Get it on Google Play
Download on the App Store

माझं या जगात येण्याचं प्रयोजन काय?

समुपदेशनासाठी माझ्याकडे आलेला धीरज आपली समस्या मला सांगत होता. सुरुवातीला धीरज अबोल होता. काहीच बोलत नव्हता. माझ्या नेहमीच्या पद्धतीनं मी त्याला बोलतं केलं. आता मी त्याचं बोलणं मन लावून ऐकत होतो. धीरजच्या नावात 'धीर' असला तरी त्याच्या बोलण्यात आता सध्या तरी जरासाही धीर दिसत नव्हता. अधीरपणे एकामागून एक अशी जोरदार प्रश्नार्थक वाक्ये तो फेकत होता. अर्थात त्यामुळंच त्याचं मन हलकं व्हायला मदत होणार होती! एकदा त्याच्या मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा झाला की मगच मी त्याला सांगीतलेल्या गोष्टींचा तो योग्य पद्धतीने स्वीकार करु शकणार होता. त्यामुळे त्याच्या बोलण्यात कोणताही अडथळा येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेत होतो.

साधारण पंधरा मिनिटे सलगपणे धीरज बोलला असावा. बोलता बोलता त्याला सतावणारे काही महत्वाचे प्रश्न त्याने माझ्यासमोर मांडले होते. या प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती.

धीरजने मला असे कोणते प्रश्न विचारले असतील? अशी उत्सुकता एव्हाना तुमच्याही मनात निर्माण झाली असेल. धीरजने मला पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले होते-
१) माझं या जगात येण्याचं प्रयोजन काय? किंवा मी कशासाठी जन्माला आलो आहे?
२) माझ्या आयुष्यात जी विविध माणसे आली आहेत, ती माझ्या आयुष्यात का आली आहेत? किंवा मी त्यांच्या आयुष्यात का आलो आहे?
३) मला चांगलं जगायचं आहे. तर मी नेमकं कसं जगलं पाहिजे?

मित्रहो, धीरजला पडलेले हे प्रश्न आपल्यापैकी अनेकांना कधीतरी नक्कीच पडले असतील. किंबहूना जीवन कळून घ्यायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला हे प्रश्न पडायलाच हवेत. आपल्याला प्रश्न पडला तरच आपण त्याच्या उत्तराचा शोध घेतो आणि 'शोधलं की सापडतंच!' असा सृष्टीचा नियमच आहे.

धीरजने मांडलेले सर्व प्रश्न हे आपल्या सर्वांनाच पडलेले प्रश्न आहेत असं समजून त्यांची उत्तरं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करुयात.

१) मी या जगात का आलो? किंवा माझा जन्म का झाला? या प्रश्नाचं सर्वात योग्य आणि सोपं उत्तर आहे- माझा जन्म फक्त या जगाची गरज भागविण्यासाठी झाला आहे. या जगातील रिक्त जागा म्हणजे कमतरता किंवा उणीव भरुन काढण्यासाठी मी या जगात आलो आहे! आपल्या जवळची ताकद, गुण, कौशल्ये, विशेषता इ. वापरुन या जगात आनंद निर्माण करणे या एकमेव हेतूसाठीच आपला जन्म झाला आहे.

आपण जन्माला येताना आपल्या हाताच्या मुठी बंद असतात. या आपल्या बंद मुठीत निसर्गानं काहीतरी ताकद, गुण, कौशल्ये, विशेषता इ. दिलेली असते. तिचा आपल्याला आयुष्याच्या पूर्वार्धात शोध घ्यायचा असतो.  आपण वेगवेगळे शिक्षण, प्रशिक्षण घेवून आपल्या बंद मुठीत दडलेली ताकद, गुण, कौशल्ये, विशेषतांचा शोध घेण्याचा व त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना हा शोध अचूकपणे घेता येतो त्यांचं जगणं सुरु होतं. ते स्वतः आनंदी राहतात आणि आपल्या वकुबानुसार आपल्या भोवतालचं जग आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना हा शोध अचूकपणे घेता येत नाही त्यांचं जगणं मात्र भरकटत जातं. ते स्वतःही दुःखी राहातात आणि भोवतालच्या जगालाही सतत दुःख देतात.

