Get it on Google Play
Download on the App Store

फावल्या वेळेचं काय करायचं?

जवळ जवळ मागची दोन वर्षे आपण कोरोनाशी लढतो आहोत. कोरोनाशी लढताना लोकांच्या गर्दीत असताना मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर किंवा साबणाने हात वारंवार धुणे, सामाजिक सुरक्षित अंतर राखणे यासारखे उपायांसोबतच कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली. सरकारच्या या आदेशामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना लगाम बसला हे खरे; पण कार्यालये, कारखाने, वाहतुकीची सार्वजनिक साधने बंद झाल्याने अनेकांना आपला रोजगार सोडून घरात बंदिस्त व्हावे लागले. हातात कोणतेच काम नसताना घरात नुसते बसून राहणे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा परिणाम दर्शवणारे ठरले.

अ) ज्यांना रोज काम करूनच चुल पेटवता येते अशा लोकांना ही परिस्थिती मरणाहूनही कठीण होती.
ब) ज्यांची सांपत्तीक स्थिती पुष्कळ चांगली आहे त्यांना फक्त घरात बसून वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडला होता. फावल्या वेळात काय करायचं या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही केल्या सापडत नव्हतं. त्यामुळं ही माणसं हवालदिल झाली होती.

खरंच आपल्याला मिळणाऱ्या फावल्या वेळाचं काय करता येईल बरं?

या संदर्भात महाभारतात एक सुंदर कथा आली आहे, ती अशी की- पांडवाना कौरवांशी द्युतात हरल्यामुळे बारा वर्षाचा वनवास भोगण्याची वेळ येते. या वनवासात पांडव द्रौपदी सह अव्दैतवनात रहात असताना त्यांची विचारपूस करायला भगवान श्रीकृष्ण वनात पांडवांकडे येतात. त्यांच्या ख्याली खुशालीची चौकशी करतात. बोलता बोलता ते भीमाला विचारतात- "भीमा, आता वनवासात असताना तू काय करायचं ठरवलं आहेस?''

त्यावर भीम म्हणतो, "आता आमच्याकडे पुष्कळ मोकळा वेळ आहे. मी भरपूर जेवणार आणि भरपूर झोपणार आहे."
असाच प्रश्न विचारण्यासाठी ते झाडाखाली बसलेल्या नकुल आणि सहदेवांकडे जातात. झाडाखाली नकुल आणि सहदेव सारीपाटाचा डाव मांडून खेळत बसलेले दिसल्यावर त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रश्नच विचारीत नाहीत. आपल्या कपाळावर हात मारुन भगवान युधिष्ठिराकडे जाऊन आपली नाराजी व्यक्त करतात. भगवान म्हणतात- "हे युधिष्ठिरा, तुम्हाला वनवासात मिळालेल्या या मोकळ्या, फावल्या वेळेचा तुम्ही काहीच चांगला उपयोग करीत नाहीत. तुम्ही असा वेळ वाया घालविणे बरे नाही!" जवळच असलेला अर्जुन त्यावर म्हणतो- "हे श्रीकृष्णा, आमच्याकडे वेळच वेळ आहे. आम्ही त्याचं करणार तरी काय?"

तेव्हा भगवान श्रीकृष्ण हलकंसं हसून म्हणाले- "पांडुपुत्रांनो, चला आपण इंद्रदेवाकडे जाऊया.'' ते पुढे म्हणतात- " हे अर्जुना, तुला मृंदूंगवादन शिकायचं आहे. युधिष्ठिराला सल्लागाराचे प्राविण्य मिळवायचे आहे. भीमाला पाककला अर्थात स्वयंपाकाची कला शिकायची आहे. सहदेवाला घोडे राखायला आणि नकुलाला रथ चालवायला शिकायचं आहे. तर द्रौपदीला घराची झाडलोट आणि साफसफाई करणं शिकायचं आहे." श्रीकृष्णाचे हे बोल ऐकताच द्रौपदीसह सर्व पांडव आचर्यचकित होऊन भगवान श्रीकृष्णांकडे पाहू लागले. इतक्यात युधिष्ठिराने प्रतिप्रश्न करुन म्हटले, "कितीही केलं तरी आम्ही राजघराण्यातली घरंदाज माणसं आहोत. आम्हाला हे सगळं शिकून काय करायचंय?"

