर जलद चालणे, धावणे, काही वेळा पोहणे,डोंगरांवरून खडकातून फिरणे, अशी त्याची आवड दिसते . मला त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे .तो शेजारच्या गावात निघालेल्या नवीन शाळेमध्ये शिक्षक आहे असे कुणाकडून तरी कळले .शाळेत जाणाऱ्या मुलांना विचारता त्यांनी सर फारच छान शिकवितात.कठीण वाटणारे गणित, पदार्थविज्ञान,रसायनशास्त्र, त्यांच्या शिकविण्यामुळे अगदी सोपे वाटू लागले आहे.असे खुषीत येऊन त्यांचे वर्णन केले.बाबा त्या शाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत .बाबांच्या प्रयत्नांनीच ही शाळा सुरू झाली आहे .मला घर सोडून दूर शिक्षणासाठी लहानपणी जावे लागले तसे माधवला माझ्या लहान भावाला जावे लागू नये. त्याचप्रमाणे खेडेगावातील पंचक्रोशीतील ज्या मुलांना शहरात जाऊन शिक्षण घेता येत नाही किंवा शिक्षण घेण्याला फार त्रास पडतो त्यांना शिक्षण मिळावे हाही बाबांचा हेतू आहे .
बाबांनीच याचा इंटरव्ह्यू घेतला असला पाहिजे . बाबानीच याची निवड केली असली पाहिजे .बाबा मोकळेपणाने बऱ्याच गोष्टी घरात बोलतात परंतु या मुलाबद्दल त्यांनी विशेष काही सांगितलेले नाही.
काही असो या तरुणाने माझे कुतूहल चाळविले आहे .हा माझ्याकडे बघतोही आणि बघतही नाही .हा आपल्याच मस्तीत असतो .पहिल्या दिवशी जेव्हा त्याने मला पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात मला ती विशिष्ट चमक दिसली .परंतु नंतर मात्र ती चमक दिसली नाही.त्याला माझ्यात इंट्रेस्ट नाही की तो इंट्रेस्ट असूनही नसल्यासारखे दाखवित आहे ? एकदा बाबांना त्याच्याबद्दल आडून आडून विचारले पाहिजे .
(मुकुंदा)
त्या दिवशी ती मुलगी मी पाहिली आणि मला तिच्या डोळ्यात ती विशिष्ट चमक दिसली .मी तिला नक्की आवडला असलो पाहिजे .माझ्याविषयी तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले असले पाहिजे .तेव्हापासून मधून मधून समुद्रावर जाणारा मी नियमितपणे समुद्रावर फिरायला जाऊ लागलो .तीही नियमितपणे येत असते.मी बरोबर साडेसहाच्या ठोक्याला समुद्रावर विशिष्ट जागी मोटारसायकल उभी करतो.नंतर पळणे धावणे जलद चालणे पोहणे इत्यादी माझ्या अॅक्टिव्हिटीज सुरू होतात.ती मी काय करतो त्यावर लक्ष ठेवून असते हे माझ्या लक्षात आले आहे .मीही तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतो.एकदा मी साडेसहा अगोदरच तिथे येऊन झाडीत लपून बसलो .साडेसहाला तिथे मी न आल्यामुळे तिची चलबिचल होत होती.मी जेथे मोटरसायकल उभी करत होतो तिकडे ती सारखी पाहात होती. ती माझी वाट पाहात होती .त्यामुळे मी चांगलाच सुखावलो .
ती अण्णासाहेबांची मुलगी आहे हे कुणीतरी सांगितल्यावर मी चमकलोच.याच अण्णासाहेबांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता .आमच्या शाळेच्या संचालक मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.त्यांनी मला प्रश्न विचारता बरेच खासगी प्रश्नही विचारले .या प्रश्नांचा माझ्या शिक्षक म्हणून नेमणुकीशी नक्की काय संबंध आहे हे माझ्या लक्षात आले नव्हते.कदाचित त्यांना माझी ग्रामीण पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल .खेडेगावात मी स्टेपिंग स्टोन म्हणून नोकरी करीत आहे आणि मिळाल्याबरोबर शहरात पळणार आहे की इथे टिकून राहीन हे त्यांना पाहायचे असावे असे मला वाटत होते.
