भाग ६
मग काही वेळाने दिपा आणि लता बागेतल्या झाडाचं निरीक्षण करू लागल्या . दोघानांही झाडं खूप आवडायची . दामोदरराव आणि गोपालराव दोघेही बागेत फिरू लागले . नंतर सगळयानी जेवण घेतलं . मग वेणू खेळ खेळण्यासाठी सर्वांना आग्रह करू लागली . तेव्हा अंताक्षरी , संगीत खुर्ची वैगरे खेळ खेळले . नंतर दिपा , लता , दामोदरराव आणि गोपाल राव एका मोठ्या झाडाखाली गप्पा मारत बसले . वेणू संध्याला आपल्या सोबत पकडापकडी खेळण्यास बोलावू लागली . तिने नकार दिला . तेव्हां ती हट्टच धरून बसली . मग संध्याचा नाईलाज झाला आणि ती तयार झाली . वेणूने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि गोल फिरवलं .
" आता सांग मी कुठे आहे ? ये मला पकडायला ये . " असे म्हणून वेणू धावली . तिला पकडण्यासाठी संध्या तिच्या पाठोपाठ जाऊ लागली . जाता जाता एका मोठ्या दगडाला तिचा पाय आपटला आणि ती पडणार तोच स्वप्नीलने धावत जाऊन तिला पकडले . ती घाबरली आणि डोळ्यावरची पट्टी लगबगीने सोडली . पाहतो तो स्वप्नील तिच्यासमोर आहे . ती काहीच न बोलता लगबगीने जाऊ लागली . तोच स्वप्नीलने तिचा हात पकडला .
" संध्या , मला माफ कर . मी तुझा अपराधी आहे . तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे . " संध्याला त्याच्या बोलण्या मागचा अर्थ समजला . ती काहीच न बोलता त्याचा हात सोडून जाऊ लागली .
" संध्या प्लीज एकदा फक्त एकदा . " असे म्हणून स्वप्नील तिच्या समोर हात जोडून उभा राहिला . पण संध्या त्याला बाजूला सारून धावत जाऊन गाडीत बसली आणि ढसा ढसा रडू लागली . संध्याच्या पाठोपाठ स्वप्नील धावत जाऊ लागला .
" अरे नील , काय झालं ? तू तिच्या पाठोपाठ धावत का जातोयस ? "
" आई तू जे सांगितलं होतस ते मी केलं . " धापा टाकीत स्वप्नील म्हणाला . लताला त्याच्या बोलण्याचा काहीच उमज पडेना . दिपा संध्या कडे गेली . पण तिला काय बोलावं ते कळेना .
स्वप्नीललाही काही सुचेनासं होऊन गाडीत डोक्याला हात लावून बसला . वेणूने पेटींगचं सामान गोळा केले आणि इतर आवर आवर केली . मग गाडीत बसली . दामोदर रावांनी गाडी सुरु केली . वाटेत कुणी कुणाशी बोललं नाही . मात्र संध्या सारखी रडत होती . तिच्या मनाच्या दुखण्यावर आज कुणी मीठ चोळलं होत . सगळे समजून होते . म्हणून कोणीच बोललं नाही .
दोन दिवस झाले . दिपा लताकडे गेलीच नाही . ' कसं जाऊ ? काय म्हणतील त्या ? " वैगरे प्रश्न तिच्या मनात घोळू लागले . .
" काय आई ... तू मावशी कडे गेली नाहीस ? " स्वप्नील विचारला .
" कसं जाऊ ? त्यादिवशी जे झालं . त्यामुळे ..... " तिचं बोलणं मध्येच थांबव त
" आई , तू त्यांच्याकडे बोलायच सोडू नकोस . साधी माणसं आहेत . हवं तर तुझ्या मनाच्या समाधानासाठी त्यांची क्षमाही माग .पण संबंध तोडू नकोस . " स्वप्नील म्हणाला . ते ऐकून दिपाला खूप बरे वाटले . दुसऱ्याच दिवशी संध्या कॉलेजला जाऊ लागली . तिच्या पाठोपाठ स्वप्नील गेला . खांद्याला बॅग अडकवून , खाली मान घालून ती भरभर चालत होती . स्वप्नीलची बाईक होती . भुर्रकन गाडी सुरु केली आणि तो तिच्या कॉलेजच्या गेटकडे थांबला . ती आपल्या च नादात कुणाशी हसणं नाही की , बोलणं नाही . स्वप्नीलने तिच्याच क्लास मध्ये असलेल्या एका मुलीला बोलावलं . आणि लंचब्रेक झालं की , एक फोन कर . " म्हणून सांगितलं . त्याची ओळख सर्वत्र होती . त्या मुलीने लगेच होकार दिला .
