मला मी भेटले नव्याने...
- अश्र्विनी निवर्गी
अगदी मनातले लिहायला सुरुवात करताना असे वाटायला लागले की खरेच माझे मन मला कळले आहे का?
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा?
कधी तेजाचे आवर्त असलेले हे मन डोळे दिपवून टाकते तर कधी काळोखाची गुंफा होत खोल खोल आठवणीत गरगरायला लावते. या मनात खूप काही दडले आहे पण लेखणीतून कितीसे शब्द पाझरतील सांगता येत नाही. मग आपल्याला आपली ओळख होणे हेच फार आवश्यक असते. माझ्यातल्या मी समोर पारदर्शीपणे उभे राहता येणे ही सगळ्यात मोठी कसोटी आहे. इतरांच्या समोर तुम्ही कसेही वागा, वागण्यावर, शब्दांवर कितीही मुलामा चढवा स्वतः समोर उभे राहणे फार कठीण आहे. मी आणि माझ्यातली मी यांच्यातले अंतर जितके कमी, तितके आपण अधिक सुखी आणि समाधानी असतो.
जगभर कोरोनाच्या महामारीने कळस गाठला आहे. निसर्गाच्या रौद्र रूपा समोर माणूस किती हतबल आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. लॉकडाऊन मुळे सर्व जण घरात बंदिस्त झाले आहेत. कधी नव्हे तो खूप सारा वेळ मिळाला आहे. अनेक समस्या दत्त म्हणून समोर उभ्या आहेत. ज्या परिस्थितीची कधी कल्पना सुद्धा केली नव्हती अशी परिस्थिती समोर येऊन उभी आहे. आणि ती कधी संपेल याबाबत खूपच अनिश्चितता आहे. आता या वेळेचं करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. मला मात्र हा प्रश्न मुळीच पडला नाही.
माझे घर म्हणजे वैचारिक वारसा चालवणारे, पुस्तकांनी व्यापून राहिलेले घर. घरातले सर्वजण साहित्याचे उपासक असल्यामुळे आणि त्याच क्षेत्रामध्ये नोकरी करत असल्यामुळे, आमच्या घरात असंख्य पुस्तके सुखाने नांदत आहेत आणि त्यांना व्यापून उरलेल्या जागेत आम्ही राहतो आहोत.
आता काहीच करायचं नाही फक्त वाचन करायचं,असं ठरवलं तरी माझं आयुष्य संपेल पण पुस्तके संपणार नाहीत इतकी पुस्तके घरात आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यांच्यासोबतच माझी चौथी मुलभूत गरज म्हणजे वाचन. त्यामुळे या काळात असंख्य पुस्तके वाचली. काही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचताना अर्थ नव्याने उलगडले.
व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तके वाचायला मला खूप आवडते. डॉक्टर पॉल हॉक व डॉक्टर वेन डायर हे माझे आवडते लेखक. त्यांच्या काही पुस्तकांची मी अक्षरशः पारायणं केली. स्वतःच स्वतःला सुधारणं हे माणसाला आयुष्यभर पुरून उरणारं काम आहे यावर माझा गाढ विश्वास आहे. मला वाटतं मी आधिक शांत व खंबीर झाले आहे. या महामारीतून आपण बाहेर पडणारच असा विश्वास घेऊन जगते आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारी मी आता बरीच समजुतदार झाले आहे. माझ्या पतीचे सुद्धा हेच मत आहे ( बहुधा ).
एकांतात शांतपणे बसून आपल्या अंतरंगात डोकवायला मला खूप आवडते. त्यामुळे मीच मला नव्याने भेटते. स्वतः बद्दलचे अनेक शोध नव्याने लागतात.
पुस्तकांना जवळ घेता घेता पुस्तकांनीही मला जवळ घेतले आणि माझ्यातल्या वाचकाचा प्रवास लेखकाकडे सुरू झाला. काही महिन्यांपासून मी लिहीत आहे. एक कवितासंग्रह आणि दोन कथासंग्रह लिहून तयार आहेत पण लॉकडाऊन मुळे त्यांचे प्रकाशन लांबणीवर पडले आहे. मी लिहिलेल्या कविता ग्राफिक्सच्या माध्यमातून पार्श्वसंगीतासह तयार केल्या. आपलीच कविता आपल्याला नव्या रुपात भेटताना, छान नटवलेलं बाळ कुशीत घेताना जसा आनंद होतो तसा आनंद झाला. विनवणी, खरं सांग निर्भया,लव्ह मॅरेज, हे मृत्यू,नाळ अशा अनेक कविता नव्याने नटल्या. कोरोनाचा काव्यमय संदेश तयार केला. एवढंच नाहीतर कोरोनाबद्दल समाजप्रबोधन व्हावे म्हणून एक नाटिका लिहिली. माझ्या काव्यात आणि नाट्यात रंगलेल्या कुटुंबाने त्यात उत्साहाने भाग घेतला आणि ती नाटिका इतकी आवडली की अनेक पत्रकार बंधूंनी त्याला भरपूर प्रसिद्धी दिली. अंबाजोगाई नगरपरिषदेने तर समाजप्रबोधनासाठी त्या नाटिकेची निवड केली आहे. आता ती नाटिका पूर्ण गावभर वाजत अंबाजोगाईकरांचे मनोरंजन व प्रबोधन करत आहे.
आपल्याला स्त्रीवादी दीर्घकथा आणि लघुकथा यांच्या बरोबरच रहस्यकथा आणि विज्ञानकथाही लिहिता येतात हा नवा शोध माझा मलाच लागला आणि लिहिण्यासाठी आणखी एक नवे क्षितीज निर्माण झाले. या काळात मी सामाजिक आशयावरील काही कथा लिहिल्या. काही रहस्यकथा लिहिल्या. विज्ञान कथा लिहायची धडपड सुरू आहे. काही लेख व कविता सुध्दा लिहिल्या.