भगवान श्रीकृष्ण पुन्हा एकदा हसले आणि "आता जास्त विचार करत बसण्याची ही वेळ नाही." असं पांडवांना म्हणत त्यांनी सर्वांना इंद्रदेवाकडे नेले. तिथं गेल्यावर पांडवांनी भगवान म्हटल्याप्रमाणे विविध कामे शिकून घेतली.

पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. परंतु हा वनवास संपल्यावर आणखी एक वर्षाचा अज्ञातवास पुर्ण करायचा होता. या एक वर्षाच्या अज्ञातवासात कौरवांनी पांडवांना पाहिल्यास पुन्हा चौदा वर्षाचा वनवास पांडवांना भोगावा लागणार होता. आता या अज्ञातवासाच्या एक वर्षाच्या काळात आपण कुठं रहायचं? असा प्रश्न पांडवांना पडला होता. तेव्हाही भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीला पुन्हा आले आणि म्हणाले की, ''पांडवांनो, काळजी करु नका. तुम्ही रिकाम्या वेळात जी इंद्राकडे जाऊन काम शिकलात ना, त्याचा तुम्हाला आता खरा फायदा होईल."

पांडव आश्चर्याने आणि उत्सुकतेने श्रीकृष्णांचे बोलणे ऐकत होते. बोलता बोलता श्रीकृष्णांनी अज्ञातवासात असताना पांडवांनी विराट राजाकडे रहावे असे सुचविले.

भगवान श्रीकृष्णांच्या सुचनेनुसार द्रौपदीसह सर्व पांडव स्वतःची खरी ओळख लपवून विराट राजाकडे सेवकाची कामे करु लागले. युधिष्ठिर 'कंक' नावाचा ब्राह्मण बनुन विराट राजाचा राजाला सल्लागार झाला. भीमाने 'बल्लव' हे नाव धारण करुन आचाऱ्याचे काम सुरु केले. अर्जुनाने 'बृहन्नडा' चे रूप धारण केले आणि तो मृदंगवादक बनला. सहदेव घोडे राखणारा आणि नकुल रथाचा सारथी बनला तर द्रौपदी विराट राजाच्या राणीची दासी बनली. अशा रितीने फावल्या वेळात शिकलेल्या कला- कौशल्यांचा योग्य वेळी योग्य वापर करुन पांडवांनी आपला अज्ञातवासाचा सर्वात कठीण काळ यशस्वीपणे पुर्ण केला.

या कथेवरुन आपणास हे समजते की, आपल्याला रिकामा वेळ मिळाला की तो नुसत्या झोपा काढण्यात, खाण्यात आणि गेम्स खेळण्यात वाया घालवायचा नसतो. या वेळात आपल्या बुद्धीला चालना मिळेल अशी कामं आपण करायला हवीत. नवीन कला, कौशल्ये आत्मसात करायला हवीत.

व्यायाम, योग याबरोबरच घरगुती दुरुस्तीची वा सफाईची कामे करणे, अवांतर वाचन, विद्यार्थ्यानी आपल्या अभ्यास विषयांचा अभ्यास करणे, पाककलेतून वेगवेगळे पदार्थ करायला शिकणे, स्त्री- पुरुषांनी एकमेकांची म्हणजे स्त्रियांनी पुरुषांची व पुरुषांनी स्त्रियांची समजली जाणारी कामे करायला शिकणे व त्यात प्राविण्य मिळवणे, शेतकरी कुटूंबातील असाल तर शेतीची कामे करणे यासाठी हा मिळालेला फावला वेळ आपण वापरायला हवा.

याशिवाय विविध धर्मग्रंथ आणि ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन करुन त्यांचे आकलन करण्याचा प्रयत्न या मोकळ्या वेळेत निश्चित करता येईल. आपण शिकलेली कोणतीच गोष्ट कधीच वायाला जात नाही.

शिक्षणामुळे 'ज्ञान' आणि ज्ञानामुळे 'विवेक' मिळतो. या विवेकातूनच आपणास संयम, धैर्य, आत्मबल, आत्मविश्वास या दुर्लभ व दुर्मिळ गुणांचा लाभ मिळवता येतो. या गुणांचा लाभ मिळाला की आनंद, सुख आणि समाधान आपल्या मुठीत अलगद येवून बसतं!

कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला भरपूर फावला वेळ मिळतो आहे. आपणास मिळालेल्या फावल्या वेळेत आपण आपल्या स्वतःसाठी इतकं तर नक्कीच करायलाच हवं!

© अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५