आठवण - वेदना नव्हे प्रेरणा!
मानवी जीवनात अखंडपणे असंख्य घटना-प्रसंग घडत असतात. हे घटना-प्रसंग, त्यांची पार्श्वभूमी, त्यांची कारणे, त्यांचे संदर्भ, त्यांचे परिणाम प्रत्येकवेळी निरनिराळे असतात. क्वचित प्रसंगी अशा घटना प्रसंगाची पुनूरावृत्ती होते. अशा वेळी भूतकाळात घडलेल्या घटना प्रसंगाची चित्रमालिका क्षणभरात आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. त्या घटना प्रसंगाची पार्श्वभूमी, त्यांची कारणे, त्यांचे संदर्भ, त्यांचे परिणाम हे सगळंच आपल्या मेंदूने नोंदवून ठेवलेलं असतं. त्या सगळया नोंदी पटापट आपल्या मनःचक्षूसमोर येतात. आपण काही काळ त्यात गुंतून राहातो. यालाच आपण 'आठवण' असं म्हणतो.
काही आठवणी आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या, मनाला उभारी देणाऱ्या, मनाची प्रसन्नता व उत्साह वाढवणाऱ्या, आंतरिक ओढ लावणाऱ्या, आपला भावनावेग नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या, मनोबल वाढवणाऱ्या, मार्गदर्शक व प्रेरक ठरणाऱ्या असतात. या प्रकारच्या आठवणींना 'सकारात्मक आठवणी' म्हणता येईल. याऊलट काही आठवणी आपल्याला नकोशा वाटणाऱ्या, मनाला निराश करणाऱ्या, चीड आणणाऱ्या, आपल्या भावनांवरचे आपले नियंत्रण घालवून टाकणाऱ्या, संतापजनक, दुःखद, आपला आत्मविश्वास कमी करणाऱ्या असतात. या प्रकारच्या आठवणींना 'नकारात्मक आठवणी' म्हणता येईल.
आपले आरोग्य अबाधित राखण्यासाठी सकारात्मक आठवणी जितक्या उपयुक्त ठरतात तितक्या नकारात्मक आठवणी उपयुक्त ठरत नाहीत. म्हणून नकारात्मक आठवणींना विसरण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतो. तसे करणेच आपल्या हिताचे असते. अर्थात भूतकाळात घडलेल्या आपल्या जीवनातील काही घटना-प्रसंगांचा आपल्या मन- मेंदूवर खोलवर परिणाम झाला असेल, तर त्याबाबतच्या आठवणी सहजासहजी विसरता येत नाहीत. त्यासाठी 'काळ' हेच उत्तम औषध ठरते. कालपरत्वे हळूहळू या आठवणी पुसट होत जातात. त्यालाच 'विस्मृती' किंवा 'विसरणे' असं म्हटलं जातं. 'विस्मृती' ही निसर्गाकडून माणसाला मिळालेलं एक महत्त्वाचं वरदान आहे असं मानलं जातं. त्यामुळं काळाच्या प्रवाहात माणसाला नकोशा, वेदनादायक, दुःखदायक गोष्टींची तीव्रता हळूहळू कमी होते आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्या गोष्टी विसरुन जातो.
असं असलं तरी 'विसरणं' ही एक 'कला' आहे असं मला वाटतं. विसरण्याची ही कला माणसाला प्रयत्नपूर्वक आत्मसात करता येते. मात्र 'विसरणं' म्हणजे 'विसर्ग' नव्हे! हे आपण नीट समजून घ्यायला हवं. काय, कधी आणि कसं विसरायचं? याचं ज्ञान आणि भान माणसाला मिळवावं लागतं. आपल्या आयुष्यातील कोणतीच आठवण संपूर्णपणे सोडून द्यायची नसते. आपण आठवणींचा विसर्ग करायला लागलो तर आपल्यावर केवळ शुष्क, कोरडे, रुक्ष आणि दिशाहीन जीवन जगण्याची नामुष्की ओढवेल. अशा जीवनात भावनिक वा आंतरिक ओढ, ओलावा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह यापैकी कशालाही स्थान राहणार नाही.
आठवणी जपल्या जातात, त्या जपाव्या लागतात कारण 'आठवण' ही एक अत्यंत वेगळी बाब आहे. आपल्या आठवणी सुखद, दुःखद, चांगल्या, वाईट कशाही असल्या तरी आपल्याला त्या प्रेरणा देतात, उभारी देतात, आनंदही देतात. क्वचित दुःखद आठवणी सुद्धा आपलं साचलेलं मन रितं करुन त्यात नवी उमेद भरायला मदत करतात. म्हणून आठवणी आठवल्या पाहिजेत. त्यासाठी आधी त्या साठविल्या पाहिजेत. परिस्थितीने गोठवलेल्या आठवणी सुद्धा एखाद्या प्रसंगी उत्तेजित होऊन किंवा पुनर्जीवित होऊन मार्गदर्शक ठरतात! काही उदाहरणांच्या मदतीने हा मुद्दा आपणास अधिक चांगल्या रीतीने समजून घेता येईल.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या रामदासने त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या खिशातून दहा रुपये चोरले होते. गोळ्या बिस्किटांसाठी रामदासने ही चोरी केली होती. २५ पैशाचे एक नाणे रामदासला हवे होते परंतु वडिलांच्या खिशात दहा रुपयांहून कमी रकमेचे सुट्या पैशांचे नाणे मिळाले नसल्याने रामदासने दहा रुपये काढून घेतले होते. रामदास दहा रुपये घेवून दुकानात गोळ्या बिस्किटे आणण्यासाठी गेला तेव्हा दुकानदारही क्षणभर बुचकळ्यात पडला. दुकानदाराने रामदासला २५ पैशांची गोळ्या- बिस्किटे दिली. "रामदास, तू पैसे राहू दे, मी तुझ्या वडिलांकडून नंतर घेईल" असे सांगत दहा रुपयांची नोट दुकानदाराने रामदासला परत केली. रामदासची चोरी पकडली गेली. वडिलांनी रामदासला चांगले बदडून काढीत माणसाने कधीच चोरी करायची नसते. ही शिकवण दिली.
