असूया टाळायला हवी!
सामान्य माणूस नेहमी आपल्या भोवतालच्या समदुःखी माणसांचा शोध घेत असतो. असा शोध घेणाऱ्या माणसाच्या मनातली घालमेल अभिव्यक्त करणारी माझी एक कविता मी समाज माध्यमात नुकतीच पोस्ट केली होती. कवितेच्या ओळी साधारणपणे अशा होत्या-
मला प्रश्न पडतो, तुला पडतो का?
मला प्रश्न नडतो, तुला नडतो का?
माझी कविता सामान्य माणसाच्या मनाचं प्रतिनिधीत्व करीत असून ती खूप आवडल्याचं कळविताना वसई येथील माझ्या एका ज्येष्ठ मित्रानं म्हटलं की, "समदुःखितांचा शोध घेणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. गेली दोन वर्षे आपण सर्वजण कोरोनाशी लढू शकलो; कारण कोरोनाने कुणाचीही गय केली नाही. मी एकटाच या संकटात सापडलेलो नाही; तर माझ्यासारखे असंख्य लोक या संकटात सापडले आहेत. या एकाच गोष्टीमुळे सामान्य माणसाला धीर आला आणि त्यामुळेच आपण कोरोनाशी यशस्वीपणे दोन हात करु शकलो." आपल्या या प्रतिक्रियेच्या अखेरीस या विषयी मी काहीतरी भाष्य करावं असा माझ्या या मित्राचा आग्रह देखील होता.
वास्तविक माझ्या मित्राचं म्हणणं काही अंशी खरं असलं तरी ते मला बरं वाटलं नाही. कारण सामान्य माणूस समदुःखितांचा शोध घेतो. त्यामागे त्याच्या मनातील 'असूया' ही दुर्गुण ठरणारी भावना कारणीभूत असते. मी एकटाच दुःखी असेल तर मला वाईट वाटतं. मात्र माझ्यासारखे अन्य अनेक जण दुःखी आहेत ही भावना माणसाला सुखावते. याचा अर्थ त्याचं दुःख कमी होतं असं नाही. तर त्याची 'असूया' सुखावते आणि दुःख कमी झाल्यासारखं वाटतं. कोरोनाकाळात माझ्यासारखीच खूप माणसे दुःखी होती. म्हणून माझे दुःख कमी होत नाही. तर माझी 'असूया' कमी होते इतकाच त्याचा अर्थ आहे. माझ्याच वाट्याला हे दुःख का? असा प्रश्न या असूयेमधूनच येत असतो.
'असूया' हा शब्द व्यवहारात फारसा परिचित नाही. त्याऐवजी आपण 'मत्सर' हा शब्द वापरतो. इंग्रजीत आपण त्याला 'जेलसी' असे म्हणतो. एखादा माणूस जास्त मत्सरी असेल तर त्याला ग्रामीण भाषेत 'जळकू' असंही म्हटलं जातं. असा जळकू स्वभाव हा आपला स्थायीभाव असुन चालणार नाही हे खरं असलं तरी जगातल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी या जळकूपणाची अर्थात असूयेची बाधा होतेच. पौराणिक काळात सुध्दा ही असूया सर्वांच्या ठायी कधी ना कधी विराजमान झालेली दिसते. पुराणकथेतील श्री दत्तात्रेयांची आई ही एकच व्यक्ती याला अपवाद होती म्हणून त्यांचे नाव 'अनसूया' असं होतं. ('अनुसया' नव्हे.) अशी नोंद ग्रंथांमध्ये दिसून येते.