आता माझ्या थोडे बहुत लक्षात येऊ लागले आहे .ते कदाचित माझ्याकडे भावी जावई म्हणून पाहात असावेत .त्या दृष्टीने त्यांनी काही प्रश्नांची पेरणी केली असावी .कदाचित मला वाटते तसे काहीही नसेलही परंतु संशयाला जागा निश्चित आहे .
( कुशाभाऊ)
त्या दिवशी राधिका शाळेबद्दल बरेच प्रश्न विचारीत होती .शाळेत बीकॉम झालेल्याला काही स्कोप आहे का असे विचारण्याचा तिचा हेतू होता .शाळेत अजून कॉमर्स विषयक विशेष विषय नसल्यामुळे तसा स्कोप नाही असे मी तिला सांगितले .तरीही जर तिची इच्छा असेल तर ती इंग्लिश मराठी भूगोल इतिहास अशासारखे काही विषय शिकवू शकते शाळा आपलीच आहे असे मी तिला सांगितले .तिने विचारता विचारता शिक्षक किती आहेत शिक्षिका किती आहेत इत्यादीही चौकशी केली .कुणाचे काय नाव,कोण काय शिकवितो, त्याच्याबद्दल माझे मत काय इत्यादीही प्रश्न तिने विचारले.आडून आडून ती मुकुंदाबद्दल तर विचारीत नाही ना असा मला दाट संशय आला .तसे असेल तर फारच उत्तम माझ्याही मनात तेच आहे. असो.पाहू या काय होते ते .
(मुकुंदा)
काल अण्णासाहेब शाळेत आले होते . शाळेचे संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे त्यांची अधूनमधून चक्कर होतच असते .आतापर्यंत त्यांनी मला त्यांच्या घरी कधीही बोलाविले नव्हते .काल त्यांनी मला रविवारी दुपारी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले .मी त्यांना काही विशेष कार्यक्रम आहे का असे विचारता त्यांनी मिश्किल स्मित करीत तसा काही विशेष कार्यक्रम नाही. तुम्ही नोकरीवर रुजू झाल्यापासून आमच्या घरी आला नाहीत म्हणून सहज बोलाविले आहे असे सांगितले .
मला उगीचच काहीतरी वास येत आहे का?घोडा मैदान जवळच आहे कळेलच काय आहे ते .
( रमाकाकू)
दोन दिवसांपूर्वी यांनी रविवारी एकजण जेवायला येणार आहेत म्हणून सांगितले.हे विशेष पाहुणे आहेत त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या असेही त्यांनी हसत हसत सांगितले .भावी जावई तर नाही ना असे मी त्यांना हसत हसत विचारले .त्यावर उत्तर न देता यांनी तुला असे का वाटते असे विचारले.तुझ्या डोक्यात नेहमी राधिकेच्या लग्नाचा विषय का असतो दुसरे काही विषय नाही का असेही मला वर सुनावले . आमच्याकडे असे कुणी ना कुणी नेहमी येतच असते .मला त्यात विशेष काही वाटले नाही .
मी नेहमीप्रमाणे साग्रसंगीत जेवणाची व्यवस्था केली होती .बरोबर बारा वाजता मोटारसायकलवरून एक तरणाबांड मुलगा आला .
अण्णासाहेबांनी जातीने त्याचे स्वागत केले .माझ्याशी त्याची ओळख करून दिली .त्याने नम्रपणे मला किंचित वाकून नमस्कार केला .त्याची बोलण्याचालण्याची पद्धत त्याचा उमदेपणा मला आवडला .आपल्या राधिकेला हा शोभून दिसेल असा विचार माझ्या मनात आला .
(राधिका)
दुपारी कुणीतरी जेवायला येणार आहे असे मला आईने सांगितले .बाबांकडे नेहमी कुणी ना कुणी येतच असते .मला त्यात विशेष काही वाटले नाही .दुपारी बरोबर बारा वाजता मोटरसायकलचा आवाज ऐकू आला.आवाज ओळखीचा वाटला. हाच आवाज समुद्रावर बरोबर साडेसहा वाजता ऐकू येत होता.मनी वसे ते स्वप्नी दिसे असे तर नाही ना असेही माझ्या मनात येऊन गेले .मी खिडकीतून बाहेर पाहिले तो पोर्चमध्ये तोच तरुण मोटारसायकल नेहमीच्या त्याच शैलीत उभी करीत होता.मी खिडकीतून त्याच्याकडे आश्चर्याने व कुतुहलाने पाहात आहे हे त्यांच्या कसे लक्षात आले कोण जाणे परंतू त्याने माझ्याकडे चमकून लगेच पाहिले.ओळखीचे स्मित केले .मीही स्मित करून त्याला उत्तर दिले.
