तरुण विचारांचे मासिक
जानेवारी २०१८ मध्ये मासिकरूपी छोटेसे रोप लावले गेले आणि ई-साहित्य क्षेत्रात नव्या साहित्य युगाचा 'आरंभ' झाला. अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या मराठीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे पडू नये यासाठी काही देश-विदेशातील मराठी मनांनी केलेला हा प्रयत्न आहे. तरुण विचारांना व्यक्त होण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळावे हादेखील त्यामागे उद्देश होता. केवळ तरुणच नव्हेत तर बालगोपालांचाही विचार आम्ही केला बरं!! वाचनाची आवड बालपणापासून मनात रुजावी या हेतूने सुट्टी विशेषांकही प्रकाशित करण्यात आला होता. आणि दिवाळीच्या साहित्य फराळाची खुसखुशीत चव असणारा दिवाळी अंकही !!
आरंभ मासिकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे ई-मासिक android app स्वरूपात प्रकाशित होते. आणि विशेष म्हणजे ते offline स्वरूपात वाचकांना उपलब्ध होते. एवढेच नाही तर पूर्वीचे अंक देखील त्याच अँप्लिकेशनमध्ये ते देखील ऑफलाईन वाचता यावे याची सोय केली आहे. ज्यांना अँप्लिकेशनपेक्षा ई-बुक स्वरूपात वाचणे आवडते त्यांच्यासाठी गूगल बुक स्टोरवर वाचायला मिळते. कोणत्याही स्वरूपात वाचनासाठी हे त्रैमासिक मोफत उपलब्ध आहे.
ज्याप्रमाणे ज्ञानदेव माऊली म्हणतात,
इवलेंसे रोप लावियलें द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥
त्याप्रमाणे २०१८ पासून इवल्याश्या रोपट्याप्रमाणे असलेला आरंभ मासिकाचा वेल गगनापर्यंत अविरतपणे झेपावतो आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. सगळ्या लेखक-वाचकांचे मनापासून धन्यवाद!!
प्रासंगिक स्पर्धांचे लेखक वाचकांसाठी आयोजन करण्याचा आरंभ परिवाराचा नित्य प्रयत्न असतो आणि त्याला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद हीच आमची ऊर्जा आहे. कोरोना महामारीसारख्या अनाहूतपणे आलेल्या संकटकाळी जेव्हा सगळीकडे भय आणि निराशा पसरत आहे तेव्हा आरंभ परिवाराने सकारात्मक विचारमंथनासाठी एक छोटासा प्रयत्न केला... 'लॉकडाऊन लेखन स्पर्धा'. अचानकपणे स्वतःच्याच घरात बंदिस्त व्हावे लागले तेव्हा अनेक जणांना स्वतःचीच दुसरी बाजू नव्याने उलगडली. या दुसऱ्या बाजूचे आणि विचारांचे एकत्रीकरण लॉकडाऊन लेखन स्पर्धेच्या निमित्ताने झाले. मनाला उभारी देणारे, स्वतःचीच त्रयस्थपणे सखोल समीक्षा करायला लावणारे आणि त्यासोबतच थोडेसे मनोरंजन करणारे असे हे सगळे लेख 'लॉकडाऊन लेखन स्पर्धा विशेषांक' स्वरूपात वाचकांपुढे सादर करत आहोत. आपल्याला हे नक्कीच आवडतील आणि मनात साचलेले मळभ दूर करायला मदतीचे होतील अशी अपेक्षा आहे.
मैत्रेयी पंडित
सहसंपादक
आरंभ... नव्या साहित्य युगाचा