स्री
असेच एकदा पहाटे पहाटे
तिने आईला विचारले ,
आई,मन म्हणजे काय ग?
आई चमकली ,क्षणभर बावरली
मग हळूच कुजबुजली
तुला काय करायचंय ?
मन बायकांसाठी नसतंच
फक्त पुरुषांपाशी असतं
ते बायकांनी राखायचं !
तिने डोळ्यातली प्रश्नचिन्ह
हळूच विझवली आणि
उत्तराच्या उजेडात
चाचपडू लागली !
मग एका दुपारी
सासरी निघतांना
तिने आईला विचारले
आई ,स्वातंत्र्य म्हणजे काय गं ?
आई धास्तावली ,विचारात पडली
कसनुसं हसून बोलली ,
तुझ्या बाबांना विचारून
मग सांगेन ,
पण ते जाऊदे
महत्वाचे ऐक आता
तुझे सारे अस्तित्व
नवऱ्यासाठी आहे
त्याने बस म्हटले
बसायचे
ऊठ म्हटले
उठायचे
हांस म्हटले
हसायचे
रड म्हटले
रडायचे !
गळ्यात दाटून येणाऱ्या
हुंद्क्याबरोबरच तिने
स्वातंत्र्य म्हणजे काय
हा प्रश्नही गिळून टाकला
आणि
सासरी पाऊल ठेवले
मग
एका संध्याकाळी
सूर्य डूबत असतांना
तिला तिच्या नातीने विचारले
आज्जी ,स्त्री म्हणजे काय असते गं ?
सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने ,
मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने
ती झट्कन बोलली ,
हात्तिच्या! त्यात काय एवढें
अगं, स्री सुद्धा मनुष्य असते
तिला तिचे आयुष्य असते
तुडवली तर नागीण असते
डिवचली तर वाघीण असते
कडाडली तर वीज असते
तान्ह्या बाळाची नीज असते
आणि बरं का पोरी ,
तिच्याच गर्भात
भविष्याचे बीज असते !!!
व्यक्ती सापेक्षता ...काळानुसार संदर्भ बदलतील तरी स्त्री ती स्त्री च पुरुषांची तिच्या कडे बघण्याची मानसिकता ही बदलतेय हे गृहीत .
©मधुरा धायगुडे