मानवी मनात ही असूया मोठ्या प्रमाणात दिसून येते. एखाद्याने चांगली उत्तम कविता लिहील्यावर आपल्या मुखातून "व्वा! क्या बात है!" असे दाद देणारे शब्द उमटत असले तरी मनात मात्र " च्यायला, हे मला का नाही सुचलं?" अशी असूया निर्माण होत असते. असं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रोज अनुभवाला येतं. या असूयेमुळेच मानवी मन सतत समदु:खितांचा शोध घेत राहातं! याप्रसंगी मला आमच्या सरांनी सांगीतलेली एक गोष्ट आठवते. ते सांगायचे की, फार पूर्वी अहमदनगर शहरात एक कुबडी म्हातारी राहात असे. तिच्या पाठीवरील कुबडामुळे ती फारच विचित्र दिसायची. चालताना किंवा शरीराची कोणतीही हालचाल करताना तिला खूप त्रास होई. रस्त्याने येता-जाताना तिची अवस्था कठीण होत असे. त्यात आजूबाजूची लहान मुलं तिला खडे मारुन चिडवित असत. ती कुबडी म्हातारी या त्रासाला अगदी कंटाळली होती; मात्र तिने आपलं नियमित चर्चला जाऊन प्रार्थना करणं कधीच चुकवलं नाही. एक दिवस तिची प्रार्थना फळाला आली. प्रभू येशूने तिला दर्शन दिलं आणि तिला "काय हवंय?" असं म्हणत तिची इच्छा विचारली. तेव्हा ती कुबडी म्हातारी प्रभू येशूला तात्काळ म्हणाली- ''मला काहीच नको देवा!" म्हातारीच्या या उत्तराने चकित झालेल्या प्रभू येशूने म्हटलं- "अगं, मी तुझ्यावर प्रसन्न होवून तूला वरदान देण्यासाठीच आलो आहे. त्यामुळे तू तुला हवं ते वरदान मागून घे." आता म्हातारी थोडी उत्साहाने पुढे होत म्हणाली- "देवा, मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाहीय; परंतु तुमचा इतका आग्रहच आहे, तर तुम्ही या शहरातल्या सगळ्या माणसांना माझ्यासारखंच कुबडं बनवा!" मानवी मनातील 'असूया' किती घातक आहे हे या गोष्टीवरुन आपल्या लक्षात आले असेलच.
मानवी मनात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वरुपातल्या अनेक इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती, भावना, कल्पना, विचार इ. गोष्टी अस्तित्वात असतात. आपण व्यक्त होण्यासाठी त्यापैकी कशाची निवड करतो यावरुन आपलं कर्म ठरतं. आणि आपलं कर्म जसं असेल तसा भोग आपल्याला मिळतो किंवा तसं कर्मफल आपल्याला प्राप्त होतं. अशा रितीने आपली कर्मगति किंवा ज्याला आपण नशिब वगैरे म्हणतो ते निश्चित होतं.
आपणास काय हवं आहे, हे आपण एकदा ठरविलं की त्यासाठी मनातून नेमकं काय घ्यायचं हे आपणास नेमकेपणानं ठरविता येतं.
उदा. आपल्याला चहा हवा असेल तर किचनमधून आपण साखर घेतो, साखरेसारखंच दिसणारं आणि साखरेच्या डब्याजवळच असलेलं मीठ आपण घेत नाहीत!
पण बऱ्याच लोकांना आपल्याला काय हवं? हे ठरवता येत नाही. मग ते त्यांना काय नकोय? हे ठरविण्याचा प्रयत्न करतात. असे लोक चहा करताना अनावधानाने किचनमधल्या साखरेऐवजी मिठाची निवड करतात. मग त्यांना चहा कसा मिळेल? हा सगळा मनाचा कारभार समजून घेतला की जगणे सोपं होतं.
मानवी जीवन आनंदी व्हायचं असेल तर समदु:खितांचा शोध घेवून, त्यामुळं आपलं दुःख हलकं झाल्याचा केवळ आभास निर्माण करुन स्वतःची फसवणूक करणं आपण टाळायला हवं. आपण खऱ्याखुऱ्या आनंदाचा शोध घ्यायला हवा. तुमच्याजवळ इतरांची गरज भागवणारं ज्ञान, धन, वेळ, श्रम यासारखं जे काही असेल ते तुम्ही खऱ्या गरजूंना मनापासून दिलंत तर तुम्ही आनंदमय व्हाल, यात शंकाच नाही!
© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५