दुपारी बाबांबरोबर आणखी कुणी जेवायला नव्हते.आम्ही सर्व एकत्रच जेवायला बसलो होतो .हास्य विनोदात जेवण सहज झाले .बाबा संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या बरोबर आपण जेवत आहोत, बोलत आहोत, त्यांच्या घरी आहोत, याचे कुठे तरी सूक्ष्म दडपण त्याच्यावर असावे असे मला वाटले .तो पूर्णपणे दिलखुलासपणे मोकळेपणाने बोलत नव्हता .
दुपारी तो गेल्यावर चहाच्या वेळेला मला बाबांनी सहजच विचारले हा मुलगा तुला कसा वाटला.मी विशेष इंट्रेस्ट न दाखवता चांगला आहे की असे म्हटले .त्यावर त्यांनी तुला पसंत आहे का म्हणून विचारले .विचार केला पाहिजे. एका भेटीत तो कसा आहे ते कसे कळणार असे मी त्यावर उत्तर दिले.त्यावर त्यांनी समुद्रावर तो रोज येतो . तूही समुद्रावर जातेस .आता तुमची ओळख झाली आहे.पाहा विचार करा आणि मला उत्तर द्या असे सांगितले .
( रमाकाकू)
रात्री यांनी मला मुलगा कसा वाटतो असे विचारले .मला राधिकासाठी हा योग्य वाटतो तुझी व तिची हरकत नसेल तर मी पुढे जाईन असे सांगितले .मी त्यांना मला हा मुलगा योग्य वाटतो .राधिका काय म्हणते ते पाहा असे सांगितले.हे लग्न होणार .हा माझा जावई होणार.असे मला आत कुठे तरी वाटत होते.
(मुकुंदा)
अण्णासाहेबांकडे जेवायला गेलो त्या दिवशी सर्वांच्या डोळ्यात मला विशेष वेगळी चमक दिसत होती .प्रत्येकजण मला निरखून पाहात होता.त्याच दिवशी संध्याकाळी मी समुद्रावर गेलो आणि मला नेहमीप्रमाणे राधिका दिसली .या वेळी केवळ ओळखीचे स्मित न करता ती धिटाईने पुढे आली आणि तिने सहजगत्या गप्पा मारण्याला सुरुवात केली .आम्ही बरोबरच समुद्रावर गप्पा मारत फिरलो.नंतर वाळूवर बसून अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे दोघेही मूकपणे पाहत होतो .अस्ताला जाणाऱ्या सूर्याची कोवळी किरणे राधिकाच्या चेहऱ्यावर पडली होती .त्या प्रकाशात तिचा मूळचा गौरवर्ण खुलून दिसत होता .
*नंतर आमचा हा रोजचाच कार्यक्रम झाला .
*थोड्याच दिवसांत आम्ही अण्णासाहेबांना ग्रीन सिग्नल दिला .
*मला माझ्या आई वडिलांनाही दुखवायचे नव्हते.
*त्यांना साग्रसंगीत राधिकेला दाखवण्याचा कार्यक्रम झाला .
*त्यांचा नकार येण्याचे काहीच कारण नव्हते
*अण्णासाहेबांनी मला पुढील शिक्षणासाठी मदत केली .
*आज मी एका नामांकित संशोधन संस्थेमध्ये मुख्य संशोधक म्हणून काम करीत आहे.*
* राधिकाने सीए केले. तिच्या अगोदरच सीएच्या काही टर्मस् झाल्या होत्या.*
* ती एका सीए फर्ममध्ये काम करीत आहे.*
*अशी ही आमच्या म्हटले तर लव्ह मॅरेज म्हटले तर अॅरेंज्ड मॅरेजची कहाणी*
(समाप्त )
४/९/२०१९©प्रभाकर पटवर्धन