रामदासच्या आयुष्यात पंचेचाळीस वर्षापूर्वी ही घटना घडली. काळाच्या प्रवाहात रामदासला या घटनेचा विसर पडला असला तरी ज्या ज्या वेळी रामदासला स्वार्थापोटी लहान मोठी लबाडी वा चोरी करण्याचा मोह होतो, त्या प्रत्येक वेळी रामदासला या घटनेची आठवण येते आणि त्या आठवणीमधूनच त्याला आपला मोह आवरण्याचे, चोरी-लबाडी न करण्याचे मार्गदर्शन मिळते आणि प्रामाणिक राहण्याची प्रेरणा मिळते.
या उदाहरणात चोरी केल्यामूळे वडिलांनी मला खूप मारले, बदडून काढले, ही गोष्ट रामदासला रोज आठवत नसली तरी रामदास हा प्रसंग पूर्णपणे विसरलेला नाही. त्याचे हे न विसरणे त्याच्यातील वर्णन सुधारण्यास उपयुक्त ठरले आहे.
रामदास आता पन्नाशीच्या पुढे गेला आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्याच्यावर मोठे आभाळ कोसळले होते. वडिलांना आपण विसरु शकणार नाही, त्यांच्याविना आपण पुढे जगुही शकणार नाही, असं रामदासला सतत वाटायचं. परंतु काळाबरोबर त्याची वडिलांची आठवण ही पुसट झाली असून तो त्याचं जीवन व्यवस्थित आनंदानं जगतो आहे. रामदासला काय, कसं, किती विसरायचं? याचं चांगलं भान आलं असल्यानं आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढ्या आठवणी येतात आणि नको तेव्हा त्याला सारं विसरता येतं.
'मला काहीच आठवत नाही' असं म्हणणारी आणि त्यामुळं दुःखी असणारी अनेक माणसं आपण पाहतो. अशा लोकांना 'स्मृतिभ्रंश' नावाचा आजार झाला आहे असं निदान वैद्यकीय तज्ज्ञांकडून केलं जातं. त्यावर उपचारही केले जातात. वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर असा स्मृतिभ्रंश झाला तर तो स्वीकारार्ह असतो; मात्र तारुण्यातील स्मृतिभ्रंश मुळीच स्वीकारार्ह ठरत नाही. थोडक्यात विस्मरण किंवा स्मृतिभ्रंश हे निरोगी माणसाचे लक्षण मानले जात नाही.
गंमतीची गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती वाढविणाऱ्या अनेक प्रकारच्या गुटी, गोळ्या, औषधे बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांच्या सेवनाने माणसाची स्मरणशक्ती वाढते, वाढवता येते अशा आशयाच्या कित्येक जाहीराती आपणास रोज दिसत असतात. विशेषतः विद्यार्जनाच्या काळात म्हणजे विद्यार्थी जीवनात स्मरणशक्ती अत्यंत महत्वाची, आवश्यक आणि अपरिहार्य मानली जाते. तितकी ती इतर काळात मानली जात नाही. त्याचा परिणाम आपल्या रोजच्या कामातल्या परफॉर्मन्सवर आणि पर्यायाने आपल्या जगण्यावर होतो.
"माणसाने लक्षात तरी काय काय ठेवायचे?"
"काहीच लक्षात राहात नाही."
"मी विसरभोळा आहे."
अशा आशयाची विधाने आपण दैनंदिन जीवनात सहजपणे बोलत किंवा ऐकत असतो. तसेच
'फायद्याचं बरं लक्षात राहातं तुमच्या" हे वाक्यही आपण अनेकदा ऐकलेलं असेल. या एका वाक्यावरून आपल्या स्मरणशक्तीच्या व्यवच्छेदक लक्षणाचा प्रत्यय येतो. जी गोष्ट उपयोगाची आहे, गरजेची आहे, निकडीची आहे, फायद्याची आहे अशी गोष्ट लक्षात ठेवण्याकडे आपला सर्वसाधारण कल असतो. हे खरेच आहे. स्मरणशक्तीसंबंधी विचार करताना काय लक्षात ठेवायचे आहे? का लक्षात ठेवायचे आहे? किती लक्षात ठेवायचं आहे? कोणी लक्षात ठेवायचं आहे? कसं लक्षात ठेवायचं आहे? हे पाच प्रश्न खूप महत्वाचे ठरतात.
आठवणी येतात आठवणी जातात
येणारीला येवू द्यावे जाणारीला जाऊ द्यावे
आठवणीला आठवावे आठवणीला साठवावे
© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५