दुपारी लंचब्रेक झाला . तसा स्वप्नील आपल्या दहा - बारा मित्रांसमवेत तिच्या कॉलेजात आला . त्यामुलीने संध्याच्या क्लासमध्ये त्याला नेले . संध्याने बँचवरची सारी वह्या - पुस्तकं बॅगेत घातली . आणि जेवणाचा डबा बाहेर काढला . तोच स्वप्नील तिच्या समोर येऊन उभा राहिला . त्याला पाहताच ती खूप घाबरली . खाली मान घालून तिथेच बसली . तिची भयभीत अवस्था पाहून क्षणभर स्वप्नील गोंधळला .
" संध्या , तू मला कां घाबरतेस ? मी तुला काहीही करणार नाही . " असे स्वप्नील म्हणताच संध्याने एकदा त्याला पाहिले . पुन्हा मान खाली घातली .
" त्या दिवशी मी तुझ्याकडे क्षमा मागितली . तेव्हां तू मला उतर दिलं नाहीस . मला तुझ्या कडून उतर हवंय म्हणून मी इकडे आलो य . " त्यावर संध्या
" मला तुमच्याशी कोणत्याच विषयावर बोलायच नाहीय " असे म्हणून उठून जाऊ लागली . तेव्हां त्याने तिचा हात पकडला . ती आणखीन घाबरली .
" प्लीज सोडा . मला जाऊ द्या प्लीज . " ती हात सोडवून घेण्यास धडपडू लागली .
" मला उत्तर दे . मग मी सोडतो . "
" मी दोन दिवसांनी सांगते . " संध्या असे म्हणताच त्याने तिचा हात सोडला . ती धावतच तिथून निघून गेली . तो ही जाऊ लागला . तेव्हां त्याच्या मित्रांनी त्याला बोलावले .
स्वप्नील घरी आला . पण त्याचं कशातच लक्ष लागेना . दुसरे दिवशी त्याने आपल्या पंसतीचं ड्रेस आणि मॅचिंग ज्वेलरी आणला .
" आई , तू हे संध्याला नेऊन दे . " दिपाच्या हातात तो बॉक्स देत म्हणाला .
" मी नाही रे बाबा , तुमच्या भानगडीत मी पडणार नाही . " दिपा म्हणाली . बाहेर कॉलनी मध्ये साफ - सफाई आणि सजावट सुरु झाली . वेणूला आणि दिपाला उत्साहाचे उधाणे आले होते . पण स्वप्नील उदास होता . मनाची अस्वस्थता वाढत चाललेली होती . ' तिच काय उत्तर असणार ? ' हा प्रश्न त्याला रात्रंदिवस छळत होता . दोन दिवस झाले . तिसऱ्या दिवशी सकाळी
" दादा , आज कोजागीरी पौर्णिमा आहे . आज रात्रभर जागं राहायचं तू तयार आहेस ? " वेणू आनंदाने उत्साहाने विचारली . त्यावर स्वप्नील हलकेच हसून ,
" हो , मी सुद्धा तुझ्या बरोबर जागा राहणार . " म्हणाला . " खरंच ? मग तू उदास कां आहेस ? मी दोन दिवस बघते . बोल ना . " वेणू विचारली .
" अगं , मी कुठे उदास आहे ? " स्वप्नील म्हणाला .
" कशाला खोटं बोलतोस .? मी सांगू की तू सांगतोस ? दिपा म्हणाली .
" मी आभ्यासमुळे जरा उदास होतो . आई , मी जरा मित्रांकडे जातो . " स्वप्नील म्हणाला .
तो गेल्यावर
" हे काय चाललय आई ? " वेणू विचारली .
" अगं , मला वाटते त्याचं आणि संध्याचं काहीतरी चाललय . काल तो मला बॉक्स देत होता कसलातरी संध्याला द्यायला . मी नकार दिला . " दिपा म्हणाली .
" कसला बॉक्स ? " वेणूने विचारल
" काय माहिती ? मी नाही उघडून बघीतलं . " असे म्हणून दिपा आत गेली . दुपारी स्वप्नील गच्चीत उभा राहून शेविंग करत होता . इतक्यात बाजूच्या गच्चीतून धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला . त्याने वाकून बघीतले . पुस्तकांचा भला मोठा ढिगारा . संध्या पुस्तके गोळा करत होती .
"संध्या , लौकर आवर आणि खाली ये . " स्वप्नील म्हणाला त्याला बघून ती घाबरली आणि आत पळून गेली . स्वप्नीलने कपाळाला हात मारून घेतले.