भाग ११
दुसरे दिवशी सकाळी कॉलनीतल्या मुलांनी मिळून नरकासूर बनविला . कॉलनीच्या मेन गेटकडे संध्याकाळ च्या कार्यक्रमचा आलेख लिहून एक मोठा बोर्ड बसविला . घरात संध्या , वेणू , लता व दिपा सगळे मिळून रांगोळीचे डिझाईन व रंग बनविण्यात दंग होत्या . स्वप्नीलला घरातलं आणि बाहेरचं वातावरण बदलेलं वाटलं . सगळं काही आनोख आणि वेगळं वाटू लागल . तो आश्चर्यचकित होऊन सर्व काही निरखू लागला .
" अरे स्वप्नील , असा कां गप्प शांत बसलास ? तू आमच्या कोणाशी काहीच का बोलत नाहीस . काय झालं ? " संध्या त्याच्या शेजारी बसत म्हणाली .
हलकेच हसून " अगं , काहीच नाही . मी घरातल पूर्वीच वातावरण आणि आताच वातावरण ह्याच्यात फरक शोधत होतो . संध्या , तुला माहीत नाही . तुझ्या मुळे घरातल्या आनंदात कि ऽऽ त्ती भर पड़लय ते . " स्वप्नील म्हणाला .
" म्हणजे ? तू काहीही बोलतोस . तसं काहीही नाही . " संध्या म्हणाली .
" तसच आहे . पूर्वी तू कशी होतीस आणि आता तू कशी आहेस . तुझा हाच बदल आम्हा सर्वांसाठी सुखदायक आहे . ह्याची जाणीव तुला नाही . "
" तुझ्यासाठी कॉफी बनवू कां ? " एक दीर्घ सुस्कारा सोडत संध्याने विचारल .
" हो हो कां नाही . फक्त माझ्यासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी बनव . चहा घ्या आणि लौकर तयार व्हा . खाली कार्यक्रम बघायला जायचयं . " स्वप्नील ही सुस्कारा सोडत म्हणाला .
चहा घेऊन सर्वजण खाली उतरले . कार्यक्रमाच्या ठिकाणी बरीच गर्दी जमली होती . कॉलनीच्या मुलांनी नरकासूराची मिरवणूक काढली . त्यात स्वप्नील सुद्धा सामील झाला .. नंतर काही मान्यवरांची भाषणे झाली . त्यानंतर नरकासूर बनविणाऱ्या मंडाळाला ह्या मान्यवरांनी सन्मानीत केलं . त्यावेळी त्या मंडळा तर्फे स्वप्नील बोलला . एरव्ही तो खूपच गंभीर आणि हळू आवाजात बोलत असे . पण ह्यावेळी त्याच्या बोलण्यात उत्साह , आनंद , आणि खोडकरपणा होता . त्याचं ते भाषण ऐकून त्याचे सारे मित्र आश्चर्य चकीत झाले . मग कार्यक्रम संपल्यावर साऱ्या मित्रांनी त्याला घेराव घातला .
" काय नील , यंदाची दिवाळी भलतीच जोरात दिसते . तुझ्या मनातलं काही आमच्या पासून . लपलेलं नाही . " सारे एक एक टोमणे मारू लागले . तेव्हां तिथे संध्या आली . तिला बघून
" अगं संध्या , जरा ह्यानां तू समजाव . कसे बोलतात बघ सारे . " स्वप्नील म्हणाला .
" काय झालं ? स्वप्नील , चल तू आता केवढा वेळ झालाय . सकाळी लौकर उठायचय चल . त्यांच्याकडे उद्या संबंध दिवस बोलत , गप्पा मारत बस . " असे म्हणून संध्याने सगळ्यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या आणि स्वप्नीलचा हात धरून जवळ जवळ ओढतच त्याला तिथून नेलं . सारे मित्र त्याला बघतच राहिले .
दिवाळीचा दिवस उजाडला . भल्या पहाटे उठून सर्वांनी अभ्यंग स्नान केले , नविन कपडे घातले . देवाची प्रार्थना करून , सर्वांनी गोडधोड खाल्ले सुद्धा . आता स्वप्नील पुन्हा पुन्हा गच्चीत येऊन , ' संध्या दिसते का ? ' म्हणून बघू लागला . पण ती पठ्ठी घराच्या बाहेरच पडेना . ' आता काय करावे ? ' हा विचार करून त्याने वेणूला हाक मारली . हाके सरशी ती आली .
" काय दादा . "
" वेणू मावशी कडे जा . संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाच आमंत्रण देऊन ये आणि संध्या ताई काय करते ते बघून ये . " स्वप्नील म्हणाला .
" बरं " म्हणून ती गेली . ती जाताच दिपाने स्वप्नीलला हाक मारून ' गाईला नैवेद्य देऊन यायला ' सांगितले . स्वप्नील गायीच पान घेऊन खाली भरभर उतरु लागला . तोच संध्या फराळाच ताट घेऊन वर येत असताना . दोघांची टक्कर झाली . ताट खाली पडले . मात्र संध्या क्षणभर स्तब्ध उभी राहिली . ते बघून स्वप्नीलने आपल्या हातातलं पान बाजूला ठेऊन फराळ गोळा करून तिच्या हातात दिला . तरीही ती पुतळ्या सारखी उभीच . दिपाने वरून हे सारं पाहिलं आणि फुलांचा वर्षाव केला . " संध्या ऽऽऽ " तिला जोरात हलवत स्वप्नील ओरडला . तशी ती भानावर आली .
" सॉरी , मला माफ कर . पण झालं काय ? कुठे लागल का तुला ? की ..... "
" अरे नाही , काहीही झालं नाही . पण तुझा धक्का लागला आणि मला वेगळच कसं काय वाटल कुणास ठाऊक आणि त्यात वरून कुणी फुले टाकली त्यामुळे मी आणखी जरा घाबरले . चल जाऊ दें . इटस् ओ . के . हं ! "
स्वप्नीलचं बोलणं मध्येच थांबवत संध्या म्हणाली आणि हलकेच हसून गेली .