काळाचा महिमा अगाध आहे. मी मी म्हणणा-या मोठ्या छापील मासिकांचे काम ठप्प झाले तर ई-मासिके मात्र जोमाने बहरली. साहित्य दरबार, संवाद डॉट नेट, अक्षरबंध, या मासिकांमधून माझ्या कथा वाचकांसमोर येत राहिल्या. प्रतिलिपीवरही मी लिहू लागले. शिक्षण संकल्प आणि आपलं मन मध्ये लेख प्रकाशित झाले. बिईंग वुमनच्या तरुण, कल्पक आणि धडपड्या संपादिकेशी झालेली ओळख आणि जुळलेला स्नेह भविष्यात माझी पाऊलवाट निर्माण करणारा ठरेल.
माणसाला जगण्यासाठी काय हवे असते ? फक्त एक ओंजळभर धान्य. त्यात त्याचे पोट सुखाने भरते. आपण इतक्या कमी गरजात इतक्या सुखाने राहू शकतो हेही सर्वांनाच नव्याने कळले. माझी आई नेहमी सांगायची, बाळा, कोंड्याचा मांडा करायला शिक. आर्थिक स्थिती चांगली असल्याने कधी कोंड्याचा मांडा नाही करावा लागला. पण आता दूध नाही, फळं नाहीत, भाज्या नाहीत तरीही घरात असलेल्या किराणा सामानात असंख्य नवे पदार्थ कसे बनवता येतात हेही लक्षात आले. एरव्ही एखादा पदार्थ जरी मनासारखा नसेल तरी लगेच स्विगी किंवा झोमॅटो ला फोन लावणा-या कन्येला आई घरात इतके चविष्ट पदार्थ बनवते याचा शोध लागला. स्वावलंबनाचे धडे माझ्याकडून या काळात खूप छानपणे तिने गिरवले. कॉफी आणि मॅगी च्या पलीकडे दुसरे काहीच न येणाऱ्या लाडक्या लेकीला आता तवा पुलाव सुद्धा बनवता येतो. अत्यंत अबोल, शांत असलेल्या पतीशी वेळेअभावी कधीच फारसे बोलू न शकलेल्या अनेक गोष्टी मनमोकळेपणाने बोलता आल्या. संवाद आहेच तो सुसंवाद झाला. "बस गं लिहित. तुझा मूड आहे ना छान लिहिण्याचा. मग आज भाजी मी करतो. तोपर्यंत तू एक छानशी कथा लिही."हे त्यांचे बोल ऐकले आणि मनाबरोबर डोळेही भरून आले. आम्ही बायका मायेच्या दोन शब्दांसाठी किती आसुसलेल्या असतो. घरकाम तर आम्ही बायका नेहमीच करतो. पण आता सारे घरंच घरकामात मदतीला उभे राहिले.
धुणीवाली, भांडीवाली, स्वयंपाक करणाऱ्या मावशी या सर्वांना भरपगारी रजा दिली आणि त्या किती काम करतात हे कळून श्रमाला प्रतिष्ठा आली. माझ्या लेकीने स्वतः स्वावलंबनाचे धडे घेतले आणि मला तंत्रज्ञानाचे धडे दिले.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत माझी मुलगी माझी गुरु आहे. कम्प्युटरच्या बाबतीत रोज एक तरी गोष्ट शिकायचीच हा मी माझ्यासाठी केलेला नियम आहे. त्यात आता भर पडली आणि एकाच दिवशी असंख्य गोष्टी रोजच मी शिकू लागले. अनेक गोष्टी मी शिकले तरीही वाटते की अजून खूप काही शिकायचे बाकी आहे. काळाची पावले ओळखून, आपण जास्तीत जास्त तंत्रस्नेही असणं ही काळाची गरज आहे.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सारे जग जवळ आले. परदेशी राहणाऱ्या आणि तिथेच अडकलेल्या असंख्य नातेवाईकांचे अनुभव, आठवणी माऊसच्या एका क्लिकवर जाणून घेतल्या. कोरोना च्या बाबतीत इतकी भयानक परिस्थिती तिकडे आहे. त्यामानाने आपली परिस्थिती बरी आहे.
आयुष्याच्या दुखवट्यावर डॉक्टर, पत्रकार, पोलीस मिळून हळूवार फुंकर घालत आहेत. त्यांचे आणि प्रशासनाचे आपण ऐकले पाहिजे आणि नियम पाळले पाहिजेत.
मी या काळात अनेक नवीन गोष्टी शिकले. नुसते शिकून उपयोग नाही तर त्यांचा वापर करेन आणि त्यात सातत्य ठेवेन. हा काळ अंतर्मुख होऊन सखोल चिंतन करण्याचा आहे. या वेळेचा सदुपयोग मी करत आहे. दोन वर्षांपूर्वी मी जशी होते तशी आज नाही. आज आहे त्यापेक्षा दोन वर्षांनंतर अशी राहणार नाही. माझी सुधारित आवृत्ती सर्वांना पहायला मिळेल हे नक्की.
कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे,
असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
प्रत्येक जण आपापल्या परीने या आव्हानाला उत्तर देत आहे. आता मात्र हे उत्तर आपल्याला सर्वांना मिळून द्यायचे आहे. लवकरच ही महामारी जावो, आणि आरोग्यपूर्ण वातावरण आपल्याला मिळो या सदिच्छेसह,
घरी रहा, सुरक्षित रहा.