भगवद्गीतेचा अभ्यास...
- योगेश रामनाथ खालकर
2019 या सरत्या वर्षाला उत्साहाने निरोप दिल्यावर 2020 या वर्षात काय संकट वाढून आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. जानेवारी 2020च्या मध्यापासूनच या संकटाची चाहूल लागली. संकट होते अर्थात कोरोनाचे. कोरोना एक महाभयंकर आजार ठरला आहे. जगातील सारी मानवसृष्टी यामुळे घाबरून गेली. चीनपासून प्रारंभ झालेला हा आजार अवघ्या काही दिवसात विश्वव्यापी बनला. भारतातही फेब्रुवारी–मार्च पासून हा आजार आपला प्रभाव दाखवू लागला. भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी उपायोजना सुरू केल्या. यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो लॉकडाऊनचा. भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशाला संबोधित करून 14 एप्रिल 2020 पर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला. 14 एप्रिल नंतर परिस्थिती आटोक्यात न आल्याने लॉकडाऊन 3 मे 2020 पर्यंत वाढवला. आजार पसरू नये म्हणून सदरचा लॉकडाऊन एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
लॉकडाऊन असल्याने घरात अडकून राहिल्यासारखे झाले. पहिले दोन – तीन दिवस विशेष काही वाटले नाही. नंतर घरी राहण्याचा कंटाळा येत होता. दुसरा पर्याय नव्हता. घरी राहणे अनिवार्य होते. मग हा कंटाळा घालवण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. स्वतःच्या प्रगतीसाठी याचा वापर करण्याचे मी ठरवले. भगवद्गीता लहानपणापासून मला माहित होती. मात्र असे असले तरी भगवद्गीतेचा अभ्यास काही करता आला नव्हता. या सक्तीच्या रिकाम्यावेळेत अर्थात लॉकडाऊन काळात भगवद्गीता अभ्यासावी असे वाटले आणि मग प्रयत्नपूर्वक अभ्यास सुरू केला. त्याचाच हा लेखनप्रपंच अंतरंगात डोकावतांना भगवद्गीतेचा अभ्यास...
भगवद्गीता म्हणजे महभारतातील भीष्मपर्वात झालेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा कुरूक्षेत्रावर घडलेला संवाद होय.
किती रंगविसी रंग, रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरीरंग, रंग खेये आभायात ||
श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई यांच्या वरील ओळीत चितारलेले विलोभनीय वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाचे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक विलोभनीय व्यक्तिम्त्त्व. त्यात अनेक रंग असल्याचे जाणवते. हजारो वर्षे उलटून गेली तरी भगवान श्रीकृष्ण ही प्रतिमा तेजस्वी वाटते. भगवान श्रीकृष्णाचे जीवनचरित्र पहात असताना अनेक रूपे आपल्याला दिसून येतात. त्यापैकी मला भावणारे रूप म्हणजे कुरूक्षेत्रावर दोलायमान मनस्थिती असलेल्या अर्जुनाला संवादरूपी साधकबाधक चर्चा करून त्याला कर्तव्य श्रेष्ठ असण्याची जाणीव करून देणारे योगेश्वराचे रुप. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यातील हा संवाद म्हणजेच भगवद्गीता होय.
भगवद्गीता अनेक महान संदेश प्राप्त होतात. कर्म करत जा, कर्मफळ बघू नका. जीवनात ज्ञान, कर्म, आणि भक्ती यांना महत्त्व आहे. आपले हातातले कार्य सोडू नका. सदैव कार्यरत रहा. नैराश्य सोडा. असे कितीतरी संदेश भगवद्गीता विशद करते. हे संदेश अगदी आजच्या काळाला लागू पडतात. आजची परिस्थिती खूप धकाधकीची आहे. या वातावरणात माणूस नेहमी प्रगतीचा विचार करतो. प्रगती करत असताना नैतिक काय अनैतिक काय याचा देखील विचार करत नाही. आज सर्वत्र कर्तव्य टाळण्याकडे माणसाची प्रवृत्ती झाल्याचे दिसून येते. कर्तव्याविषयी टाळाटाळ करणारा माणूस हक्कांविषयी मात्र खूप जागरूक आहे. हे जीवन जगण्यासाठी विपरीत आहे. अशा या विपरीत परिस्थितीमध्ये हक्काइतकेच कर्तव्याला महत्त्व द्या. असा संदेश श्रीमद्भगवद्गीता सामान्य माणसाला देते. गीतेमध्ये प्रतिपादन केलेले तत्त्वज्ञान हे विजिगीषू तत्त्वज्ञान आहे. त्यात सर्वसामान्य माणसांना उत्साहित व कर्तव्यपरायण तसेच नीतीपरायण करण्याचे सामर्थ्य आहे. भगवद्गीतेत प्रतिपादन केलेले हे विजिगीषू तत्वज्ञान गेली हजारो वर्ष माणसांना धर्म व उन्नतीचा मार्ग दाखवत आहे. उत्तरोत्तर नैतिक अधःपाताची समस्या गंभीर होत असताना गीतेत व्यक्त केलेले विचार हे समस्या टाळण्यासाठी संजीवनी ठरतील अशी आशा वाटते.
भगवद्गीतेचे हे महत्त्व लक्षात घेऊन लॉकडाऊन काळामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास करावा असा विचार मनात आला. लहानपणापासून भगवद्गीतेचे श्लोक माहित होते. भगवतगीतेचे तत्वज्ञान समजण्यासाठी सखोल अभ्यास करावा असे वाटायचे आणि सुदैवाने ही संधी मिळाली. सर्वप्रथम मी ऑनलाईन अभ्यास करावा असे ठरवले. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वर्गात जाऊन गीतेचा अभ्यास करणे शक्य नव्हते. यामुळे ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय निवडला. इंटरनेटवर बरीच शोधाशोध केली. भगवद्गीतेसंबंधित अनेक चांगले अभ्यासक्रम ऑनलाईन असल्याचे आढळले. भगवद्गीतेसंदर्भात विविध माहिती सुद्धा ऑनलाईन आढळली. यातून bhagavadgeeta.com या वेबसाईटवरचा अभ्यासक्रम मी निवडला. एकंदर तीन आठवड्याचा हा अभ्यासक्रम होता. वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन केले आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवला आणि मग सुरुवात केली भगवद्गीतेच्या अभ्यासाला.या अभ्यासक्रमात एक ते अठरा अध्यायातील सातशे श्लोकांविषयी विस्तृत माहिती दिली आहे. खरोखर भगवद्गीतेची एक नवीनच माहिती मिळत होती. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक 20 गुणांची प्रश्नमंजुषा देखील होती तीदेखील ऑनलाईन. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक दोन दिवसांनी मी ती प्रश्नमंजुषा सोडवली. प्रश्नमंजुषा यशस्वीरित्या दिल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झाले. खरोखर एक विलक्षण अनुभव होता हा ! भगवद्गीता ऑनलाईन शिकण्याचा. या सुट्टीच्या काळात कित्येक दिवसापासून बघितलेले स्वप्न पूर्ण झाले.