२) माझ्या आयुष्यात विविध माणसे आली आहेत. नेमकी हीच माणसं माझ्या आयुष्यात का आली आहेत? किंवा मी त्यांच्या आयुष्यात का आलो आहे? या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना पहिल्या प्रश्नाच्या उत्तरांचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. तो असा की, या जगात जन्माला आलेला प्रत्येकजण जगाची गरज भागविण्यासाठी आणि जगातील कमतरता किंवा उणीव भरुन काढण्यासाठी या जगात आला आहे! याचा अर्थ आपल्या आयुष्यात आलेली विविध लहान मोठी माणसं एकतर आपली किंवा कदाचित त्यांची गरज भागविण्यासाठीच आपल्या आयुष्यात आली आहेत. आपल्या एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठीच आपण एकमेकांशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडले जातो. गरज संपली की हे नातेही संपते! कधी कधी हे नाते आपोआप, नकळतपणे संपते तर कधी हे नाते आपणास प्रयत्नपूर्वक संपवावे लागते. आपण बारकाईने विचार केला तर आपल्या आयुष्यातले अनेक घटना प्रसंग आपल्याला या गोष्टीची साक्ष देतील. आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक लोकांच्या बाबतीत असे घडल्याचा अनुभव तुम्ही सर्वांनीच घेतला असेल यात शंकाच नाही.

३) मला चांगलं जगायचं आहे. तर मी नेमकं कसं जगलं पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर समजून घेताना पहिल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी या जगात का आलो आहे याबाबत आपली समज स्पष्ट आणि पक्की असेल, आपल्या आयुष्यात विविध माणसं का येतात याची जाणीव आपल्याला योग्य रितीनं झाली असेल तर आपण चांगलं कसं जगावं हे आपणास सहज ठरवता येईल. ढोबळ मानाने आपणास असं म्हणता येईल की, आपलं जगणं हे आपण या जगात जन्माला येण्याच्या हेतूची यथार्थ पूर्तता करणारं असलं पाहिजे. म्हणजेच आयुष्य जगताना आपण जगातल्या उणीवा किंवा कमतरता भरून काढण्यासाठी आपली ताकद, गुण, कौशल्ये, विशेषता यांचा पुरेपुर उपयोग केला पाहिजे. आपल्या जवळच्या ताकद, गुण, कौशल्ये व विशेषतांचा उपयोग भोवतालच्या गरजू लोकांच्या गरजा भागविण्यासाठी पर्याप्त स्वरूपात केला पाहिजे. आपल्या जवळ असलेलं ज्ञान, धन, साधन, माहिती, अनुभव, कला, कौशल्य इतकंच नव्हे तर तुमचा वेळ, श्रम, शक्ती हे सगळं समाजातील गरजूंना आनंदानं आणि समाधानी वृत्तीनं दिलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सभोवताली आनंद निर्माण होईल आणि आपला जन्माला येण्याचा हेतू सफल होईल. हे जग आनंदी व्हावं, आनंदी रहावं हीच श्रींची इच्छा आहे. आपल्या जगण्यानं ही श्रींची इच्छा पूर्ण व्हायला हवी. समाजातल्या तुमच्या भोवतालच्या गरजूंना जे जे आणि जितकं अधिक देणं तुम्हाला शक्य आहे ते ते तुम्ही द्यायला हवं. तेच तुमचं जगणं म्हणजे चांगलं जगणं आहे! तोच तुमच्या मुक्तीचा एकमेव महामार्ग आहे! जोपर्यंत तुमच्या जवळचं सगळं तुम्ही देत नाहीत तोपर्यंत तुम्हाला 'पुनरपि जननम्... पुनरपि मरणम्' याचाच प्रत्यय येत राहील. जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर याच जन्मात आपण रिक्त व्हायला हवं!

© अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५